शुक्रवार, २५ सप्टेंबर, २०२०

प्रिय मयूरा

 

 

प्रिय मयूरा,

 

कालपासून तुझी आठवण तीव्रतेने येतेय. काल संध्याकाळी मौसम बदलला, अंगाची लाही लाही करणारा भास्कर, सुटलेल्या वार्‍मुळे थोडासा शांत, थंड झाला. आकाशात ढग जमू लागले आणि मेघगर्जना सुरू झाल्या. सोबत कोसळणारा पाऊस थंडावा घेऊन आला. अंगावर शिंपडल्या जाणार्‍या शिंतोड्यांनी, गार हवेने प्रसन्न वातावरण तयार झाले. आम्ही सर्वजण त्याचा आस्वाद घेत बाल्कनीमध्ये उभे होतो. पण...

    

माझी नजर मात्र तुलाच शोधत होती. नासिराबाद/अजमेर सारखे घराच्या अंगणात तू येशील, तू भेटशील, तू फुलशिल असेच वाटत होते. फार फार आठवण येते रे तुझी. दुपारी तीन वाजले की येणारी तुझी हाक कानात रुंजी घालून बसलीय. पायात चाळ घातले तर एका लयीत छन छन छन ऐकू येईल अश्या तालावर नाचणारे तुझे पग माझ्या डोळ्यासमोरुन हलत नाहीत रे. तुझा तो डोळे शांत करणारा, मंत्रमुग्ध करणारा पिसारा, त्याची सळसळ खूपच बेचैन करून सोडते. किती दिमाखात तू रोज मला भेटायला यायचास. तुला येते का रे माझी आठवण? हाका मारतोस कारे मला? इथे तू दिसतोस पण कधीतरी कुठेतरी दूर असतोस. शोधावे लागते तुला. पण मन भरत नाही ना असे बघून. तुझा विरह कधी कधी असह्य होतो.  

 

रोज दुपारी सगळीकडे शांतता असतांनाची वेळ तू हेरून ठेवली होतीस. बरोबर त्याचवेळी मी जरा मोकळी असते ते तुला माहीत झाले होते. तू मला तुझे दर्शन देऊन नेत्रसुख द्यायचास. तब्बल साडेतीन वर्षे तू प्रत्येक दुपार माझ्याबरोबर घालवलीस. ‘मी आलोय' म्हणून ओरडलास की मी पळतच खिडकीत यायचे. कधी लपून तुझे फोटो, विडियो पण काढायचे. पण तुला निरखत मात्र जास्त रहायचे. एकदा मात्र तू फार चिडलास. त्या दिवशी मी पहिल्यांदाच DSLR हातात घेतला. तू आपल्याच धुंदीत नृत्य करीत होतास. मी लांब लेन्स झूम करीत होते. तुला वेगवेगळ्या कोंनांमधून टिपायचे होते रे मला. पण तुला त्यावेळी का कोण जाणे पण राग आला. तू पिसारा मिटवून कंपाऊंडच्या भिंतीवर जावून बसलास. माझ्याकडे पहात होतास. अचानक जोराने किंचाळत, आवेशात माझ्यावर हल्ला करायला आलास. खिडकी जवळ आलास आणि घराच्या छपरावर जाऊन बसलास. तुझ्या त्या आवाजाने मी मात्र पुरती घाबरले. माझ्या हातातला कॅमेरा तुला बंदूक वाटली की काय? मी कशाला मारेन तुला? इतके दिवस प्रेमाने तुझ्या आवडीचे दाणे खाऊ घालणारी मी, तुला मारायचा विचार का करेन? प्रेम करते रे मी तुझ्यावर. त्या दिवसांनंतर मात्र मी तुला थोडीशी घाबरायला लागले. खायला दाणे टाकायला आले तरी आधी ताटली तुला दुरूनच दाखवायचे आणि मगच पुढे यायचे. तुझ्या आठवणींने खूप खूप अस्वस्थ होते रे मी. इतक्या दिवसांचा सहवास होता ना आपला. तू दिलेली सगळी लांबसडक पिसे मी जपून ठेवली आहेत.

 

एकदिवस तुझी आठवण असह्य झाली मला. मग मी तुझे प्रतीक घरी घेऊन आले. त्याचे बटण दाबायचे आणि डोळे बंद करून आवाज ऐकत तुला डोळ्यासमोर आणायचे. तुझ्या भेटीची सर येत नाही त्याला पण....

 

                                               तुझीच

                                              राजेश्वरी

                                              ०८/०६/२०१९           

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

पाचोळा - कुसुमाग्रज

कविता रसग्रहण    पाचोळा - कुसुमाग्रज आडवाटेला दूर एक माळ तरू त्यावरती एकला विशाळ आणि त्याच्या बिलगूनिया पदास जीर्ण पाचोळा पडे तो उदास उषा ये...