शुक्रवार, २५ सप्टेंबर, २०२०

वाचन_प्रेरणा_दिवस

 वाचन_प्रेरणा_दिवस

 

 

 

या गठ्ठ्यातले दिवसाला तीन पैसे, हे दोन पैसे, हे पाच पैसे.

ही पुस्तके तुझ्यासाठी नाहीत. ही मोठ्या मुलांसाठी आहेत. तुला कळणार नाहीत. ही दिवसाला दहा आणि पंधरा पैसे आहेत.

तुला चित्र रंगावायचे असेल तर एका चित्राला पन्नास पैसे, पण बाकी पुस्तक खराब करायचे नाही.

दिवाळीची सुट्टी, मे महिन्याची सुट्टी सुरू झाली की, सकाळी उठल्याबरोबर वाड्याच्या दरवाज्याच्या दारात एक सतरंजी टाकून आमचे असे पुस्तकांचे वाचनालय सुरू व्हायचे. परीक्षा संपली की दुसर्याच दिवशी बाबा दुकानात जाणार. भालचंद्र बूक स्टॉल चे मालक बाबांचे मित्र होते. त्यांच्याकडून दरवर्षी छोटी मोठी पंचवीस तीस पुस्तकांचा गठ्ठा बाबा घेऊन यायचे. जुन्या पुस्तकांचे कपाट उघडले जायचे. सगळी पुस्तके बाहेर निघायची. जुन्या वहीतल्या कोर्या कागदाचे चौकोनी तुकडे करायचे. त्यावर स्केचपेनने 1,2,3 नंबर घातले जायचे. जुन्यांचे नंबर घालून झाले की नवीन पुस्तकांना पुढील नंबर.. मग त्यांचे वर्गीकरण केले जायचे. जादूच्या कथा, परी कथा, पक्षी-प्राण्यांच्या कथा, प्रवास वर्णन, रहस्य कथा, व्यक्तिचित्रे, चित्रकला, वगैरे... सगळी पुस्तके आम्ही भावंडांनी वाचून काढलेली असायचीच. एकदा का त्यांचे सविस्तर वर्गीकरण झाले की त्याप्रमाणे नावे आणि नंबर लिहून एक वही तयार करायची. त्यात दिनांक, नेणार्याचे नाव, पुस्तक परत आणून दिल्याची तारीख आणि पैसे असे रकाने करायचे. वाचनालयाची तयारी पूर्ण झाली की मग दरवाजात सतरंजी टाकली जायची. गल्लीतील, आजूबाजूची मुले येऊन आमचे वाचनालय सुट्टी संपेपर्यंत सुरू असायचे. जमलेले पैसे ठेवायला आई एक डब्बा द्यायची. सुट्टी संपली की पुन्हा पुस्तके कपाटात आपल्या जागेवर जायची आणि डब्यातले पैसे मग पुढच्या सुट्टीत नवीन पुस्तके आणायला वापरले जायचे.

बाबांनी अजून एक सवय लावली होती, ती म्हणजे पुस्तक परत करणार्याला, त्यात काय वाचलेस? आवडले का? असे विचारायचे. म्हणजे त्या पुस्तकावर थोडक्यात चर्चा व्हायची. जो जास्त पुस्तके वाचेल आणि चर्चा करेल त्याला शेवटी एक पुस्तक भेट द्यायचे.

फार मजा यायची हे सर्व करतांना. सुट्टीत आलेली चुलत, आत्ये, मामे भावंडसुद्धा यात रमून जायची. संध्याकाळी पाच नंतर वाचनालय बंद आणि खेळ सुरू.

आम्हा बहीणींची, पुस्तक वाचून त्यावर चर्चा करण्याची सवय काही प्रमाणात अजूनही सुरू आहेच.       

आज वाचन प्रेरणा दिवसअसे पेपरमध्ये वाचल्यावर मनात विचार आला, कधीपासून आपल्याला वाचनाची आवड लागली? उत्तरात प्रमुख कारण आमचे वाचनालय सापडले. आम्हाला वाचायला येत नव्हते तोपर्यंत बाबा पुस्तके वाचून दाखवायचे, गोष्टी सांगायचे. मोठे होत गेलो तसे आपले आपले वाचन सुरू केले. घरातली पुस्तके वाचून झाली की, कराड नगरपालिका वाचनालय/ग्रंथालयात जावून कधी तिथेच वाचायचे आणि येतांना पुस्तके घेऊन यायचे. याची सवय मोठ्या काकांनी लावली. त्यांना ऐकायला याचे नाही मग ते दिवसभर वाचनात वेळ घालवायचे. रोज एक पुस्तक वाचायचे. आमचे वाचून झाले नाही की त्यांची चलबिचल सुरू असायची. लवकर वाच म्हणून मागे लकडा लावायचे. सुट्टीत चार पुस्तकांपैकी दोन मोठ्यांची आणि दोन मुलांची आणायचे. ते वाचनालयात गेले की, आमचे नंबर लागायचे, पहिले पुस्तक कोण वाचणार? याचे. काल तू पहिले घेतले, आज माझा नंबर असेही व्हायचे. फार मजा यायची. कोणीतरी रहस्यकथा लिहायला घ्यायचे. सुट्टी संपेपर्यंत ती मोठी कादंबरीच व्हायची. सगळ्यांचे विचार घेत घेत लिहिले की मग, सुरुवात कुठून झाली आणि शेवट कुठे झाला ते कळायचेच नाही. त्याला शेवट करायला मोठ्यांची मदत घ्यावी लागायची..

शाळा संपल्या, कॉलेज सुरू झाले.. अडनीड्या वयात गेलो आणि मग घरचे वाचनालय बंद पडले. प्रत्येकाच्या आवडीनिवडी बदलत गेल्या. नगरपालिका वाचनालयात प्रत्येकाचे वेगळे खाते उघडले आणि पसंती/नापसंती उलगडत गेली... वाचनाची आवड मात्र अद्ययावत राहिली. महाराष्ट्राबाहेर गेल्यावर सुरूवातीला घरातलीच पुस्तके पुन्हा पुन्हा वाचली जायची. हिन्दी, इंग्लीश पेपर वाचून समाधान होत नव्हते. सुट्टीत घरी आले की पुन्हा भरपूर वाचन होत असे. गूगलने मात्र सगळ्यांची सोय करून दिली. जगात कुठेही जा आंतरजाल असेल तिथे वाचायला मिळेल. खूप सोपे करून दिले वाचन...

पूर्वी सुट्टीत प्रत्येक दिवसाची सुरूवात आणि शेवट व्हायचा तो वाचनाने... आता वाचन प्रेरणा दिवस हे शब्द वाचुन विचार मनात आला. कमी होत चाललेय का वाचनाचे प्रमाण? 

 

                                                    राजेश्वरी

                                                   १५/१०/२०१९    

 

                   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

पाचोळा - कुसुमाग्रज

कविता रसग्रहण    पाचोळा - कुसुमाग्रज आडवाटेला दूर एक माळ तरू त्यावरती एकला विशाळ आणि त्याच्या बिलगूनिया पदास जीर्ण पाचोळा पडे तो उदास उषा ये...