माझे लॉक डाउन मधील आयुष्य..
१.. राजेश्वरी किशोर.. rajeshwarikishor@gmail.com
कोविड- आयुष्याच्या सरळ रस्त्याला आलेलं एक वळण..
कोविड-१९ याबद्दल पहिल्यांदा कधी कळले, असा विचार करता करता मी एकदम जानेवारी महिन्यात गेले..
जानेवारीच्या शेवटाला चीनमधून माझी भाची आपल्या दोन लहानग्यांना घेऊन इथे येणार होती. नेमके त्याचवेळी चीनच्या वूहान प्रांतात पसरलेला हाःहाकार सगळ्या बातम्यांमध्ये पाहायला मिळाला.. सहाजिकच ती येईपर्यंत मनात धाकधूक होती. ती मुंबईत सासरी आली आणि आठ दिवसातच तिची तब्येत बिघडली. तसं पाहिलं तर ती चीनमध्ये रहात होती तिथून वूहान कितीतरी दूर होतं, संसर्गाचा लवलेश देखील नव्हता पण तरीही तिच्यावर उपचार करणार्या मुंबईतील डॉक्टरनी तिला अलगीकरणात ठेवले. त्यावेळी आजारी असलेल्याला असं वेगळं ठेवणं मला जरा विचित्र वाटलं होतं. तिला सगळ्यांच्या, मुलांच्या सोबत असण्याची गरज असतांना एकटीला का ठेवलं हा प्रश्न मनात वारंवार येऊ लागला होता. आठवडाभरात ती बरी होऊन घरी आली पण तोपर्यंत भारतात हा अलगीकरणाचा प्रकार माहीत नव्हता. खरं तर साधा सर्दी खोकला झाला की आपण घरातल्या घरात थोडं दूर राहून काळजी घेतो पण असं वेगळं करत नाही ना. त्यामुळे तिचं हे अलगीकरण जरा वेगळं वाटलं.. पण आता जाणवतं की, जरी ती कोविड पॉझिटिव्ह नव्हती तरी डॉक्टरनी योग्य तीच खबरदारी घेतली होती..
ते भारतात आल्यानंतर चार दिवसातच चीनकडून येणारी विमानसेवा बंद झाली. त्यानंतर जे काही बघायला मिळालं ते पाहून भारताचच काय पण आख्ख्या जगाचं धाबं दणाणलं.. जोपर्यंत भारतात कोविड हा आजार आला नव्हता तोपर्यंत आपल्यासाठी ती एक वाईट बातमी होती पण नंतर जेव्हा भारतात त्यानं जाळं विणायला सुरवात केली आणि वाईट बातमीचं रूपांतर भीतीने घेतलं.. रोज येणार्या दुध, भाजीपाला, पेपर अश्या प्रत्येक गोष्टीवर संशय निर्माण होऊ लागलाय..
आपापले स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी वेळोवेळी हात धुणे, स्वच्छता, सॅनीटायझरचा वापर करण्याचं आवाहन ग्रुपवर करण्यात आलं.. इतकंच काय पण बाहेरच्या कोणाशी संपर्कात आल्यावर किंवा ऑफिसमधून आल्यावर काय काय करायचं याचं तपशीलवार माहिती पत्रक सरकारतर्फे निघालं त्याची अंमलबजावणी करण्यासाठी ऑफिसमधून सूचना दिली गेली.. जसं..
१.. ऑफिसमधून निघताना घरी फोन करायचा..
२.. दार उघडून दारात २ बादल्या आणि एक ट्रे आणि स्लीपर्स ठेवायच्या .. एकात साबणाचं पाणी दुसर्यात साधं पाणी आणि ट्रे मध्ये चश्मा, पाकीट, घड्याळ, मोबाइल, टाय वगैरे काढून ठेवायचं..
हात पाय बुडवून साबणाच्या बादलीत उभे राहून मग साध्या पाण्याच्या बादलीत उभं रहायचं.. नंतर पाय सरळ स्लीपरमध्ये अडकवायचे आणि तडक बाथरूममध्ये जायचं.
३.. तिथे कपडे भिजवायला परत एक साबणाच्या पाण्याची बादली.. दारामागे कपडे ठेवायचे.. साबण शांपू लावून स्वच्छ आंघोळ करून मगच घरात इतर कुठे हात लावायचे..
खरं तर इतकं सगळं पाळलं जात नाही कारण आमच्या कॅम्पसमध्ये अजून तरी बाहेरच्यांना सहजी आत येऊ देत नाहीत..
भाजीपाला आला की गाडीतून बाहेर काढून त्यावर पाणी मारून एक दिवस एका बाजूला ठेवतात. दुसर्या दिवशी तो विक्रीला बाहेर काढतात. ऑनलाइन मागवलेलं सामान मुख्य प्रवेशद्वारावर एका खोलीत उतरवून घेतात. दुसर्या दिवशी आपापले येऊन घेऊन जायचं.. औषधं मागवली तर sanitizer मारून घेऊ देतात. खाद्यपदार्थ मागवायला बंदी..
पहिले काही दिवस कामवालीला दुसर्यांच्या घरी जाऊन काम करायला बंद केले. त्यावेळी सगळ्याच बायकांच्या पोटात गोळा आला. सरकारी मोठी क्वार्टर, पुढे मागे बाग, गाडी साफ करणे ही सगळीच कामं घरातल्या कामांबरोबर करायला लागली. पण नंतर त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न विचारात घेऊन ठराविक वेळात जायला परवानगी दिली. कित्येक कामवालींचे नवरे बाहेरच्या कंपनीत काम करतात. त्यांचं रोजचं बाहेर जाणं बंद झाल्यावर त्यांनाच कॅम्पसमध्ये काम दिलं गेलं..
आर्मीकडून कॅम्पसमधील सगळं जनजीवन सुरळीत करण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत..
लॉक डाउन सुरू झाले त्यावेळी बाहेर जाऊन काम करणारा नवरा घरी बसून काम करू लागला.. रोजचं routine नाही म्हणलं तरी थोडं विस्कळीत झालंच. वेळेचं बंधन कमी होतं ना. पण जबाबदारीचं काम असल्यामुळे स्वतः शांत राहून अडकलेल्यांना सुखरूप घरी पोहोचवणे महत्वाचं वाटत होतं.
आयुष्यातल्या या अनोळख्या खेळात मला काय कळलं असा विचार केला, तर पहिलं उत्तर मनात येतं ते म्हणजे, ‘जबाबदारीची जाणीव.' कोणाच्या जबाबदारीची? घरच्यांची? ती तर नेहमीचीच असते की.. मग? आपल्या पेक्षा मोठ्यांची.. आपले नसलेल्यांची.. त्यांना मानसिक आधार देणं, विचारपूस करणं, त्यांचं रहाणं सुसह्य करणं...
त्याचं असं झालं की.....
पहिलं लॉक डाउन सुरू झालं ते २५ मार्चला आणि किशोर कोर्स ऑफिसर होता तो कोर्स संपणार होता २८ मार्चला.. त्यावेळी एक महिन्याच्या कोर्ससाठी आलेल्या चाळीस अधिकार्यांची जबाबदारी त्याच्यावर होती. आयुष्यातले सेवानिवृत्तीपूर्वीचे शेवटचे प्रमोशन मिळण्यासाठी विशेष प्रशिक्षण घ्यायला हे अधिकारी सी एम ई येथे आले होते. त्यामुळे सगळे जण वय वर्षे पंचावन्नच्या पुढचेच.. मधुमेह, रक्तदाब आणि इतर आजार असलेले देखील काही जण. काहींची मुलं बाहेर नोकरीला त्यामुळे घरी बायको एकटीच राहिलेली.. जबाबदारी म्हणजे जसं शाळेतले प्रत्येक वर्गाचे वर्गशिक्षक असतात ना तसं काहीसं.. त्यांची बित्तंबातमी ठेवायची. ते ज्या ठिकाणावरून आले ते ऑफिस, त्यांचे गाव वगैरे..
पहिले लॉक डाउन रात्री जाहीर झाले, त्या दिवसापर्यंत सगळे खुश होते. दोनच दिवसात कोर्स संपेल, परत आपआपल्या घरी जायचे.. रेल्वेचे, विमानाचे तिकीट काढून झाले होते. शेवटचे दोन दिवस पार्टी होणार होती. पण..
सगळेच नियोजन फिसकटले गेले.
CME मध्ये २० मार्चपासूनच आम्हाला लॉक डाउन केलं गेलं. म्हणजे घराबाहेर फक्त सकाळी आणि संध्याकाळी दोन तास, चालायला, पळायला किंवा सायकल चालवायला एकट्यानं जायचं. कोणाशी बोलायचं तर एक मीटर अंतर राखून.. प्रत्येकाचे घरचे सदस्य आणि त्यांचे वय, आजार यांचा डेटा तयार केला गेला. तत्पर सैन्य अधिकार्यांच्या मदतीने दोनच दिवसात आमच्या बंधनाचा आणि मोकळीकीचा आराखडा तयार केला गेला. घरोघरी जाऊन प्रत्येकाचं मेडिकल चेक अप केलं गेलं.
बाकी आपत्कालीन व्यवस्था अशी केली..
१. सगळी गेट बंद. कोणीही बाहेर जायचं नाही की बाहेरून कोणी आत. अगदी कर्मचारी, अधिकारी पुण्यात रहातात त्यांनाही आत येणं बंद केलं. थोडक्यात आमचा पुण्याशी संपर्क तोडला.
२. पेट्रोल भरायला देखील बाहेर जायचं नाही म्हणून परिसरात गाडी चालवायला बंदी. फक्त चालत किंवा सायकलने कामापुरते जायची परवानगी..
३. आमच्या घरांच्या परिसराची वेगवेगळे ग्रुप करून विभागणी केली गेली. त्यांचे whatsapp ग्रुप केले.
४. दर दोन दिवसांनी बाहेरून येणारी भाजी/सामान आर्मीच्या गाडीत भरून, sanitize करून एक दिवस तशीच ठेवून दुसर्या दिवशी आमच्यापर्यंत आणली जायला लागली. गाडी येण्यापूर्वी मोबाइलवर विभागवार वेळ, दिवस याचा मेसेज येतो. दूध, दही, पनीर असे बंद पिशव्यातले पदार्थ sanitize करून आमच्यापर्यंत येतात. इतकेच काय पण मी बाहेरून मागवलेली औषधे आधी sanitize केली आणि मगच गेटवरून आत घेतली.
५. ट्रेनिंगला आलेल्या सगळ्यांना काही दिवस खोलीत जेवणाची सोय केली गेली नंतर मेसमध्ये ठराविक अंतर ठेवून बसायची व्यवस्था केली.. नाश्ता, जेवणाच्या, फिरण्याच्या वेळी सगळे जण योग्य ती काळजी घेतात की नाही हे पहायला रोज एकेका अधिकार्याची नेमणूक केली. किशोर २,३ वेळा या लक्ष ठेवण्याच्या कामगिरीवर गेला. देशाचे लढवैयेच ते. कशाला कोण नियम मोडेल.
गरजेपुरतं मिळतंय की सगळं.. मग आम्ही बंधनात असलो तरी मजेतच आहोत ना? कारण सुरक्षित आहोत ही भावना समाधान देऊन जातेय.
कोर्सला आलेल्या चाळीस जणात तीन महिला अधिकारी होत्या. त्यातल्या एक मॅडम आम्ही विशाखापट्टणमला १६, १७ वर्षांपूर्वी असतांना किशोरच्या हाताखाली जूनियर इंजीनियर होत्या. तिथल्याच स्थानिक असल्याने आम्ही दोन लहान मुलांना घेऊन तेथे गेल्यावर त्यांची थोडीफार मदत झाली होती. ती जाणीव मनात होतीच..
इतक्या वर्षांनंतर त्या भेटणार म्हणून मी खुशीत होते. मनातल्या मनात मी बर्याच गोष्टी ठरवल्या होत्या.. ‘त्यांना घरी बोलावू, भरपूर जुन्या आठवणी काढून त्यात रमून जाऊ, त्यांना पुणे दाखवायला घेऊन जाऊ, त्यांच्याबरोबर साडी खरेदीला जाऊ’... वगैरे वगैरे.. त्यांनी मला वैझाग सोडतांना दिलेली साडी अजूनही माझ्याकडे आहे हे मला त्यांना दाखवायचं होतं. पण..
आपण काही ठरवतो आणि तसं काही होतच नाही, हा नेहमीचा अनुभव.. निव्वळ २,३ वेळा भेटण्यापलीकडे आम्ही काहीही करू शकलो नाही.. नाही म्हणायला सतरा वर्षांपूर्वी त्यांनी पहिल्यांदा माझ्याकडे ढोकळा खाल्ला आणि त्यांना तो खूप आवडला हे आठवणीने सांगताच मी लगेचच दोन दिवसांनी त्यांना ढोकळा बनवून डब्यात दिला. मला त्यांच्याकडून पुन्हा एकदा पुलिहरा/इमली राइस, लेमन राइस शिकायचा होता. टोमॅटो लोणचं आणि बरंच काही उजळणी करायची इच्छा होती. आंध्रमध्ये खूप प्रकारची लोणची करतात..
अगदी कोथिंबीरीच्या काड्या, वांग्याचे, भोकराचे आणि कैरीची तर अनेक प्रकारची लोणची करतात ते.. सगळीच मला आवडायची.. हे सगळं आमच्या गप्पातच राहिलं अखेर.
पहिले लॉक डाउन सुरळीत पार पडले. तोपर्यंत कोर्सला आलेले कोणी काहीच बोलले नाहीत पण नंतर त्यात वाढ झाल्यावर मात्र सगळ्यांची चुळबुळ सुरू झाली. हो, ‘काम ना धाम’ करतील काय बिचारे. प्रशिक्षण संपून झाल्यावर त्यांचा वेळ जावा म्हणून जास्तीचं शिक्षण/अनुभव देखील सांगून संपले...
नाही म्हणायला किशोर सगळ्यांच्या तक्रारीच्या फोनना उत्तरे देत होताच. खोलीत अडकून पडल्यावर तक्रारींचा पाढा सुरू झाला जसे, 'कोणाची औषधं संपत आलेली आणि CME च्या मेडिकल मध्ये नाही मिळत, मग त्यांना बाहेरून मागवून द्या.. दाक्षिणात्य मंडळींना रोज इडली डोसा खायची सवय पण इथे तर फक्त रविवारीच मिळायचा.. दगडी इमारतींमध्ये सिग्नल मिळत नाही, घरच्यांशी बोलायला बाहेर येऊन उभे रहायला परवानगी नाही..’ चाळीस जणांच्या वेगवेगळ्या अडचणी.. काहीजण मात्र परिस्थिति समजून घ्यायचे पण काहींच्या अश्या तक्रारींना उत्तरे द्यायला लागायची.. सकाळ-संध्याकाळी फिरताना सगळे एकमेकांना बघायचे..
एक दिवस किशोरला फोन आला, ‘तीन महिलांपैकी दोघीच रोज फिरताना दिसतात. तिसरीला फिरताना कोणीच बघितले नाही. बहुतेक तिला डिप्रेशन आलंय.’ त्यांना भेटायला जायची वेळ आता माझ्यावर आली. संध्याकाळी मी तिच्या खोलीत पोचले. पाहिले, तर ती शांतपणे आपली प्रार्थना करत होती. मला अचानक आलेली पाहून खुश झाली. तासभर गप्पा मारून मी निघाले. मग दर दोन तीन दिवसांनी भेटून किंवा फोनवर तिघींचा हालहवाल मी विचारत असायचे. माझ्यापेक्षा वयानी मोठ्या मी काय त्यांना समजावणार? पण जाऊन गप्पा मारून यायचं इतकंच मी करू शकले.
सगळ्यात जास्त धक्का बसला, ज्या दिवशी विशाखापट्टणमला गॅस गळती झाली त्यावेळी...
सकाळी सहा पासूनच किशोरचा फोन वाजू लागला. कारण कोर्सला आलेल्या चाळीसपैकी अकरा जण विशाखापट्टणमचे.. सगळेच जण चिंतेने ग्रासले. भोपाळ गॅस गळती सगळ्यांच्या डोळ्यासमोर येऊ लागली. आपल्या परिजनांचे काय हा प्रश्न सतावू लागला.. त्यांच्याबरोबरच आमचेही टेंशन वाढत होते. प्रत्येकाला फोन कर, तुमचे घर किती दूर आहे विचार, त्यात कित्येकांचे फोन एंगेज लागायचे. किशोरने सगळ्यांना आठ वाजता ऑफिसमध्ये भेटायला बोलवले. त्या सगळ्यांना लगेचच आपल्या घरी जायची इच्छा होती. पण जाणार कसे? त्यासाठी करावे लागणारे सोपस्कार कमी का होते? सगळे मिळून CME कमांडंटना भेटले. त्यांनी, ‘खास बस करून उद्याच तुमची जायची व्यवस्था करतो’, अशी खात्री दिली.
नशीब इतकंच की, त्यातील दोघांची घरे त्या गॅस गळती झालेल्या कंपनीपासून तीन किलोमीटर अंतरावर होती. बाकीचे बरेच दूर रहात होते. प्रशासनाने काळजी घेऊन सगळ्या तीन किलोमीटरच्या परिसराला रिकामं करायला भाग पाडलं होतं. ज्यांचे नातेवाईक त्याच गावात होते त्यांचा प्रश्न नव्हता पण ज्यांचं कोणीच नव्हतं, त्यांचं काय? इथे असलेल्या एका ऑफिसरची बायको एकटीच तिथे रहात होती. त्यांना फारच टेंशन आलं होतं. त्या भागातले सगळेजण अखेर रात्रभर समुद्रकिनारी जाऊन बसले. सोबत होती पण अंगावरच्या कपड्यांनीशी बाहेर पडलेले लोक, गळती थांबेल कधी आणि घरी कधी जाऊ? या विलक्षण काळजीत होते. सगळंच अनिश्चित होतं सुरूवातीला. नशिबानं लवकरच गळती थांबली आणि दुसर्या दिवशी समुद्र्किनार्यावरचे प्रत्येकजण आपापल्या घरी गेले. इथे असलेल्यांना असहायतेची जाणीव गप्प बसू देत नव्हती. त्यावेळी त्यांचे मनोधैर्य वाढवणे गरजेचं होतं. किशोरला त्यांची आणि मला किशोरची घालमेल बघवत नव्हती. शांत रहा. सगळं नीट होईल इतकंच मी म्हणू शकत होते.
दुसर्या दिवशी जातानाच्या त्यांच्या कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी चाललेली धावपळ मी बघत होते.
त्यापूर्वी उत्तरेकडील काही जवान आणि अधिकारी CME मधून खास सेनेसाठी निघालेल्या रेल्वेने जायला निघाले होते.
सेनेच्या कित्येक ऑफिसेसचे अधिकारी, कर्मचारी काही ना काही कामांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी गेले होते अन तिकडेच अडकले होते. विशेषतः जिथे ट्रेनिंग सेंटर आहेत तिथे छोट्या मोठ्या ट्रेंनिंग साठी गेलेले, कोर्स संपला तरी हलू शकत नव्हते. काही ठिकाणी आर्मीने विशेष रेल्वे आरक्षित केली. बेंगलोरहून नाशिक, बडोदा, जोधपुर मार्गे दिल्ली, जालंधर, अमृतसर वगैरे. त्या मार्गाने जाणार्या लोकांना पाठवण्यापूर्वी बरेच सोपस्कार.. ज्यादिवशी निघायचे त्यादिवशीचे डॉक्टरांचे सर्टिफिकेट, त्यासाठीची त्यांच्या मेडिकल चेक अपची व्यवस्था, ज्या राज्यात जायचं, तिथली परवानगी, epass हे सगळं तर होतंच पण ज्या ऑफिसला ते परत जाणार तिथल्या त्यांच्या साहेबांचं, ‘आम्ही त्यांना आल्यावर चौदा दिवस विलगीकरण करू’ असे संमतीपत्र. जाणार्याच्या सामानाचे पॅकिंग ठराविक ज्या पद्धतीने पाहिजे तसं आहे की नाही, याची कडक अमलबजावणी... बॅग बंद करून वरुन प्लॅस्टिकशीटने सील केली असली पाहिजे. फक्त कागदपत्रे आणि खायचे पदार्थ हातातल्या बॅगमध्ये. आरोग्यसेतू app प्रत्येकाच्या मोबाइलमध्ये असली पाहिजे. कुठे गाडी थांबवायची असेल तर दोनचार किलोमीटर परिसर ग्रीन झोन असेल तिथेच थांबेल. तिथे त्यांच्या ऑफिसची गाडी न्यायला येईल आणि सरळ विलगीकरण कक्षात सोडेल..
जे लोक खाजगी बसने जातील त्यांची बस पुर्णपणे sanitize करून मगच निघेल.
अश्या या शिस्तब्द्ध पद्धतीने एकेकांना पाठवून, पोचल्यावर सुखरूपतेचा शेवटच्या अधिकार्याचा फोन आल्यावर अखेर आम्ही २५ मे ला पुर्णपणे त्यांच्या जबाबदारीतून मुक्त झालो.
अजून एक गंमत म्हणजे या चाळीस जणातील दोन जण ३० एप्रिल रोजी निवृत्त होणार होते. स्वतःच्या ऑफिसमध्ये निवृत्त होणे म्हणजे एक मोठा सोहळाच असतो. उत्तरेकडे तर लग्नाप्रमाणे नातेवाईक, मित्रमंडळी, मंडप, DJ, नाच गाणी, जेवण, आहेर सगळं असतं. मी पहिल्यांदा पाहिलं तेव्हा खूप आश्चर्य वाटलं होतं. काय वाटत असेल त्यांना? असा विचार करून किशोरने त्यांना काहीच नाही तर चहा पार्टी तरी करू म्हणून दोघांनाच बोलावलं. आणि पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. दूसरा इलाजच नव्हता.
त्याचवेळी एकीकडे किशोरनेही जमेल तशी मला घरकामात मदत करून साथ दिलीच.. घरातलं वातावरण हलकं करायला पत्ते, कॅरम सुरूच आहे. मला सर्वात जास्त आनंद झाला तो म्हणजे, माझ्या वाढदिवसाला संध्याकाळी सगळ्यांचे फोन येत होते, ‘आज काय स्पेशल’ म्हणून.. पण दिवसभर हा त्याच्या कामात मग्न होता आणि अचानक त्यानं माझ्यासाठी केक करायला सुरुवात केली. फार चविष्ट केक झाला होता तो..
तब्बल दोन महीने खरी जबाबदारी म्हणजे काय ते जाणवले. एकेक जिवाची शारीरिक, मानसिक काळजी महत्वाची. एखाद्याचे मनोधैर्य वाढवणे म्हणजे काय ते कळले.
या दिवसात घरात अडचणी आल्याच पण आपला साथीदार जर दुसर्याची काळजी घेतोय तर त्याची मानसिकता समजून घेण्याची गरज मला कळली...
मग बंद काय झालं हा प्रश्न विचारता जाणवलं ते म्हणजे, पुण्यात जाऊन नातेवाईक, मित्रमंडळींना भेटणे, हॉटेल चित्रपट, नाटक बघायला जाणे, हे सगळं बंद झालं.. पण त्याला पर्याय खूप निर्माण झालेत आता..
माझा मुलगा चेन्नईला शिकायला होता.. परीक्षेच्या काळात अचानक कॉलेजने सुट्टी जाहीर केली आणि पुढचं सगळंच अनिश्चित असल्या कारणाने पुण्याला आला.. पण कराडला माझ्या माहेरी माझ्या भावांची चार मुले त्याला इथे एकटे राहून द्यायला तयार नव्हती म्हणून त्याला कराडला मामाकडे पाठवलं. तीन महीने झाले तरी परिस्थिति चिघळत चाललेली पाहून मग आम्ही त्याला epass काढून इकडे घेऊन आलो. पण त्या दरम्यान आमच्या कॅम्पसमध्ये कोव्हिड पेशंट सापडल्यामुळे वातावरण जरा जास्तच खबरदारी घेण्याचे झाले होते. अलगीकरण कालावधी वाढून एकवीस दिवसांचा ठरवला गेला. तसेच एकतर मुलाला खास अलगीकरण इमारतीत ठेवा किंवा पूर्ण घर अलगीकरणात रहा असे दोन पर्याय ठरले. एकवीस दिवस मुलगा आलाय आणि मेस मधील जेवतोय हे मला एक आई म्हणून आजिबात पटत नव्हतं. मग कशाला बोलवायचं त्याला? मजेत आहे की तो तिकडे असंच वाटत होतं. मी तर नवर्याला, किशोरला म्हटलं, मग तू जाऊन मेस मध्ये राहा म्हणजे आम्हाला भाजी, दूध, सामान आणून देशील आणि आम्ही तिघं एकत्र राहू. पण शारीरिक दुर्बल असलेली मुलगी, तिला कधी काय अडचण येईल ते सांगता येत नाही म्हणून मग आम्ही मुद्दामच दूसरा पर्याय निवडला.. त्यापूर्वी आमच्या समोर राहाणार्या कुटुंबात त्यांचे आई वडील परगावावरून आल्याने ते घर अलगीकरणात होते. त्यावेळी त्यांना आवश्यक असणारे साहित्य, दूध आणून द्यायची जबाबदारी आम्ही पार पाडली होती. आता माझा मुलगा आल्यावर त्यांच्यावर आमच्या गरजेचं साहित्य आणून देण्याची वेळ आली होती. ती त्यांनी व्यवस्थित पार पाडलीच.. अखेर एकवीस दिवस पूर्ण झाल्यावर आमची वैद्यकीय तपासणी करून मगच मोकळीक देणार होते.. त्याबद्दलचे २४ जुलैला लिहिलेले माझे विचार खालील प्रमाणे..
काल गंमतच झाली... निमित्त होतं बाहेर जाण्याचं.. पण ते साधंसूधं बाहेर जाणं नव्हतं तर तब्बल एकवीस दिवसांच्या अलगीकरणातून बाहेर पडणं होतं.. आलाप कराडहून आल्यामुळे आम्हाला एकवीस दिवस बंदिवास होता..
मजा आली त्या एकवीस दिवसात.. शेजारी दुधाच्या पिशव्या, सामान, भाजी आणून दारात ठेवायचे मग आम्ही हळूच दार उघडून त्या आत घ्यायचो.. एरवी रोज दिवसातून दोन तीन वेळा एकमेकांच्या घरात शिरणारे आम्ही, एकदम असं तुटक वागणं सुरूवातीला जडच गेलं..
आलापला/मुलाला घरी आणलं आणि पाठोपाठ अलगीकरणाचा बोर्ड घेऊन जवान आले. समोरच्या बाल्कनीत बोर्ड बांधलेला बघून, फोटो काढून मगच गेले.. तेव्हापासून एकत्र कामं करत करत, पत्ते, कॅरम, गप्पा, गाणी या बरोबरच रोज फ्रेंड्स ही सिरियल बघत एकवीस दिवस कसे गेले ते कळलंच नाही..
आता डॉक्टरनी ठीक आहे म्हणलं की दाराबाहेर जाणं सुरू.. त्यासाठी मेडिकल इन्स्पेक्शन करायला जायचं होतं..
किशोर घाई करत होता पण मी निवांतपणे आवरत बसले होते.. शांतपणे आरशात बघून केस विंचरणे छान वाटत होतं.. मग किंचितशी पावडर हाताच्या तळव्यावर घेतली.. दोन्ही हात चोळून चेहर्यावर फिरवू लागले आणि जाणवलं, किती दिवसांनी मी हे असं स्वतःच्या चेहर्यावरून हात फिरवतेय.. डोळे मिटून तो अनुभव पुन्हा पुन्हा घेत राहिले.. पावडरचा मंद सुवास मनातली मरगळ घालवत होता..
बाहेर जाताना कसं, हातावरची ती किंचितशी पावडर चेहर्याचा बाह्य रंग बदलत नाही, पण अंतरंग मात्र बदलत जाताना जाणवतं.. घरातल्या कामाचा, विचारांचा, कंटाळा निघून जातो, डोळे लकाकायला लागतात.. खूप दिवसांनी हा हवाहवासा अनुभव मिळत होता हे जाणवलं.. घराबाहेर पडल्यावर बाहेरची मोकळी हवा डोळे बंद करून, मन भरून शरीरात फिरली आणि अजूनच प्रसन्न वाटू लागलं..
आरोहीचं आवरायला घेतलं तर बाहेर जाण्यासाठीचा तिचा उत्साह बघून आश्चर्यच वाटलं.. जसे तिला बूट घातले तशी ती भराभर बाहेर जाऊ लागली माझा हात धरून पायर्या उतरू लागली.. पिंजर्यातून बंदिस्त प्राणी सुटला की सैरावैरा धावत सुटतो तसं जाणवत होतं मला तिच्याकडे बघून..
इकडे किशोर मात्र काहीतरी गडबड झाल्यासारखा विचारातच, घरातच बूट घालून फेर्या मारताना दिसत होता.. एक पाय उचलतोय, खाली बघतोय, पुन्हा दूसरा पाय.. त्याच्या लेफ्ट राइट मार्चिंग करण्यात व्यत्यय आणत मी विचारले..
“अरे हे काय चालवलंयस?”
“काही नाही ग, कळत नाहीये मला, कपाटात ठेवून ठेवून बुटाचं वजन वाढलंय की काय? एकेक पाय उचलून दोन्ही वजनं सेम आहेत का बघतोय"
आता मात्र मला हसू आवरेना.. “अरे, बुटाची वजनं नाही वाढलीत, तुझी बूट घालून चालायची सवय गेलीय." आम्ही चौघेही जोरजोरात हसू लागलो..
“आलाप तुझं काय? तुला काय वेगळं वाटतंय?”
“मी खुश आहे कारण आज खूप दिवसांनी, जवळपास सहा महिन्यांनी मला गाडी चालवायला मिळणार म्हणून." असं म्हणत त्यानं पटकन गाडीची किल्ली घेऊन जिन्यातून खाली उतरायला सुरुवात केली..
चार जणांचे चार मजेशीर विचार...
यथावकाश सगळी चाचणी प्रक्रिया पूर्ण झाली आणि आम्ही बंदिवासातून मोकळे झालो..
बंदिवासातून मोकळे म्हणजे फक्त तासभर एकटं फिरायला, सांगितलेल्या वेळात सामान, भाजी आणायला मोकळीक मिळाली इतकंच.. कॅम्पस सोडून बाहेर जायचं नाहीच.. अर्थात बाहेर माजलेली अराजकता पहाता मन बाहेर जायला धजावत देखील नाही..
आता काही जवळचे, माहितीतले लोक कोविडची शिकार बानु लागलेले ऐकिवात येऊ लागलंय. पण त्यानंतर ते बरे झालेले ऐकतोय तसं भीती हळू हळू कमी होऊ लागलीय.. सुरुवातीचा धसका आता विरायला लागलाय.
सुरूवातीला अचानक लॉक डाउनमुळे घरचे रोजचे routine बदलले त्यावेळी खरं तर आजूबाजूला काय चाललंय याची उत्सुकता म्हणून दूरदर्शनवर बातम्या बघायला लागलो. पण लवकरच मला जाणवलं, आपण विचार करून, घाबरून परिस्थिती बदलणार नाही. त्यापेक्षा नकोच ते बघणे. किती खरं आणि किती खोटं.. कोणाला फोन केला तरी तोच विषय, मोबाईलवर कायप्पा बघितलं तरी तेच ते पुढे ढकललेले मेसेज.. हे सगळं थांबवले पाहिजे असा विचार करून बातम्या बघणे बंद केले. मग सगळ्या ग्रुपवर कोविड सोडून मेसेज टाकावेत असा इशारा दिला. आंतरजालावर असलेली नावाजलेली नाटके, मराठी चित्रपट, लघुपट बघणे सुरू केले. वेगवेगळे वेबिनार, चर्चा पहायला लागले. गुंतून जायचं मन.. घरात एक दिव्यांग मधुमेही मुलगी असल्याने मला तिच्या वेळा सांभाळाव्याच लागतात. तिचं सगळं करणे, स्वयंपाक, आणि सगळीच घरकामं करण्यात वेळ कसा जातो ते कळतच नाही. लिखाणाची आवड असल्याने वेळ मिळेल तेव्हा मनात येईल त्या विषयावर, आठवणींवर लिखाण करत रहाते.. मन आणि शरीर गुंतवून टाकलं ना तर नैराश्य जवळ देखील फिरकत नाही..
मी बर्याचदा प्रयत्न केला कधी मानसोपचार तज्ञांचे video बघितले. श्री श्री रविशंकर यांचे मनःशांतीसाठी सुरू असलेले कार्यक्रम बघितले एक दोनदा. पण माझं मन रमलं नाही त्यात. कदाचित मुलीच्या जन्मापासूनच अनेक अडचणीतून मार्ग काढायची सवय असल्याने मला स्वतःला या बंदिवासात कधी नैराश्य आलं नाही. गुजरात भूकंपात आम्ही जामनगरला, चक्रीवादळात तसेच त्सुनामीच्या काळात विशाखापट्टणमला होतो. त्यानंतर लगेचच नवर्याची बदली निकोबार बेटांवर झाली. तिथले जनजीवन सुरळीत करण्यासाठी. त्यावेळी तीन वर्षं लहान मुलांना घेऊन मी एकटी राहीले.. त्यामुळे आल्या परिस्थितीला सामोरं जायचा, अडचणी मान्य करून त्या कश्या सोडवायच्या/ त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधायचा स्वभाव झालाय जणू.. आता तरी आंतरजाल आहे पण पूर्वीच्या लोकांनी महामारीला कसं तोंड दिलं असेल? एक दिवस मी बरेच सर्च करून जुन्या महामारी आणि उपाय यावरचे लेख देखील वाचून काढले. मनावर ताबा ठेवला की मार्ग सापडतो. रडून, चिडून, निराश होऊन परिस्थिति बदलत नाही हे माझं नेहमीचं तत्व..
लग्न झाल्यानंतर कुठे ट्रीपला गेलेलो सोडले तर असं तीनही त्रिकाळ म्हणजेच चोवीस तास एकत्र असणे क्वचितच झाले असेल.. आम्ही दोघांनी ठरवले, घरातलं काम एकत्र मिळून करायचं. ते झालं की कधी पत्ते तर कधी कॅरम खेळायचं, खेळता खेळता गप्पा होत असत आणि काही ठराविक वेळ तुझा तू आणि माझे मी, मग एकमेकांना डिस्टर्ब नाही करायचं. त्यामुळे काय झालं की स्वतःचा वेळ देखील मिळाला आणि वादविवाद होण्याचा प्रश्नच निर्माण नाही झाला.. एकमेकांना ओळखत तर होतोच पण एकमेकांना जास्त समजू लागलोय. सगळ्याच नवर्यांना घरी आल्यावर बायको दूरदर्शन किंवा मोबाइलवर गुंगलेली दिसली की, नेहमीचा बोल ‘तुला काय काम असतं घरात, बघेन तेव्हा रिकामी बसलेली असतेस.' या शब्दांचा फोलपणा कळून चुकला. आता परत हे शब्द कित्येक नवर्यांच्या तोंडी येणार नाहीत..
आता पुढे काय काळजी घ्यायची याचा विचार करते तेव्हा मला माझं माहेर आठवतं. तो वाडा, त्याचा उंबरठा ओलांडून आत शिरलं की, कानावर येणारे बाबांचे शब्द, “हौदावर हात पाय धुवून मगच आत यावं.” लहानपणी त्यांनी पाडलेलं हे वळण किती योग्य होतं. पूर्वीची घरं, दाराबाहेर मोरी आणि नंतर दिवाणखाना.. आता कोणत्याही घराच्या दारात आपल्याला मोरी दिसत नाही.. तडक बेडरूममध्येच बाथरूम.. म्हणजे बाहेरचे हात पाय धुवेपर्यन्त पूर्ण घरात ते फिरलेले असतात.. स्वच्छतेच्या पूर्वीच्या संकल्पना किती योग्य होत्या हेच आता जाणवतंय..
पण कसं बदलता येईल घराची ठेवण? नवीन बांधणारे आता दारातच मोरी बांधायला सुरुवात करतील. ते पुढील कित्येक वर्षे तसेच राहील असं वाटतं. आपल्या कित्येक रूढी अश्याच का पडल्या असतील? दुरूनच हात जोडून नमस्कार करणे. उगाच कोणाला भेटायला न जाणे. उष्टा ग्लास, उष्टे ताट न वापरणे. कपडेच काय पण अंथरूण पांघरुण, टॉवेल, चहाचा कप देखील प्रत्येकाचा वेगळा.
होईल का परत असं? असेल का ते फायदेशीर? शंभर सव्वाशे वर्षांपूर्वी आलेल्या साथीच्या आजाराने पडल्या असतील का या रूढी? काहीही असो पण आता एकमेकांवरचं प्रेम दाखवण्याच्या सर्वांसमक्ष पद्धती बदलतील असं वाटतंय. मग ते मित्र मित्र, मैत्रिणी मैत्रिणी असोत, एकदम एकमेकांना भेटायला जाणार नाहीत..
या लॉक डाउनच्या काळात माझ्या आजूबाजूला घडणार्या घटनांमुळे मात्र कधी वाईट वाटलं, कधी अर्धवट ज्ञानाबद्दल हसू आलं, कधी असहायतेची जाणीव झाली, मदत केल्याचं समाधान वाटलं तर कधी विचार करायला भाग पाडलं.. काही किस्से मला इथे नमूद करावेसे वाटतात..
१.. लॉक डाउनच्या काळात आमच्यापैकी कित्येकांचे कोणी ना कोणी इकडे तिकडे अडकले होते. जसा माझा मुलगा माझ्या माहेरी होता तसं आमच्या समोर रहाणार्यांचे आईवडील नाशिकला राहिले होते आणि घरात बसून, बातम्या बघून घाबरले होते. त्यांना खास गाडीने इकडे आणायची वेळ आली त्यावेळी आमची चर्चा झाली. कारण त्यांना घरी आणले की पूर्ण घर अलगीकरणात रहाणार होतं.. मग त्यांच्या या अडचणीत आम्ही त्यांना लागेल ती मदत करायची आणि ते त्यातून बाहेर पडले की आम्ही आलापला म्हणजेच माझ्या मुलाला आणायचं असं ठरलं.. दोन्हीकडे येणारे सुरक्षित जागेतून येणार होते, स्वतःच्या घरून येणार होते, कुठेही न थांबता येणार होते.. पण इतकं सगळं माहीत असून देखील त्यांना मदत करणे सोडाच पण त्यांच्या समोर उभे रहायला देखील शेजारचे तयार नव्हते.. खूप गंमत वाटली मला. दहा-वीस मीटर दूरून संसर्ग होईल का? पण मदत करणे सोडाच जवळपास वाळीतच टाकलं त्यांना आणि नंतर आम्हाला..
२.. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात नेमकं माझं फोनचं सिम बंद पडलं.. आमच्या कॅम्पसमध्ये कोणतंच मोबाइल दुकान नसल्यामुळे आणि आम्हाला बाहेर जाता येत नसल्यामुळे अजून देखील माझा फोन बंद सिमचाच आहे. कधी मिळेल तेही सांगता येत नाही.. कित्येक ठिकाणी दिलेला नंबर, बँकेची कामं बंद पडलीत. जानेवारीच्या सुरूवातीला माझं ‘निकोबारची नवलाई' हे निकोबार बेटांवर लिहिलेलं मराठीतील पहिलं पुस्तक राजहंस प्रकाशन तर्फे प्रकाशित झालं. सहाजिकच मला अपेक्षा असणार ना वाचकांनी अभिप्राय कळवावा.. पण गेले सहा महीने मी त्यापासून वंचित राहिले. ज्यांना माझ्या नवर्याचा नंबर माहीत आहे त्यांनी त्याच्या फोनवर फोन करून कळवले. पुस्तकात माझा कायमस्वरूपी नंबर दिलेलाच आता बंद पडल्यामुळे माझा जरा हिरमोडच झाला..
३.. सर्वात असहायता जाणवली ज्यावेळी, आमच्या शेजारच्या इमारतीत एकटीच रहाणार्या सेना अधिकारी महिलेला आपल्या पोटात असलेला गर्भ गमवावा लागला त्यावेळी कॅम्पस बाहेरच्या दवाखान्यात तिचे उपचार करावे लागले आणि आल्यावर तिला चौदा दिवस अलगीकरणात राहावे लागले.. इच्छा असून देखील ना मी तिच्या बरोबर जाऊ शकले ना नंतर तिला काहीच मदत करू शकले.. ती धैर्यवान अधिकारी एकटीने सहन करत राहिली. तिच्या मदतीला, आधार द्यायला तिचा दिल्लीला असलेला नवरा देखील येऊ शकला नाही कारण तो आला तरी आधी त्याला अलगीकरणाच्या खास इमारतीत चौदा दिवस रहावे लागणार होतं.. चौदा दिवस झाल्यावरच तिची गाठ मी घेऊ शकले..
४.. दोन महीने लॉक डाउन सुरू होऊन झाले आणि किशोरचे बोलणे सुरू झाले. हे कधी संपणार? केस किती वाढलेत? कधीच मी असा झिपर्या राहिलो नाही. आता केस कसे कापणार? सेनेचा नियम केस अगदी बारीक असले पाहिजेत. ज्यांच्याकडे ट्रिमर आहे त्यांनी केस एकदम बारीक करून टाकले. पण बाकीचे अडचणीत आले. सलून तर उघडायला परवानगीच नव्हती आणि जे कोणी दुसर्याच्या घरी जाऊन केस कापू लागले त्यांची हत्यारे जप्त केली. मी आठवडाभर सांगत राहिले, ‘मी प्रयत्न करू का? जसं जमेल तसं कापते.' मला गेले पंचवीस वर्षांचा अनुभव आहे पण मुलीचे केस कापायचा.. अखेर हो नाही करता करता, मनावर अक्षरशः दगड ठेवून किशोरने मला केस कापायला परवानगी दिली. कारण ऑफिसमध्ये त्याच्या शेजारी बसणार्या अधिकार्यांनी कापलेले केस अगदीच वेडेवाकडे होते आणि याला खात्री होती की आपली बायको यापेक्षा चांगलेच कापेल अशी.. नशिबानी साथ दिली आणि मी अतिशय उत्तम केस कापू शकले. पुन्हा दोन महिन्यांनी केस वाढले आणि त्यांनी बिनधास्त ‘माझे केस काप' असे सांगितले.. आहे ना गंमत.. आयुष्यात कधी काय करायची वेळ येईल काही सांगता येत नाही.
५.. आमच्या खालच्या मजल्यावर रहातात त्यांच्या आईवडिलांची औषधं संपली आणि ती मिळत नव्हती. औषधाच्या बाबतीत मी प्रत्येक गावाला बदली झाली की घरपोच औषधं कोणी देईल का त्यांचे नंबर घेऊन ठेवते. अगदीच घरी नाही पण कॅम्पसच्या मेन गेटवर आणून दिली तरी खूप. मी खालच्यांना मेडिकलवाल्याचा नंबर दिला आणि दोनच दिवसात त्याने गेटवर औषधं आणून दिली तेही दहा टक्के किंमत कमी करून. काय खुश झाले ते.
या कोरोनामुळे ना काही वाईट झालं असेल ते असेल पण खूप चांगल्या गोष्टी पण घडू लागल्यात. माणुसकी, शेजारच्याला मदत करणे, समोरच्याची काळजी घेणे ही गोष्ट वाढू लागलीय. नाहीतर आजकाल आपण बरे की आपलं घर बरे ही पद्धत रूढ झाली होती. तसंच आंतरजालाचा वापर वाढू लागलाय. याबाबतीत आपण अपेक्षेपेक्षा जास्त पुढे जाताना दिसतेय मला. सत्तर वर्षाची बाई देखील व्यवस्थित नेट वापरुन माहिती घेऊ लागलेली दिसू लागलीय..
राजेश्वरी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा