रविवार, २७ सप्टेंबर, २०२०

पक्षी गणना दिवस




 हॅलो, राजेश्वरी,

जाऊन आला का ग किशोर?
काय काय बघायला मिळाले मग?
मी : बघतोय . आत्ताचा count १८ झाला ,अजून थोडावेळ बसू .
मैत्रीण : म्हणजे , तू पण गेलीस ? अगं मग मला नाही का सांगायचे ? मी पण आले असते ना ..
मी : आत्ता येतेस का? अजून एक तासभर तरी आहोत आम्ही इथे..
मैत्रीण : नको , मी संध्याकाळी आले तर चालेल का?
का तुमचे काही वेगळे प्रोग्रॅम आहेत?…
मी : नाही ग . काही वेगळे प्रोग्रॅम नाहीत . ये तू . आपण पुन्हा दुसरीकडे जाऊ...
आज का दिन डॉ. सलीम अली के नाम।....
१२ नोव्हेंबर डॉ. सलीम अलींचा वाढदिवस ..पक्षी निरीक्षण/पक्षी गणना दिवस म्हणून साजरा करायचा.
२,३ दिवसांपासून किशोरचे सुरू होते रविवारी मी पक्षी बघायला जाणार. सकाळी सकाळी मला वाटलं आपण पण जाऊया.. उठलो , कॅमेरा घेतला आणि तळ्याकाठी जायला निघालो.. कधी क्लिक करायचे, कधी दुर्बिणीतून बघायचे आणि नावे लिहायची असे ठरवत असतानाच मला तारेवर खंडया (किंगफिशर) दिसला . चला सुरुवात तर किंग पासून होतेय !! खूप छान वाटले. त्याचे मनसोक्त फोटो काढले कारण तो फक्त इकडे तिकडे बघत होता पण उडाला मात्र नाही. घरी आल्यावर फोटो zoom करून बघितले तर दिसले की काही फोटोत त्याचे डोळे चक्क मिटलेले दिसले . म्हणजे पक्षी सुद्धा आपल्यासारखेच असतात..झोपून उठल्यावर देखील आपण नाही का कधी सोफावर , कधी गादीवरच पेंगत बसतो तसेच यांची पण सवय दिसतेय. पेंगता पेंगता पडत तर नसतील ना ? क्षणभर मनात विचार आला कसा धडपडत पुन्हा उडेल ना ..डोळ्यासमोर चित्र येऊन माझं मलाच हसू आलं.
त्याचे फोटो काढून पुढे निघणार तोच समोरच्या झुडपात काहीतरी हलले.. किशोर ,कोकिळा , कोकिळा !! मी ओरडलेच.. अगं ओरडू नकोस , उडेल ना ती. इति किशोर ... ५,७ फुटांवर मस्त पैकी कोकिळा बसलीय.. तिच्या अंगावरचे ठिपके खुलून दिसत होते. फारच सुंदर दिसत होती ती . असं म्हणतात की सगळ्या पक्षांमध्ये 'ति'च्यापेक्षा 'तो ' जास्त सुंदर असतो. फक्त कोकीळ पेक्षा कोकिळा अधिक सुंदर दिसते याची प्रचिती आली. ती अशी काही बसून तिच्या लाल डोळ्यांनी आमच्याकडे बघत होती तेंव्हा नकळतपणे 3 idiots मधल्या कोकिळेचीच आठवण आली. ही पण बहुदा झोपेत असावी. तिने पण आम्हाला फोटो काढायच्या वेगवेगळ्या पोझेस दिल्या.
२ दिवसांपासूनच थंडीची चाहूल लागलेली. पहाटेच्या गुलाबी थंडीत उबदार मऊ पांघरुणातून बाहेर पडून उगाचच पायपीट करतोय असं वाटू नये म्हणूनच की काय दोघांनी सुरूवातीलाच खुश करून टाकलं..
आता मात्र आम्हाला खूपच हुरूप आला. पुढे गेलो तर गडद निळ्या जांभळ्या रंगाच्या १२,१३पाणकोंबड्या मस्तपैकी गवतात बागडत होत्या. या मात्र चांगल्याच ताज्यातवान्या दिसत होत्या. कोवळ्या सुर्यकिरणांचे पृथ्वीवर आगमन झाले होते , त्यामुळे त्यांचा जांभळा निळा रंग एकदम लकाकत होता. नुकतीच अंघोळ केल्याप्रमाणे त्या सगळ्याच स्वच्छ आणि तजेलदार दिसत होत्या. त्यांना भूक पण लागलेली असणार, कारण त्या भरभर मातीतले किडे टिपत होत्या. त्यांना पण कॅमेरात टिपून आम्ही पुढे गेलो. तर समोरच कोतवाल ने दर्शन दिले. कोतवाल आणि टिटवी कधी झोपत असतील काय माहीत? कारण रात्री सुद्धा ते फिरतच असतात. अखेर त्यांनाही कॅमेऱ्यात कैद केले आणि आम्ही तलावावर पोचलो.
पांढरा आणि चिमणा कुदळ्या (White Ibis and Glossy Ibis), बगळे , वेडा राघू (bee-eater), करकोचे आणि पाणकावळे एकेक करून उडत उडत आपली उपस्थिती दर्शवू लागले. प्रत्येक पक्षाची एक वेगळीच खायची पद्धत असते. जसे पोपट आपण जेवतो तसे पायात खाद्य पकडून तोंडात घालतात . खूप मजा येते पोपट खाताना बघायला. तसे वेडा राघू झेप घेऊन एक मधमाशी पकडतो, पुन्हा फांदीवर बसतो, माशीचा विषारी डंख आपटून आपटून तोडतो आणि मग खातो. कोणी शिकवले असेल यांना ही काळजी घ्यायला?
तलावाजवळ आल्यावर पाण्यातील माशांवर ताव मारणारे बरेच पक्षी दिसले . प्रत्येकाची मासे पकडायची आणि खायची तऱ्हा वेगवेगळी .. बगळे एका पायावर तासनतास उभे राहतात स्थितप्रज्ञ जसे. पाणकावळे (Cormorant) पंख तेलकट नसतात त्यामुळे ते मासा पकडला आणि पंख ओले झाले की खूप वेळ एका जागी बसून पंख फडफडवत बसतात. ते दृष्य बघताना असे वाटते की दोन्ही हातात खूप मोठे झेंडे धरून ,'मी इथे ऊभा' आहे असा प्रत्येक जण इशाराच देतोय जणू . संथ पाण्यात आपल्या बदकांची झुंड जेंव्हा पुढे येऊ लागते तेंव्हा तर पाण्यावर असे काही तरंग उठतात की बघतच रहावेसे वाटते. त्यात एका थव्यातल्या बदकांच्या पोटावर तपकिरी ठिपके आणि चोचीवर पिवळा आणि कपाळावर लाल ठिपका. असे वाटले की बुट्ट्यांची साडी नेसलीय आणि कपाळावर हळदीकुंकू लावलंय. म्हणूनच किती समर्पकपणे त्यांचे नाव हळदीकुंकू बदक असे ठेवलेय..
किती पाहू आणि किती नको असे झाले. पण घरी तर परतावेच लागले. सगळ्या पक्षांचा निरोप घेऊन संध्याकाळी पुन्हा भेटायच्या बोलीवर परत फिरलो..
घरी आल्यावर सुद्धा मनात सगळे पक्षी फेर धरून नाचत होते. कॅमेरातील त्या कैद्यांना पुन्हा पुन्हा पाहून चर्चा सुरू होती..त्या धुंदीतच दुपारचे ४ कधी वाजले कळालेच नाही.. आता आमच्या दोघांबरोबर एक मैत्रीण आकाशात स्वैर संचार करणाऱ्या या दूतांना बघायला सज्ज झाली होती..
सकाळी सुरुवात किंगफिशर ने केली होती आणि आता आपल्याच तोऱ्यात असणाऱ्या मोराने .... रॅम्प वॉक (योग्य मराठी शब्द सापडला नाही) करत आमच्या समोरून ऐटीत रस्ता ओलांडला. काय ती ऐट अहाहा!! आपलाच पिसारा सांभाळत जेंव्हा तो दिसेनासा झाला तेंव्हा आम्ही भानावर आलो. मोर कितीही वेळा समोर आला तरी बघतच राहावंसं वाटतं. निसर्गाच्या या किमयेपुढं मान झुकवावीशी वाटते.
पुढे गेलो तर समोरच्या हर्बल गार्डन मध्ये नीलपंख (indian roller) त्या छोट्या छोट्या रोपट्यांवरून संचार करत होता. इवली इवलीशी ती रोपटी त्याचा भार पेलायला असमर्थता दाखवत झुकून जायची मग हा आपले निळेशार पंख उलगडून दुसऱ्या रोपट्यांकडे झेपावायचा. ते उघडलेले कमी अधिक निळेशार पंख समुद्राच्या लाटांचा आभास निर्माण करायचे. ५ मिनिटात तो किमान २५ वेळा तरी इकडून तिकडे उडाला असेल. जणू काही म्हणतोय की काढा माझे फोटो किती काढायचे तितके. आहेच मी तसा विलोभनीय. विशेष म्हणजे ती छोटी छोटी रोपं सुद्धा त्याला सांगत होती की ,'अरे तू बसलास तर तुझे सौंदर्य कसे दिसेल यांना? थोडावेळ तू उडतच रहा बरं'. (कारण पंख मिटल्यावर तो तपकिरी जास्त आणि थोडासा निळसर दिसतो)
निलपंख वरून थोडीशी नजर हटवली तोच डोक्यावरच्या तारेवर एक पंचरंगी पोपट (plum headed parakeet)... मी तर याला प्रथमच पहात होते. आत्तापर्यंत फक्त गळ्यावर काळा गोल कंठ असलेले आणि नसलेले असे पोपट बघत आलेले. आणि आता हा म्हणजे गडद लाल डोक्याचा आणि पोपटी शरीर.. रंगपंचमी ला कोरडा लाल रंग एखाद्याच्या चेहऱ्यावर भरपूर फासल्यावर कसे दिसेल , अगदी तस्सेच वाटले मला. त्या लाल डोक्याखाली एक काळे गोल वलय/कंठ.. जसे काही दृष्ट लागू नये म्हणून गळ्यात आईने काळा गोफ बांधलाय. पंख त्यामानाने शरीरापेक्षा थोडेसे गडद पोपटी आणि शेपूट मात्र शरीरापेक्षाही लांबलचक. केशरी बाकदार चोचीने झाडावरची शेंग पकडून शेंगेतील एकेक दाणा खाण्यात अगदी मग्न झाला होता तो. आम्हीपण मग त्याच्या खाण्यात व्यत्यय न आणता पुढे निघालो...
पुढे बरेच छोट्या छोट्या पक्षांचे थवे दिसले. जसे चीरक, दयाळ, सुर्यपक्षी आणि मैना...
सूर्यास्त व्हायला अजून तासभर तरी बाकी होता. एका बाजूला कावळ्यांची शाळा भरली होती. डोक्यावरून छोट्या छोट्या तपकिरी मुनिया मजेत हुंदडत होत्या. काहींच्या पोटावर गडद तपकिरी ठिपके दिसत होते..
चालत चालत तलावाकाठी पोचलो तर पांढराशुभ्र नदी सुरय (River Tern) घिरट्या घालत होता. त्याची पिवळी धमक चोच आणि केशरी पाय सुर्यकिरणांमुळे त्याच्या सौंदर्यात अजूनच भर टाकत होते. घिरट्या घालता घालता मधेच पाण्यात झेपावून मासा पकडून लगेचच वर झेपावयाचा.. काय अचूक अंदाज असेल , इतक्या वेगात पाण्याजवळ यायचे, कचकन ब्रेक दाबायचा , चोच उघडून मासा उचलायचा आणि लगेच वेग वाढवून वर झेप घ्यायची.. प्रचंड नियंत्रण असले पाहिजे. यांचा मेंदू किती वेगाने चालत असेल नाही. कितीही थवा मोठा असला तरी उडताना यांचे नाही कधी एकमेकांवर आपटून अपघात होत. नाहीतर आपण जरा कुठे ट्राफिक जाम झाला तर पुढे जाण्याच्या गडबडीत एकमेकांवर आपटणारच. एकमेकांवर कुरघोडी करायची असते ना. पक्ष्यांच्या सारखे नाही , थवा उडत असताना पुढचा पक्षी दमला असे दिसले तरच दुसरा पुढे येतो.. असेच मजल दरमजल करीत नवीन पाहुणे बदकं दाखल झालेली दिसताहेत समोर. चक्रवाक (Ruddy shelduck) काठावर जवळजवळ बसली होती. नुकतीच दाखल झाली असल्याने परिसराची ओळख करून घेताहेत असे वाटत होते. थोडीशी बावरलेली, थोडीशी बुजलेली आहेत असे वाटले. नर्सरीत पहिल्यांदाच शाळेत प्रवेश घेतला की कशी बावरलेली मुले असतात ना अगदी तश्शीच दिसली. असे वाटले की त्यांच्या जवळ जावे आणि सांगावे, बाबांनो , तुम्ही इथे अगदी सुरक्षित आहात. मनसोक्त पाण्यात डुंबत रहा आणि मजा करून छान छान आठवणी घेऊन पुन्हा इथेच येण्याचे वचन देऊनच जा..
थोडावेळ तलावाच्या काठाकाठाने फिरून लवकरच परत फिरायचे होते. कारण सूर्यास्तानंतर इथे थांबणे धोक्याचे असते. पाय वाटेने जात असतानाच किशोर कॅमेऱ्यात छोट्या मोठ्या पक्षांचे फोटो काढण्यात मग्न असायचा त्यामुळे आजूबाजूला मला लक्ष ठेवायला लागायचे. अचानक लांब काहीतरी चकाकत होते. लगेच लक्षात आले की एक मोठा नाग आपले वस्त्र सोडून गेलाय. जवळ जाऊन हातात उचलून धरली तर कात जवळपास एक मीटर पेक्षा लांब होती आणि अजून १,२ वीतभर लांबीचे तुकडे जवळच पडले होते पण तोंडाचा भाग काही दिसत नव्हता. एकंदरीत नाग बऱ्यापैकी लांब असणार. आणि कात एकदम मऊ होती म्हणजे नुकतीच टाकलेली. प्रत्येक गावात आजूबाजूला भरपूर जंगल असेल अशीच सरकारी घरे मिळाली , त्यामुळे आता कात हातात घेतली की लगेच कळते ताजी आहे की जुनी. आता इथे थांबण्याचा प्रश्नच नव्हता. परत फिरलो. आता मात्र सावध होतो. मैत्रिणीला हातातली कात दाखवत काही जुन्या आठवणी सांगत होते आणि अचानक पायापासून २,३ फुटांवर दिसले की साहेब वेटोळे घालून आमच्याकडे बघत असलेले.. मातीच्या रस्त्यावर मातकट रंगाचा तो लांबलचक साप कदाचित दिसला पण नसता पण तिरक्या सुर्यकिरणांमुळे तो चकाकत होता. क्षणभर आम्ही स्तब्ध झालो. आता हा काय पवित्रा घेतो असा विचार डोक्यात येईपर्यंत त्यानेच आपली दिशा बदलून झाडीत जाणे पसंत केले आणि आम्ही सुटकेचा निश्वास सोडून पुढे निघालो . तोपर्यत लालबुंद सूर्यबिंब पाण्यात सामावयाला सुरुवात झाली होती. पूर्ण सूर्यास्त झाल्यावर निघायचे ठरवले आणि एका बाकावर शांत बसलो.
जवळच असलेल्या 2,3 झाडांवर छोटी छोटी घुबडं सूर्यास्तानंतर दिसतात हा नेहमीचा अनुभव... आणि आजही टपोऱ्या डोळ्यांचे तपकिरी ठिपकेदार घुबड आपल्या जागेवर बसून रोखून बघत होते..
दिवसभर इतके फिरलो पण थकल्याचा लवलेशही नव्हता . आजचा दिवस निसर्गाच्या अदभुत किमया बघून मन प्रसन्न करून गेला..
स्व. डॉ. सलीम अलींना मनोमन श्रद्धांजलीच वाहिली जणू...
... राजेश्वरी किशोर १२/११/१७
(मनातले विचार त्याच रात्री गडबडीत लिहिले गेले पण दुरुस्त्या करायला वेळ लागला)
Meenal Umrani, Rashmi Ankalikar and 3 others
8 Comments
Seen by 12
Like
Comment

Comme

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

पाचोळा - कुसुमाग्रज

कविता रसग्रहण    पाचोळा - कुसुमाग्रज आडवाटेला दूर एक माळ तरू त्यावरती एकला विशाळ आणि त्याच्या बिलगूनिया पदास जीर्ण पाचोळा पडे तो उदास उषा ये...