फ्रीज_फ्रेम
कधी कधी, काही प्रसंग, घटना, तिथला निसर्ग, दृश्य आणि विशेषतः त्याचं वेगळेपण आपल्या मनात कायमचं पक्कं बसून जातं.. मग तिथले फोटो बघून मनातल्या मनात पुन्हा त्या ठिकाणी आपण जाऊन येतो.. तिथल्या आठवणी जाग्या होतात.. अशी कितीतरी ठिकाणं, घटनांनी माझ्या मनात घर करून ठेवलंय..
बंदराचे शहर/पोर्ट सिटी म्हणून ओळख असलेल्या विशाखापट्टणमला आम्ही होतो..
तेव्हा एके दिवशी... “या रविवारी आपल्याला डॉल्फिन हिलवर जायचंय. आपण सगळे मराठी फॅमिली एकत्र पिकनिकला जाणार आहोत." किशोरने असं सांगितलं..
एरवी नेहमी रामकृष्ण बीचवर जायचो तेव्हा तो समुद्रात घुसलेला, डॉल्फिनचं डोकं आणि चिंचोळ्या नाकासारखा आकार असलेला डोंगर दिसायचा.. डोंगराचा भाग नौसेनेच्या ताब्यात असल्याने पर्यटनाला परवानगी नव्हतीच. उत्सुकता मात्र खूप होती, कसा दिसत असेल वरुन समुद्र? विशाखापट्टणम शहर? खूप प्रश्न मनात होते..
पिकनिक म्हटल्यावर खेळ, जेवण, गाणी आलीच. जोडीला वरून दिसणारा निसर्ग..
सगळं आटोपून आम्ही परत जायला निघालो त्याआधी एका ठिकाणी थांबलो..
तो तिथला व्हीयू पॉइंट होता..
डॉल्फिन हिलवर उभी राहून नजर जाईल तिथपर्यंत मी निरखत होते.. समोर अथांग समुद्र...हिलच्या डाव्या बाजूला शहर आणि उजव्या बाजूला समुद्राचे पाणी आत घुसून तयार झालेली खाडी आणि नैसर्गिक बंदर... एक दोन नाही तर तब्बल पाच जेट्टी.. म्हणूनच त्याला फाइव फिंगर जेट्टी असं संबोधतात.. ते दृश्य अजून माझ्या डोळ्यासमोर आहे, एकीकडे टोलेजंग इमारती, रस्ते आणि दुसरीकडे पाण्याने नैसर्गिकरीत्या बनलेले हाताच्या बोटांच्या आकारातले वेगवेगळे / विविध कालवे.. पाणी असलेल्या पाच ठिकाणी वेगवेगळ्या विभागांच्या जेट्टी.. जसे एक नौसेनेची जेट्टी, एक तटरक्षक दलाची जेट्टी, एक पोर्ट ट्रस्ट कंपनीची आणि इतर काही खासगी कंपनीचा माल उतरवण्यासाठीच्या जेट्टी..
माझ्या मनात कोरलं गेलेलं चित्र पुढेच आहे.. निसर्गाची विविध रूपं न्याहाळत असतांना दिसले की, समुद्रात उभ्या असलेल्या एका मोठ्या कार्गो जहाजाला दोन छोट्या बोटी, म्हणजेच टग बोट/पायलट बोट, एक पुढे आणि दुसरी मागे अशा जोडल्या होत्या. हा प्रकार मी प्रथमच पहात होते. प्रथम ती साखळी समुद्राकडून आत शिरली मग हळू हळू पुढे सरकत एका ठिकाणी स्थिरावली.. त्यातली पुढची बोट हळुवारपणे जहाजाला छोट्याश्या रस्त्याने खेचत होती.. जेट्टीकडे जाण्यासाठी अजून एक वळण होतं.. पुढची छोटी बोट वळून निघाली आणि त्याचवेळी मागची छोटी बोट जहाजाचा मागचा भाग विरुद्ध दिशेला खेचून हळुवारपणे वळवतांना दिसत होती.. अपेक्षित कोनात जहाज वळवल्यावर तिघांची साखळी ठरलेल्या थांब्याकडे निघाली... किती ती समन्वयता..
माझ्यासाठी हे दृश्य विलक्षण होते.. शास्त्र शाखेची विद्यार्थिनी होते, वस्तु पाण्यावर तरंगते तेव्हा हलकी वाटते वगैरे सगळं माहीत होतं तरीदेखील ते दृश्य प्रथमच अनुभवताना मी अचंबित झाले होते..
वृद्ध आजोबांना दोन तीन वर्ष वयाची नातवंडं हाताला धरून रस्त्याने चालत जातांना कसं दिसेल ना तसचं ते चित्र मला वाटलं.. खूप आश्चर्य वाटत होतं, इतकं मोठं जहाज इतक्या छोट्या कालव्यातून जातांना इकडे तिकडे कसं आपटत नाही? बरं हे कालवे पण सरळ नाहीत ना, काही तर एकदम काटकोनात वळतात. आणि दोन्ही बाजूंना तर अजून अशीच कितीतरी जहाजं उभी असलेली.. काहींवरचं सामान क्रेनच्या सहाय्याने उतरवणे सुरू होते..
हे दृश्य त्यावेळी देखील आणि आज देखील माझ्या मनात कोरलं गेलय एखाद्या स्टीलफ्रेम सारखं..
राजेश्वरी
२५/०३/२०२०
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा