सोमवार, २७ ऑक्टोबर, २०२५

विश्व_आदिवासी_दिवस


 विश्व_आदिवासी_दिवस

आज 9 ऑगस्ट 'विश्व आदिवासी दिवस' ...
वर्षभरातल्या ३६५ दिवसांपैकी कित्येक खास विश्व दिवस साजरे केले जातात. काही दिवसांना तर साजरा करायचा दरवर्षी वेगळा विषय दिला जातो. त्याचं घोषवाक्य ठरवून दिलं जातं.
या वर्षी जागतिक आदिवासी दिनाचा विषय “संरक्षणात स्थानिक महिलांची भूमिका आणि पारंपारिक ज्ञानाचे प्रसारण” ही 2022 ची ( Role of local women in conservation and transmission of traditional knowledge ) आहे.
आज मला या विश्व आदिवासी दिवसाबद्दल लिहायला कारणीभूत ठरला तो ६ ऑगस्टच्या लोकसत्तामध्ये आलेला एक लेख. पहिल्या स्त्री भारतीय मानववंश शास्त्रज्ञ मधुमाला चटोपाध्याय जेव्हा अंदमानमधील अज्ञात सेंटिनल बेटावर जातात आणि तिथल्या आदिम जमातीशी संवाद साधतात, त्यात यशस्वी होतात. ही मोहीम खरंच धाडसी आणि कौतुकास्पद म्हणावी लागेल. त्यांच्या या मोहिमेला ३० वर्षं पूर्ण झाली तरी नंतरच्या या ३० वर्षांत पुन्हा अशी मोहीम यशस्वी झाली नाही. अतिशय कौतुकास्पद कामगिरी त्यांच्या या लेखात वाचायला मिळेलच. सोबत त्या लेखाचा फोटो आणि pdf मी जोडत आहेच. फारच रंजक आहे हा लेख.
'निकोबारची नवलाई' लिहीत असताना मी अंदमान निकोबारमधील आदिवासींबद्दल बरीच माहिती जाणून घेतली आणि ती पुस्तकात लिहिली आहेच.
जगाच्या पाठीवर असे अनेकविध आदिवासी अस्तीत्वात आहेत, काही मात्र नामशेष झाले.
जंगलामध्ये वास्तव्य करणाऱ्या मूळ निवासी समुहांनी पर्यावरण जपण्याचे मोलाचे कार्य केले. परंतु समाजाच्या मुख्य प्रवाहात नसल्याने या आदिम जमाती शिक्षण, आरोग्य, रोजगार या सर्वांपासून कोसो दूर राहिल्या होत्या. संयुक्त राष्ट्रसंघटना आणि तिची सलग्न संस्था आंतरराष्ट्रीय मजूर संघटनेने आदिवासींना ‘इंडिजिनस’ अर्थात देशज, मूळनिवासी असे संबोधावे अशी शिफारस केली आहे. संयुक्त राष्ट्रसंघटनाने जागतिक आदिवासी समुदायाच्या अधिकाराच्या रक्षणार्थ १९९३ हे जागतिक आदिवासी वर्ष घोषित केले होते. आदिवासी हेच पृथ्वीचे मूळनिवासी आहेत आणि ४६१ आदिवासी जमाती भारतात वास्तव्यास आहेत. आदिवासींच्या जातीत आज आणखी काही जाती समाविष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या प्रेरणेने १९९४-२00५ हे ‘आदिवासी दशक’ म्हणून साजरा करण्यात आले. भारतामध्ये प्रामुख्याने चेंचू इरुला, कदार, कोटा या निग्रो, प्रोटो ऑस्ट्रॉलॉईड या वांशिक जमाती केरळ, तमिळनाडू, कर्नाटक आणि आंध्रप्रदेशात राहतात. मध्य भारतात बिहार, ओरिसा, मध्य प्रदेश, पं. बंगाल या राज्यामध्ये गोंड, संथाल, भूमजी, हो, ओरियन, मुंडा, कोरवा या प्रमुख जाती वास्तव्य करतात. राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, गोवा, दमण-दीव, दादरा, नगर हवेली या राज्यांत आणि केंद्रशासित प्रदेशात भिल्ल या प्रमुख जमातीचे लोक राहतात. या व्यतिरिक्त कोळी, कोकणा-कोकणी, वारली, ठाकूर, कातकरी, आंध्र परधान, कोलाम, कोरकू, माडिया, गोंड, राज-गोंड या जमाती राहतात. या मूळ निवासी आदिम जमातींचे अस्तित्व मान्य करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाने ९ ऑगस्ट १९९४ या दिवशी International Day of Indigenous People अर्थात विश्व आदिवासी दिवस घोषित केला. त्यावेळेपासून दरवर्षी या दिवसाच्या निमित्ताने या जमातींच्या मुलभूत सुविधा पुरविण्याकडे लक्ष वेधणे व त्या मिळवून देणे याला सुरुवात झाली. (आंतरजालीय माहिती)
आदिवासी म्हटलं की, आपल्या डोळ्यासमोर डोंगर दर्यात राहणारा, जंगलात राहणारा, उघडा, नागडा असणारा, ओबड धोबड चेहर्याचा, जगाशी कुठलाही संपर्क नसणारा समाज येतो. जगाच्या पाठीवर ज्या माणसाने, ज्या जिवाने पहिल्यांदा जन्म घेतला तो जीव म्हणजे आदिमानव म्हणजेच आदिवासी. आज जगात ज्या काही कला अस्तित्वात आहेत, त्या सगळ्या कलांचा उद्गाता आदिवासी आहे. आदिवासींची लोककला, चित्रकला, नृत्य, वादन, गायन, शिल्पकला याला तोड नाही. आदिवासी आजही आपली उपजीविका जंगलात मिळणार्या रानमेवाव्यावर करीत आहेत. भारतात गडचिरोली, चंद्रपूर, अमरावती, ठाणे, किनवट, आदिलाबाद (आंप्र.), अंदमान निकोबार या भागात राहणारे आदिवासी बांधव जंगलाच्या जवळच राहणे पसंत करतात. ‘आदिवासी तेथे जंगल, जंगल तेथे आदिवासी’ असल्यामुळे निसर्गातील प्रत्येक वस्तूला ते दैवत मानतात. निसर्गावर त्यांची निस्सीम श्रद्धा आहे.
अतिशय दुर्गम भागात अधिवास असल्यामुळे आरोग्य सुविधा पुरविणे देखील एक मोठे आव्हान आहे. मात्र यात दळण-वळण साधने व इतर तंत्रज्ञानाची मदत घेतली जात आहे. गडचिरोली जिल्ह्यात मुख्यत्वे माडिया, गोंड तसेच परधान आदी आदीम जमाती आहेत. आदिवासींची मूळ भाषा आहे, यात माडिया -गोंडी या दोन मुख्य भाषा गडचिरोली जिल्ह्यात आहेत. या जमातीत मुख्य समाज भाषा रुजवताना त्यांची मूळ भाषा असणाऱ्या गोंडी-माडिया आदी भाषांचे संवर्धन कसे होईल. याबाबतही प्रयत्न जाणीवपूर्वक सुरु करण्यात आले आहेत. त्यांच्या रुढी, परंपरा यांची माहिती इतरांना मिळावी यासाठी प्रयत्न होत आहेत.
भाषा हे संपर्काचे सर्वांत मोठे साधन मानले जाते; मात्र एखाद्या समाजातील विशिष्ट वर्गातील महिलांना शिक्षणापासून वंचित ठेवले गेल्यास त्यांनी एकमेकांशी संपर्क साधायचा तरी कसा? काही प्रांतातील महिलांपुढे हीच समस्या होती व त्याचे उत्तर त्यांनी आपली स्वतःची भाषा आणि तिची लिपी विकसित करत राहिले. सुरूवातीला पुरुष अन्नाच्या शोधात गेले की बायका दगडाने/ गारगोटीने दगडावर, मातीत चित्रं काढून एकमेकींना संदेश देत असत. हे संदेश देण्यात हळूहळू उत्क्रांती होत गेली आणि भाषा, लिपि तयार होऊ लागली.
मग मैत्रिणीला भेट दिलेले रुमाल, हेअरबॅंड, हातपंखे आणि कमरेच्या पट्ट्यांवर मैत्रीचे संदेश महिला एकमेकींना देत. वृद्ध महिला स्वतःचे आत्मचरित्रात्मक गीत तयार करून आपल्या आयुष्यातील कष्ट किंवा संस्काराचे दोन शब्द पुढील पिढीतील महिलांना सांगत.
निसर्गाच्या सानिध्यात, निसर्ग देईल ते वापरुन, खाऊन जीवन कंठणार्या प्रत्येक जमातीतल्या आदिवासींची बोली भाषा वेगवेगळी आहे. त्यांचे जगण्याचे नियम, रूढीपरंपरा तिथल्या हवामानाला समजून बनवलेले असतात. अनुभवातून तयार झालेले असतात.
आदिवासींची बोली कळत नसली तरी थोड्याफार प्रमाणात त्यांच्याशी संवाद साधता येतो. मध्यंतरी किशोरच्या एका असिस्टंट इंजिनियरची बदली ग्रेट निकोबारला म्हणजेच भारताच्या शेवटच्या दक्षिण टोकाला झाली होती. उत्सुकता म्हणून आम्ही त्यांच्याशी बोलायचो. तिथल्या शोंपेन आदिवासींची सद्यस्थिती जाणून घ्यायचो. काही नवीन माहिती मिळायची. या आदिवासींना सरकारने पूर्ण संरक्षण दिलं आहे. ते जर बाजारात आले तर त्यांना काय पाहिजे असेल ते त्यांना दिलं जातं. वस्तूंसाठी पैशांचा वापर अजूनही ते करत नाहीत. आणि हे नक्की, की ते विना मोबदला देखील काही घेत नाहीत. ते जंगलातून येताना केळीचे घड, मध, नारळ घेऊन येतात आणि त्याच्या बदल्यात नवीन वस्तु घेऊन जातात. त्यांना जर कोणी वरण - भात, पराठा - भाजी खायला दिली तर ते फळं, कंदमूळ आणून देतात. हळूहळू ते समाजप्रिय होऊ लागलेत. त्यांनी मतदान करावं म्हणून त्यांना मतदानाची कार्यपद्धती समजावली जाते. अर्थात त्यांना सरकारी निवडणुकीचा उपयोग, अर्थ माहीत नसतोच. त्यांचं राज्य चालततं ते त्यांच्या मुखिया किंवा कॅप्टनच्या सांगण्यावरून.
काही ठिकाणी आदिवासी जमाती टिकून रहाण्यासाठी सरकारी कर्मचारी स्वतःचा जीव धोक्यात घालून देखील काम करतात. त्यांच्या भागात रस्ते, वीज, पाणीपुरवठा करताना नवीन बांधकाम करताना कधी कधी आदिवासी आक्रमक होतात. तेव्हा पोलिस संरक्षणात अशी कामं करावी लागतात.
तिथला एक विचार करायला लावणारा किस्सा...
दोन वर्षांपूर्वी घडलेला…
आदिवासी जनगणना करत असताना जाणवलं की गेल्या काही वर्षांत या आदिवासींची संख्या वाढत नाहीये. सरकारी अधिकारी कारण जाणून घेत असताना कळलं की, त्यांच्या मुखिया किंवा कॅप्टनने स्वतःच्या ताब्यात, स्वतःच्या देखरेखीसाठी कित्येक स्त्रियांना बंदी बनवून ठेवलंय. आता या स्त्रियांना मोकळं कसं करणार? बेटावरचे सरकारी अधिकारी, सैन्य अधिकारी, तटरक्षकदलाचे अधिकारी सगळ्यांची बैठक होऊन त्यातले काही अधिकारी कॅप्टनना भेटायला गेले. कॅप्टननी आनंदाने आदरातिथ्य केलं. त्यांच्याशी सांकेतिक भाषेत संवाद साधत होते. सुरूवातीला कॅप्टनना कारण कळलं नाही, पण जेव्हा कळलं की ते आपल्या अंतर्गत आयुष्यात ढवळाढवळ करू लागलेत, तत्क्षणी कॅप्टन त्यांच्या अंगावर धावून आले, चिडले, मारायला लागणार म्हणून सगळे अधिकारी जीव वाचवत पळत सुटले.
जगातील सर्वच आदिवासींचे आपले आपले नियम ठरलेले आहेत. आपण त्यात ढवळाढवळ करू शकत नाहीत. जेव्हा त्यांना स्वतःहून वाटेल आपण आधुनिक विचारशैली आचरणात आणली पाहिजे, त्याचवेळी त्यांच्यात बदल घडेल.
आदिवासींमध्येही अनेक स्वातंत्र्यसैनिक होते होऊन गेले. सुधारक बिशप रिचर्डसन, क्रांतिकारक बाबूराव शेडमाके, नारायणसिंह उईके, राघोजी भांगरे , बख्त बुलंद शहा, दलपतशहा, रघुनाथ शहा, विरांगणा राणी दुर्गावती मडावी, कुमरा भीमा, या प्रत्येकाची शासनाने, पाठय़पुस्तक मंडळाने दखल घेतली पहिजे.
आदिवासी दिनाच्या शुभेच्छा देताना इतकंच म्हणावंसं वाटतं, 'त्यांच्यासारखं निसर्गावर प्रेम करायला, निसर्ग संगोपन करायला, जपायला शिकूया!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

अनुभव_एका_पावसाचा

  अनुभव_एका_पावसाचा नुकतीच मी श्रीकांत सुनीताच्या घरी काही कारणाने जाऊन आले. गेट उघडलं तर समोर सुनीताला बघून मी म्हटलं, "अगं, किती छान ...