बुधवार, ३० सप्टेंबर, २०२०

कृष्णा_कोयना

 


कृष्णा_कोयना 



त्या दोघी बहिणी... खरं तर एकाच ठिकाणी जन्मल्या म्हणून बहिणी म्हणायच्या. पण त्यांना मैत्रिणी म्हणणं जास्त योग्य वाटतं.. दोघी मैत्रिणी माझ्या फार आवडीच्या.. पूर्वी तर मला त्यांना भेटायला कोणत्याही ऋतुतला कोणताही दिवस चालायचा.. लहानपणी काय आणि वयात आल्यावर काय तितकीच ओढ होती त्यांना भेटायची.. 

दोन मैत्रिणी कश्या अगदी जिवलग असल्या तरी त्यांचं वागणं एकसारखं नसतं..

एक अगदी शांत, जबाबदार, विचार करून वागणारी असते.. 

तर दुसरी अल्लड, उत्स्फूर्त बागडणारी.. सगळ्यांच्या खोड्या काढणारी असते.. कदाचित या विरोधी गुणांमुळेच दोघी अगदी घट्ट मैत्र असणार्‍या म्हणूनच जास्त लोभसवाण्या आहेत..  

दोघी आपआपल्या वाटेनं मार्गक्रमण करणार्‍या पण अगदी जिवाभावाच्या..  


एक कृष्णा अन दुसरी कोयना..  

महाबळेश्वरसारख्या नयनरम्य ठिकाणी जन्मलेल्या.. पण उगम झाल्यानंतर दोघींनी आपआपले  मार्ग निवडले.. 

कृष्णाला समंजस समजायचे, कारण उगमानंतर दर्या-खोर्‍यात अडकून न रहाता ती घाटमाथ्याकडे जाते.. जातांना जबाबदारीची जाणीव तिला असते.. आपल्या काठावर असणार्‍या पिकांना पाणी पाजून तृप्त करण्याची, ताजेतवाने करण्याची जबाबदारी.. वाटेत भेटणार्‍या प्रत्येकाला शांतावत जात असते.. 

याउलट कोयना, तिला डोंगर, दर्याखोर्‍यात रहायला आवडतं.. अवखळपणे डोंगरावरून दरीत कोसळायला तिला आवडते.. बरेच डोंगर तिच्या प्रेमाचे.. तिच्या या बेधडक कोसळण्याचाच तर उपयोग केला आपल्याला वीज मिळण्यासाठी.. कोयना धरणात आल्यावर जणू तिची सगळी ऊर्जा ती आपल्याला देते.. 

एकीनं दिलेलं पाणी तर दुसरीनं दिलेली वीज आपलं जगणं सुकर करून टाकतात.. 


अश्या या दोघी कराड गावात प्रवेशतात तेव्हा एकमेकींना घट्ट मिठी मारतात.. जणू प्रेमाचं माणूस किती विरहानंतर भेटतंय.. विलक्षण अशी ही त्यांची भेट, प्रीतिसंगम नावानं आम्हाला ओळखीची.. 

असामान्य असं हे भेटणं आहे, कारण समोरासमोरून आलेल्या दोघी १८० कोनात भेटून पुढे ९० अंशाचा कोन करून एकत्र हातात हात घालून पुढे जातात.. पुढे कोयनेचं कृष्णेत समरस होऊन कृष्णा नावानेच ओळखलं जाणं.. क्वचित दिसणारा हा निसर्गाचा चमत्कारच म्हणायचा.. 

 

अश्या या दोघी अतूट सख्या...  ग्रीष्मात शांत, नितळ तर वर्षा ऋतुत भरभरून वहातात, अथांग बनतात.. महाबळेश्वरला जास्त पाऊस झाला की, कृष्णेच्या पात्रात वाढ होणार, ती कोयनेला फुगवणार असं म्हणतात. तर कोयना धरणातून पाणी सोडलं तर कोयना गावाकडे शिरणार.. पूर्वी पाणी सोडण्याआधी एकतर रेडियोवर बातमी द्यायचे नाही तर दवंडी पिटवायचे.. आम्हाला फार अप्रूप असायचं पाणी किती वाढतंय याचं.. एकतर काठावरच्या मंदिरापर्यंत आलेलं पाणी बघायला तोबा गर्दी व्हायची. नाहीतर आमच्या कॉलेजकडे जाणार्‍या पूलावरून पाणी गेलं का ते बघायला.. पूर्वी कमी उंचीचा पूल होता तेव्हा, पूलावरून पाणी जातंय तोपर्यंत कॉलेज बंद असणं ही आनंदाची गोष्ट असायची. त्यावेळी मुद्दाम दिवसातून तीन तीनदा पाणी बघायला जायचं.. आताशा तो नजारा बघायला मला मिळत नाही पण पाऊस सुरू असला की मी फोनवरून हमखास पाणी किती वाढलंय याची चौकशी करते. मग घरचं कोणीतरी फोटो काढून पाठवतं.. फोटोतून दोघींना बघून समाधान मानावं लागतं.. चैत्रातला उत्सव, हळदीकुंकू असतो त्यावेळी जर नदीला पाणी कमी झालं असेल तर मुद्दाम धरणाचं पाणी सोडायला लावतात.. आधी नदीला हरबरे, काकडी अर्पण करून मग सगळ्या बायका एकमेकींना हळदीकुंकू द्यायच्या.. सगळ्यांचीच नदी ही पहिली मैत्रीण.. महाशिवरात्रीच्या दिवशी आमच्या शिवमंदिरात लघुरूद्र करायला हिचेच पाणी आम्ही घेऊन यायचो.. इतरदिवशी रोज संध्याकाळी मंदिरात दिवा लावायच्या निमित्तानं दोघींना डोळेभरून पहायला जायला मी नेहमीच खुश असायचे..      

कराडला असणार्‍या प्रत्येकालाच या दोघींच्या संगमात सकाळी आपलं शरीर झोकून मनसोक्त पोहणं आकर्षित करतं आणि संध्याकाळी सूर्य अस्ताला जाताना, एखाद्या मित्र मैत्रिणीच्या सहवासात पात्रात पाय टाकून, हाताशी असलेले गोटे पाण्यात टाकत, चपट्या दगडाच्या पाण्यात भाकर्‍या करत, मनसोक्त गप्पा मारण्याचा अनुभव मोहरून टाकतो.. 


(सोबत दिलेला फोटो आंतरजालच्या सौजन्याने घेतलेला आहे. दोघींचं समोरासमोर मोहक भेटणं दाखवायला..)



राजेश्वरी 

रविवार, २७ सप्टेंबर, २०२०

पक्षी गणना दिवस




 हॅलो, राजेश्वरी,

जाऊन आला का ग किशोर?
काय काय बघायला मिळाले मग?
मी : बघतोय . आत्ताचा count १८ झाला ,अजून थोडावेळ बसू .
मैत्रीण : म्हणजे , तू पण गेलीस ? अगं मग मला नाही का सांगायचे ? मी पण आले असते ना ..
मी : आत्ता येतेस का? अजून एक तासभर तरी आहोत आम्ही इथे..
मैत्रीण : नको , मी संध्याकाळी आले तर चालेल का?
का तुमचे काही वेगळे प्रोग्रॅम आहेत?…
मी : नाही ग . काही वेगळे प्रोग्रॅम नाहीत . ये तू . आपण पुन्हा दुसरीकडे जाऊ...
आज का दिन डॉ. सलीम अली के नाम।....
१२ नोव्हेंबर डॉ. सलीम अलींचा वाढदिवस ..पक्षी निरीक्षण/पक्षी गणना दिवस म्हणून साजरा करायचा.
२,३ दिवसांपासून किशोरचे सुरू होते रविवारी मी पक्षी बघायला जाणार. सकाळी सकाळी मला वाटलं आपण पण जाऊया.. उठलो , कॅमेरा घेतला आणि तळ्याकाठी जायला निघालो.. कधी क्लिक करायचे, कधी दुर्बिणीतून बघायचे आणि नावे लिहायची असे ठरवत असतानाच मला तारेवर खंडया (किंगफिशर) दिसला . चला सुरुवात तर किंग पासून होतेय !! खूप छान वाटले. त्याचे मनसोक्त फोटो काढले कारण तो फक्त इकडे तिकडे बघत होता पण उडाला मात्र नाही. घरी आल्यावर फोटो zoom करून बघितले तर दिसले की काही फोटोत त्याचे डोळे चक्क मिटलेले दिसले . म्हणजे पक्षी सुद्धा आपल्यासारखेच असतात..झोपून उठल्यावर देखील आपण नाही का कधी सोफावर , कधी गादीवरच पेंगत बसतो तसेच यांची पण सवय दिसतेय. पेंगता पेंगता पडत तर नसतील ना ? क्षणभर मनात विचार आला कसा धडपडत पुन्हा उडेल ना ..डोळ्यासमोर चित्र येऊन माझं मलाच हसू आलं.
त्याचे फोटो काढून पुढे निघणार तोच समोरच्या झुडपात काहीतरी हलले.. किशोर ,कोकिळा , कोकिळा !! मी ओरडलेच.. अगं ओरडू नकोस , उडेल ना ती. इति किशोर ... ५,७ फुटांवर मस्त पैकी कोकिळा बसलीय.. तिच्या अंगावरचे ठिपके खुलून दिसत होते. फारच सुंदर दिसत होती ती . असं म्हणतात की सगळ्या पक्षांमध्ये 'ति'च्यापेक्षा 'तो ' जास्त सुंदर असतो. फक्त कोकीळ पेक्षा कोकिळा अधिक सुंदर दिसते याची प्रचिती आली. ती अशी काही बसून तिच्या लाल डोळ्यांनी आमच्याकडे बघत होती तेंव्हा नकळतपणे 3 idiots मधल्या कोकिळेचीच आठवण आली. ही पण बहुदा झोपेत असावी. तिने पण आम्हाला फोटो काढायच्या वेगवेगळ्या पोझेस दिल्या.
२ दिवसांपासूनच थंडीची चाहूल लागलेली. पहाटेच्या गुलाबी थंडीत उबदार मऊ पांघरुणातून बाहेर पडून उगाचच पायपीट करतोय असं वाटू नये म्हणूनच की काय दोघांनी सुरूवातीलाच खुश करून टाकलं..
आता मात्र आम्हाला खूपच हुरूप आला. पुढे गेलो तर गडद निळ्या जांभळ्या रंगाच्या १२,१३पाणकोंबड्या मस्तपैकी गवतात बागडत होत्या. या मात्र चांगल्याच ताज्यातवान्या दिसत होत्या. कोवळ्या सुर्यकिरणांचे पृथ्वीवर आगमन झाले होते , त्यामुळे त्यांचा जांभळा निळा रंग एकदम लकाकत होता. नुकतीच अंघोळ केल्याप्रमाणे त्या सगळ्याच स्वच्छ आणि तजेलदार दिसत होत्या. त्यांना भूक पण लागलेली असणार, कारण त्या भरभर मातीतले किडे टिपत होत्या. त्यांना पण कॅमेरात टिपून आम्ही पुढे गेलो. तर समोरच कोतवाल ने दर्शन दिले. कोतवाल आणि टिटवी कधी झोपत असतील काय माहीत? कारण रात्री सुद्धा ते फिरतच असतात. अखेर त्यांनाही कॅमेऱ्यात कैद केले आणि आम्ही तलावावर पोचलो.
पांढरा आणि चिमणा कुदळ्या (White Ibis and Glossy Ibis), बगळे , वेडा राघू (bee-eater), करकोचे आणि पाणकावळे एकेक करून उडत उडत आपली उपस्थिती दर्शवू लागले. प्रत्येक पक्षाची एक वेगळीच खायची पद्धत असते. जसे पोपट आपण जेवतो तसे पायात खाद्य पकडून तोंडात घालतात . खूप मजा येते पोपट खाताना बघायला. तसे वेडा राघू झेप घेऊन एक मधमाशी पकडतो, पुन्हा फांदीवर बसतो, माशीचा विषारी डंख आपटून आपटून तोडतो आणि मग खातो. कोणी शिकवले असेल यांना ही काळजी घ्यायला?
तलावाजवळ आल्यावर पाण्यातील माशांवर ताव मारणारे बरेच पक्षी दिसले . प्रत्येकाची मासे पकडायची आणि खायची तऱ्हा वेगवेगळी .. बगळे एका पायावर तासनतास उभे राहतात स्थितप्रज्ञ जसे. पाणकावळे (Cormorant) पंख तेलकट नसतात त्यामुळे ते मासा पकडला आणि पंख ओले झाले की खूप वेळ एका जागी बसून पंख फडफडवत बसतात. ते दृष्य बघताना असे वाटते की दोन्ही हातात खूप मोठे झेंडे धरून ,'मी इथे ऊभा' आहे असा प्रत्येक जण इशाराच देतोय जणू . संथ पाण्यात आपल्या बदकांची झुंड जेंव्हा पुढे येऊ लागते तेंव्हा तर पाण्यावर असे काही तरंग उठतात की बघतच रहावेसे वाटते. त्यात एका थव्यातल्या बदकांच्या पोटावर तपकिरी ठिपके आणि चोचीवर पिवळा आणि कपाळावर लाल ठिपका. असे वाटले की बुट्ट्यांची साडी नेसलीय आणि कपाळावर हळदीकुंकू लावलंय. म्हणूनच किती समर्पकपणे त्यांचे नाव हळदीकुंकू बदक असे ठेवलेय..
किती पाहू आणि किती नको असे झाले. पण घरी तर परतावेच लागले. सगळ्या पक्षांचा निरोप घेऊन संध्याकाळी पुन्हा भेटायच्या बोलीवर परत फिरलो..
घरी आल्यावर सुद्धा मनात सगळे पक्षी फेर धरून नाचत होते. कॅमेरातील त्या कैद्यांना पुन्हा पुन्हा पाहून चर्चा सुरू होती..त्या धुंदीतच दुपारचे ४ कधी वाजले कळालेच नाही.. आता आमच्या दोघांबरोबर एक मैत्रीण आकाशात स्वैर संचार करणाऱ्या या दूतांना बघायला सज्ज झाली होती..
सकाळी सुरुवात किंगफिशर ने केली होती आणि आता आपल्याच तोऱ्यात असणाऱ्या मोराने .... रॅम्प वॉक (योग्य मराठी शब्द सापडला नाही) करत आमच्या समोरून ऐटीत रस्ता ओलांडला. काय ती ऐट अहाहा!! आपलाच पिसारा सांभाळत जेंव्हा तो दिसेनासा झाला तेंव्हा आम्ही भानावर आलो. मोर कितीही वेळा समोर आला तरी बघतच राहावंसं वाटतं. निसर्गाच्या या किमयेपुढं मान झुकवावीशी वाटते.
पुढे गेलो तर समोरच्या हर्बल गार्डन मध्ये नीलपंख (indian roller) त्या छोट्या छोट्या रोपट्यांवरून संचार करत होता. इवली इवलीशी ती रोपटी त्याचा भार पेलायला असमर्थता दाखवत झुकून जायची मग हा आपले निळेशार पंख उलगडून दुसऱ्या रोपट्यांकडे झेपावायचा. ते उघडलेले कमी अधिक निळेशार पंख समुद्राच्या लाटांचा आभास निर्माण करायचे. ५ मिनिटात तो किमान २५ वेळा तरी इकडून तिकडे उडाला असेल. जणू काही म्हणतोय की काढा माझे फोटो किती काढायचे तितके. आहेच मी तसा विलोभनीय. विशेष म्हणजे ती छोटी छोटी रोपं सुद्धा त्याला सांगत होती की ,'अरे तू बसलास तर तुझे सौंदर्य कसे दिसेल यांना? थोडावेळ तू उडतच रहा बरं'. (कारण पंख मिटल्यावर तो तपकिरी जास्त आणि थोडासा निळसर दिसतो)
निलपंख वरून थोडीशी नजर हटवली तोच डोक्यावरच्या तारेवर एक पंचरंगी पोपट (plum headed parakeet)... मी तर याला प्रथमच पहात होते. आत्तापर्यंत फक्त गळ्यावर काळा गोल कंठ असलेले आणि नसलेले असे पोपट बघत आलेले. आणि आता हा म्हणजे गडद लाल डोक्याचा आणि पोपटी शरीर.. रंगपंचमी ला कोरडा लाल रंग एखाद्याच्या चेहऱ्यावर भरपूर फासल्यावर कसे दिसेल , अगदी तस्सेच वाटले मला. त्या लाल डोक्याखाली एक काळे गोल वलय/कंठ.. जसे काही दृष्ट लागू नये म्हणून गळ्यात आईने काळा गोफ बांधलाय. पंख त्यामानाने शरीरापेक्षा थोडेसे गडद पोपटी आणि शेपूट मात्र शरीरापेक्षाही लांबलचक. केशरी बाकदार चोचीने झाडावरची शेंग पकडून शेंगेतील एकेक दाणा खाण्यात अगदी मग्न झाला होता तो. आम्हीपण मग त्याच्या खाण्यात व्यत्यय न आणता पुढे निघालो...
पुढे बरेच छोट्या छोट्या पक्षांचे थवे दिसले. जसे चीरक, दयाळ, सुर्यपक्षी आणि मैना...
सूर्यास्त व्हायला अजून तासभर तरी बाकी होता. एका बाजूला कावळ्यांची शाळा भरली होती. डोक्यावरून छोट्या छोट्या तपकिरी मुनिया मजेत हुंदडत होत्या. काहींच्या पोटावर गडद तपकिरी ठिपके दिसत होते..
चालत चालत तलावाकाठी पोचलो तर पांढराशुभ्र नदी सुरय (River Tern) घिरट्या घालत होता. त्याची पिवळी धमक चोच आणि केशरी पाय सुर्यकिरणांमुळे त्याच्या सौंदर्यात अजूनच भर टाकत होते. घिरट्या घालता घालता मधेच पाण्यात झेपावून मासा पकडून लगेचच वर झेपावयाचा.. काय अचूक अंदाज असेल , इतक्या वेगात पाण्याजवळ यायचे, कचकन ब्रेक दाबायचा , चोच उघडून मासा उचलायचा आणि लगेच वेग वाढवून वर झेप घ्यायची.. प्रचंड नियंत्रण असले पाहिजे. यांचा मेंदू किती वेगाने चालत असेल नाही. कितीही थवा मोठा असला तरी उडताना यांचे नाही कधी एकमेकांवर आपटून अपघात होत. नाहीतर आपण जरा कुठे ट्राफिक जाम झाला तर पुढे जाण्याच्या गडबडीत एकमेकांवर आपटणारच. एकमेकांवर कुरघोडी करायची असते ना. पक्ष्यांच्या सारखे नाही , थवा उडत असताना पुढचा पक्षी दमला असे दिसले तरच दुसरा पुढे येतो.. असेच मजल दरमजल करीत नवीन पाहुणे बदकं दाखल झालेली दिसताहेत समोर. चक्रवाक (Ruddy shelduck) काठावर जवळजवळ बसली होती. नुकतीच दाखल झाली असल्याने परिसराची ओळख करून घेताहेत असे वाटत होते. थोडीशी बावरलेली, थोडीशी बुजलेली आहेत असे वाटले. नर्सरीत पहिल्यांदाच शाळेत प्रवेश घेतला की कशी बावरलेली मुले असतात ना अगदी तश्शीच दिसली. असे वाटले की त्यांच्या जवळ जावे आणि सांगावे, बाबांनो , तुम्ही इथे अगदी सुरक्षित आहात. मनसोक्त पाण्यात डुंबत रहा आणि मजा करून छान छान आठवणी घेऊन पुन्हा इथेच येण्याचे वचन देऊनच जा..
थोडावेळ तलावाच्या काठाकाठाने फिरून लवकरच परत फिरायचे होते. कारण सूर्यास्तानंतर इथे थांबणे धोक्याचे असते. पाय वाटेने जात असतानाच किशोर कॅमेऱ्यात छोट्या मोठ्या पक्षांचे फोटो काढण्यात मग्न असायचा त्यामुळे आजूबाजूला मला लक्ष ठेवायला लागायचे. अचानक लांब काहीतरी चकाकत होते. लगेच लक्षात आले की एक मोठा नाग आपले वस्त्र सोडून गेलाय. जवळ जाऊन हातात उचलून धरली तर कात जवळपास एक मीटर पेक्षा लांब होती आणि अजून १,२ वीतभर लांबीचे तुकडे जवळच पडले होते पण तोंडाचा भाग काही दिसत नव्हता. एकंदरीत नाग बऱ्यापैकी लांब असणार. आणि कात एकदम मऊ होती म्हणजे नुकतीच टाकलेली. प्रत्येक गावात आजूबाजूला भरपूर जंगल असेल अशीच सरकारी घरे मिळाली , त्यामुळे आता कात हातात घेतली की लगेच कळते ताजी आहे की जुनी. आता इथे थांबण्याचा प्रश्नच नव्हता. परत फिरलो. आता मात्र सावध होतो. मैत्रिणीला हातातली कात दाखवत काही जुन्या आठवणी सांगत होते आणि अचानक पायापासून २,३ फुटांवर दिसले की साहेब वेटोळे घालून आमच्याकडे बघत असलेले.. मातीच्या रस्त्यावर मातकट रंगाचा तो लांबलचक साप कदाचित दिसला पण नसता पण तिरक्या सुर्यकिरणांमुळे तो चकाकत होता. क्षणभर आम्ही स्तब्ध झालो. आता हा काय पवित्रा घेतो असा विचार डोक्यात येईपर्यंत त्यानेच आपली दिशा बदलून झाडीत जाणे पसंत केले आणि आम्ही सुटकेचा निश्वास सोडून पुढे निघालो . तोपर्यत लालबुंद सूर्यबिंब पाण्यात सामावयाला सुरुवात झाली होती. पूर्ण सूर्यास्त झाल्यावर निघायचे ठरवले आणि एका बाकावर शांत बसलो.
जवळच असलेल्या 2,3 झाडांवर छोटी छोटी घुबडं सूर्यास्तानंतर दिसतात हा नेहमीचा अनुभव... आणि आजही टपोऱ्या डोळ्यांचे तपकिरी ठिपकेदार घुबड आपल्या जागेवर बसून रोखून बघत होते..
दिवसभर इतके फिरलो पण थकल्याचा लवलेशही नव्हता . आजचा दिवस निसर्गाच्या अदभुत किमया बघून मन प्रसन्न करून गेला..
स्व. डॉ. सलीम अलींना मनोमन श्रद्धांजलीच वाहिली जणू...
... राजेश्वरी किशोर १२/११/१७
(मनातले विचार त्याच रात्री गडबडीत लिहिले गेले पण दुरुस्त्या करायला वेळ लागला)
Meenal Umrani, Rashmi Ankalikar and 3 others
8 Comments
Seen by 12
Like
Comment

Comme

वालचंद कोठाडीया आर्ट गॅलरी

वालचंद कोठाडीया आर्ट गॅलरी 



आज एका आगळ्यावेगळ्या कलेविषयी लिहावसं वाटतं आहे इथे. कलेची एक दृष्टी, नजर असली की काय घडू शकते याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हे कलादालन...

         यात १९२९, १९३० सालापासून करत आलेल्या काही अप्रतिम कलाकृती पाहायला मिळतात. आत्तापर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या रंगांनी आपल्या कुंचल्यातून रंग भरून केलेली चित्रे पाहिली होती. पण इथली विलक्षण चित्रं पाहून कलाकाराच्या कलाकृतीला सलाम केल्यावाचून रहावत नाही.

        थोडेसे कलादालनाच्या कल्पनेविषयी....

       स्वतः इंजिनीअर असलेले सर जेव्हा जेव्हा आपल्या वडिलांच्या कलेला बघत तेव्हा तेव्हा काहीही करून या कलेला समाजापर्यंत पोचवण्याची खूणगाठ मनाशी बांधत. त्यासाठी आपल्या कमाईतून थोडी थोडी रक्कम बाजूला काढत. एक स्वप्न साकार करण्यासाठी आयुष्यभर झटतात.. निपाणी किंवा कराड सारख्या छोट्याशा गावापेक्षा पुण्यासारख्या शहरात याला योग्य न्याय मिळेल असं वाटून निवृत्ती नंतर सर्व जमापुंजी वापरून एक असे घर घेतात की जिथे एक दालन फक्त आपल्या वडिलांची कला लोकांपर्यंत पोचवण्यासाठी असेल. दुसरे दालन अशाच हरहुन्नरी कलाकारांसाठी असेल की जे तरुण पिढीला आपल्या वेगवेगळ्या कला शिकवू शकेल. तिथे सुट्टी मध्ये मुलांना वेगवेगळ्या प्रकारच्या कला शिकवल्या जातात...

       एका दालनात आपल्या वडिलांचा हा अमुल्य ठेवा फ्रेम्समध्ये जपून ठेवलाय. दालनात प्रवेश केल्यावर एकेक चित्रं बघत गेले आणि सगळे उद्गारवाचक शब्द ठेंगणे वाटावेत अशी स्थिती झाली. काय अफलातून कला आहे ही? कुठेही न शिकवली जाणारी. याला फक्त आणि फक्त तशी नजरच पाहिजे.  

     सरांच्या वडिलांनी केलेल्या कलाकृतीचा माझ्या शब्दातील आढावा...   

      (सरांचे वडील, त्यांना मी आजोबा म्हणते म्हणजे लिहिणे सोपे जाईल) आजोबा एक शिक्षक होते. शाळा संपवून घरी आले की बायको काहीतरी रेशीम घेऊन भरतकाम करताना दिसायची. आपल्याच साडीवर केलेले सुंदर भरतकाम पाहून खुश व्हायची. पण आजोबांना वाटायचे की, साडी वापरून फाटली की संपलं सगळं. मग काय उपयोग या कलेचा. असा विचार करून आजोबांनी रेशमाच्या लडी हातात घेतल्या मात्र. त्यातून जिवंत केली एकेक चित्रं. रेशमाच्या असंख्य छटा वापरून निसर्ग चित्रं बनवू शकतो पण चेहऱ्यावरील भाव साकारणे किती कठीण. एका रंगात दुसरा मिसळला की नवीन रंग तयार करता येतो पण रेशीम कसे मिसळणार? त्यातून त्यांनी साकारले अनेक अप्रतिम चेहरे. आणि एक "कुतुबमिनार"  चे चित्र तयार करताना तर किती वेळेस रेशीम तोडून,जोडून, गाठी मारून त्याची उंची, छटा साकार करण्यासाठी प्रयत्न केलेत. हे चित्र दालनातल्या मांडणीत मात्र सरांनी कल्पकतेने उलटे फ्रेम केलंय, ते एका टीपॉय वर ठेवले आणि खाली आरशात त्याचे प्रतिबिंब म्हणजे तयार झालेले चित्र दिसते. उद्देश जाणकाराला पडद्यामागची कलाकारी दिसावी. अशी रेशीमकाम केलेली विविध चित्रे तयार करायला काय मेहनत लागली असेल, कारण एका चित्राला ४,६ महिने तरी नक्कीच गेले असायचे.

           पण अशा फक्त एकाच प्रकारावर प्रतिभा भागेल तो कलाकार कसला? 

      रस्त्यातून येताना शिंप्याचे दुकान दिसायचे. त्याने टाकून दिलेल्या चिंध्या बघून मनात विचार आले आणि मग घेऊन यायचे त्या चिंध्या आणि कापून चिकटवून काही चित्रे तयार व्हायची. चिंध्याचे तुकडे पण किती लहान हो, अगदी २,४ mm चे पण. बापरे, इतके बारीक तुकडे कापून ते चिकटवणे अशक्यप्राय गोष्ट. किती संयमाने करावे लागले असेल. आणि त्यातून साकारली एक बेजोड अप्रतिम कलाकृती... "छत्री दुरुस्त करणारा माणूस"! या एकाच चित्रात विविधता किती कल्पकतेने आणलीय, ती उभी स्त्री, दुरुस्तीच्या कार्यात मग्न असलेला मान खाली घातलेला तो कारागीर, त्याच्या हातातली छत्री, दुरुस्तीच्या सामानाचे सर्व साहित्य आणि इतर... याच प्रकारातले दुसरे चित्र साकारले तो "बैरागी" ... त्याचे केशरी वस्त्र, कमंडलू, काठी, सगळे केशरी रंगाच्या वेगवेगळ्या छटा वापरून ... काय सुरेख छटा तयार केल्यात त्या कपड्यांच्या तुकड्यांमधून...

       कधीतरी एकदा आजोबांना माशाचे खवले नजरेस पडले. आले की घरी घेऊन आता याचे काय करायचे विचार करत, दाढी करायच्या ब्लेड ने छोटे छोटे खवले बोटात पकडून त्याला आकार देत आणि मग चिकटवून साकार झाल्या त्या "WELCOME" आणि बसलेले "गौतम बुध्द" अशा दोन अप्रतिम फ्रेम्स.

        आजी लांबसडक केस विंचरत असताना काही केस खाली पडले. ते आजोबांनी उचलले. रोज थोडे थोडे असे एकत्र करत गेले आणि सुईत ओवून कापडावर भरतकाम करतात तसे विणून तयार झाले ते "रवींद्रनाथ टागोर" आणि "विजयालक्ष्मी पंडित" !! काय मस्त भाव उमटलेत त्यांच्या या दोन्ही चित्रात!  दुरून पाहिले की वाटते पेन्सिलने काढलेले चित्र असेल. पेन्सिलने काढताना चुकले तर एकवेळ खोडता येतेही पण एकेक केस कापडावर टाके घालत चेहरा साकारायचा आणि चेहऱ्यावरचे भावही निर्माण करायचे म्हणजे... नाही मी नाहीच करू शकत याचे नीटसे वर्णन.

         एकदिवस आजी शेंगा फोडताना दिसली. उचलली काही फोलं, बोटात घेऊन त्याला ब्लेडने आकार देत छटांचे विचार करत जोडत गेले आणि "महात्मा गांधीजींचा चेहरा." अवतरला...

        घरात आंब्याची पेटी आली की मिळाले यांना आयते गवत. काही जाड, काही बारीक, काही भडक, काही फिकट रंगाच्या काड्या कापून, जोडून बनवली गेली एक "बावरी स्त्री" आणि कसल्याशा ओढीने वाट पाहत बसलेला एक "छोटासा मुलगा". दोघांच्या चेहऱ्यातील ते आर्त भाव त्या निर्जीव गवतातून निर्माण करण्याचे अचाट साहसच ते.

गव्हाच्या काड्या बघितल्या शेतात आणि त्याच्या सुंदर सोनेरी झलक मुळे उठाव आलेले तयार झाले ते "यशवंतराव चव्हाण", "जवाहरलाल नेहरू" आणि "लेनिन". यशवंतरावांची प्रेमळ नजर, नेहरूंचे कर्तृत्ववान बोलके डोळे. सगळं सगळं आणि तेही त्या गवताच्या काड्यापासून.. अवर्णनीय.

        एकदा घरातले लाईट गेल्याचे निमित्त झाले आणि fuse वायर आणली. आता राहिलेल्या वायरचे काय करायचे. यांच्या डोक्यात चक्रे सुरू झाली. त्यातून तयार झाल्या दोन सुंदर कलाकृती. "वनांत विश्रांती घेत असलेले जणू राधा कृष्णच" आणि "एक पक्षी,त्याची भेदक नजर."

         आजी त्यादिवशी अळूच्या वड्या करणार होत्या. अळू धुवून पाटावर मांडून ठेवले होते. काकांची नजर त्या अळूवर गेली. एक पान उचलले आणि त्यावर रंगवले गांधीजी. ५०,६० वर्षांपूर्वी तयार झालेले हे चित्र आजही तितकेच सुरेख दिसतेय.

        पुढे गेल्यावर दिसले ते कातरकाम केलेले "राजर्षी शाहू महाराज" आणि "मोतीलाल नेहरू"... एक कागद दाढीच्या ब्लेडने कोरत जायचा आणि त्यातून चेहऱ्यावरच्या रेषा, महाराजांचा फेटा, करारी डोळे... विचार करणं थांबूनच जातं इथे. 

         त्याचबरोबर आजोबांनी केलेली निसर्ग चित्रं, तंबाखू उद्योगाला भारतात चालना दिलेले तंबाखू सम्राट म्हणून ओळखले जाणारे देवचंद शेटजी, गुजगोष्टी करत बसलेले जोडपे, अशी काही कापडाचे तुकडे चिकटवून साकारलेली चित्रे. अप्रतिम....

   आजोबांनी सर्वात शेवटची रेशमांनी तयार केलेली कलाकृती म्हणजे त्यांच्या घरासमोरच नेहमी बसणारा, कष्टाची कामे झाली की आरामात सिगरेट बोटात पकडून बसलेला, थकलेला "शंकर." एका कष्टकऱ्याच्या चेहऱ्यावरचे काय भाव टिपलेत त्यात. कमालच केलीय.

         अशी बरीच चित्रे बघून झाल्यावर साहजिकच आजोबांबद्दल अजून जाणून घ्यायची उत्सुकता निर्माण झाली...

          सन १९२९ साली जे. जे. स्कूल ऑफ आर्टस् मध्ये त्यांनी पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला. महर्षी कर्वे यांच्या ध्येयाने प्रेरित होऊन निपाणी सारख्या छोट्या गावात "फिमेल एज्युकेशन सोसायटीची" स्थापना केली. १९३८ साली निपाणी मध्येच कन्या शाळेची स्थापना केली. तेव्हापासून शाळेत कला शिक्षक म्हणूनच काम केले. घरातच "भरतकला मंदिर" स्थापन केले आणि अखेरच्या श्वासापर्यंत इच्छुकांना मोफत कला शिक्षण दिले. त्यांचे एकच म्हणणे असायचे... कला विकायची नाही !!     त्या आजोबांचे नाव आहे... 

    निपाणीभूषण कलामहर्षी गुरुवर्य

     श्री. वालचंद कोठाडीया...

    पुण्यातील कलादालन त्यांच्या मुलांनी म्हणजे अरविंद सरांनी मोठ्या कष्टाने उभे केले. उदघाटन उषा मंगेशकरांच्या हस्ते २०१० साली केले. उषा मंगेशकरांनी त्यांच्या फोटोचा अल्बम बघितला मात्र आणि लगेचच विना मोबदला उदघाटनाला यायची इच्छा प्रकट केली. उदघाटन सोहळ्यात सगळी चित्रे निरखून बघत त्याचे कौतुक करत होत्या. 

      नंतर लवकरच सर अचानक निवर्तले. पण तरीही आपल्या वडिलांची इच्छा त्यांच्या दोन मुली आपल्या आई सह योग्यप्रकारे सांभाळतात. आपापल्या घराला व व्यवसायाला सांभाळून दोन्ही मुलींचे कलादालनाच्या उत्कर्षासाठी सर्वपरीने प्रयत्न सुरू असतात...हे ही कौतुकास्पदच... असे हे दालन सर्वांसाठी रोज संध्याकाळी ४ ते ८ वेळात सर्वांसाठी खुले असते... खास वेळ काढून आवर्जून बघण्यासारखे...


         राजेश्वरी

        १३/०२/१८

      उदाहरण दाखल काही फोटो देत आहे...












 

शुक्रवार, २५ सप्टेंबर, २०२०

ग्रेट_भेट प्र_के_घाणेकरसर

 

ग्रेट_भेट

प्र_के_घाणेकरसर

 

कधी, कुठे भेटायचे ठरवता ठरवता अखेर CME मध्येच भेटू असा निरोप आला. दुपारी चार वाजताच येणार होते प्र. के. घाणेकर सर. प्रकाशन कार्यक्रम झाल्यावर पुस्तक घेतलेले दाखवून, सरांनी आवर्जून मला सांगितले, वाचतो आणि मग भेटून बोलू." मी देखील नक्की भेटू म्हणाले आणि विसरून पण गेले. अर्थात त्यादिवशी असे बर्याचजणांनी सांगितले होते. त्यानंतर जवळपास महिना उलटून गेल्यावर त्यांचा निरोप आला. खरेतर त्यांचा निरोप येईपर्यंत त्यांचे एकही पुस्तक मी वाचलेले नव्हते. ज्या व्यक्तिला भेटायचे त्यांची थोडीफार माहिती तरी हवी ना? म्हणून मी आधी आंतरजालावर माहिती घेणे सुरू केले. बापरे! सत्तरहून जास्त पुस्तके लिहिलीत या माणसाने.. वयाची सत्तरी पार केलेली.. महाराष्ट्रच काय इतर देखील गड किल्ले सर करून मगच त्यावर पुस्तक लिहायचे. जात्याच वनस्पतीशास्त्राचे प्राध्यापक असल्याने गडावरच्या वनस्पतींचा देखील त्यात मागोवा घेतलेला. त्यांनी अंदमानवर एक पुस्तक लिहिलेले असल्याने मला जरा टेन्शनच आले. त्यांचे एकतरी पुस्तक वाचावे म्हणून मी पळाले अप्पा बळवंत चौकात.. बरीच शोधाशोध केल्यावर एक पुस्तक हाती लागले. दरम्यान यू ट्यूब वर त्यांची काही भाषणं ऐकली. माहिती घेत गेले आणि त्यांची महती जाणवत गेली. ते घरी येण्याचा क्षण जवळ आला तशी मनातली भीती वाढत होती पण आपल्या पुस्तकाबद्दल काय बोलतात याची उत्सुकता देखील होती..

 

सर घरी आले. छान गप्पा सुरू झाल्या आणि त्यांनी माझ्या पुस्तकात केलेल्या टिप्पणीचा कागद बाहेर काढला. चक्क दोन पाने भरून लिखाण केलेले होते. सर अजूनही आंतरजाल किंवा मोबाइल फोन वापरत नाहीत. त्यांच्याशी बोलायचे ते लॅंडलाइन फोनवरच.. त्यांनी लिहून आणलेल्या कागदावर बर्याच शंका, प्रश्न होते. त्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे, शंका निरसन झाल्यावर आम्ही CME तलाव बघायला बाहेर पडलो. फिरत असतांना आजूबाजूच्या झाडांचे निरीक्षण सुरू होतेच. त्याची माहिती आम्हालाही सांगत होते. काही त्यांच्या आठवणी, किस्से सांगत होते. एक फार मजेशीर किस्सा त्यांच्या तोंडून ऐकला...

आम्ही पाच जण गडावर फिरायला गेलो होतो. वाटेत मस्तपैकी भाजी तळण्याचा घमघमाट येत होता. पाच कांदा/खेकडा भजीची ऑर्डर दिली, तर एक मित्र ओरडला, अरे, नाही बाबा, मी गडावरच्या शिवलिंगाचे दर्शन घेतल्याशिवाय काहीच खाणार नाही.' मग आम्ही चार प्लेट भजी सांगितली. तोपर्यंत मी इकडेतिकडे पहात होतो. मी शोधत होतो एक झाड. आणि मला ते लगेचच सापडले. त्याची काही फळे तोडून मित्राला दिली आणि सांगितले, ही फळे हातावर चोळत रहा त्यातला रस निघून जाईल आणि हातात फक्त बिया रहातील तेव्हा मला दाखव. मी काय आणि का सांगतोय तो उद्देश न कळल्यामुळे तो निमूटपणे हातात फळं रगडत राहिला. हात कोरडे झाल्यावर बिया मला दाखवल्या. मी त्या बिया हातावर घेतल्या आणि सांगितले नीट निरीक्षण कर, तुला यात काय दिसते ते पहा. त्याने क्षणभर त्या बिया निरखल्या आणि साक्षात माझे पाय धरले. तू महान आहेस म्हणाला. आणि लागलीच भजीची पाचवी प्लेट मागवली. असे सांगून सर आठवणीने हसू लागले..  कसल्या होत्या त्या बिया माहीत आहे? एक मिनिट थांबा, मी तुम्हाला पण दाखवतो असे म्हणाले आणि जवळच्याच एका झाडाची सुकलेली फळे चुरगाळून त्यांनी आम्हाला त्याच बिया दाखवल्या.. साक्षात शिवलिंगाचा आकार होता त्यांचा.. त्या बिया पाहून आम्हीदेखील चाट पडलो..  

 

अशाच विविध गमतीजमती, अनुभव सरांच्या तोंडून ऐकत आम्ही फिरत होतो.. सुरुवातीची भीती सरांशी बोलतांना कधी नाहीशी झाली ते कळलेच नाही. अगदी मैत्रीपूर्ण गप्पा सर मारत असल्याने आमचे औघडलेपण नाहीसे झाले होतेच..           

    

 

अस्ताला चाललेला सूर्य, हवेत हलकीशी हालचाल, मावळतीचे रंग, निर्मळ वातावरण सरांना खूपच आवडले. त्या निसर्गाचाच फायदा घेऊन मी हळूच सरांना पुस्तक कसे वाटले ते विचारले. त्यांच्या परवानगीने त्याचे रेकॉर्डिंग केले. त्यांच्याशी बोलतांना जाणवत होते, फार अभ्यासपूर्ण वाचन केले आहे सरांनी..

 

अंधार पडला तेव्हा घरी येऊन गरम गरम कांदेपोहे आणि चहाचा आस्वाद घेऊन निरोप घेतला. वेळ पुढे सरकत होती पण गप्पा संपत नव्हत्या..

 

पुन्हा एकदा भेटू या म्हणत एका ग्रेट भेटीची' सांगता झाली.

 

 

राजेश्वरी

२९/०२/२०२०  

 

 



 


 

दृश्य

 दृश्य  

 

शांतपणे खिडकीशी उभी होते..  

खूप दिवसांनी कोवळं ऊन झाडांना उजळवत होतं...   

पावसाची रिपरिप रिमझिम शांत झाली होती...   

जमिनीवर नुकतेच कोंब फुटून हिरवा गार गालिचा तयार होऊ लागलाय..   

पावसाने आडोश्याला बसलेले पक्षी बाहेर पडून चिवचिवू, बागडू लागलेत..   

मजा येतेय त्यांची लगबग बघायला...

इतक्यात अचानक एक पक्षी धोक्याची सूचना द्यायला कलकलू लागतोय…

सगळे पक्षी जागरूक होऊन, घाबरून सैरभैर होऊ लागलेत...

गोड चिवचिवाट आता कल्ला वाटू लागला...   

मी खाली पहाते तर सीताफळाच्या झाडाच्या खोडावर हालचाल दिसली... 

वरून खोडाचाच काळपट तपकिरी रंग पण खालून पिवळी धमक रंग असलेली एक प्रचंड मोठी धामण शांतपणे खाली उतरत होती..  

आनंदाने सुरू असलेला चिवचिवाट शांत झालेला असतो..

असहायपणे गिळंकृत केलेल्या आपल्या साथीदाराला दुरावतात, पहात रहातात... 

जणू श्रद्धांजली वहातात..  

धामण आपले कार्य साध्य करून आपल्या मार्गाला निघून जाऊ लागते... 

पाण्याने भरून गेलेले आपले बीळ सोडून दुसरीकडे सुस्तावायला...  

एका क्षणात बदललेली परिस्थिती... 

जीवन मरणाचा खेळ... 

मला विचार करायला लावून गेली...


                              

 

                                                 राजेश्वरी

                                                १०/०७/२०१९ 

घारींचे संमेल्लन

 घारींचे संमेल्लन 

 

(ऑफिसर्स इन्स्टिट्यूट ची इमारत... डाव्या बाजूला स्विमिंग पूल...  2,3 मुले मस्तपैकी पाण्यात उडया मारण्यात दंग असतात... उजव्याबाजूला लांबच लांब पसरलेले हिरवेगार गवत.. ते इतक्या कडक उन्हात सुद्धा हिरवेगार रहावे म्हणून त्यावर सोडलेली पाण्याची पाईप..

ती आणि तो सकाळी  कुठेतरी भटकून आलेले असतात.. सकाळी 8 वाजताचे कोवळे ऊन आणि पाईप मधून येणारे थंडगार पाणी... घोट घोट पाण्याचा आस्वाद घेताना एकमेकांना तृप्त झालेले पहात असतात... बहुतेक रोजच त्यांची सकाळ अशी जात असणार.. बघायला कोणी नाही.. कदाचित त्यांची दखल घ्यायला देखील कोणी येत नसावे...

पण आजचा दिवस जरा वेगळाच उजाडला आहे की काय असे दोघांनाही वाटत असते.. पाणी पीत असतांनाच एक पांढरी शुभ्र कार रस्त्यावर अचानक थांबते.. दोघांचेही लक्ष कारकडे जाते. कार मधून हळूच एक व्यक्ती उतरते. आणि अचानक दोघेही सतर्क होतात.)

 

ती:: अरे हे तर मिलिंद . हेच ते आहेत ना जे टेल्को च्या त्या तलावावर आले होते ना मागे एकदा.

तो:: अच्छा तेच तर नाहीत जे सारखे चित्रबलाक चे फोटो काढत होते.

ती:: हो रे तेच ते. त्यावेळी आपण ही होतो की झाडावर, एकदम झाडाच्या शेंड्यावर बसलो होतो ना.

तो:: हो ग त्यांच्या हातात बघ ना तीच तर बंदूक की काय आहे. मला तर फार भीती वाटली होती त्यावेळी.

ती :: मलाही सुरुवातीला वाटली होती की. पण नंतर कळाले. अरे बाबा ती बंदूक नाही. तो तर कॅमेरा आहे.

मी बघितले ते त्या छोट्याच्या पडद्यावर चित्रबलाकचे फोटो पण बघत होते.

तो:: आज तर त्यांना फारसे कोणीच मिळणार नाही फोटो काढायला.

ती:: ए आपण असे करू या ना?

तो:: काय?

ती:: आपण आज फुटबॉल मैदानावर सगळ्यांना बोलवूया. मिलिंद  आता नक्कीच तिकडे जाणार त्यांचा तो लाडका कॅमेरा घेऊन.

तो:: चल लवकरच बोलवूया सगळ्यांना.

(दोघेही तुंहुतुs टुहुंs टूsss करत उडत गेले.)

(त्यांच्या आवाजाने/बोलावण्याने आसपासचे सगळे सगेसोयरे जमले. सगळ्यांचे प्रश्नार्थक चेहरे. ???)

 

ती:: आपल्या भागात आज मिलिंद आलेत मोठा कॅमेरा घेऊन. आता थोड्याच वेळात ते इथे येतील.

तो:: आज आपण त्यांना निराश नाही करायचे. छोटी मुले जशी विविध गुणदर्शन करतात ना अगदी तसेच वेगवेगळे दर्शन त्यांना द्यायचे.

ती:: हो त्यांना आपण कधीच जवळून दर्शन दिलेले नाही. आज त्यांना खुश करून टाकू .

(मग दोघेही शाळेत शिक्षक सांगतात तसे...

 

1..ए तुम्ही तिघांन्नी मॉडेलिंग करायचे म्हणजेच माना इकडून तिकडे वेळावून त्यांच्या कॅमेरा कडे बघायचे. आपल्या पंखांवरची सुबक नक्षी दाखवायची त्यांना...

 

2..आता तुमच्या दोघा दोघांच्या जोड्या. बागेत बाकड्यावर जोड्या जोड्या कशा प्रणय करतात ना तसे चिकटून बसायचे..

तुम्ही आजोबा, त्या तीन जोड्यांवर लक्ष ठेवायचे...

(7 घारींचा फोटो.. )

 

3.. तू नुसताच पाणी पी. तुला तेवढेच जमते.

 

4.. आज तुम्ही तिघे मस्त अंघोळ करून आलेले दिसताय. तुमचे हे विराट पंख पसरवून दाखवा..

 

5.. तुला पाण्यावर सूर मारणे छान जमते, तू तसेच कर.

 

6.. तू आज फारच अस्वच्छ दिसतेस तू तुझे पंख चोचीने साफ करून दाखव जरा. तेवढीच तू स्वच्छ होशील त्यामुळे.) 

 

अर्ध्या तासाने मिलिंद आणि किशोर पोचले की...

आणि काय डोळे विस्फारून पाहतच बसले क्षणभर.

 

‘ती' आणि ‘तो’ दोघांनी सांगितल्या प्रमाणे जणू सगळे जण एकेकेक पोझ देऊ लागले.

अरे हे काय kite फेस्टिवल दिसतोय की इथे.. जमेल तसे, जमेल तितके दोघांनीही वेगवेगळ्या कोनातून फोटो काढणे सुरू केले की.. 

इतकावेळ लांबवर किडे खाण्यात मग्न असलेल्या मोराला मग थोडेच चूप बसवतेय? त्यानेही मग पाणी पितांना, एक रंगीबेरंगी स्टेज वर उभे राहून रोड मिरर मध्ये बघत  असे काही मॉडेलिंग केले की बस ...

‘तो' आणि ‘ती' विचारच करत बसले कितीतरी वेळ की आज सगळ्यांनी किती छान ‘विविध गुण दर्शन’ करून दाखवले.

मग चित्रपटात ‘स्पेशल अपियरन्स असतो तसे पाणकावळा, पाण कोंबडी, छोटा बगळा, मोठा बगळा, बदक, पांढरा कुदळ्या दर्शन देऊन आपआपल्या मार्गाने गेले.

मध्ये मध्ये छोटे छोटे पक्षी, फुलपाखरे आपल्याच मस्तीत नाचून गेली.

क्षी बघायचा सिझन नसतानाही अशाप्रकारे दोघांचे मन रिझवून टाकले सगळ्यांनी...

बाकीच्यांना बघायला परत यायच्या बोलीवर मिलिंद नी आपला कॅमेरा बॅगेत ठेवला... 

 

(सगळे फोटो मिलिंद केळकर यांच्या सौजज्ञाने..)

 

 

राजेश्वरी

२९/०५/२०१८. 

पाचोळा - कुसुमाग्रज

कविता रसग्रहण    पाचोळा - कुसुमाग्रज आडवाटेला दूर एक माळ तरू त्यावरती एकला विशाळ आणि त्याच्या बिलगूनिया पदास जीर्ण पाचोळा पडे तो उदास उषा ये...