शुक्रवार, २५ सप्टेंबर, २०२०

समर्पण

समर्पण

 

     नीता ताई...

       सहा सात वर्षांपूर्वी तिला पहिल्यांदाच मी भेटले.. वय चाळीशीच्या आसपास. सावळा वर्ण.. भरपूर तेल लावून घातलेली काळ्याभोर केसांची लांबसडक वेणी.. शांत सोज्वळ चेहरा, कुणाला कधी न दुखवल्याचे त्यावर भाव.. काठपदाराची सुती साडी तिला जास्तच पोक्त बनवत असे.. प्रेमाने सगळ्या मुलांना जवळ घेणारी.. मितभाषी पण मुलांच्या नजरेतून त्यांना काय पाहिजे ते कळणारी.. तिच्याकडे आरोहिला सोपवले की मग मला पाच,सहा तास तरी चिंता नसायची..बाकी विषयांवर खूप कमी बोलायची पण आमच्या मुलांनी आज शाळेत नवीन काय केले, नवीन कोणता शब्द बोलला हे ती फार कौतुकाने सांगायची..

   सुरुवातीला नविन नवीन असतांना मी जास्त विचार केला नाही कारण मला आरोहीच्या तब्येतीची काळजी असायची. मग नीता ताई असली की विश्वासाने तिच्यावर सोपवायचे आरोहीला..

   थोड्याच दिवसात जाणवले की ताई मुलांचे खूप प्रेमाने करते पण आतून खूप उध्वस्त आहे. काहीतरी मनात सल आहे जो ती कधी दाखवत नाही. कधी खळखळून हसलेली मी तिला पाहिलीच नाही..

   एक दिवस तिची निघायची वेळ आणि मी आरोहीला घ्यायला जायची वेळ एकच आली. मग मी तिला गाडीत बसवून घेतले, मुद्दामच.. नाहीच म्हणायची ती.. कुठे सोडू विचारले तर दोन नंबरच्या रेल्वे गेट जवळ म्हणाली.. बेळगाव मध्ये अशी बरीच रेल्वे फाटके आहेत..

  "तिथे राहतेस का तू?" मी विचारले.

"नाही ग, मी तिथे एका स्वमग्न मुलाला शिकवायला जाते."

"ओह्ह! म्हणजे शिकवणी."

"शिकवणी नाही , मी 'सर्व समावेशित शिक्षण' या सरकारी उपक्रमात सामील झाले आहे." ताई

"काय आहे हा उपक्रम?" मी.

    

   "0 ते 18 या वयोगटातील विशेष गरजा असणा-या विदयार्थ्याचा शालेय आरोग्य तपासणीद्वारे तसेच विशेष शिक्षकांच्या सर्व्हेक्षणाद्वारे शोध घेण्यात येतो.

 

विशेष गरजाधिष्ठीत बालकांना आवश्यक साहित्य साधने, लोव्हिजन साहित्य, श्रवणयंत्रे, मदतनीस, प्रवास भत्ता इत्यादी सुविधा पुरविण्यात येतात. तसेच गरजेनूसार शासकिय व शासनमान्य रुग्णालयामध्ये शस्त्रक्रिया करण्यात येतात.

 

अध्ययन व अध्यापनासाठी विशेष शिक्षकांची नेमणूक करण्यात येते." ताई.

 

"वा. छान काम करतेस की."

"कसा आहे तू जातेस त्यांचा मुलगा? काय आजार आहे त्याला?" माझी उत्सुकता मला स्वस्थ बसू देईना.

"8 वर्षांचा मुलगा आहे. स्वमग्न आहे." थोडेफार त्याच्याबद्दल सांगत होती तोपर्यंत तिची गाडीतून उतरायची वेळ झाली..

   मग नंतर बऱ्याचदा तिची आणि माझी वेळ एकच यायची आणि मी तिला माझ्या गाडीत बसवायचे..

हळू हळू ती मला उमजत गेली. मोकळी होत गेली. कधी आरोही बद्दल तर कधी बाकी मुलांबद्दल सांगायची..

 एक दिवस मात्र तिने अशा काही गोष्टी सांगितल्या की मी पुरती ढवळून गेले.

 ती ज्या घरात जायची त्यांचा दूध विक्रीचा व्यवसाय होता. चार म्हशी होत्या गोठ्यात. जवळच शेती पण होती. आईवडील कायम कामात गुंतलेले असायचे. मुलगा झाला पण चार वर्षे झाली तरी तो बोलत नाही पण तब्येतीने धडधाकट असल्याने खूप उद्योग वाढवून ठेवायचा. त्याला सांभाळणे मुश्किल व्हायचे. कधी कधी कमालीचा आक्रमक व्हायचा मग त्याला आवरणे एकट्या आईला जड जायचे. एकदा रागाने तिने त्याला गोठ्यात पायाला दोरीने एका दावणीला बांधून ठेवले. आश्चर्य म्हणजे त्या मुक्या प्राण्यांबरोबर तो रमला. त्यांच्याशी वेगवेगळ्या आवाजात बोलू लागला. पुढे पुढे हे रोजचेच झाले. खायला घातले की त्याला दिवसभर दावणीला बांधायचे. मग तो तिथे कडबा खेळायचा, शेणाने बरबटायचा. पण आई खुश की मुलगा मध्ये मध्ये येऊन त्रास देत नाही.

  ताईंच्या घरी दूध घालताना कधीतरी वडील बोलून गेले की माझा मुलगा विशेष मूल आहे म्हणून. लग्गेच ताईने घरी जाऊन त्याला शिकवायचे ठरवले.

  पहिल्या दिवशी तिने सगळा प्रकार बघितला मात्र..

तिने पणच केला याचा ताबा थोड्यावेळासाठी तरी आपण घ्यायचा. त्यादिवशी त्याच्याशी ताई बोलायला लागली आणि त्याने अतीव आनंदाने ताईला कडकडून मिठीच मारली. ताईने पण त्याला जवळ घेतले, डोक्यावरून हात फिरवला. तिच्या डोळ्यात पाणी आले. शेणाने माखलेला तो इवलासा जीव. मिठी मारणे , जवळ येणे, प्रेम करणे कळतंय की याला.  म्हणजे नक्कीच हा प्रेमाचा भुकेला आहे. मग ताई त्याला मोकळं करायची. अंघोळ घालायची. त्याला स्वच्छ करून मग स्वतः स्वच्छ व्हायची. तिच्या पिशवीत एक साडी ती बरोबर घेऊनच यायची. कारण तिला बघितल्या बघितल्या तो 'आss आss' करत येऊन तिला मिठी मारायचा. मग तिच्या अंगाला पण ती घाण लागायची. पण ताईने कधी किळस नाही केली. हळू हळू तिच्या प्रेमाने आणि शिकवण्याने तो शांत होत गेला. त्याचे बांधणे बंद झाले. त्याला बंधमुक्त केल्याचे समाधान तिला मिळत होते..

  शाळेला दिवाळीची सुट्टी लागली होती. ताईने पण आठ दिवस सुट्टी घेतली. दिवाळी नंतर शाळा सुरू झाली. नेहमीप्रमाणे मी ताईला उतरायचे म्हणून गाडी थांबवली. ताई आज खूप गप्प गप्प होती.

"काय झाले ताई? आज उतरायचे नाही?" मी

"आता कधीच नाही उतरायचे इथे. मला माझ्या घराजवळच एका दुसऱ्या मुलीला शिकवायचे काम मिळाले आहे." ताई.

"मग तो?" मी

"दिवाळीच्या दिवशी देवानेच त्याला मुक्त केले.." असं म्हणून ताई ढसाढसा रडू लागली.

मग म्हणाली आज माझा मुलगा गेल्यानंतर पुन्हा एकदा रीती झाल्यासारखे वाटतेय.

हा मला पुन्हा एक धक्का..

  ताई चा मुलगा पोलिओ पीडित होता. बुद्धी ने हुशार. नववी च्या परीक्षेच्या वेळी तापाने फणफणला आणि चार दिवसात गेला. त्या चार दिवसात त्याने ताईला त्याची एक इच्छा बोलून दाखवली होती. जणू त्याला त्याच्या जाण्याची कल्पनाच आली होती.

 "आई, नॉर्मल असलेल्या मुलांना कोणी पण शिकवू शकते पण विशेष मुलांना जवळ घ्यायला पण कोण नसते. तू त्या मुलांना माझे प्रेम दे. त्यांच्यात तुला मी दिसेन बघ." मुलगा गेला आणि पंधराव्या दिवशी ताई घरातून बाहेर पडली. इतक्या दिवसांनी तिची ही कहाणी मला कळली.

मी तिथेच स्तब्ध.. निःशब्द..

  अशी ही आरोहीची नीता कुलकर्णी मावशी..

 अजूनही कार्यरत असलेली..

 

राजेश्वरी

१७/०७/१८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

अनुभव_एका_पावसाचा

  अनुभव_एका_पावसाचा नुकतीच मी श्रीकांत सुनीताच्या घरी काही कारणाने जाऊन आले. गेट उघडलं तर समोर सुनीताला बघून मी म्हटलं, "अगं, किती छान ...