#शाबासकी
#ललित
काही दिवसांपूर्वी पेपरमध्ये एक बातमी वाचनात आली. आवडली म्हणण्यापेक्षा खूप भावली मला. कदाचित जास्त जवळची असेल म्हणून त्याची तीव्रता जाणवली. बातमी अगदी छोटीशी होती, पण त्याचा अर्थ माझ्या मनावर खोलवर रूतला तो असा...
‘आई-वडील आपल्या आठ वर्षांच्या मुलाला घेऊन प्रवासाला निघाले. कदाचित पहिल्यांदाच निघाले होते. या आधी कधी मुलाला घेऊन बाहेर पडायचे धाडस त्यांनी केले नव्हते... कारण मुलगा कमालीचा आत्मकेंद्रित (Autistic) होता. जराही एका जागी शांत बसू शकत नव्हता. पहिल्यांदाच बघितलेले विमानतळ, चकचकीत वातावरण त्याला मोहून टाकत होते. आईचा हात सोडून त्याला धावपट्टीकडे धावायचे होते. आईने त्याला कसेबसे पकडून सेक्युरिटी चेक, बोर्डिंग लाइन मधून विमानात जाण्याच्या जिन्यावर नेले. तिथे पोहोचताच अखेर त्याने आईचा हात सोडला आणि पटापट पळत पायर्या चढू लागला. पुढे उभ्या, चढत असलेल्या लोकांना ढकलून तो वर वर चढत होता. आपला पास दाखवून चढायचे हे देखील त्याच्या गावी नव्हते. तो आपल्याच मस्तीत गुंग होता. मागून कोणीतरी आपल्याला अचानक धक्का दिला की जशी आपली प्रतिक्षिप्त क्रिया होते, साधारण तशीच काहींची झाली, तर कोणी वरच्यांना बाजूला करून त्याला आत जायला जागा करून देत होते. मागे आई त्याला कसे पकडावे या विचारात, लोकांना ‘सॉरी, सॉरी...’ म्हणत मागोमाग आत गेली. विमानातील हवाई सुंदरी नेहमीप्रमाणे सगळ्यांना गोड हसत अभिवादन करीत होत्या. मुलाच्या आईला, ‘शांत व्हा, काळजी करू नका...’ वगैरे सांगत होत्या. आता आईचे डोळे पाण्याने डबडबले होते. मागून वडिलांनी येऊन आपल्या सीट जवळ मुलाला घेतले. नवीन वातावरणात मुलगा खूपच भांबावून गेला होता. काय करू अन् काय नको असे त्याला वाटत होते. आई अपराधीपणाने सर्वांकडे बघत होती.
सगळेजण स्थिरस्थावर झाल्यावर विमान उड्डाणासाठी सज्ज झाले आणि सर्वांना सिटबेल्ट लावायचे आदेश आले. आई वडिलांनी आपले पट्टे बांधले पण काही केल्या मुलगा पट्टा बांधून घेत नव्हता. दोन्ही बाजुकडून आईवडील अथक प्रयत्न करीत होते पण प्रत्येक वेळी मुलगा त्यांचे प्रयत्न धुडकावून लावत होता. त्यांची तारांबळ पाहून हवाई सुंदरीने त्यांना ‘नका त्याला त्रास देऊ, फक्त उड्डाणाच्या वेळी त्याला घट्ट धरून बसा. एकदा विमान स्थिर झाले की मोकळे करा त्याला’ असे सांगितले. विमान वर जाऊन स्थिर होईपर्यंत तो देखील शहाण्या मुलासारखा शांत बसला. पण जसे त्याला धरलेली पकड सैलावली, तो पटकन सटकला बाहेर. त्यानंतरच्या प्रवासात तो विमानातील प्रत्येक खुर्चीजवळ गेला. प्रत्येकाला काही ना काही त्रास दिला. कधी त्याने कुणाचा हात पकडला, कधी कोणाच्या खिशातील वस्तु काढल्या, कधी कोणाचे पाणी प्यायले… बोलू तर शकत नव्हता तो, आणि समोरचा काय बोलतो त्याच्याशी काही देणेघेणे नव्हते त्याला. क्षणाक्षणाला मेल्याहून मेल्यासारखे होत होते आईला. पण आश्चर्य म्हणजे कोणताच प्रवासी त्याच्या वागण्यावर नाराज नव्हता. शक्य होतील त्या सगळ्या खुर्च्यांना भेट देऊन झाली आणि अखेर आपल्या जागेवर तो येऊन स्थिरावला.
आईने मोठा सुस्कारा सोडला. तो इतका अस्वस्थ का फिरतोय याचे विश्लेषण आई लोकांना करू शकत नव्हती.
“बाळा, असे लोकांना त्रास होईल असे नाही करायचे. शहाणा ना माझा राजा तू? का उगाच सगळीकडे फिरतोस? आपण किनी विमानात बसलोय. असे झूsssम उडते ना विमान? तसे आपण भुर्र फिरायला जातोय. तिथे आपण खूप मजा करायची. गंमत बघायची. आता माझ्याजवळ बस बरं शहाण्या मुलासारखं. शहाणं माझं पिल्लू ते.” तिने त्याला जवळ घेऊन शांतपणे समजावयाचा प्रयत्न केला, त्याला बरोबर आणलेले जेवण भरवले.
आपण कोणत्यातरी विलक्षण परिसरात आलो याचे अप्रूप त्याच्या चेहर्यावर स्पष्ट दिसत होते आईला. आज मुलाची बदललेली नजर आईला जाणवली. भांबावलेली नजर जणू आईला विचारायचा प्रयत्न करीत होती, ‘हे काय आहे? आपण कुठे चाललोय?’ आईला मुलाच्यात सकारात्मक बदल जाणवला, आवडला... त्याच्या सपाट चेहर्यावर हलकीशी लहर उमटलेली आईने स्पष्ट बघितली. त्याच नशेत जणू तो विहरत हळू हळू झोपी गेला.
त्याला शांत झालेले पाहून अचानक सगळे प्रवासी उभे राहिले. त्याच्या आईवडिलांना सर्वांनी मिळून एक कडक सलाम केला. त्यांचे कौतुक करून टाळ्यांचा कडकडाट केला. त्या बालमनाला त्याची कल्पना देखील नव्हती. आईला कळेना काय झालेय, काय चाललेय ते. ती सगळ्यांना बघून सैरभैर होते आणि तितक्यात एक गृहस्थ बोलले की...
‘‘आम्ही फक्त दोन तास त्याच्या करामती झेलतोय पण तुम्ही बारा महीने चोवीस तास त्याला झेलताय.. कौतुक आहे तुमचे... सलाम तुमच्या संयमाला.. सलाम तुमच्या प्रेमाला..’’
असा हा किस्सा वाचला आणि मला त्या सर्व हवाई कर्मचारी आणि प्रवाशांना शाबासकी द्यावी असे वाटून गेले. खूप कमी वेळा असे समजून घेणारे लोक भेटतात या आयांना... आता त्या आईचे पण धाडस वाढेल, आपल्या पिल्लाला घराच्या बाहेर काढायचे.. वेगवेगळ्या जागा त्याला दाखवण्याचे. गर्दीत मिसळायचे त्याचे धैर्य वाढवायला मदतच होईल ना?
जरा विचार करू, उलट झाले असते तर... लोकं वैतागली असती, मुलाला सांभाळता येत नाही म्हणून आईला दुषणे दिली असती तर... मुलाला ओरडली असती तर... नक्कीच तिने परत बाहेर जाणे टाळले असते... बहुतांशी असंच होतं... कित्येकदा नाही समजून घेत समाज... गरज आहे बदलण्याची... आपल्या हुशार मुलावर समाजाने प्रेम करावे असे वाटत असते सगळ्यांना पण एखाद्या विशेष/ दिव्यांग मुलाला पाहिलं की, एखाद्या प्राणिसंग्रहालयात वेगळा प्राणी पाहिल्यासारखं करतात. त्याच्याकडे रोखून काय बघतील, हसतील तरी, मुद्दाम खोड्या करून, प्रश्न विचारून भंडावून सोडतील त्याला. आणि मग कशी मजा केलीय म्हणून हसत सुटतील... असे करणार्यांना मला सांगावेसे वाटते, “अरे, दिव्यांग तो नाही. तुम्ही आहात. त्याला समोरच्यावर प्रेम करणे माहीत आहे, कुचेष्टेने हसणे नाही. तुमच्या डोळ्यावरची हुशार मुले पहाण्याची पट्टी काढा आणि मग बघा, ते मूल देखील तुम्हाला तितकेच सुंदर दिसेल."
माझी मुलगी ‘आरोही’ एक विशेष कौशल्य घेऊन जन्माला आलेली म्हणजेच दिव्यांग आहे. तिच्याबाबतीत घडलेला असाच एक किस्सा मला आठवला…
एक दिवसाची ऑफिसची पिकनिक आणि त्यात मला प्रचंड उभारी देऊन गेलेली एक घटना सांगते....
दोन्ही लहान मुलांना घेऊन मी क्वचितच बाहेर जात असे. कारण अनोळखी लोकात गेले की, आरोहीबद्दल चर्चा, प्रश्नांची सरबत्ती, सल्ले देणे सुरू व्हायचे. मी अगदी वैतागून जायचे. कधी कधी तर, कधीच न पाहिलेला प्राणी बघतात असे लोक बघत रहायचे. फार राग यायचा माझ्या मनात मग. त्यापेक्षा नकोच ते बाहेर जाणे असे वाटून जायचे.
एक दिवस सगळ्या ऑफिस कर्मचारी कुटुंबासहित पिकनिक करायची ठरली. पिकनिकची तयारी खूप छान केली होती. सगळ्यांना नाष्टा, चहा देऊन झाल्यावर वेगवेगळे खेळ सुरू झाले. आधी मुलांचे, मग महिलांचे आणि शेवटी पुरूषांचे... मुलांच्या खेळाच्या वेळी मी आरोहीला घेऊन मागे एका खुर्चीवर बसले होते. साहेबांनी ते बघितले. प्रत्येक खेळात सगळ्यांचा सहभाग झालाच पाहिजे हा त्यांचा अट्टाहास होता. मला भीती की, आरोहीला वेडेवाकडे पाय टाकतांना पाहून कोणी हसेल की काय. त्यांनी मला उठवले आणि आरोहीला घेऊन खेळ खेळायला भाग पाडले. नंतर मला वाटले की, हे सगळे माझ्या मनाचेच खेळ असावेत, कारण संगीत खुर्ची खेळतांना, गाण्याच्या तालावर, माझा हात धरून भराभर चालतांना आरोही इतकी तल्लीन झाली होती की, तिला ती गाणी बंद झालेली आजिबात पटत नव्हते. ती चालायला लागल्यावर पहिल्यांदाच मी मनापासून इतकी खुश झाली असेन. असेच अजून काही खेळ खेळून झाल्यावर सगळ्यांची जेवणे झाली.
सर्वात महत्वाचा आणि सर्वांच्या आवडीचा कार्यक्रम म्हणजे बक्षीस समारंभ... एव्हाना सगळ्यांची एकमेकांशी ओळख झाली होती. काहीजण तेलगू, काही पंजाबी, मराठी, बिहारी, तामिळ अश्या विविध राज्यातील कुटुंबे होती. गप्पा, विनोद, हसणे यांनी वातावरण भरून गेले होते...
आणि अखेर तो क्षण आला... साहेबांनी दोन मिनिट भाषण केले, पिकनिकचा हेतू सांगितला...
नंतर “आजच्या खेळाचे प्रमुख पाहुणे मुलांना बक्षीस देतील.” सगळे जण आता आपले साहेब सोडून नवीन कोण पाहुणे आले म्हणून इकडे तिकडे पाहू लागले. पण कुठेच कोणी दिसेना..
“सगळ्यांना उत्सुकता असेल हे नवीन पाहुणे कुठून आले? पण ते दुसरे तिसरे कोणी नसून आपल्यातीलच ‘कुमारी आरोही’ आहे. तिच्याबरोबर तिची आई आणि भाऊ आलाप बक्षीस प्रदान करायला तिला मदत करतील.”
शप्पथ सांगते, त्यावेळी मला मी एका सेलिब्रेटीची आई झाल्याचा भास झाला. इतक्या वर्षात असा क्षण कधीच आला नव्हता. माझ्या आरोहीला जवळ घेणे सोडाच पण क्वचितच कोणी तिच्याशी संवाद साधायचा प्रयत्न करायचे आणि इथे तर साहेबांनी खुशाल तिला प्रमुख पाहुण्यांचा मान दिला. मग मी आणि आलापने तिला प्रत्येक खेळातील विजयी खेळाडूला बक्षिसं प्रदान केली...
त्यावेळी घडलेला तो प्रसंग माझ्या नैराश्यावर प्रचंड मात करून गेला. माझ्यातील नकारात्मकता जाऊन मला माझाच अभिमान वाटू लागला. त्यानंतर कधीच मी तिला घेऊन घरी बसले नाही. शक्य होईल तेव्हा तिला घेऊन जाते. तिला वेगवेगळे अनुभव देण्याचा प्रयत्न करते... तिचे समाधान हाच आमचा आनंद...
हा प्रसंग घडला त्यावेळी मी निःशब्द झाले होते. आता जाहीरपणे मला त्यांना ‘शाबासकी’ द्यावीशी वाटते.
परिस्थिति आता खूप बदलते आहे पण तरीही अजून खूप बदलायची बाकी आहे हे जाणवते.. या मुलांना माया हवी असते, प्रेम हवे असते.. खूप निर्मळ मनाची असतात ही मुले.. जणू देवाघरची फुलेच.. थोड्याश्या मायेच्या ओलाव्याने/ शिडकाव्याने देखील तरारतात... अवहेलनेने कोमेजून देऊ नका त्यांना... प्रेम वाटत रहा.. आपोआप प्रेम मिळत जाईल...
राजेश्वरी
०७/०१/२०२०
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा