"अगं, किती छान वाटतोय बंगला आता. एकदम प्रसन्न. उंचावलेला दर्शनी भाग आणि नवीन मातीत तरारून उठलेली रंगीबेरंगी फुलांची झाडं. बघूनच मन मोहवून टाकतायत. थोडावेळ बाहेरच झोक्यावर गप्पा मारत बसूया का? इथेच मन सुखावतेय बघ."
"हो बसूत की. आम्हालाही आता त्या दुखर्या आठवणीतून बाहेर आल्यासारखं वाटतंय. नुकतंच घराचं आतलं बाहेरचं रंगकाम संपलंय. महिनाभर काम सुरू होतं ग. संध्याकाळी दमायला व्हायचं पण सकाळ पुन्हा नव्या दमाने उजाडायची. वाईट आठवणींचा ओरखडा, नवीन रंग, नवीन बाग पाहून थोडासा धूसर होत चाललाय आता."
"खरं आहे गं. पावसाळा सुरू झाला की सगळ्या जुन्या आठवणी दाटून येत असतील ना? फारच दूर असल्यामुळे मला मदतीला येता आलं नाही याचं नेहमीच वाईट वाटत होतं."
"हरकत नाही गं. सुरवातीचे दिवस भयाण शांततेत आणि कामात गेले. असा थरार यापूर्वी कधी अनुभवला नव्हता. लग्न झाल्यापासून कधी घराची इतकी उलथापालथ झाली नव्हती. ते दिवस आठवले तरी अंगावर काटा येतो."
"तुला अजून सगळं जसंच्यातसं आठवत असेल ना? मी तर फक्त फोनवरून ऐकलं तुमच्या सगळ्यांच्या तोंडून."
"चल घरात, मी एकेक खोलीतलं त्या दिवसाचं दृश्य सांगते तुला."
"कधी कधी काय होतं की, वास्तवात आलेलं अरिष्ट स्वीकारून पर्याय शोधावा लागतो. तब्बल ५१,५२ वर्षांपासून सजवलेलं, सांभाळलेलं घर एका फटक्यात भेसूर बनत असतांना पाहून आपली असहायता, हतबलता अधिकच तीव्रतेने जाणवते. पण कठीण प्रसंगातून बाहेर पडण्याचे प्रयत्न आपोआप होत गेले."
तावरे कॉलनीत रहाणारी सुनीता सांगत होती....
बुधवार, २५ सप्टेंबर २०१९ ... कित्येक दिवसांपासून पाऊस चालूच होता. कधी रिमझिम तर कधी मुसळधार.. त्या दिवशी संध्याकाळी कर्वेनगरला सुहासिनीकडे/नणंदेकडे गेलो होतो. तिच्या मुलाचा वाढदिवस होता आणि त्याच दिवशी तो आणि सून परदेशी डॉक्टरेट करायला जाणार म्हणून त्यांना निरोप द्यायला गेलो होतो. रात्री नऊच्या दरम्यान परत निघालो. मुसळधार पाऊस सुरू होता. थांबायचं नावच घेत नव्हता. रस्तोरस्ती पाणी साचलेलं दिसत होतं. मित्रमंडळ चौकात जरा जास्तच पाणी होतं. एकेक गाडी कशीबशी बाहेर काढत होते लोक. पावसाचा जोर अजूनच वाढत होता. घराजवळ आलो तर दारात फुटभर पाणी साचलेलं. ५२ वर्षांपूर्वी बांधलेला बैठा बंगला फक्त दोन पायर्या उंची असलेला.. पायर्यांवर पाणी आलेलं. अजून पाऊस वाढला तर कदाचित घरात पाणी येऊ शकतं असा विचार करून दारातील, व्हरांड्यातील जमिनीवरच्या वस्तु, चपला वर ठेवल्या. इतक्या वर्षात फक्त एक दोनदा असं उंबर्यातून आत पाणी डोकावलं होतं. तसंच होईल असं वाटलं. पुढच्या मागच्या लोखंडी दरवाजाला खालच्या बाजूला तीन फुट तरी पत्रा होता आणि वर जाळी. सुरूवातीला पाणी अगदी फटीतून आत येऊ लागलं. काय होईल, किती पाणी वाढेल याचा विचार करीत असतांनाच, प्रचंड पाण्याचा लोंढा घराच्या मागच्या बाजूने खिडक्या, दरवाजांमधून आत आला. हा पाण्याचा हल्ला अनपेक्षित होता. कुठे जायचं सुचत नव्हतं म्हणून मी श्रीकांतला म्हणत होते, "अरे आपण माझ्या मैत्रिणीकडे जाऊ तिचं घर दुमजली आहे." श्रीकांत मला शांत करत म्हणत होता, "अगं आपलं पण घर दुमजलीच आहे ना?" खरं तर तो पाण्याचा लोंढा आमच्याकडे येताना पाहून मला घरातून बाहेर पळावं असंच वाटत होतं. मागून पाणी आम्हाला ढकलत होतं आणि आम्हाला मागच्या बाजूलाच जाणं भाग होतं. कारण वरच्या मजल्यावर जायचा जिना मागे असल्याने आम्ही सर्वजण घाबरून मागच्या खोलीकडे निघालो. तिथपर्यंत कसंबसं एकमेकांना सांभाळत जिना गाठला. तोपर्यंत जिन्याच्या चार पायर्या पाण्याखाली गेल्या होत्या. आता सामानाचा विचार सोडून जीव वाचवणं महत्वाचं वाटलं. तरी जाता जाता महत्वाची कागदपत्रांची बॅग, काही कपडे, मोबाईल घेऊन जात होतो. माझ्या अचानक नजरेत भरली ती मी गणपतीत केलेली सजावट, ती पाण्यात वाहून जायला नको म्हणून तीही उचलली. तसं पाहिलं तर जेमतेम साठ रुपये खर्च आलेली ती सजावट पण त्यासाठी माझे काही दिवस खर्ची पडले होते ना? मग ती खराब होऊन कसं चालेल? त्याचवेळी त्याशेजारी असलेला माझ्या गाण्याच्या सरावासाठी सदैव सज्ज असलेला दहा हजाराचा कराओके मात्र दिसला नव्हता मला. वरच्या मजल्यावर एक प्रशस्त हॉल आणि एक बेडरूम असल्याने सर्वांची म्हणजे श्रीकांत, मी, मेधा आणि आई, चौघांची सुरक्षित सोय होणार होती. ओल्या कपड्यांनीशी वर पोचेपर्यंत पाणी अजूनच वाढलं होतं. गच्चीवरुन पहाता पाण्याचा प्रवाह आपल्याबरोबर कहयात येतील त्या गोष्टी, जनावरे वहात आणत होता. ते भयानक रुद्र रूप पहात असतांनाच जाणवलं ते शेजारचं गुणे काकूंचं कुटुंब पाण्यात असलेलं. त्यांना तर वर आडोसा घ्यायला खोल्या पण नाहीत. इतक्या वर्षांचं सख्य शांत बसू देत नव्हतं. त्यांना इकडे बोलावलं. छातीपर्यन्त, चार फुट आलेल्या पाण्यातून साखळी करून सगळेजण त्यांच्या घरातून निघाले. त्यांची आई उंचीला कमी असल्यानं तिच्या गळ्यापर्यंत पाणी येत होतं. त्यांच्या हातातली औषधाची पिशवी पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली. वर आल्यावर ओले कपडे बदलायला घेतलेली कपड्यांची पिशवी भिजून गेली. सगळे दारात तर पोचले पण दारच काही केल्या उघडेना. कारण पाण्याचा प्रवाह आतल्या दिशेने जोर करत होता. बाहेरून ते चारजण ढकलत होते, आम्ही खाली जाऊन आतून तीनजण ओढत होतो, पण आतल्या बाजूंनी असलेला पाण्याचा जोर काही केल्या त्या बंद दाराला हलू देत नव्हता. अखेर महत्प्रयासाने कशीबशी दाराला फट तयार झाली आणि आधी पाणी जोराने बाहेर जाऊ लागले. त्यांना जरा धडपडायला झालं पण एकाने दार घट्ट धरून ठेवल्याने आत येता येईल अशी परिस्थिति निर्माण झाली. तोपर्यंत दारातून, फटीतून पाणीच बाहेर जातच होतं. दार उघडल्यावर बाहेर साठलेल्या कचर्याने पण आत बाहेर संचार सुरू केला. सगळे आत आल्यावर जोर लावून दार बंद केलं आणि एकमेकांना सांभाळत अखेर सर्वजण वरच्या मजल्यावर पोहोचलो. सुन्न मनाने कोसळत असलेला पाऊस पहाण्यावाचून पर्याय नव्हता. इतकं पाणी असं अचानक कसं आलं याची चर्चा करीत राहिलो. नाही नाही त्या शंका मनात येत होत्या. वीजप्रवाह खंडित केला गेला होता. गच्चीवरून पाण्यातून वहात जाणारं सामान, प्राणी दिसत होते. दाराशी दोन गाड्या उभ्या होत्या. होंडा सिटी गाडीत ठिणग्या येत असलेल्या दिसत होत्या. तितक्यात एक सिलेंडर वहात येऊन गाडीला खेटून थांबला. श्रीकांतला जरा टेंशन आलं, या ठिणग्या थांबल्या नाहीत आणि सिलेंडर मधून गळती सुरू झाली तर???? पण नशिबाने तसं काही घडलं नाही.
घाबरून शेजारून आलेलं गुणे कुटुंबिय अंग कोरडं करून कपडे बदलून सतरंजीवर शांतपणे निजले होते. मी, मेधा आणि श्रीकांत मात्र सुन्न होऊन गच्चीवरून भयाण नजारा बघत होतो. मधेच एक स्टील कपाट, एक डुक्कर येऊन गाडीला खेटून राहिलं. पाणी येणं सुरू होताच मेधाच्या मांजरानं खिडकीबाहेर पाण्यात उडी मारली होती. तिला मांजराची काळजी सतावत होती. दुसर्या दिवशी दुपारी मांजर घरात आलं तेव्हा तिच्या जीवातजीव आला.
श्रीकांतनी रात्री अकरा नंतर बहिणींना, सुहासिनीला कर्वेनगरला आणि धनश्रीला सहकारनगरला फोन केले. त्यांनी घेऊन जायला येऊ का अशी विचारणा केली पण त्या येणार तरी कशा आणि कोणत्या रस्त्यानं? सगळे रस्ते वहात्या नदीत रूपांतरीत झालेले. पाण्याच्या अतिप्रचंड दाबाने पूल वाहून चालले होते असं कळलं.
तावरे कॉलनीच्या मागच्या बाजूला आंबिल ओढा होता. ओढ्याचं पाणी ओढ्याची आणि कॉलनीची भिंत तोडून इतरत्र घुसलं होतं. रात्री एकच्या दरम्यान पावसाचा जोर कमी झाला. पाच सात जणांचं एक टोळकं ओरडत येत होतं. अंधारात ते कोण आहेत आणि काय ओरडत आहेत ते आधी आम्हाला नीटसं कळलं नव्हतं. मग कळलं की ते, 'कोणाला मदत हवी का मदत?' असं ओरडत होते. आमच्या शेजारच्या घरतून आवाज आला,' आम्हाला मदत हवी आहे.' ते तिकडे वळले. शेजारचं घर अजून खाली असल्यानं त्यांच्या घरात पाणी आल्यावर मुली कपाटावर आणि आजी कॉटवर अडकले होते, त्यांना त्या मुलांनी उचलून सुखरूप वरच्या मजल्यावर नेऊन सोडलं.
आम्ही वरच्या हॉलमध्ये गाद्या पसरल्या होत्या. पण डोळ्याला डोळा लागणं शक्य नव्हतं. अखेर पहाटे चारच्या दरम्यान पाणी बर्यापैकी ओसरलं होतं. पाऊस सुरू झाला तेव्हा वीज पुरवठा खंडित झाला. इन्व्हर्टर पाण्यात भिजत राहिल्यानं त्यानं काम करणं बंद केलं. उजाडण्याची वाट पहात गादीला पाठ टेकली. सकाळी उठून घर साफ करणं क्रमप्राप्त होतं त्यासाठी थोडा आराम गरजेचा होता.
खाली येऊन सकाळी पाहिले तर....
जिना उतरतानाच दिसत होता तो एखाद फुट उंच चिखल आणि त्यात अस्ताव्यस्त पसरलेल्या वस्तु. प्रत्येक खोलीत होत्याचं नव्हतं झालं होतं. रात्री मेधाच्या खोलीतील लाकडी भक्कम पलंग निश्चितच पाण्यावर हेलकावे खात असणार. कारण हेलकाव्यांबरोबर त्यावर असलेल्या गाद्या चिखलाने डाय केल्याप्रमाणे माखून निघाल्या होत्या. शेजारी असलेल्या टेबलवरील कॉम्प्युटर आणि CPU च्या बॉक्समधून एकेक थेंब पाणी जमिनीवरच्या गाळात टपकत होते. बाथरूम मधून अर्धवट चिखल भरलेल्या प्लॅस्टिक बादल्या बाहेरच्या जागेत येऊन पडल्या होत्या. आईंच्या खोलीत हाताशी असावी म्हणून रॅकमध्ये ठेवलेली अंथरुण पांघरूणं, औषधं, कपडे अस्ताव्यस्त पसरले होते. बेसिनजवळचं वॉशिंग मशीन उभ्याचं आडवं झालं होतं. आईंच्या गुडघेदुखीमुळे देवघर उंच केलं असल्याने देव जागेवरच होते. सगळं घर अस्ताव्यस्त पसरलं होतं पण देवाला वाहिलेलं एक फूल देखील हललं नव्हतं हे आश्चर्य. अजून एक आश्चर्य म्हणजे आईंच्या चप्पल बाहेरच्या व्हरांड्यातून तरंगत येऊन मागच्या खोलीतल्या कपाटावर विराजमान झाल्या होत्या. त्याला कणभर देखील चिखल लागला नव्हता.
सगळ्यांच्याच कपड्यांची खोलीतली कपाटं उघडताच खालच्या तीन कप्प्यात साठलेलं गाळरूपी पाणी बद्दकन काही कपड्यांना घेऊनच बाहेर पडत होतं. किचनमध्ये तर विचारता सोय नाही इतका पसारा. दोन दरवाजे असलेला फ्रीज आडवा उताणा झोपला होता. आतल्या सामानाची जागा केव्हाच चिखलाने घेतली होती. “पतझड मौसम” असतो तेव्हा सगळीकडे झाडांची वाळलेली पानं, पाचोळा पसरतो तशी भांडी इतस्ततः विखुरली होती. डब्यातल्या डब्यातच तपकिरी पाण्याने कणीक भिजवली गेली होती. कडधान्ये डब्यातच भिजत घातली गेली होती. सगळ्या भांड्यांना साबण लावून ठेवतो तसा चिखल फासला गेला होता. हॉलमध्ये सोफा आणि खुर्च्या देखील लाकडी पलंगाप्रमाणे खोखो/कबड्डी खेळून शांत झाले होते. शोकेस मधील शोभिवंत वस्तूंची जागा राडारोडयानं घेतली होती आणि आतल्या वस्तूंना बाहेर फेकलं होतं. त्यातच काचा, वहात आलेले किडे पण होते. व्हरांड्यात बसायच्या दोन सेटी आणि त्यात आत असलेली पेपरची रद्दी हातात देखील धरण्याच्या लायकीची राहिली नव्हती. घर तर चिखलमय झालं होतंच पण बाहेर पाहिलं तर दोन्ही कार चिखलपाण्याने भरून जागेवर उभ्या होत्या आणि दुचाकीने मात्र मान टाकली होती. घराभोवतीचं तारेचं कुंपण चारही बाजूंनी आडवं झालं होतं. दुसरीकडून वहात आलेल्या काही वस्तु कारला भिडून शांत बसल्या होत्या. त्यात एक गोदरेज कपाट, दोन गॅस सिलेंडर, अजून काही प्लॅस्टिक वस्तु कचरा, कपडे होते. आणि एक मेलेलं डुक्कर फुगत चाललं होतं. काही काळानं त्याची दुर्गंधी पसरायला सुरुवात झाली.
सकाळी सकाळी सुहासिनी आणि धनाश्री रणरागिणी/ अष्टभुजेच्या वेशात दारात अवतरल्या. त्या आणि त्यांचे कुटुंबीय बादल्या, झाडू, पोचा गाडीत घालून मिळेल त्या रस्त्याने घरी पोचल्या. गरमागरम नाश्ता, प्यायला पाणी घेऊन आल्याने 'आधी करू पोटोबा मग काढू चिखलोबा' असं म्हणावं लागलं. घराचा नजारा बघून काम कुठून आणि कसं सुरू करावं कोणालाच कळत नव्हतं. फुटभर चिखलात काहीही, कोणीही असण्याची भीती होतीच. दोघादोघांनी एकेका खोलीचा ताबा घेतला. जमेल तसं घरातला पातळ चिखल बाहेर काढताना महत्वाच्या गोष्टी, सोनं नाणं पण फेकलं जाण्याची भीती होती. गाळात चाचपडत असताना धनश्रीच्या शुभंकरला हाताला काच लागली आणि रक्त येऊ लागलं. त्याला पट्टी बांधून सगळे कामाला लागलो. सुरुवातीला जाण्यायेण्याचा रस्ता साफ केला तरी उघडलेल्या कपाटातून घाण बाहेर येत राहिलीच. खराब वस्तु बाहेर टाकणं हे फार मोठं आव्हान होतं. त्यावेळी पहिल्यांदा जाणवलं, आपण घरात निरुपयोगी पण प्रेमाच्या म्हणून कित्येक गोष्टींचा साठा करून ठेवलेला असतो. कळत असून देखील फेकवत नाहीत अशा वस्तु. त्यादिवशी उपयोगी, निरुपयोगी कित्येक वस्तूंना तिलांजली द्यावी लागली.
कामवाल्यांच्या घरातच पाणी शिरल्याने पहिले दोन दिवस लोकं मिळालीच नाहीत कामाला. दोन दिवस वीज नाही.... प्यायला पाणी नाही. तिसर्या दिवशी चार लोक मिळाले. भिंतींपासून सगळं धुता धुता घर हळूहळू साफ वाटायला लागलं. दोन दिवसांनी भंगारवाले गाडा घेऊन फिरू लागले. कचरा उचलायला गाड्या फिरू लागल्या. कॉलरासारखे आजार पसरू नयेत म्हणून लवकरात लवकर घर स्वच्छ मोकळं करायचा सगळ्यांनी आटोकाट प्रयत्न केला.
रोज माझ्या मैत्रिणी भेटायला येत होत्या. येताना कोणी नाश्ता तर कोणी जेवण आणत होत्या. आयतं खात कामं सुरू होती. दूरदर्शन, बातम्या बघायला, ऐकायला कोणाला वेळ होता? एक दिवस एक मैत्रीण आली आणि माझ्याकडे बघून एकदम रडायलाच लागली. खरं तर तोपर्यंत आम्हाला परिस्थितीचं गांभीर्य इतकं वाटलं नव्हतं. आपत्ती आली मार्ग काढू अशा आवेशात आम्ही होतो. पण तिचं ते रडणं बघून, बाहेरची, ओढ्याकडची परिस्थिती किती कठीण झालीय ते जाणवलं.
हळूहळू मग गाद्या नवीन करणं, सोफा सेटला पॉलिश करून नवीन कुशन करणं, किचन कपाटं नवीन करणं होत गेलं.
जिवापाड जपलेल्या गाड्या क्रेनने उचलून भंगारात देताना मात्र डोळ्यात पाणी तरळलं. गाडी नेताना आठवणीने त्यातल्या गणपती बाप्पांना उचलून घेतलं, नवीन गाडीत विराजमान करण्यासाठी.
गेल्या दोन वर्षात घरात पाणी आलं नाही पाहूनच यावर्षी घराला रंग देण्याचा विचार केला.
दारासमोरचे रस्ते सीमेंटचे होताना छान वाटलं होतं पण तेव्हा ऊंची वाढवलेले रस्ते आपल्यावरचं पावसाचे पाणी न जिरवता बंगल्याकडं ढकलतील हा विचारच आधी मनात आला नव्हता. मागच्या वर्षी बागेत ब्लॉक टाकून आणि माती टाकून ऊंची वाढवली. पाण्याला नाल्यात सुरळीत जाता यावं म्हणून मार्ग केला. दोन वर्षं घरात पाणी न शिरता त्याला दिलेल्या वाटेनं गेलं म्हणून रंगकाम केलं.
चार तासात सगळ्या घरांना वेढा घातलेल्या पाण्याचे उपद्व्याप निस्तरता निस्तरता कितीतरी जुन्या वस्तु भंगारात काढून नवीन वस्तु, उपकरणं घ्यावी लागली.
खरंतर या आपत्तीतून बाहेर पडून नवीन उपकरणं वापरताना नैराश्य मागे टाकून उत्साह वाढत होता हे निश्चित.
जुनं ते सोनं असलं तरी नव्याची नवलाई हवीहवीशी वाटतेच....
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा