शुक्रवार, २५ सप्टेंबर, २०२०

नकार

 नकार

 

 

आई.. आई लवकर बघ..."

काय रे? इतका का खुशीत आहेस? काय झालं?

आई, अगं आहेस कुठं? मला खूप मोठ्या कंपनीत नोकरी मिळाली... एक तारखेला हजर व्हायचंय.. आता सगळं सुरळीत होईल.. काही कुणाच्या पैश्यावर जगायची गरज नाही..

आई, आज रिताच्या आवडीचे गुलाबजाम कर हं.. मी जेवण भरवणार आज तिला.. बघ किती खुश होईल ती.."

हो रे बाळा.. माझा गुणाचा बाळ तू.. किती आनंदाची बातमी सांगतो आहेस.. या दिवसाची तर मी कधी पासून वाट बघत होते.."

आई, पण आपल्याला आता जामनगर सोडून बेंगलोरला जावं लागेल.."

बेटा तुझ्या बरोबर जगाच्या पाठीवर मी कुठंही यायला तयार आहे.."

थॅंक यू ममा, लव यू ममा.. यू आर द बेस्ट ममा इन द वर्ल्ड.."

  

रितेश आईबरोबर सामानाची, घराची चर्चा करत असतो आणि इतक्यात फोनची रिंग वाजते..  

 

 

हॅलो.."

बेटा रितेश, मी बाबा बोलतोय."

कोण बाबा?... मं..  मी नाही ओळखत कोणी बाबाला.."

अरे असं काय करतो आहेस? मी आजारी आहे. नुकताच हॉस्पिटलमधून घरी आलोय. तुझ्या आईशी सविस्तर बोलणं झालंय. ती सांगेल तुला.. तुम्ही सगळे लवकर आपल्या घरी या.."

मी माझ्याच घरी रहातोय. मला अजून दुसरं कोणतंच घर माहीत नाही.. कृपा करून परत मला फोन करून त्रास देऊ नका.. गुड बाय.."

 

 

आई हे काय आता?

अरे, मी तुला सांगणार होतेच.. तुझ्या बाबांना हार्ट अटॅक आला होता. मलाही कालच कळलं.. तुझ्या काकांनी फोन करून सांगितलं.. त्यांना आता सक्तीची विश्रांती घ्यायला सांगितली आहे. पण ते घरी राहिले तर कापडाचं एवढं मोठं दुकान कोण बघणार? ते तुला दुकान सोपवायचं म्हणत होते. घरचा व्यवसाय असताना तुला नोकरी करायची गरजच काय असं त्यांना वाटतं.."

आई मग तू काय सांगितलंस त्यांना?

मी? मी काहीच बोलले नाही. रितेश काय ठरवेल ते मला मान्य असेल, असं सांगितलं.."

 

आई, मी आधीच सांगतोय, मला तू तिकडे जायचा आग्रह करू नकोस. तुला जायचं असेल त्यांची सेवा करायला तर तू जाऊ शकतेस. मी येणार नाही.."

नाही रे बाबा, रिताला घेऊन मी त्या घरात पुन्हा पाऊल टाकणार नाहीच.. पण तुझं मत देखील तितकंच महत्वाचं आहे ना. तुला मी कोणतीच जबरदस्ती कधी केली नाही आणि यावेळी देखील करणार नाही."

आई, नाही गेलं माझ्या डोळ्यासमोरुन काहीच.. मला अजून तो सोळा वर्षांपूर्वीचा दिवस आठवतोय.. पाचवीच्या वर्गात, नवीन मोठ्या इंग्लिश शाळेत माझी अॅडमिशन झाली होती. खूप मोठी चार मजली शाळा, मुलांची गर्दी पाहून मी सैरभैरच झालो होतो. सुरूवातीला तर माझा वर्ग देखील मला लवकर सापडायचा नाही. मी शाळा सुटून घरी येऊन तुझ्याशी बोलायला लागायचो. मला शाळेत घडलेल्या सगळ्या गमतीजमती तुला सांगायच्या असायच्या. तू त्या कौतुकानं ऐकायचीस पण.. माझी बडबड ऐकून छोटीशी रिता देखील आss ऊss करत आवाज करायची. खूप मजा वाटायची मला. तिचे मऊ मऊ इतकुशे हात हातात घ्यायला मला खूप आवडायचं.. पण लगेच आजी तुला ओरडायला लागायची.. ती तुझ्यावर का चिडते ते त्यावेळी मला कळायचं नाही.. रिता बोलत नाही, तिला काही कळत नाही म्हणून तुलाच दोष द्यायचे सगळे. तुला रिताला घेऊन एका खोलीत बसायला सांगायचे.. तू गप्प बसून सगळं सहन करायचीस.. चुकून तू कामात असताना ती बाहेर बागेत पळाली आणि झाडाची पानं खायला लागली तरी कोणी तिला बघायचे नाही.

मला अजून आठवते, एक दिवस मी शाळेतून आलो तेव्हा ती बागेत बसली होती, मला बघून तिने आss आss केलं म्हणून मी तिच्याजवळ गेलो तर ती मस्तपैकी मातीने भरली होती, तिच्या तोंडात माती होती आणि समोर काकू आणि आजी गप्पा मारत होत्या.. मीच तुला बोलावले आणि तिला आपण स्वच्छ केलं..   

बाबा तर तुला कायम त्रास द्यायचे. रिताला तर त्यांनी कधी जवळ घेतलं नाही पण मी तीच्याशी बोलतो, खेळतो म्हणून माझा पण राग राग करायचे.

 

एक दिवस अचानक तुला आपल्या तिघांचं सामान बांधताना बघितलं मी. मला काहीच कळत नव्हतं. लवकरच आपण या वेगळ्या घरात रहायला आलो. तिकडच्या भल्या मोठ्या बंगल्याच्या मानाने हे घर छोटच होतं पण आपल्या तिघांसाठी छान होतं.. फक्त मला तिकडे मुलांना जमवून क्रिकेट खेळायला यायचं तसं हे घर वरच्या मजल्यावर असल्याने खेळता आलं नाही.. तिकडंचं कोणीच इथे यायचं नाही. मी तुला कितीतरी वेळा विचारलं, पण तू मला काहीच सांगायची नाहीस. माझ्या शाळेच्या जवळ म्हणून इथे आलो असं सांगायचीस आणि मला ते खरं वाटायचं.. हळू हळू मला कळत गेलं.. रीताचं आजारपण, कमीपण..

तिची आजारपणं काढताना, रात्र रात्र जागताना, हलकेच डोळे पुसताना मी किलकिल्या डोळ्यांनी कित्येकदा बघितलंय तुला.. तू कधीच माझ्यावर चिडली नाहीस.. माझा अभ्यास वेळ काढून करून घ्यायचीस.. मला सगळ्या चांगल्या सवयी लागाव्यात याची किती काळजी घेतलीस तू.. तितकंच प्रेम मला रितावर करायला शिकवलंस, तुझ्या वागण्यातून.. मला कधीच एकटं पडू दिलं नाहीस.. मी इंजीनियर झाल्यावर तर माझ्यापेक्षा तू जास्त खुश झाली होतीस.. मग माझं MBA होताना, तुला माझं किती कौतुक आहे ते दिसायचं तुझ्या डोळ्यात.. आई तू माझं सर्वस्व आहेस.. आता सगळे जुने दिवस विसरून आपण आनंदानं बेंगलोरला जायचंय.. लवकरच.. मला कंपनीने घर पण दिलं आहे. काहीच अडचण येणार नाही तिकडे आपल्याला..    

 

  या माझ्या गोड, लाघवी बहिणीसाठी बाबांनी तुला घटस्फोट दिला आणि त्यांच्याचकडे आता ते मला बोलावतात? कसं जाईन ग मी तिथे? कोण आहेत ते माझे? का जाऊ मी तिथे? त्यांची काठी व्हायला? त्यांचा व्यवसाय सांभाळायला? आता माझी गरज वाटली त्यांना? इतके दिवस मी काय करतो हे तरी माहीत होतं का त्यांना?

 

हो रे बाळा, सगळं खरं आहे. मला तुझं म्हणणं पटतंय. पण ते आता अंथरुणाला खिळलेत. त्यांना तुझी गरज आहे. मनात आणलंस तर मागचं सगळं विसरून तू तिकडे जाऊ शकतोस. मी इथेच राहीन, रितुला घेऊन. तू आमची आठवण आली तर येत जा भेटायला, रहायला.. घर तुझंच आहे..

काहीही काय आई, या घरात आपण आलो, त्यावेळी इथे असलेलं सामान इथेच ठेवून आपण जायचंय. आणि जाताना घराची किल्ली त्यांना परत करायची. आता परत या गावात आपण येऊ की नाही ते पण मी सांगू शकत नाही. आता नको अडकवूस मला त्या तुटलेल्या बंधात.. माझी स्वप्नं फक्त तू आणि रितूबरोबर मी बघितलीत. त्यात इतरांना स्थान नाही. तुला जायचं असेल तर तू जाऊ शकतेस."

 

नाही रे रितेश, जिथे तू तिथेच आम्ही दोघी.. तुझं समाधान, सुख तेच माझं सुख.. जाऊ आपण बेंगलोरला"  

 

अजून एक आई, मी तुला सांगितलं नाही कधी, पण आता सांगतो. आपण इथे आल्यावर सुरूवातीला मला बँकेचं काम शिकवायला तू मला घेऊन जायचीस, नंतर नंतर मी एकटाच जायचो. पण त्या दिवसांपासून त्यांनी पाठवलेला पै न पै मी लिहून ठेवलाय. मला त्या माणसाचे उपकार नकोत आता. मी त्यांचे हळू हळू सगळे पैसे फेडणार आहे.. आपण तिघे आनंदात राहू अशी कमाई असेल माझी..

सांग त्यांना,

मी नाकारतोय त्यांच्या या मागणीला..

मी नाकारतोय त्यांच्या या करोडोंच्या व्यवसायाला..

मी नाकारतोय त्यांच्या बापपणाला..

 

 

(टीप: सत्यघटनेवर आधारित...)

 

 

राजेश्वरी

२७/०८/२०२० 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

अनुभव_एका_पावसाचा

  अनुभव_एका_पावसाचा नुकतीच मी श्रीकांत सुनीताच्या घरी काही कारणाने जाऊन आले. गेट उघडलं तर समोर सुनीताला बघून मी म्हटलं, "अगं, किती छान ...