दिवाळीचा किल्ला
साप्ताहिक संकल्पनेचा विषय कळला आणि सगळे बालपण डोळ्यासमोर आले... अर्थात मुलांबरोबर पुन्हा पुन्हा अनुभवता आलेच होते. पण आता मात्र खंड पडला हे मान्य करावे लागेल.
लहानपणी वाड्यात बालपण गेलेल्यांना हा दरवर्षी येणारा प्रसंग.. सहामाही परीक्षा सुरू असतांनाच ‘त्याचे’ विचार, ‘त्याच्या’ गप्पा सुरु असतात.. आणि परीक्षा संपली रे संपली की त्याच दिवसापासून ‘त्याचे’ काम सुरु होते. अभ्यास करतांनाची मरगळ कुठल्याकुठे निघून गेलेली असायची..
वाड्यात असलेली पाच, सहा बिर्हाडे.... त्यांची लहान मोठी उत्साही मुले... आधी चर्चा करणार.. एखादा इतिहासप्रेमी असेल तर तो ‘त्या’चा इतिहास रंगून रंगवून सांगत आपण ‘त्या’ची प्रतिकृती करणे किती अभिमानास्पद गोष्ट असेल हे सर्वांना पटवून द्यायचा.. मग एखादे ‘त्या’चे पुस्तकातले चित्र पाहून तशी रचना करायला सुरुवात करायची...
वाड्यातल्या अंगणातील लहान मोठे दगड आणायचे, तुटलेली कौले गोळा करायची, माती मात्र चाळूनच घ्यायची.. खराब झालेला कपडा, प्लास्टिक आणि पत्र्याचे छोटे मोठे डबे आणि मिळेल ते सामान सगळे गोळा करून ठेवायचे. मग एकाने जागा साफ करायची.. जागा मात्र दरवर्षीची ठराविकच असायची. मग दगडे लावणे सुरु व्हायचे. आकार मनासारखा जमेल तोपर्यंत सगळ्यांच्या डोक्याने त्यात उलट सुलट बदल करायचे.. कधी मग जुने कापड ओले करून त्यावर पाहिजे तसे दाबायचे. जिथे बुरुज करायचे असतील तिथे उलटे डबे ठेवले जायचे. पाणी घालून कालवलेली माती जरूर असेल तिथे लिम्पत जायचे. अरे हो, राहिलेच की, जवळच्याच दवाखान्यामधील नर्स कडून आधीच सलाइनची नळी आणलेली असते, त्याची आधी चालू स्थितीत आहे की नाही ती परीक्षा घ्यायची. ती नळी जिथे धबधबा किंवा तलाव करायचा असेल तिथे आतून लावून ठेवायची. आणि हो, त्या नळीचे तोंड मात्र सांभाळायचे नाहीतर त्यात माती गेली तर तिला साफ करणे औघड आणि मग पाण्याचा प्रवाह कमी होऊन जातो. सर्वात शेवटी भजीच्या पिठासारखे माती मिश्रित पाणी सगळ्या बांधकामावर हळू हळू टाकत जायचे. एका काडेपेटीच्या काडीने बुरुज, तटबंदी, दरवाजा यांच्यावर रेषा उमटायच्या.. आणि ते पाणी ओले असतांनाच त्यावर मोहरी, नाचणी, धणे, गहू, ज्वारी अशी धान्ये घालायला विसरायचे नाही हं. दिवाळीला अजून चार,पाच दिवस बाकी असतात मग तोपर्यंत त्यावर जंगल वाढले पाहिजे ना.
असा हा ‘तो’ आमच्या शिवरायांचा खास किल्ला तयार होतो. सर्वात वर शिवरायांना बसायला सिंहासन बनवायचे किंवा मावळे आणतांना एखादे सिंहासन पण आणले जाते. बहुतेकवेळा एकदा आणलेले मावळे आणि शिवाजी महाराज घरातच एखाद्या खोक्यात जपून ठेवलेले असतात. वर्षभर त्यांना जपून ठेवायचे हे काम मात्र आई अगदी प्रामाणिकपणे करायची. या सगळ्या कार्यात समोर उभे राहून आमचे बाबा मात्र लागेल तिथे सूचना द्यायला जातीने हजर असायचे. कधी आम्हाला जमत नाही असे वाटले तर स्वतः बसून करून द्यायचे. बाबांनी तर स्वतःच्या लहानपणी, मुलांसाठी आणि नंतर नातवंडांबरोबर पण असे किल्ले करण्यात आनंद लुटलाय..
मग वसुबारस पासूनच किल्ल्यासमोर पणती लावायची, मावळे-शिवाजी मांडायचे, धबधब्याचे पाणी सुरु करायचे आणि ते केलेल्या तलावात नीट जातेय कि नाही ते पाहायचे, त्या पाण्यात मग प्लास्टिकची बदके आणि फुले टाकायची.. त्यावर वाढलेले गावात किती मोठे झाले ते पहात राहायचे. रोज रात्री सगळे मावळे काढून ठेवायचे. सकाळी उठल्यावर पहिले काम कि किल्ल्यावर आधी पाणी शिंपडायचे. मग त्याच्या समोर छोटीशी रांगोळी पण काढायची. त्याचे बुरुज, तटबंदी, दरवाजा सगळ्यांवर थोडे थोडे पाणी शिंपडावे नाही तर त्याला तडे जातात.
असा हा आम्ही बनवलेला किल्ला दर वर्षी आमच्या वयाप्रमाणे नवीन नवीन क्लुप्त्या वापरून आधुनिक बनत होता.. आमचा उत्साह वाढवत असायचा.. सगळ्यात शेवटी मात्र, म्हणजेच तुळशीचे लग्न झाले कि फटाके वाजवतांना एक मोठा बॉम्ब त्या किल्ल्याच्या आत लावून त्याचे कोसळणे हसत हसत पहायचे असायचे सगळ्या मुलांना आणि आम्हा मुलींना मात्र ते आजीबात आवडायचे नाही...
शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात कित्येक गड किल्ले बांधून स्वराज्य, स्वातंत्र्य, सुरक्षितता, सुराज्य म्हणजे काय ते जनतेला दाखवून दिले. गुलामगिरीतून रयतेला बाहेर काढून सुखसमृद्धीने जगायला विश्वास दिला. बहुतेक तेंव्हापासूनच दिवाळी साजरी करण्याला सुरुवात झाली असावी.. महाराजांच्या मावळ्यांनी पण हे गड-किल्ले अगदी आपल्या लेकरांप्रमाणे त्याचा सांभाळ केला.
आणि म्हणूनच एक आदराचं आणि प्रेमाचे प्रतिक असून घराचे रक्षण करणारा किल्ला प्रत्येकाच्या घराबाहेर दिवाळीत दिसू लागला.
राजेश्वरी
२९/१०/२०१८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा