शुक्रवार, २५ सप्टेंबर, २०२०

ससा_कासव

 ससा_कासव

 

     एकदा काय झालं? आमच्या घरात एक कासव जन्माला आलं. छान गोरं गोरं.. कुरळया केसांचं..  अर्धगोल भुवया जश्या काही आत्ताच कोरल्यात... सरळ नाक.. लांबसडक बोटं.. छोटीशी नाजुक जिवणी... म्हणजे सौंदर्याचे सगळेच निकष पुरेपूर ठासून भरलेले.. पण लवकरच कळाले की या सौंदर्याला काळा तिळ पण आहे..

कासव सगळ्याच बाबतीत आळशी निघाले.. उठून बसायचे कष्ट घेईना.. ना उभे राहायचे... बोलायचे कष्ट घेईना.. अगदीच काय खायचे कष्ट पण त्याला नको असायचे, अगदीच जबरदस्ती केली तर लगेचच अन्न बाहेर काढायचे..(cleft palet and hiatus hernia).. फक्त हातात मिळेल त्यातून आवाज करायचा म्हणजे कधी आपटून तर कधी वाजवून... त्या कासवाने चालावे, बोलावे म्हणून खूप वाट बघितली.. खूप दवाखाने पालथे घातले.. पण उपाय काही सापडेना...

 एक दिवस एक रेकी गुरु भेटले.. त्यांनी उपाय सुचवला... कधीही विचार न केलेला विचार... ते म्हणाले, एक मार्ग आहे या कासवाला चालते बोलते करण्याचा... याच्यासाठी एक ससा पण जन्माला घाला... आम्हाला काही सुचेना.. एका कासवाच्या नाजुक तब्येतीला सांभाळता सांभाळता लढत होतो.. आता ससा सांभाळणे जमेल का? खूप विचारांती या परिस्थितीलाही सामोरे जाऊ असे ठरले...

 एक दिवस एक छोटासा, गोरा गोरा.. गुबू गुबू ससुल्या जन्माला आला... त्याचा पहिला स्पर्श, पहिली नजर...  सगळ्या जन्माचे सार्थक झाल्याचा अनुभव होता.. ससुल्या खूपच गोड होता.. कधी हट्ट नाही की कधी रडे नाही... त्याची प्रगती जणू सशाच्या वेगानेच सुरू होती...

 कासव पण सारखे त्याच्यावर लक्ष ठेवून असायचे.. ससुल्याचे अनुकरण करायचे हा त्याने जणू चंगच बांधला.. ससुल्या लवकरच उभे रहायचा प्रयत्न करू लागला.. आणि काय आश्चर्य कासवाने पण आपला प्रयत्न सुरू केला की.. धडपडत उभे रहायचा प्रयत्न.. तोंडातून शब्द उच्चारायचा प्रयत्न.. अगदीच काय खायचा पण प्रयत्न... कासव आपल्याकडे पहाते, आपल्यासारखे करायला बघते हे जणू त्या सासुल्याला कळलेच होते.. ससुल्या पण कासवाला आपल्यासारखे करायला भाग पाडायचा... एकदा दोनदा कासव धडपडले तर सासुल्याच घाबरला.. मग त्याने पडण्याच्या क्षणी आम्हाला हाक मारायला सुरुवात केली... दिवस खूप छान चालले होते..

 ससुल्याने कधी स्पर्धा नाही केली... कासवाची कुवत ओळखून त्याच्याबरोबर असतांना आपली चाल धीमी करायचा.. पण प्रत्येकवेळी त्याला कासव बरोबर पाहिजे असायचे... कासवाला शिकवत शिकवत ससुल्या मोठा होऊ लागला.. कासव पण आपल्या गतीने मोठे होत होते...

 आता ससुल्या शाळेत जाऊ लागला... शाळेतली गम्मत कधी एकदा घरी येऊन कासवाला सांगतो अस्सेच त्याला व्हायचे.. शाळेत कोणाचा वाढदिवस असला आणि एखादे चॉकलेट मिळाले तरी ससुल्या त्यातले अर्धे कासवाला द्यायचा मगच स्वतः खायचा..

 आता कासव थोडे थोडे चालायला बोलायला लागले होते.. ससुल्याचा अभ्यास घेताना कासव पण ऐकत बसायचे.. कासवाला गणित विज्ञान आवडायचे नाही... पण कथा, कविता, गाणी मात्र फार आवडायची.. ससुल्या कविता म्हणतांना गडबडला की पुढचा शब्द कासव उच्चारायचा... ही एकच गोष्ट ससुल्याला नेहमीच खटकायची... माझ्या अभ्यासाच्या कविता त्याने का म्हणायच्या? यामुळे ससुल्याची थोडीशी चिडचिड व्हायची... पण नंतर परत नवनवीन गोष्टी कासवाला शिकवायचा...

 आता ससुल्या मोठा होऊ लागला... कासवाची चाल मात्र मंद ती मंदच राहिली... मग ससुल्या कधी कधी आपली चाल सोडून कासवाच्या चालीला पकडून कासवाशी मस्ती करतो... कासवाला हसवतो.. ते बघून भरून पावते मी...

अशी ही आमच्या घरची ‘ससा कासवाची गोष्ट...

 

 

 

राजेश्वरी

०६/०९/२०१८  

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

पाचोळा - कुसुमाग्रज

कविता रसग्रहण    पाचोळा - कुसुमाग्रज आडवाटेला दूर एक माळ तरू त्यावरती एकला विशाळ आणि त्याच्या बिलगूनिया पदास जीर्ण पाचोळा पडे तो उदास उषा ये...