शुक्रवार, २५ सप्टेंबर, २०२०

लेखन_अवजारे

लेखन_अवजारे

 

लिखाणाची अवजारं' हा विषय वाचला त्या दिवसांपासून विचारचक्र सुरू होतं.. मनातल्या मनात.. काय बरं असेल, की ज्यामुळे, ज्यावेळी, ज्याठिकाणी आपलं मन रमतं आणि शब्दात उतरतं? काहीच सुचत नव्हतं..

लिखाणाची अशी एक माझी खास जागा नव्हती, खास पेन नव्हतं, खास वेळ नव्हती... मग आठवलं, काहीवेळा काढलेले फोटो अचानक लिखाणाला विषय देऊन जातात, पण म्हणून फोटो हे अवजार असेल का? फोटो तर कित्येकदा काढले जातात आणि त्यातले काहीच फोटो मनात ठसतात. कारण ते मनापासून काढलेले असतात.. जेव्हा एकटेपण खायला लागतं त्यावेळी हमखास मी बागेत, इकडेतिकडे फिरू लागते. आजूबाजूला उगवलेली रोपं, त्यांची वेगवेगळी पानं, फुलं, त्यावर भिरभिरणारी फुलपाखरं  बघत बसायला मला जाम आवडते. मग कधी पानांना जोडून कोळ्याने विणलेलं जाळं किंवा मुंग्यांनी माती बाहेर काढून केलेलं वारूळ मी निरखत बसते...  

आश्चर्य आहे ना, हे इतके छोटे जीव अखंड कार्यरत कसे असू शकतात? किती किचकट काम अगदी जीव ओतून करत रहातात. ना मोजायला पट्टी, ना बांधायला दोरी. तरीदेखील वारुळाचा परीघ अगदी कंपास ठेऊन काढल्यासारखा... कोसळणारा पाऊस येतो आणि ती माती विस्कटुन टाकतो.. पण चार दिवसात परत शांतपणे मुंग्यांनी पुन्हा तिथेच तसंच गोल वारूळ करायला सुरुवात केलेली..  

तीच कथा कोळयाची.. कधीकधी तर आपल्या वाटेतच एका रात्रीत जाळं तयार केलेलं असतं आणि आपल्या अंगाला चिकटून तुटून जातं. किती वैताग येतो ना, हे जाळं अंगाला चिकटलं तर, काही केल्या ते पूर्ण निघतच नाही. आपलं तोंड नुसतं वाकडं, चिडकं होऊन जातं.. अरे, पण तो बिचारा इतकी मेहनत करून जाळं विणतो त्याला किती वैताग येत असेल. दाखवतो का तो तसं? शांतपणे पुन्हा नवीन जागी विणायला जातोच. शेवटी त्याचं पोट त्या जाळ्यावर अवलंबून असतं ना. मुंगी असुदे किंवा कोळी, कोणाची वाट नाही बघत बसत, आमचं घर बांधून देतील म्हणून..  

का नाही जगता येत आपल्याला असं? का उगाचच क्षुल्लक गोष्टीसाठी चिडचिड करतो आपण? असे अनेक प्रश्न मी एकटी असते तेव्हा माझ्या मनात येत रहातात..

मी हे असले उद्योग रिकाम्यावेळात करत बसते आणि त्यावर विचार...  

सापडलं सापडलं.. माझं एकटेपण/रिकामपण हेच तर माझं अवजार असेल का? त्यावेळी तो वेळ फक्त माझा एकटीचा असतो मग त्यात मी तरी भटकते किंवा कधीकधी माझं मन कुठल्या कुठल्या आठवणीत भटकत रहातं आणि कोळयाच्या जाळ्यासारखं त्यातच गुंतून जातं..

 

 

राजेश्वरी

१५/०५/२०२०   

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

पाचोळा - कुसुमाग्रज

कविता रसग्रहण    पाचोळा - कुसुमाग्रज आडवाटेला दूर एक माळ तरू त्यावरती एकला विशाळ आणि त्याच्या बिलगूनिया पदास जीर्ण पाचोळा पडे तो उदास उषा ये...