खादाडी
मला अजूनही आठवतो तो दिवस...
मे महिन्याचे दिवस होते. डोक्यावर पत्रे असल्याने अंगाची लाही लाही होत होती. सकाळी लवकरच जाग यायची. शाळा असली की, आईने कितीही उठवले तरी उठावेसे वाटत नसायचे. पण सुट्टीत जाग यायची तेच आज काय उद्योग करायचा या विचाराने. वाड्याच्या एका कोपर्यात कुठेतरी बसायचे आणि खलबते चालायची. दगडी वाडा, ‘दिंडी दरवाजा’ म्हणता येईल इतका मोठा दरवाजा. दरवाज्याच्या समोर वाड्यात शिरण्याचा पॅसेज आणि दोन्ही बाजूला दोन दोन खोल्या आणि त्यावर अखंड चार खोल्या. लाकूड आणि दगडी बांधकाम असल्याने पॅसेज अतिशय थंड असायचा. पॅसेजमधून आत शिरले की उजव्या बाजूला तीन खोल्या, समोर सहा खोल्या आणि त्यावर सहा खोल्या. सगळीकडे मिळून चार बिर्हाडे रहात असत. पॅसेजच्या डावीकडे साठ वर्षांपूर्वी लावलेले आणि अजूनही उभे असलेले बकुळीचे सदाहरित झाड. शेजारी नारळाची दोन झाडे आणि एक रामफळाचे झाड. खाली जमिनीत लावलेली जास्वंद, कण्हेर, गुलाब, तुळस, अबोली, स्वस्तिक, अनंत, गुलबक्षी आणि इतर रोपे. चौसोपी पण आयताकृती वाड्याची वास्तु अजूनही उभी आहे.
तर अश्या या वाड्यात संजू, अनी, राणी, सुदू, पमा, नंदू, सुनील, राजू, चिमा, शिरीष, शशांक, किशोर, किरण, मोहन अशी सगळी मुले वय वर्षे तीन ते वय वर्षे पंधरा या वयोगटातली होती. एकमेकांची काळजी घेत रोज वेगवेगळे खेळ खेळायची. त्यात मैदानी खेळ आणि बैठे खेळ सगळेच प्रकार असायचे. दुपारी मैदानी खेळ खेळून कोणाची झोपमोड झाली आणि कोणी ओरडले तर बैठे खेळ खेळायचे. भांडणे क्वचितच होत असत. काही बालकांची डोकी भलतीच चालायची त्यामुळे खूप नवीन शोध देखील लागायचे. काही नुसतेच वांडपणा करायचे, कोणाचेच ऐकायचे नाही. त्यात सुनीलचा नंबर पहिला आणि बाकीचे नुसतेच मजा बघणारे. त्याचे उद्योग म्हणजे... गाढवाच्या शेपटीला डालड्याचा डबा बांधायचा आणि त्याला पळवायचे. शेजारच्या बागवानांच्या बकरीला एकेक पान खायला घालत वाड्यात आणायचे, वाड्याचे दार बंद करून मग तिचे दूध काढायचे आणि आमच्यातल्याच कोणाला तरी प्यायला द्यायचे. एकदा तर लक्ष्मीपूजनाला दुकानदारांनी रस्त्यावर फटाक्यांच्या माळा पसरून ठेवल्या होत्या. दुकानात पूजा सुरू होती. हा पट्ठ्या गेला आणि ओळीने एकेक माळ पेटवत पुढे गेला. सात आठ दुकानदारांचे फटाके पूजेच्या आधीच उडायला लागले. त्याच्या रोजच्या खोड्यांना कधी अंतच नसायचा.
एकदिवस ठरले… सगळ्यांनी मिळून खरी खरी भातुकली खेळायची. रोज शेंगदाणे, चुरमुरे खेळायला घेऊन कंटाळा आला होता. ते न घेता खरा खरा पोळी भाजीचा स्वयंपाक करायचा. सर्वानुमते ठराव पास झाला आणि कोणी काय करायचे आणि कोणी काय काय पदार्थ आणायचे ते ठरले.
“माझ्या आईने कालच बटाटे आणलेत मी ते घेऊन येतो."
“मी नुकतीच कणीक कशी मळायची ते शिकलेय. मी कणीक आणते."
“मी कांदे आणून सालं काढून देईन."
“ठरले तर मग आज आपले जेवण आपणच बनवायचे."
“मोठ्यांनी कोणी मधे मधे करायला नको अशी जागा शोधूया."
“या माजघरात करू या का? म्हणजे इकडे कोणीच येणार नाही."
दार उघडून बघितले तर माजघरात धुळीचे साम्राज्य होते. आधी ते साफ केले पाहिजे.
“एय, एय तुम्ही तिघे लिंबूटिंबू, तुम्ही कराल का हे साफ?”
“दादा सांगतोय म्हटल्यावर कोण नाही म्हणेल?”
“हो हो, करू की आम्ही साफ. आत्ता कुंचा घेऊन येतो."
“मी आपल्याला बसायला तीन सतरंज्या आणतो. तीन बास ना?”
असा सर्व जामीनामा करून आम्ही सगळे लागलो कामे करायला. एकेक भांडी, सामान समोरच्या रिकाम्या खोलीत जमा होऊ लागले. कोण कांदा चिरतेय तर कोण बटाट्याची साले काढतेय. कांदे कापण्याचे दिव्य पार पडले. ताईने मात्र पोळ्यांची जबाबदारी स्वतः घेतली. आईने एक वातीचा स्टोव्ह पेटवून दिला आणि कणीक कशी मळायची ते संजुताईला दाखवली. तिला पोळ्या तर लाटायला येत होत्याच. छोट्या छोट्या पुरीच्या आकाराच्या छान पंधरा वीस पोळ्या झाल्या. महत्प्रयासाने केलेली कांदे बटाटे रस्सा भाजी कढईत उकळत असतांना आमची भूक वाढवत होती.
“इतकी गरम भाजी लगेच आपण खाऊ शकत नाही."
“हे काय ग ताई."
“आधी सगळ्यांनी काय काय केले ते आईला सांगायचे. स्वच्छ हात पाय धुवून आपापले ताट घेऊन यायचे. जेवायला अजून अर्धा तास वेळ आहे. तोपर्यंत या खोलीला आपण कडी लावून जाऊ." सुनील बोलला.
प्रत्येक जण आईला काय केले, कसे केले ते वर्णन करून सांगत होता. आम्ही सगळेच जण भारावून गेलो होतो. आयुष्यात प्रथमच काहीतरी जगावेगळे केल्याचा भास होत होता. आई पण खुश होवून ऐकत होती, प्रश्न विचारत होती.
इतक्यात बाहेर रस्त्यावर बॅंडचा आवाज ऐकू येऊ लागला. घोड्यावर बसलेला नवरदेव आणि बॅंडच्या तालावर नाचणारे त्याचे सागेसोयरे बघायला त्यावेळी अप्रूप वाटायचे. सगळेजण पळतच बाहेर गेलो. तल्लीन होवून नाचणारा घोडा बघत उभे राहिलो.
किती वेळ गेला माहीत नाही पण राजुने ताट आणि चमचा टण टण वाजवायला सुरुवात केली आणि आम्ही आपापली ताटे घेऊन हजर झालो, तर माजघराचे दार उघडेच दिसले.
“अरेच्चा, हे दार कोणी उघडले?”
प्रत्येक जण ‘मी नाही.. मी नाही..’ असेच उत्तर देत होते.
एकमेकांकडे सगळेजण संशयाने बघत होतो पण कबूल कोणीच करेना.
“चला आत तर जाऊ.. खूप भूक लागलीय आता."
“अरे, पोळीचा डबा पण उघडा आहे. आणि यात तर चारच पोळ्या शिल्लक आहेत.”
“आणि हे बघ कढईतली भाजी तर सगळी संपूनच गेलीय. फक्त थोडासा रस्साच शिल्लक आहे."
“बापरे कोणी खाल्ले असेल हे सगळं?”
“मांजर तर नाही?”
“मांजर कशाला डबा उघडेल?”
“अरे इथे तर खरकटी ताटली पण दिसतेय. ही कोणाची?”
“ही आमची ताटली आहे. थांब आईलाच विचारतो."
“अरे ही ताटली तर मघाशी सुनीलला दिली होती मी."
“अगं पण तो एकटाच कसा सगळं खाऊ शकतो?”
“तुला माहीत नाही का सुनील काहीही करू शकतो. आता त्याला बोलण्यात काहीच अर्थ नाही."
“अरे पण आपण इतकया वेळापासून खपून छान जेवण बनवले आणि तो एकटा कसा खाऊन गेला?”
“आणि गेला कुठे तो?”
“काय माहीत. खेळायला स्टेडियमवर जातो म्हणाला."
“कठीण आहे बाबा याचे. आता काय करायचे?”
“खादाड कुठचा. जरा म्हणून इतरांचा विचार करायला नको याला."
“आता काय करणार?”
“घरी आईने केलेले जेवण जेवा."
आमचे सकाळपासून केलेले सगळे श्रम वाया गेले होते.. नाही सुनीलच्या पोटात गेले होते. आणि आमच्या पोटात मात्र कावळे ओरडायला लागले होते. समजूतदार संजुताईने मार्ग काढला. प्रत्येकाने आपले ताट वाढून आणायचे आणि एकत्र माजघरात बसूनच जेवायचे. कडकडून भूक लागलेलो आम्ही सगळे पटकन हो म्हणालो आणि आईकडून ताट वाढून घेऊन आलो. सगळे एकत्र जेवणार म्हणून वाटावाटीला जरा जास्तच जेवण आयांनी दिले. वर झटपट शिकरण पण करून दिले.
गोल पंगत करून बसलो. चार घास पोटात गेल्यावर जरा रागाचा पारा खाली येऊ लागला. सुनीलच्या खादाडीवर हसत गप्पा मारत पोटभर जेवलो. आमचीही छान अंगतपंगत झाली.
राजेश्वरी
२२/०८/२०१९
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा