शुक्रवार, २५ सप्टेंबर, २०२०

सवयीचा_भाग

 सवयीचा_भाग

 

 

काल एक गंमतच झाली.. काल माझ्या एका वहिनीचा वाढदिवस होता. ती टाटा केमिकल सारख्या मोठ्या कंपनीत मोठ्या पोस्टवर असल्याने सहाजिकच रात्री आठ, नऊ पर्यन्त wfh सुरू असणार. म्हणून मी तिला रात्री नऊ नंतर फोन केला. नुसता आवाजी कॉल केला.. आश्चर्य म्हणजे तिनं फोन कट केला. खरं तर असं ती कधी करत नाही. किमान, कामात आहे नंतर बोलते, असं तरी म्हणतेच. लगेचच तिचा फोन आला. तिचा आला तो व्हिडिओ कॉल. छान वाटलं मला..

आजकाल केस नीट रंगवले नाहीत, कपडे नीट घातले नाहीत, अवतारात आहे म्हणून व्हिडिओ कॉल घेत नाहीत. मी घेतला..

 आणि समोर दिसली ते छान अबोली रंगाचा ड्रेस, गळ्यात मोत्याची माळ, केस सोडलेली अशी प्रसन्न गोरी गोरी, हसतमुख वाहिनी.. तशी ती नेहमीच हसतमुख असतेच.. पटकन माझ्यातोंडून उद्गार निघाला..

अरेवा! किती छान दिसतेस."

म्हणजे रात्री साडेनऊ वाजता असं बघितल्यामुळे खरं तर मीच एकदम फ्रेश होऊन गेले.

मग ती सांगू लागली,

गेले तीन महीने कपाटाला हातच लावला नाही. घरी आहे तरी ऑफिसचं काम जोरात सुरू आहे, पण घरच्या अवतारात. दोरीवरचं अंगावर आणि अंगावरचं धुवून दोरीवर अशी सवयच लागलीय आता.. आज ती सवय मोडली आणि माझ्याच वाढदिवसाला मीच छान तयार झाले.'

 किती छान वाटलं बघूनच." मी

 पूर्वी कसं सुट्टीच्या दिवशी आठवडाभराची कपड्यांची तयारी करायची सवय होती. आता ती सवय गेली असंच वाटतंय. रोज सकाळी भराभर आवरून तयार होण्याची सवय आता गेली की काय असं वाटायला लागलंय. कोण बघतंय फिरू तसंच म्हणत दाराबाहेरच्या कॉरिडॉर मध्ये फिरलं जातं. पण आज ठरवलं नाही ही सवय मोडून मस्त तयार व्हायचं. ती

मला खूप मजा वाटली तिची.. आणि तिचं हे सवय बदलणे आवडलं पण..  

 

किती गंमत आहे ना, आधी नसलेली सवय लावून घ्यायची मग ती सवय लागू नये म्हणून किंवा ती सवय बदलावी म्हणून दुसरी सवय लावून घ्यायची.

सकाळी उठल्यापासून प्रत्येकाच्या अशा कित्येक सवयी असतात.. काही सवयी रोजच्या असतात तर काही आठ दिवसातून एकदा, महिन्यातून एकदा, वर्षातून एकदा करायच्या..

जसं आम्ही म्हणतो, दर तीन वर्षांनी बदली व्हायची सवय लागलीय आम्हाला." नवीन जागी गेलं की स्थिरस्थावर व्हायची सवय.. तिथल्या वातावरणाची सवय.. संध्याकाळी वेगवेगळ्या रस्त्यांनी बाहेर फिरून परिसर बघायची सवय.. रोज फिरतांना समोरून येणार्यांच्याकडे बघत स्मित करायची सवय.. हळूहळू ओळखी करण्याची सवय.. मैत्री करण्याची सवय.. होता होता तीन वर्षे सरली की वर्तुळ पूर्ण होऊन नवीन वर्तुळ तयार करण्याची सवय..

नवीन जागी रूळेपर्यंत मागचे वर्तुळ आठवत रहाते.. मग सावकाशीनं ते वर्तुळ धूसर होत जातं.. विचार करता करता जाणवलं अशी कितीतरी वर्तुळे आपण तयार केलीत.. प्रत्येकातल्या काही गोष्टी मनावर कायमच्या कोरल्या गेल्यात.. समोर आलेल्या एखाद्या प्रसंगात अशी जुनी वर्तुळे आठवायची पण सवय असते.. जुन्या आठवांत मन गुंतलं तरी आनंदी होऊन जातं. अश्या चांगल्या सवयी जोपासल्या पाहिजेत.. दुःखाच्या प्रसंगी त्यावर मात करायला उपयोगी पडतात..

नवीन शेजारी रहायला आले की त्यांची ओळख होण्यापूर्वी त्यांची माहिती आतल्या गोटातून म्हणजे कामवालीकडून काढून घ्यायची सवय असते कित्येकांना.. मग त्यावरून त्यांच्या किती जवळ जायचं ते ठरवलं जातं.. अशी माहिती काढून घ्यायची सवय कधी कधी नडते देखील, पण सोडत नाहीत..

प्रत्येकाची खाण्यापिण्याची एक आवड असते पण नवीन राज्यात गेलं की तिथल्या वातावरणाप्रमाणे आपल्या सवयी बदलाव्या लागतात.. सवयीचा भाग असला तरी पोटाला ते पचत नाही.. हळू हळू माहिती होऊन सवय बदलावी लागतेच.. तिथे हट्टीपणा चालत नाही.. चिडचिडेपणा उपयोगाचा नसतो..

आताचीच गोष्ट.. गेलेत तीन महिन्यापासून आमच्या गेटमधून भाजीची गाडी आली की सुरक्षेच्या दृष्टीने त्यावर भरपूर पाणी मारून मग ती दुसर्या दिवशी विक्रीला येते. त्यामुळे नाशवंत भाज्या आणणे कमी केलंय.. एक दिवस बाहेर टिकणार्या भाज्याच मिळू लागल्यात.. आम्हाला आता तीच ती भाजी खायची पण सवय लागलीय. पण काही जण फार चिडचिडे झालेत, पुण्यात सगळ्या भाज्या मिळतात मग इथे का नाही आणत, असं म्हणत डाफरतात.. सगळ्या परिस्थितीवर संताप करण्याची सवय झालीय त्यांना..  

      संयम, चिकाटी सहनशीलता टिकवण्याची सवय व्हायला हवी सगळ्यांना.. सहनशीलता नसेल तर उद्वेग वाढतो आणि परिणाम चांगला होत नाही..

नेहमी लेख लिहून झाला की नवर्याला वाचून दाखवायची सवय लागलीय मला.. हो कारण पूर्ण वाचेल यावर विश्वास नाही ना.. तसा आजचा लेख ऐकवून झाला आणि प्रतिक्रियेसाठी त्याच्याकडे पाहिलं तर क्लीन बोल्डच केलं की त्यानं...

मामबो मध्ये सामील झाल्यापासून सोमवारी संकल्पना समजली की त्यावर दोन दिवस विचार करायचा आणि लेख लिहायच्या निमित्ताने त्यावेळची कामं माझ्यावर ढकलायची सवय लागलीय तुला आताशा..

 

 

 

राजेश्वरी

१५/०७/२०२०

  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

पाचोळा - कुसुमाग्रज

कविता रसग्रहण    पाचोळा - कुसुमाग्रज आडवाटेला दूर एक माळ तरू त्यावरती एकला विशाळ आणि त्याच्या बिलगूनिया पदास जीर्ण पाचोळा पडे तो उदास उषा ये...