शुक्रवार, २५ सप्टेंबर, २०२०

संवाद

 

संवाद

 

 

 

“ए हाय, कशी आहेस? ये. ये. आत ये. किती दिवसांनी येती आहेस. आज तुझा फोन आला आणि इतका आनंद झाला म्हणून सांगू. कसे आहात सगळे?”

“मी मस्त."

“किती दिवसांनी भेटतोय ना आपण? मध्यंतरी एक दोन वेळा फोनवर बोललो तेवढेच."

“हो ना. मलाही घरातल्या कामांनी वेळच मिळत नाही.”

“आमच्याकडे तर सारखे पाहुणे चालू आहेत बघ. कंटाळा आलाय नुसता. कुठेतरी लांब निघून जावे असे वाटतेय आम्हाला. खूप दिवसात कुठे गेलो पण नाही. मुले पण कंटाळतात ग घरात बसून बसून."

“अरे वा! मस्त फिरून या कुठेतरी. शांत ठिकाणी."

“तेच तर. तेच विचारायला मी तुझ्याकडे आलेय."    

“छान प्लॅन करा. मस्त मजा करून या."

“तू सांग ना, सौराष्ट्र कसे आहे पहायला? तू तिथे राहून आलीस ना? काय काय आहे पहायला? आम्ही अजून अहमदाबादच्या पुढे गेलोच नाही. यावेळी सौराष्ट्र पाहू म्हणतोय."

“अरे वा. किती छान. खूप ठिकाणं आहेत तिकडे पहायला. सर्वात महत्वाचे म्हणजे शांतता, स्वच्छता अनुभवायला मिळते काही मंदिर परिसरांमध्ये. आम्हाला खूपच आवडले तिथे. पोरबंदर आणि जामनगरला होतो आम्ही. त्यामुळे सौराष्ट्रचा सगळा कानाकोपरा पाहून झालाय."

“मी तुला लिस्ट करून देते आणि सुरुवात कुठून करायची ते पण सांगते म्हणजे कमी दिवसात जास्तीत जास्त पाहून होईल तुमचे."

“सगळंच तू प्लॅन करून दिलेस तर सोप्पं होईल गं आम्हाला.”

“दोन मिनिट थांब आत्ता लिहून देते..... हम्म.. हे घे."

“ए, जामनगरच्या लिस्ट मध्ये ‘बाला हनुमान मंदिर'च्या खाली हे काय लिहिलंस? स्मशान? ते काय पहायची गोष्ट आहे का? आणि बाला हनुमान काय?”

“अगं, बाला हनुमान मंदिर जामनगरच्या मध्यभागी असलेल्या तलावाच्या जवळ आहे. तिथे गेले ५९/६० वर्षांपासून ‘राम धुन' अखंड अहोरात्र सुरू असते. लिम्का, गिनीज सगळ्या बूकात नोंद झालीय त्या मंदिराची. कधी कोणी भक्त येऊन म्हणतात तर कधी तिथे वास्तव्यास असलेले भक्तगण. तिथली संध्याकाळी सातची आरती सुद्धा ‘रामधून' असलेलीच असते. खूप प्रसन्न होऊन जायचो आम्ही आरती ऐकून."

“बरं बरं. ते मंदिर बघेन. स्मशानाचे काय?”

“अगं, गुजरात मधील काही स्मशानभूमि प्रेक्षणीय बनवल्यात. राजकोट आणि जामनगरची तर अप्रतिमच."

“इतकं काय आहे तिथे?”

“स्वच्छ, शांत वातावरण. मृत्यू झालेल्या व्यक्तिला आणायला मोफत अॅम्ब्युलेन्सची सोय केली आहे. त्या बसला ‘अंतिम यात्रा’(THE LAST JOURNEY) असे नाव दिलेले आहे. मृत्यू नंतरचा प्रवास, अंतिम यात्रा सुखकर व्हावा, जाता जाता सर्व संत महात्म्यांचे दर्शन व्हावे असा सात्विक विचार करून ते मुक्तिधाम तयार करण्यात आले आहे. बसमध्ये भजनीमंडळ बसलेले असते. भजन म्हणता म्हणता शव स्मशानात आणले जाते. एका कोपर्‍यात दाहसंस्कार करण्याची सोय आहे. पण बाकी परिसर फारच प्रेक्षणीय केलाय.”

“इतकं काय विशेष आहे त्यात?”

“तिथे, जन्म ते मृत्यू चक्र आहे.. बाळाचा जन्म झाला की बालपण, शिक्षण, व्यवसाय, लग्न, मुले, वार्धक्य आणि मृत्यू असा प्रवास एका सुंदर चक्रावर बनवला आहे. पुढे रामायणातील राम जन्मापासूनचे प्रसंग दाखवणारी म्युरल्सने एक मोठी भिंत बनवली आहे. त्यावरची कलाकुसर पाहून अचंबित होते अगदी. पुढे काही महात्म्यांचे पुतळे चोथार्‍यावर बसवलेत. त्यांच्या चौथार्‍यावर त्यांचे कार्य, कार्यकाल कोरलेला आहे. अजूनही काही पौराणिक प्रसंग मांडलेले आहेत.”

“किती छान कल्पक असेल ना सगळं?”

“हो ना. काही ठिकाणी सुविचाऱ कोरलेले आहेत तर काही ठिकाणी सद्वचने. निवांत बसायला बाक आहेत आणि त्यावर छत्र छाया म्हणून मोठमोठे वृक्ष आहेत. वार्‍याची येणारी झुळूक, हिरव्यागार वृक्षांवरील पक्ष्यांचा किलबिलाट, आजूबाजूची रंगीबेरंगी म्युरल्स मन उल्हसित करून टाकतात बघ. त्या म्युरल्सवरचे रंग देखील शांत आणि प्रसन्न वाटावे असेच आहेत, कुठेच भडकपणा जाणवत नाही."

“अगं, काय सांगतेस?”

“कधी कधी विचार येतो मनात, घराची एखादी व्यक्ति मरण पावली असेल. सगळेजण शोकसागरात बुडून गेलेले असतील, त्यावेळी काही अंशी का होईना पण येणार्‍याचे मन शांत करून टाकत असेल हे वातावरण. जन्म मरणाचा फेरा कोणालाच चुकलेला नाही पण दुःखात फुंकर मारली जात असेल असे हे वातावरण निर्माण केले आहे.”

“नक्की भेट देणार आम्ही त्या मुक्तिधामला.”

“बाकीची मी लिहिलेली ठिकाणे देखील बघ बरं का. त्यातही काही ठिकाणं, समुद्रकिनारे तुमचा सगळा शीण घालवून टाकतील बघ.”

“नक्की नक्की बघू आम्ही. तू तर खूप छान ट्रीप प्लॅन करून दिलीस बघ मला. आता आल्यावरच भेटू.”

“बाय.”

“बाय... बाय… करा, करा… मजा करा.”

 

 

 

राजेश्वरी

०७/०५/२०१९   

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

अनुभव_एका_पावसाचा

  अनुभव_एका_पावसाचा नुकतीच मी श्रीकांत सुनीताच्या घरी काही कारणाने जाऊन आले. गेट उघडलं तर समोर सुनीताला बघून मी म्हटलं, "अगं, किती छान ...