गेले_शिकायचे_राहूनी..
माझे लग्न झाले तेव्हाची ही गोष्ट... पहिल्यांदाच सासरच्या घरी पाऊल टाकले होते.. एक जुना वाडा होता.. भले मोठे लाकडी उंबरा असलेले प्रवेशद्वार.. खाली चार पाच बिर्हाडे रहात होती.. वर आम्ही आणि अजून एक बिर्ड.. जिना चढून वर आले की समोरच हॉल आणि डाव्या बाजूला स्वयंपाकघर.. त्याला लागूनच मागे मोठी गच्ची.. गच्चीच्या एका टोकाला बाथरूम आणि बाहेर भांडी घासण्यासाठी छोटी मोरी.. आल्या क्षणापासून स्वयंपाकघराचा ताबा माझ्याकडे आल्यामुळे भांड्यांचे आणि माझे लगेचच नाते जुळले. खरकटी भांडी एकात एक ठेवायची आणि घासून आलेली भांडी त्यांच्या जागा शोधुन जागेवर उपडी करायची. लग्नापूर्वी दिवसातला सर्वात कमी वेळ स्वयंपाक घरात घालवणारी मी, सासरी गेल्यावर जास्तीत जास्त वेळ भांड्यांशी खेळण्यात घालवू लागले.. जेवण बनवत असतांना, कधी माझ्या हातून तर कधी अनावधानाने चमचा वाट्यांचे पार्श्वसंगीत सुरू असायचे.. भांडी गडगडली की बाहेरून तितक्याच जोरात खसखस ऐकू यायची.. मी तरी काय करणार कित्येक वर्षे मल्टिमिटरचे कॉर्ड आणि सोल्डरिंग रॉड हाताळलेली मी, सांडशीत/चिमट्यात भांडी कशी काय घट्ट पकडू शकणार? पण तरीही नेटाने प्रयत्न सुरूच असायचे.. कधी बाहेरून काही ऑर्डर आली की टेंशन तर कधी फोडणी जळाली म्हणून टेंशन..मग भांड्यांची गडगड.. तर अश्या या भांड्यांची आणि माझी हळू हळू मैत्री जुळत होती..
आमच्या सासरच्या घरी त्यावेळी एक म्हातार्या आजी भांडी घासायला यायच्या.. खूप वर्षांपासून त्या कामाला येत होत्या म्हणे.. घरची अतिशय गरीबी चेहर्यावर दिसून येत असे.
सुरकुतलेला चेहरा.. उन्हाने रापलेली कातडी.. समोरून दिसणारे चार ठिकाणी तरी ठिगळ लावलेले जरी काठाचे नऊवारी लुगडे.. चंदेरी केसांचा छोटासा आंबाडा.. कपाळावर भलेमोठे मेणावर पसरवलेले कोरडे कुंकू.. चालतांना पाठीत नव्वद अंशात आलेला बाक.. घरात शिरल्या की दोन मिनिट तसेच उभे राहून, पाठीचा बाक तसाच ठेऊन मान फक्त वर करून बोलायची पद्धत.. वय असेल साठ पासष्ठ.. पहिल्यांदा त्यांना पाहून मला त्यांची फारच कीव आली.. या वयात देखील पोटापाण्यासाठी या बाईला इतक्या उन्हाचे चटके सोसत कामाला यावे लागते.. पाहिल्याच दिवशी त्यांना खरकटी भांडी उचलून घरातून गच्चीवरून शेवटच्या मोरीकडे नेताना बघितले आणि ठरवले की थोडे तरी आपण यांचे काम कमी करू यात.. दुसर्या दिवशी आल्या आल्या मी त्यांना बसवले, चहा बनवून दिला आणि “आजी, तुम्ही चहा प्या. तोपर्यंत मी भांडी मोरीत नेऊन ठेवते.” असे म्हणून मी भांडी उचलू लागले.. वय झाले असले तरी आजीचा आवाज बाकी खणखणीत होता.. एकदम ओरडलीच, “गं बये, चहात काय साखर बिखर घालायची पद्धत आहे की नाही? साधा चहा सुद्धा नाही करता येत तुला?”
मी एकदम गडबडलेच.. हळूच सांगत होते की, आजी, एक चमचा घातलीय साखर, पण ते तिला कळत नव्हते आणि अजून दोन चमचे साखर घालायला लावली.
हळू हळू रोजचे हे रुटीन सुरू झाले.. आजीला मी थोडी थोडी करून भांडी नेऊन देत असे.. पण त्यावर देखील तिचे खडसावणे असायचे.. “तुला भांडी एकात एका घालून आणायला काय होते ग? कधी नुसतीच ताटे आणते तर कधी कढया आणि मग पातेली.. एकात एक घालून आणत जा की.”
रात्री सगळ्यांची जेवणे आटोपली की रिकामी खरकटी भांडी थोड्या पाण्याने धुवून एकत्र मोरीत ठेवतांना आईला मी घरी बघितले होते पण तसे करायची वेळ कधी आली नव्हती, की मी कधी तसा प्रयत्न केला होता.. आता मात्र ही आजी रोज माझी परीक्षा बघत होती..
माझे मनापासून प्रयत्न सुरू होते.. आधी खाली मोठी परात ठेवायची... त्यावर एकात एक ताटं.. त्यावर तवा... आता तीन भागात एकात एका कढया, एकात एक पातेली आणि एकात एक कुंडे आणि वाट्या.. मग सगळ्यात मध्ये चमचे आणि छोट्या ताटल्या...
मी माझ्या गणिती भाषेत विचार करायचे.. सीमेट्री/प्रमाणबद्ध कसे होईल ते.. म्हणजे एक मोठं सर्कल.. मग एकच केंद्र मानून त्यात छोटी छोटी सर्कल.. आता त्या प्रमुख सर्कल वर तीन भागात छोट्या त्रिज्येची एकात एक सर्कल अडकवत जायचे..
सगळा विचार प्रमाणबद्ध करीत गेले ना तरी कुठे गडबड होतेय ते कळायचेच नाही.. कारण महितीय? इथे वजनाचा विचार करत नव्हते ना.. त्यामुळे काय व्हायचे की कढया सगळ्या जड आणि कुंडे हलके.. मग ढीग उचलतांना एकीकडे वजन जायचे आणि सगळी भांडी हातातून निसटतात की काय भीती वाटायची आणि मी पुन्हा थोडी थोडी भांडी घेऊन जायचे.. पुन्हा पुन्हा तिची कटकट ऐकायचे.. “अगदी इतकी साधी गोष्ट पण हिला जमत नाही मग संसार कसा करेल ग बाय ही?”
नंतर प्रत्येकवेळी सदनिका मिळत गेली आणि मागची मोरी विसरून गेले. पण त्या खरकटया भांड्यांना एकात एक लावून एकत्र उचलायचे कसे हे मात्र शिकायचे विसरून गेलेच..
राजेश्वरी
०४/०४/२०१९
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा