सोमवार, २७ ऑक्टोबर, २०२५

कै. उषा दातार स्मृति पुरस्कार - अहवाल

कै. उषा दातार स्मृति पुरस्कार  

एक प्रवास मैत्रीचा

साज चढवलेल्या शब्दांचा
पाठीवरल्या कौतुक थापांचा
नवी उमेद देणाऱ्या घडींचा....
एक प्रवास भेटीचा
हळुवार पावसाच्या सरींचा
संध्याकाळच्या आल्हाद गारव्याचा
गप्पांच्या आनंदी शिडकाव्यांचा...
निमित्त काहीही असो, मामबोकर भेटीत आनंद ओसंडून वाहणारच.
यावेळी निमित्त होते, कै. उषा दातार स्मृती पुरस्काराचे.
१८ नोव्हेंबरला सकाळी मला फोन आला. 'नमस्कार, मी अवधूत परळकर बोलतोय. तुमच्या 'निकोबारची नवलाई'ला कै. उषा दातार स्मृती पुरस्कार जाहीर झालाय. १० डिसेंबरला माहिमला आमच्या वाचनालयात पुरस्कार वितरण कार्यक्रम आयोजित केला आहे. तुम्हाला जमेल ना यायला?'
मला क्षणभर काहीच सुचलं नाही. नंतर सर मला, 'तिथे १० मिनिटं बोलावं लागेल... लेखनाकडे कसे वळलात ते सांगा... तुम्ही आधी काय करत होता, नवीन काही लिखाण सुरू आहे का? म्हणजे थोडक्यात पुस्तकात काय लिहीलंय ते सोडून सांगा. कारण पुस्तक आम्ही वाचलंय, आम्हाला आवडलंय म्हणूनच निवडलं.' असं सांगत होते.
त्यातली माहिती सोडून माझ्या आयुष्यातील इतर घडामोडी मला सांगायच्या होत्या..
फोन ठेवला आणि किशोरसमोर बसून मी हसता हसता रडू लागले. आनंदातिशयाने शब्दच फुटत नव्हते. 'काय झालं साग की.' असं तो म्हणत होता पण मी बोलू शकत नव्हते.
फोनवर ऐकताना माझा एक मोठा गैरसमज झाला. कारण ६ महिन्यांपूर्वी मी दुसर्याच वाचनालयाकडे पुस्तक पाठवलं होतं. मी समजले त्यांचाच फोन. बातमी मामबोकरांना सर्वात आधी कळवली. सगळ्यांचे अभिनंदनाचे संदेश वाचून मी हवेत गेले होते. खरी बातमी मग सुषमाने जाहीर केली. उषा दातार स्मृती पुरस्कार माहीम सार्वजनिक वाचनालयातर्फे दिला आहे. पुन्हा अभिनंदन....
मग काय, कुठे जायचं? कुठे राहायचं? कधी जायचं? कोण कोण भेटणार? किती आणि कोणाकोणाचे संदेश, किती प्लॅनिंग बदललं... अखेर शेवटच्या २ दिवस आधी ठरलं, आरोहीला दगदग नको, मग मी आणि बहीण सुहासिनी दोघीच जाऊ.
"अगं, मी हा लोकरीचा बाहुला बनवलाय. आरोहीला आवडेल का? "- सुनवंती.
"राजेश्वरी ताई, माझी आई माहीमला वाचनालयाजवळच रहाते. कार्यक्रम संपला की तू आमच्या घरी नक्की जा." - श्रेया बापट
"नंतर नको, उशीर होईल. मी असं करते आधी फ्रेश व्हायला तुमच्या घरी जाते मग कार्यक्रमाला जाईन."
"माहीम ऐवजी माटुंगा रोडहून जवळ आहे.
हिंदुजा हॉस्पिटलच्या रस्त्यावर आहे. हवं असेल तर लोकेशन पाठवते." - सुषमा
"अगं, मी श्रेयाच्या आईकडे जाईन म्हणते. आयोजनाच्या धावपळीत मी येऊन तुला त्रास द्यायला नको."
"काहीही काय राजेश्वरी, माहीमला येऊन तू माझ्या घरी येणार नाहीस हे काही बरोबर नाही. मी थांबतेय तू येईपर्यंत. आपण एकत्रच जाऊ."
"सायन हॉस्पिटल समोरून चाललोय ग. आता तू सांगतेस तसं येतो."
"फक्त उजवीकडे गंगाविहार हॉटेल दिसेल तिथून सरळ ये.
सर्कलला डावीकडे वळू नकोस. ते गेट बंद आहे.
तिथे लोकमान्य सोसायटी कोणालाही विचारलंस तरी सांगतील."
हो, नाही करत करत अखेर आमची गाडी सुषमाच्या सोसायटीच्या आवारात शिरली.
"मी खाली जाऊन राजेश्वरीला घेऊन येते तोपर्यंत कपात चहा गाळून टेबलवर झाकून ठेव." अशी नवर्याला ऑर्डर सोडून सुषमा खाली आली. हे मला ऐकू आलं कारण दहा मिनिटांपासून आमचा फोन सुरूच होता. तो एकमेकींना समोर बघूनच बंद झाला.
समोर सुषमा छान आकाशी रंगाच्या खानदानी रेशमी साडीत उभी दिसली. खरंच खूप छान दिसत होती.
घरात शिरलो तर चकली, बिस्किटं आणि झाकलेल्या चहाचे कप समोर स्वागतालाच. बायकोची आज्ञा शिरसावंद मानण्यात आली होती. कौतुकास्पद...
जेमतेम पंधरा मिनिटं मिळाली आम्हाला गप्पा करायला. त्यातच मला चार तासांचा प्रवास करून आल्यामुळे आवरायचं होतं. पण भेटल्याचा आनंद इतका होता, की काय तयारी करतेय त्याकडे लक्षच नव्हतं. बरोब्बर पंधराव्या मिनिटाला बाहेर पडलो.
आम्ही ज्या लिफ्टने उतरणार होतो त्या लिफ्टने दस्तुरखुद्द ओरिसाकर वर आले. मी चक्कर येऊन पडणार होते😍😍 - सुषमा
कसलं surprise होतं उल्काचं😄🎉🎊🎉🎊🎉🎊🎊😍😍😍😍
मामबोकर भेटीची सुरुवात मी, सुषमा मग उल्का भेटत झाली. सुहासिनी आणि आम्ही तिघीजणी गप्पा मारत वाचनालयाच्या इमारतीत पोचलो.
सुषमाचे आदरातिथ्य भावले होतेच. ग्रंथालयातील सांस्कृतिक वातावरण, वागण्याबोलण्यातील मोकळेपणा आणि कार्यक्रम परिपूर्ण व्हावा म्हणूनची धडपड खरंच सुखावून गेली.
विशेष म्हणजे ग्रंथालयातील कर्मचारी वर्गाने आपणहून कष्ट घेऊन सजावट उत्तम केली ह्याचे फार कौतुक करावेसे वाटते.
चहापान, एकमेकांची ओळख होताहोताच मामबोकर सुनवंती आणि श्रद्धा सोहनी समोर आल्या. माझी खरंच खूप द्विधा मनस्थिती झाली. सुनवंतीने आल्याआल्याच माझ्या हातात आरोहीसाठी एक बाहुलीची बॅग दिली. गंमत म्हणजे तिने तयार केलेला बाहुला कमी वाटून तिच्या अहोंनी अजून एक छान गोंडस बाळ आणून दिलं. अगदी कोडकौतुकच...
जाताना मला एका मैत्रिणीने सांगितलं होतं, 'माहीमचा हलवा घेऊन ये.' मला तर त्यासाठी वेळ घालवायचा नव्हता पण श्रद्धाने ते ऐकलं बहुतेक. ती माहीमचा चविष्ट, शुद्ध तुपातला हलवा, सिंगापूरची चॉक्लेट, एक गळ्यातल्याचा सेट असा भरगच्च आहेर घेऊन आली. सोहळ्याची जाणीव अजूनच तीव्र झाली...
मी पहिल्यांदाच भेटत होते पण तसं अजिबात जाणवलं नाही. ही खरंतर मामबोची खासियत. पहिल्यांदा भेटलो तरी खूप जुनी मैत्री असल्यासारखं वाटतं.
डोंबिवलीहून किशोरचे मित्र विलास आणि मीनल कुलकर्णी आले होते. श्रेयाच्या आई प्रज्ञाताई आल्या होत्या. मला सगळ्यांशी गप्पा मारायच्या होत्या पण सगळीकडे उत्साहच इतका होता की बोलायला शब्द फुटत नव्हते. माझं आपलं एकच पालुपद सुरू होतं, "खूप छान वाटलं तुम्ही आलात पाहून."
चहापान, ओळख इतरांशी गप्पा करत घड्याळाचा काटा कार्यक्रमाची वेळ दाखवू लागला.
शैलाताई, अवधूत सर सगळ्यांशी छान गप्पा मारता आल्या.
कार्यक्रमाची सूत्रं सुषमाने अतिशय उत्तमप्रकारे सांभाळली. माहीम वाचनालयाची माहिती, कै. उषा दातार यांच्या लेखनाविषयी सांगून मग पुरस्काराबद्दल... समोर कै. उषा दातार यांचा मुलगा आणि सून बसले होते. मला खरंच खूप कौतुक वाटलं त्यांचं. आईची स्मृती जागवत नवोदित लेखनाला प्रोत्साहन देण्याचं खूप छान कार्य ते करत आहेत.
२०१८-१९ चा पुरस्कार श्रीमती सरिता आव्हाड यांना 'हमरस्ता नाकारताना' या पुस्तकाबद्दल जाहीर झाला. सरिता ताईंच्या आयुष्यातही बर्याच घडामोडी, वळणं आहेत. लेखिका कै. सुमती देवस्थळी यांची मुलगी, आंतरजातीय लग्न, पुरुषप्रधान संस्कृतीत वाढलेला नवरा, नवर्याचा कॅन्सरने झालेला मृत्यू आणि आता दोघांच्या संमतीने करंदीकरांच्या बरोबर एकत्र रहाणे. साठी पार केलेल्या, जोडीदाराच्या नसण्याने एकट्या पडलेल्यांचे मेळावे भरवणे, शक्य झाल्यास जोडीदार मिळवून देणे, अशाप्रकारचा कोतुकास्पद उपक्रम सध्या त्या राबवत आहेत. या सगळ्या घडामोडी अतिशय उत्तमप्रकारे त्यांनी 'हमरस्ता नाकरताना' या पुस्तकात मांडल्या आहेत. हे पुस्तक लिहिण्यामागची कथा त्यांनी अतिशय प्रभावीपणे सांगितली.
मग वेळ आली माझी. आधीच सगळ्यांच्या केलेल्या कौतुकाने, आजूबाजूच्या सजावटीने आणि रेड कार्पेट वरून एकेक पावलं टाकत येताना माझे डोळे दीपले होते. त्यात सुषमाने केलेल्या गोड निवेदनाने अंगावर मूठभर मांस चढलं. पोडियम समोर उभी तर राहिले, पण मनात ठरवलेली सुरुवात पुर्णपणे विसरून गेले होते. बोलताना परळकर सरांचे शब्द आठवले, पुस्तकात लिहिलेलं सांगायचं नाही. बोलता बोलता गाडी पुस्तकाकडं चालली ती वेळीच थांबवली आणि पुस्तकाव्यतिरिक्त बोलून माझं भाष्य संपवलं.
प्रमुख पाहूण्या म्हणून डॉ. अरुणा दुभाषी होत्या. भाषेवर प्रभुत्व म्हणजे काय ते त्यांना ऐकताना जाणवतं. त्यांनी बदलते कथालेखन, लेखक यांच्यावर केलेले भाष्य म्हणजे दुधातली साखरच. माझ्या fb wall वर share केलेलं त्यांचं भाषण नक्कीच ऐका.
अखेर श्री. अवधूत परळकर सरांनी पुरस्काराचे स्वरूप सांगायला सुरुवात केली. "पूर्वी आम्ही अगदी मामुली रक्कम देत होतो. यावर्षीपासून पुरस्काराची रक्कम थोडी वाढवतोय. पूर्वीच्या १०,००० रू. ऐवजी यावर्षी २५,००० रू, प्रशस्तिपत्रक आणि स्मृतिचिन्ह देत आहोत."
हे ऐकताच सुखद धक्का तर बसलाच पण डोळ्यात पाणी जमा झालं.
शैलाताई, अवधूत सर, मेधाताई आणि सुषमा या सगळ्यांची साहित्यसेवेची धडपड, त्याविषयीची सखोल जाणीव, माझ्यासारख्या नवोदित लेखिकेला दिलेले प्रोत्साहन, यासाठी त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच.
कार्यक्रम सुरू असताना उल्का एकेक फोटो काढून मैत्रिणींना पाठवत असावी.
नंतर त्यावर आलेले अभिप्राय म्हणजे दुधात साखरच...
किती गोडुल्या सगळ्या ! - वैशाली ताई
आऽऽ ...किती कळा येताहेत पोटात...आईईई!! 😀😀 - उषा
मस्त दिसतायत सगळ्याजणी👌👌- उषा
वाह, मस्त सोहळा, छान फोटो 👌😍- रजनी
राजेश्वरी... खूप छान वाटतंय यार तुझ्यासाठी....soo happy for you dear 💕 लिखते रहो! खुश रहो!👍- उषा
श्रद्धाही दोन वर्षांनी भेटली. छान वाटलं तिला भेटून. - उल्का
काय बोलल्यात अरुणाताई, आम्ही मंत्रमुग्ध! - सुषमा
"मस्त मस्त. फोटो बघून दुधाची तहान... असो. - मधू
एकत्र फोटो, सह्या, गप्पा आणि चहापान...
केतकर केटरर यांचे बॉक्स प्रत्येकाला देण्यात आले. डोळे दिपवून टाकणार्या या कार्यक्रमात पोटच्या भुकेची जाणीवच नव्हती. मी म्हटलं, आम्ही दोघी जाताना गाडीतच खाऊ. इथे शक्यच नाही. पाय निघत नव्हता पण घड्याळाचा काटा पण थांबत नव्हता. पुन्हा निवांतपणे भेटू या आश्वासनानंतर अखेर सगळ्यांना टाटा बाय बाय करून गाडीत बसलो.
गाडी मार्गस्थ झाली आणि बॉक्स उघडला तर काय, "बापरे!" दोघीही एकदमच ओरडलो. बटाटा वडा, मटार करंजी, दहीवडे आणि भरगच्च सुकामेवा घातलेला केशर शिरा... निःशब्द...
माहीमला पोचल्यापासूनचे एकेक क्षण अनमोल असल्याची जाणीव कायम माझ्या मनात असणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

अनुभव_एका_पावसाचा

  अनुभव_एका_पावसाचा नुकतीच मी श्रीकांत सुनीताच्या घरी काही कारणाने जाऊन आले. गेट उघडलं तर समोर सुनीताला बघून मी म्हटलं, "अगं, किती छान ...