बुधवार, ३० सप्टेंबर, २०२०

कृष्णा_कोयना

 


कृष्णा_कोयना 



त्या दोघी बहिणी... खरं तर एकाच ठिकाणी जन्मल्या म्हणून बहिणी म्हणायच्या. पण त्यांना मैत्रिणी म्हणणं जास्त योग्य वाटतं.. दोघी मैत्रिणी माझ्या फार आवडीच्या.. पूर्वी तर मला त्यांना भेटायला कोणत्याही ऋतुतला कोणताही दिवस चालायचा.. लहानपणी काय आणि वयात आल्यावर काय तितकीच ओढ होती त्यांना भेटायची.. 

दोन मैत्रिणी कश्या अगदी जिवलग असल्या तरी त्यांचं वागणं एकसारखं नसतं..

एक अगदी शांत, जबाबदार, विचार करून वागणारी असते.. 

तर दुसरी अल्लड, उत्स्फूर्त बागडणारी.. सगळ्यांच्या खोड्या काढणारी असते.. कदाचित या विरोधी गुणांमुळेच दोघी अगदी घट्ट मैत्र असणार्‍या म्हणूनच जास्त लोभसवाण्या आहेत..  

दोघी आपआपल्या वाटेनं मार्गक्रमण करणार्‍या पण अगदी जिवाभावाच्या..  


एक कृष्णा अन दुसरी कोयना..  

महाबळेश्वरसारख्या नयनरम्य ठिकाणी जन्मलेल्या.. पण उगम झाल्यानंतर दोघींनी आपआपले  मार्ग निवडले.. 

कृष्णाला समंजस समजायचे, कारण उगमानंतर दर्या-खोर्‍यात अडकून न रहाता ती घाटमाथ्याकडे जाते.. जातांना जबाबदारीची जाणीव तिला असते.. आपल्या काठावर असणार्‍या पिकांना पाणी पाजून तृप्त करण्याची, ताजेतवाने करण्याची जबाबदारी.. वाटेत भेटणार्‍या प्रत्येकाला शांतावत जात असते.. 

याउलट कोयना, तिला डोंगर, दर्याखोर्‍यात रहायला आवडतं.. अवखळपणे डोंगरावरून दरीत कोसळायला तिला आवडते.. बरेच डोंगर तिच्या प्रेमाचे.. तिच्या या बेधडक कोसळण्याचाच तर उपयोग केला आपल्याला वीज मिळण्यासाठी.. कोयना धरणात आल्यावर जणू तिची सगळी ऊर्जा ती आपल्याला देते.. 

एकीनं दिलेलं पाणी तर दुसरीनं दिलेली वीज आपलं जगणं सुकर करून टाकतात.. 


अश्या या दोघी कराड गावात प्रवेशतात तेव्हा एकमेकींना घट्ट मिठी मारतात.. जणू प्रेमाचं माणूस किती विरहानंतर भेटतंय.. विलक्षण अशी ही त्यांची भेट, प्रीतिसंगम नावानं आम्हाला ओळखीची.. 

असामान्य असं हे भेटणं आहे, कारण समोरासमोरून आलेल्या दोघी १८० कोनात भेटून पुढे ९० अंशाचा कोन करून एकत्र हातात हात घालून पुढे जातात.. पुढे कोयनेचं कृष्णेत समरस होऊन कृष्णा नावानेच ओळखलं जाणं.. क्वचित दिसणारा हा निसर्गाचा चमत्कारच म्हणायचा.. 

 

अश्या या दोघी अतूट सख्या...  ग्रीष्मात शांत, नितळ तर वर्षा ऋतुत भरभरून वहातात, अथांग बनतात.. महाबळेश्वरला जास्त पाऊस झाला की, कृष्णेच्या पात्रात वाढ होणार, ती कोयनेला फुगवणार असं म्हणतात. तर कोयना धरणातून पाणी सोडलं तर कोयना गावाकडे शिरणार.. पूर्वी पाणी सोडण्याआधी एकतर रेडियोवर बातमी द्यायचे नाही तर दवंडी पिटवायचे.. आम्हाला फार अप्रूप असायचं पाणी किती वाढतंय याचं.. एकतर काठावरच्या मंदिरापर्यंत आलेलं पाणी बघायला तोबा गर्दी व्हायची. नाहीतर आमच्या कॉलेजकडे जाणार्‍या पूलावरून पाणी गेलं का ते बघायला.. पूर्वी कमी उंचीचा पूल होता तेव्हा, पूलावरून पाणी जातंय तोपर्यंत कॉलेज बंद असणं ही आनंदाची गोष्ट असायची. त्यावेळी मुद्दाम दिवसातून तीन तीनदा पाणी बघायला जायचं.. आताशा तो नजारा बघायला मला मिळत नाही पण पाऊस सुरू असला की मी फोनवरून हमखास पाणी किती वाढलंय याची चौकशी करते. मग घरचं कोणीतरी फोटो काढून पाठवतं.. फोटोतून दोघींना बघून समाधान मानावं लागतं.. चैत्रातला उत्सव, हळदीकुंकू असतो त्यावेळी जर नदीला पाणी कमी झालं असेल तर मुद्दाम धरणाचं पाणी सोडायला लावतात.. आधी नदीला हरबरे, काकडी अर्पण करून मग सगळ्या बायका एकमेकींना हळदीकुंकू द्यायच्या.. सगळ्यांचीच नदी ही पहिली मैत्रीण.. महाशिवरात्रीच्या दिवशी आमच्या शिवमंदिरात लघुरूद्र करायला हिचेच पाणी आम्ही घेऊन यायचो.. इतरदिवशी रोज संध्याकाळी मंदिरात दिवा लावायच्या निमित्तानं दोघींना डोळेभरून पहायला जायला मी नेहमीच खुश असायचे..      

कराडला असणार्‍या प्रत्येकालाच या दोघींच्या संगमात सकाळी आपलं शरीर झोकून मनसोक्त पोहणं आकर्षित करतं आणि संध्याकाळी सूर्य अस्ताला जाताना, एखाद्या मित्र मैत्रिणीच्या सहवासात पात्रात पाय टाकून, हाताशी असलेले गोटे पाण्यात टाकत, चपट्या दगडाच्या पाण्यात भाकर्‍या करत, मनसोक्त गप्पा मारण्याचा अनुभव मोहरून टाकतो.. 


(सोबत दिलेला फोटो आंतरजालच्या सौजन्याने घेतलेला आहे. दोघींचं समोरासमोर मोहक भेटणं दाखवायला..)



राजेश्वरी 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

पाचोळा - कुसुमाग्रज

कविता रसग्रहण    पाचोळा - कुसुमाग्रज आडवाटेला दूर एक माळ तरू त्यावरती एकला विशाळ आणि त्याच्या बिलगूनिया पदास जीर्ण पाचोळा पडे तो उदास उषा ये...