शुक्रवार, २५ सप्टेंबर, २०२०

खो_खो

 

#खो_खो

 

 

 

ते आमचे अलगीकरणाचे एकवीस दिवस होते.. आलाप कराडहून आला म्हणून अलगीकरण..एकवीस दिवस पुरेल (?) अशी भाजी आणि किराणा सामान सगळं आधीच आणून झालंय असं वाटत होतं. पहिले पंधरा दिवस कधी भाजी तर कधी उसळ करण्यात निघून गेले.. शेजारी रोज इमानेईतबारे दाराला लावलेल्या पिशवीत दुधाच्या पिशव्या आणून टाकायचे.

   बाजारात जाताना, काही पाहिजे का? असं पण विचारायचे..

आहे त्यात भागवू की.. का उगीच त्यांना त्रास द्यायचा? असा आमचा साधा सरळ विचार..

अखेर पंधरा दिवसांनी फ्रीज पूर्ण रिकामा झाल्याचं जाणवलं.. अजून सात दिवस काढायचे होते..

एरवी आपण त्यांना मदत करतोच की, सांगू या का भाजी आणायला? 

नको ग. डाळ, उसळ करून काढू की. कशाला त्यांना सांगतेस?

पण मला रिकामा फ्रीज अस्वस्थ करत होता..

किशोरच्या नकळत मी त्यांना दोन तीन भाज्या आणायला सांगितल्या..

शेजारी चेन्नई चे.. रोज इडली, डोसा, भात आणि बरोबर सांबार खाणारे..

त्यांच्या आवडीप्रमाणे त्यांनी मोठे दोडके, वांगी, शेवग्याच्या शेंगा आणि जोडीला भला मोठा दुधी भोपळा आणून दिला.

बाकी सगळ्या भाज्या फ्रिजमध्ये मावल्या.. पण तो दुधी भोपळा काही केल्या मावेना.. दिवसभर तो तसाच टेबलवर मला खुणावत होता..

किशोर आणि आलाप दोघेही चिडवत होते, नको सांगू म्हणत होतो, तरी सांगितलेस ना त्यांना भाजी आणायला, आता खा एकटीच आठवडाभर दुधी..

मला काय करावं ते कळेना.. नवर्याला सांगू शकतो ना, पण त्यांना कसं विचारू? इतका मोठा का आणला म्हणून.. गपगुमान बसले एकदिवस..

पुढच्या दिवशी....

त्या दुधीला स्वच्छ धुतला. त्याची सालं काढली.. अगदी ओरबाडून ओरबाडून.. वैतागूनच.. मग त्याचे दोन तुकडे केले.. एक भाग बारीक चिरून डब्यात ठेवला आणि दूसरा भाग खिसणीने खिसून दुसर्या डब्यात ठेवला.. पाहू नंतर काय करायचं ते असं म्हणून फ्रिजरमध्ये ठेवून दिले डबे..

त्या दिवशी कापलेल्या दुधीच्या काही भागाची भाजी केली.. भाजी अगदी मस्त कांदा, दाण्याचं कूट घालून चविष्ट झाली होती. पण तरीही थोडी शिल्लक राहिलीच..

संध्याकाळी अंडाभुर्जी करायचं ठरलं. एरवी भुर्जी करायचं काम माझ्याकडे नसतं..  कारण मी तेल आणि तिखट कमी घालेन ही भीती असते दोघांना.. पण त्या दिवशी गोड बोलून, मी ते काम माझ्याकडे घेतलं.. अंमळ जरा जास्तच तेल आणि कांदा चिरून परतल्यावर हळूच राहिलेली दुधीची भाजी त्यात सरकवली. मस्तपैकी तिखट, मीठ घालून अंडी फोडली त्यात.. जेवायला बसल्यावर थोड्याच वेळानं दोघं एकमेकांकडे बघू लागले..

आईने नक्की काही तरी गडबड केलीय.

हो रे, मला पण कांद्याची चव मधेच वेगळी लागतीय.

मी कशाला काही गडबड करू? भाजी करायचं तुमचं काम कमी केलं, त्याचं काही कौतुक नाही.. आणि वर काहीतरी गडबड केली म्हणून माझ्यावर संशय घेताय. 

माझी नाराजी बघून गप्पपणे जेवले दोघं.. मी मात्र गालातल्या गालात हसत होते..

 

दुसर्या दिवशी..

कोफ्ते करू म्हणून दुधीचा खिस सकाळी जरा लवकरच बाहेर काढला. फ्रिजरमध्ये राहून त्याचा दगड झाला होता.. थोडी कोथिंबीर, डाळीचं पीठ आणि इतर सगळी चविष्ट सामग्री घालून पीठ भिजवले.. अचानक काहीतरी दुसर्या कामात गुंतून गेले आणि कोफ्त्याचं पीठ जरा जास्तच पातळ झालं.. पुन्हा त्यात पीठ आणि इतर सामान घालत गेले.. अखेर दोन दिवस खाऊन संपणार नाहीत इतके कोफ्ते तळले गेले.. निम्म्या कोफ्त्याची रुचकर भाजी झाली.. निम्मे तसेच फ्रीजमध्ये..

तिसर्या दिवशी...

मी म्हणलं, आज वडा सांबार खायचा मूड आहे. चालेल ना? दोघेही होकाराची मान हलवून कॅरम खेळू लागले.. मी बापुडी सगळ्या डाळी थोड्या थोड्या एकत्र करून, कांदा, बटाटा, टोमॅटो आणि फ्रिजरमधले थोडे दुधीचे तुकडे घालून, सगळं कूकरला शिजायला ठेवलं.. शिजवता शिजवता कूकरने आपलं काम केलं की.. अंदाजापेक्षा सांबाराच्या  शिजलेल्या डाळीचं प्रमाण दुप्पट झालं होतं.. कठिण.. आता आली का पंचाईत.. जेवताना फ्रीज मधून कोफ्ते काढून मायक्रोवेवला गरम करून वडा सांबार आणि सांबार भात असं भरपेट जेवण झालं.. पण सांबार खूप शिल्लक राहिलं.. आता त्याचं काय करायचं? पुन्हा शेजार्यांची मदत घेऊन ब्रेड मागवला..

रात्री, आपण आमटी ब्रेड खातो तसं सांबार ब्रेड पण छान लागतं.. खाऊन बघणार का?

इतकी वर्षं स्वयंपाक करते आहेस पण अजून तुला अंदाज आला नाही.. असं आणि बरंच काही मला ऐकवून दोघं अखेर सांबार ब्रेड खायला तयार झाले. पण...

रात्री खाऊन देखील सांबार शिल्लक राहिलेच..

चौथ्या दिवशी ..

आज मी मस्तपैकी झणझणीत ठेचा आणि पराठे करणार आहे.. 

दोघेही खुश.. हाहाहा.. अखेर पराठयाचं पीठ सांबारात कालवून सांबाराचा शेवट केला..

प्रश्न राहिलेल्या दुधीच्या खिसाचा आणि तुकड्यांचा होताच..

पाचव्या दिवशी...  

आज श्रावण सुरू होतोय.. आज मी पुरण न करता खीर करतेय..

ठीक आहे, चालेल."

कळलं ना.. तांदळाची खीर करून गार झाल्यावर, वाफवून गार केलेला दुधी त्यात मिसळलाच..

तांदळाची खीर अशी हिरवट का दिसतेय?

बाबा, खीर तांदळाची नाही, तर दुधीच्या खिरीत थोडेसे तांदूळ घातलेत. 

अजून तुझा दुधी आहेच का?

आता फक्त एकदाच हरबरा डाळ घालून भाजी होईल इतकाच शिल्लक आहे.. 

नो वे..."

सहाव्या दिवशी ती डाळ घालून दुधीची भाजी झाली आणि

अखेर सगळ्या पदार्थांना खो देत दुधी आमच्या फ्रिजमधून आऊट झाला...  

 

 

 

राजेश्वरी

१४/०८/२०२०         




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

अनुभव_एका_पावसाचा

  अनुभव_एका_पावसाचा नुकतीच मी श्रीकांत सुनीताच्या घरी काही कारणाने जाऊन आले. गेट उघडलं तर समोर सुनीताला बघून मी म्हटलं, "अगं, किती छान ...