सोमवार, २७ ऑक्टोबर, २०२५

मामबो_बाळाला_पत्र

 मामबो_बाळाला_पत्र

मामबो बाळा,
०७ जुलै २०१६ला जन्म झालेला तू, आता किती मोठा झालास रे?
काय म्हणू तुला?
लहान मूल म्हणू तर ते तू नक्कीच नाहीस.
शाळेच्या कित्येक इयत्ता तू केंव्हाच पार केल्यास.
महाविद्यालय म्हणू तर तू नुसतंच महाविद्यालयीन मुलांसारखी मजा मस्ती नाही करत. विद्यापीठ म्हणायचं तर थोडीशी कमी तुझ्यात नक्कीच आहे.
३२९ जणांच्या कुटुंबाचे सर्वात लाडके बाळ आहेस तू.
जेव्हा कोणी तुला अध्यात्माचे, संस्काराचे चार श्लोक शिकवतं तेव्हा या कुटुंबातल्या कित्येकांच्या मनात भक्तीभाव निर्माण होतो...
कित्येकजण तुला अनुभवाचे बोल सांगतं तर कोणी निसर्गातील आश्चर्य, विविध रूपं दाखवतं...
कोणी आपल्या आठवणीत रममाण होत असतं तर कोणी प्रलोभनातील जोखीम दाखवतं किंवा भविष्याची स्वप्नं ......
आपल्या व्यावसायिक अनुभवगाठी उलगडून दाखवतात तेव्हा त्यात घ्यावी लागणारी काळजी पण नकळतपणे सगळ्यांनाच शिकायला मिळते...
जुन्या संगीतात बागडायला लावताना तर सगळेचजण त्यात मनोमन थिरकतात...
काहींना आपल्या भ्रमणातील थरार तुला दाखवावेसे वाटतात तर कोणाला कथा, कादंबरीतून काल्पनिक जगत...
नाजुक साजूक प्रेमकविता आणि हटक्या लटक्या रागाचा तोरा तर प्रेमातच पाडतो...
कवितांबद्दल सांगताना तर तुला त्यांची कितीतरी रूपं दाखवतात...
वृत्तछंदातील कवितेतून शिस्त कळते तर मुक्तछंदात रमायला जमते...
प्रेमात आकंठ डुंबणे तर विरहात जीव नकोसा करणे...
विद्रोहात कानशीलं तापतील इतका संताप होणे तर कनवाळू कवितेतआजीच्या मायेने कुरवाळणे...
सगळे सगळे भाव या कविता दाखवत असतात...
साहित्याची विविध रूपं तुझ्या पटावर मांडताना, मांडलेली रूपं वाचताना जीव हरखून जातो...
बाळा, तू माझ्या जीवनात प्रवेश केलास, नाही नाही, मी तुझ्या विद्यालयात प्रवेश केला आणि माझं आयुष्यच बदललं बघ. माझंच काय आपल्या कुटुंबाचंच आयुष्य बदललं म्हण ना...
स्वत्व बीज सापडलं, स्वतःची ओळख रुजवली, त्याला कोंब फुटले...
विविधरंगी, विविधढंगी बगीचा तयार झाला...
समृद्ध, निखळ मैत्र मिळालं...
जीवनात आनंद शोधायचा मार्ग गवसला...
एक सक्षम बाळ घरात चिवचिवाट करून सुख, समाधान देतं ना तसं तू करत आला आहेस आणि करत रहाशील...
फक्त तुला दोनचार गोष्टी शिकवायच्या राहिल्यात रे. त्या शिकलास की तू अगदी अष्टपैलू बाळ होशील. त्याची उणीव खूप जाणवते. त्या साहित्यप्रकाराकडे तुला फारसं कोणी घेऊन गेलं नाही. नाही म्हणायला तुझ्या सानिध्यात राहून एक चित्रपट अवतरला पण तो एकच..
एकांकिका, नाटक, समीक्षा अशा काही प्रकारच्या वाटेला तुला नेलं नाही त्यामुळे अजूनही तू परिपूर्ण नाहीस असं वाटतं.
एक छोटीशी कथा दृश्यस्वरुपात कशी यावी याचं ज्ञान व्हायचं राहिलंय तुझं.
मान्य आहे मला, आपला समूह स्वतः लिहिलेल्या चार ओळी - कथा, कविता, लेख, विचार, अनुभव, आठवणी, मनोगते इतरांपर्यंत पोचवण्यासाठी आणि मराठीचा आस्वाद घेण्यासाठी निर्माण झालेला आहे पण कधीकधी वाटतं ना, यापलीकडे जावं, शिकावं, शिकवावं... काय सांगावं, तुझ्यासोबत लेखक होताहोता कोणी दिग्दर्शक आणि अभिनय निपुण होतील.
खूप जास्तवेळ लागतोय का रे वाचायला? हे कुटुंबच असं आहे, याच्या विविधगुणदर्शनाचे गोडवे गाऊ तितके थोडेच आहेत...
असाच बहरत रहा बाळा!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

अनुभव_एका_पावसाचा

  अनुभव_एका_पावसाचा नुकतीच मी श्रीकांत सुनीताच्या घरी काही कारणाने जाऊन आले. गेट उघडलं तर समोर सुनीताला बघून मी म्हटलं, "अगं, किती छान ...