रंग_माझा
दोन तीन दिवसांपूर्वी खोलीत भरून गेलेल्या संधीप्रकाशाने माझं मावळतीकडे लक्ष गेलं. खूप दिवसांनी आकाशात रंगांची उधळण झाली होती.. निळा, जांभळा, लाल, केशरी, पिवळ्या रंगाच्या अनेक छटा क्षणाक्षणांनी बदलत होत्या... श्रावण धारांनी डवरलेल्या हिरव्यागार वनराईमागे असलेला तो कॅनव्हास मला उल्हसित करून गेला... अनिमिष नेत्रांनी बघत रहावं असंच ते दृश्य होतं. बघता बघता मी कॅमेरात ते क्षण टिपत गेले. त्या रंगांचं गारुड मग कितीतरी वेळ मनात घोळत राहिलं. रोजच्या व्यापातून ही मुग्ध रंगांची उधळण मनाला सुखावून गेली.. इतकी की आपसूकच गाणं गुणगुणलं जावं...
ये कौन चित्रकार है.....
हरी हरी वसुंधरा पे नीला नीला ये गगन
के जिसपे बादलों की पालकी उड़ा रहा पवन
दिशायें देखो रंगभरी, चमक रही उमंगभरी
ये कौन चित्रकार है,
ये कौन चित्रकार....
मग मनात विचार आला खरंच या रंगांचा मनावर इतका परिणाम होतो का? मनाला सुखावणारे रंग, मन विचलित करणारे रंग, मन निराश करणारे रंग.. खोलवर रुतून जाणारे असे काही रंग.. कितीतरी रंगछटा.. रंग असे मनातल्या भावना खरंच बदलत असतील? रंग आणि भावनांचा असा काही संबंध असेल का जो त्यावेळच्या भावना बदलू शकतो? रागावलेल्या मनावर ताबा ठेवायचा असेल तर शांत निळा, आकाशी ड्रेस मनालाही शांत करू शकतो.. उत्साही वाटत असेल त्यावेळी आपोआपच हाताशी लाल, केशरी रंगाचे कपडे येतात..
कधी कधी चित्रपट बघितल्यावर त्याचा पगडा खूप वेळ पर्यन्त मनावर सवार होऊन रहातो. का बरं? त्यात देखील कथानकाबरोबर या रंगांची काही किमया असतेच ना..
जसं..
‘मोर देखने जंगल में' चित्रपटात सुरुवातीचं रुक्ष, ओसाड रान दारिद्रयाचं दर्शन देऊन जातं.. काही समाजसेवी सुशिक्षित तरुणांच्या व्यावसायिक अनुभवामुळे तिथला परिसर हळूहळू हिरवा साज अंगावर चढवू लागतो.. गवताच्या कोवळ्या पालवीपासून मनाला आणि डोळ्याला थंडावा मिळत जातो.. आणि त्याचबरोबर स्थानीय आदिवासींची मनं, विचार बदलू लागतात.. त्यांचे स्वभाव सौम्य होत जातात... हा चित्रपट पाहून झाला तेव्हा मन देखील शांतावले...
पण त्याउलट, ‘मातीमाय’ चित्रपट बघताना सुरुवातीपासूनच मातीच्या रंगाबरोबर मन गढूळ झालं ते शेवटपर्यंत गढूळच राहिलं.. मातकट कपडे घातलेली नंदिता दास आणि अतुल कुलकर्णी.. जग सोडून गेलेल्या बाळांना मूठमाती देण्याच्या त्या परंपरागत चालत आलेल्या कामातला तिचा अभिनय.. त्यानंतर स्वतःला बाळ झाल्यानंतरचा तिचा असहायपणा.. काम सोडून देण्याची तगमग.. काहीतरी बदल घडेल असं वाटत राहिलं तरी चित्रपटाचा रंग शेवटपर्यंत गढूळलेला मातकटच रहातो.. त्यामुळे फार अस्वस्थ करून जातो.. ही अस्वस्थता नंतर देखील मनात खूप काळ टिकून रहाते..
जेव्हा ‘जन्म' चित्रपट पहायला सुरुवात केली तेव्हा रीमा लागूचा सकारात्मक अभिनय भावतो.. तिने घातलेल्या गुलाबी, निळ्या नाजुक फुलांच्या गाऊनमुळे चित्रपट आशादायी असेल असंच वाटत रहातं.. आणि अपेक्षेप्रमाणे शेवट सुखांत होतोच..
‘यलो' चित्रपटात तर पिवळा रंग जणू उबदार प्रेमाचं प्रतिकच आहे. आई मुलीचं प्रेम तर आहेच पण गौरीला ऊर्जा देणारा पिवळा मासा/गोल्ड फिश आणि तिचं त्याच्याशी मूकपणे बोलणं.. त्याला पाण्यात सहजरीत्या फिरताना बघूनच तिची पाण्यात पोहण्याची उर्मी जागी होते.. परिणामी ती यशस्वी होते..
‘बयो' चित्रपट पहात असतांना अथांग सागर पाहून देशप्रेम जागवते तर कोकणातली हिरवाई मायभूमीची ओढ दर्शवते.. अस्वस्थ मृणाल देव आणि बोटीतून येणारा सुटाबुटातला श्रेयस तळपदे नक्कीच सकारात्मक शेवट करणार याचा दिलासा मिळतो..
‘क्षण' चित्रपटात अधुरी प्रेम कहाणी असली तरी तिचा नवरा तिला मोठ्या मनाने प्रियकराच्या सोबत रहाण्यासाठी वेळ देतो. जणू तिची शेवटची इच्छाच ती. तिच्या आजारपणात असहाय, खचून गेलेला नवरा, तिला त्याच्या हवाली करून जातो तेव्हा शेवटी दीपा परबच्या अंगावरची लाल साडी त्या दोघांना नवी उमेद, नवी ऊर्जा देण्यासाठी तर वापरली नसेल? असंच वाटून जातं..
‘गंध' चित्रपटातल्या पहिल्या भागात, सावळ्या रंगाची म्हणून लग्नाच्या बाजारात नापसंत होत असलेली मुलगी... अमृता सुभाष... निराश न होता गिरीश कुलकर्णीला बघताच मनात घंटी वाजलेली मुलगी.. आणि शेवटी तिने घातलेल्या गुलाबी रंगाच्या ड्रेसमुळे, गालावर गुलाबी रंगाची छटा येऊन तर प्रेम जमणार याची खात्रीच पटते जणू..
‘नितळ' चित्रपट पहाताना जाणवतं ते, अंगावरच्या पांढर्या डागांपेक्षा मनाचा निर्मळपणा महत्वाचा असतो.. सौंदर्य व्यक्तिमत्वातून दिसलं पाहिजे बाह्यरंगातून नव्हे.. देविका दफ्तरदारच्या सहज सुंदर अभिनयातून ते दिसून येतं..
शिरीष कणेकरांनी नर्गिसबद्दल बोलताना एका वाक्यात तिचं वर्णन केलं होतं, ते म्हणजे, ‘धवल वस्त्रातील धवल प्रतिमा'... किती सार्थ ठरतं ना हे वर्णन नर्गिसच्या बाबतीत..
सध्याच्या काळात बघितलेले हे काही विविधरंगी चित्रपट त्यातल्या रंगवैशिष्ट्यांसहित माझ्या मनावर नकळतपणे ठसा उमटवून गेले..
राजेश्वरी
२९/०७/२०२०
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा