शुक्रवार, २५ सप्टेंबर, २०२०

पुष्पाताई,मला भावलेले व्यक्तिमत्व.

 पुष्पाताई,मला भावलेले

व्यक्तिमत्व....

 

 

 

       पुष्पांताईंची आणि माझी भेट पोरबंदर ला झाली. तसे बघितले तर आम्ही पोरबंदर ला दीड वर्षेच राहिलो. त्यात पण एक वर्ष किशोरची बदली कलकत्त्याला झाली. (पोरबंदर ते कलकत्ता जवळपास २५०० किलोमीटर दूर). पोरबंदर ला जाऊन  महिने झाले आणि लगेच बदली ची नोटीस. काय करावे काही सुचेना. आलाप(मुलगा)ची १०वी सुरू झालेली. त्यामुळे आम्हाला हलणे शक्य नव्हते. आरोही अशी की आज ठीक म्हणावे तर रात्रीत काय आजारपण उदभवेल सांगता येत नाही. १००० किलोमीटर च्या जवळपास कोणीच जवळचे असे नाही. , दिवस घालमेल झाली. पण पुष्पाताईंनी धीर दिला, आम्ही आहोत ना का एवढे टेन्शन घेताय? सगळे ठीक होईल. काळजी नका करू. खूप धीर आला या शब्दांनी. आणि खरेच त्या वर्षी खूप काळजी घेतली त्यांनी आमची.

     रविवारची सकाळ तर त्यांच्याबरोबर चहा घेण्यापासून सुरुवात होणार. त्या उठल्या की मेसेज करणार, मग मी दोघींचे कप घेऊन खाली जाणार. मग दुपारचे जेवणाचे ठरणार, त्या आधी त्यांच्या गाडीतून बाजारात नेणार, आठवड्याची भाजी, सामान घेऊन यायचे. मजेत गेले ते दिवस. कधीतरी कंटाळा आला की वर यायच्या मग एकत्र गप्पा, जेवण करायचो. मुलांकडे पण त्यांचे कायमच लक्ष असायचे. चेहरा, नजर बघून कोणाला काय होते ते त्यांच्या लक्षात यायचे. खूप आश्चर्य वाटायचे मला.

   दैवी शक्तीच ती. आपल्यात एखादी कमी दिली देवाने की दुसरे अवयव जास्त कार्यशील होतात.

        माझे आरोहीशी वागणे पाहून कितीतरी वेळा बोलल्या असतील ... 'मला का नाही तुमच्यासारखी आई दिली देवाने? मी नेहमीच आरोही मध्ये माझे बालपण बघते.'  मला खूप आश्चर्य वाटायचे. सगळ्याच आया अशा वागतात. मी काय एवढे जगावेगळी वागते.

       म्हणून मग एकदा त्यांचा रागरंग बघून विचारलेच सगळे. 'रागरंग' अशासाठी की एकतर त्या आमच्या घरमालकीण दुसरे म्हणजे माझ्यापेक्षा१० वर्षांनी तरी वयाने मोठ्या आणि डॉक्टर. त्यामुळे मैत्रिणीसारखे वागू शकत नव्हते.

      ऐकता ऐकता त्यांच्या आयुष्यातील खूप उतार चढाव दिसायला लागले. प्रत्येक क्षणी.. 'कमाल आहे या बाईची'... मनातल्या मनात असाच विचार यायचा.

       थोडक्यात त्यांचे आयुष्य मांडायचा प्रयत्न करते..

 

       ताईंचे लहानपण जोधपूर ला गेले. घरची परिस्थिती बऱ्यापैकी चांगली होती. एकटीच मुलगी आणि सर्वात मोठी, पाठीवर चार भाऊ..खूप लाड करायचे सगळे.

       लहानपणीच ताईंना ताप आल्याचे निमित्त झाले आणि पोलिओ झाला. एक पाय काम करेनासा झाला. आधीच मुलगी आणि त्यात तिला पोलिओ झाला, आता तिला शिकवून काय करायचे असा व्यवहारिक विचार करून आईने मुलीला घरकामाला जुंपले. हो जुंपलेच. कधी बसून तर कधी काठी घेऊन, आईची ओरडणी खात कामं करायला लागायची. आणि शाळेत जाताना भावंडांना गरम गरम भाजी पोळी आणि ताईंना ...शिळ्या कडक झालेल्या पोळ्या आणि वाटीभर ताक. मोलकरणीलाही मिळणार नाही अशी वागणूक.. काय मिळत असेल असे वागून? पहिली मुलगी जन्माला आल्यावर किती कौतुक केलं असेल. आणि शारीरिक व्यंग आल्यावर असे वागवायचे... तिला स्वतःला तरी सावरायला वेळ मिळाला असेल का?चालणार पाय अचानक निकामी झाला कळल्यावर काय वाटले असेल. मैत्रिणींबरोबर पळणे, खेळणे, उड्या मारणे सगळेच थांबले असेल का?

     पण शिकण्याची तीव्र इच्छा आणि त्याला बुद्धीची जोड यामुळे शाळा मात्र चालू ठेवली. १० वीत गेल्यावर एका शिक्षकांनी ... तू स्वावलंबी झाली पाहिजेस याची जाणीव करून दिली.

      अपेक्षेप्रमाणे मार्क चांगलेच मिळाले. सायन्स ला जायचे ठरवले. आईचा त्यालाही विरोध. तिचा एकच हेका.. मुलगी शिकून काय करणार? हिच्याशी कोणी लग्न थोडेच करणार? ही तर आयुष्यभर आपल्यावरच बोझ बनून रहाणार.

     जिद्दीने ११ वी,१२ वी चांगल्या मार्कंनी पास झाली. कोणाच्या  कळत मेडिकल चा फॉर्म भरला. जयपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला.           वडिलांनी पहिल्यापासूनच  'बाहेर शिक्षणाला द्यायला माझ्याकडून पैसे मिळणार नाहीत' असे स्पष्ट सांगितले होत. त्यामुळे सुट्टीत फावल्या वेळात हाताने मैत्रिणींचे कपडे शिवून पैसे साठवले होते. मार्क चांगले असल्याने शिष्यवृत्ती मिळायला लागली. त्यातलेही पैसे साठवून आणि होस्टेलवर अभ्यासाबरोबर शिवणकाम करून जमवलेले पैसे एका सुट्टीत वडिलांना दिले... 'हे घ्या आत्तापर्यंत तुम्ही माझ्यासाठी केलेला खर्च'.. अशा मुलीवर गर्व करायचा सोडून शरमेने मान खाली गेली असणार नक्कीच त्यांची.

     प्रश्न इथेच संपले नाहीत .. MBBS पूर्ण करून घरी आल्यावर घरात काहीतरी शिजतेय याची जाणीव झाली. नेमके काय याचा अंदाज येत नव्हता.. आणि एका रात्री जेंव्हा पुढच्या शिक्षणासाठी फॉर्म भरणे सुरू होते तेंव्हाच वडिलांनी खोलीत येऊन सांगितले की उद्या तुझा साखरपुडा ठरावलाय. हे कपडे आणलेत सकाळी १०वाजता तयार रहा. मुलगा कॉमर्स पदवीधर आहे पण शेती करतोय. तुझ्यासारख्या लंगडीला पसंत करतोय हा त्याचा मोठेपणा.. आभाळ कोसळले असे वाटले. दार बंद करून शांतपणे विचार केला की आता कोणाशी बोलण्यात अर्थ नाही. पहाटे पहाटे उजाडण्यापूर्वीच घर सोडले. एका मामांच्या मदतीने बडोद्याला आल्या. अपेक्षेप्रमाणे डोळ्यांच्या सर्जरी विभागात प्रवेश मिळाला.. सगळ्यांना वाटत होते की सुट्टी पूर्वीची पुष्पा आणि आताची खूप फरक आहे. काय झालंय तुला असे विचारायचे.. आपल्याच आईवडिलांविरुद्ध कोणाला काय सांगणार? काही नाही म्हणून विषय टाळायच्या...

      ग्रुप मध्ये महेश नावाचा एक मित्र होता. नेहमीच आनंदी राहणारा आणि समोरच्याकडून अशीच अपेक्षा ठेवणारा. तो MD फिजीशियन, शेवटच्या वर्षाला होता. त्याला सगळी हकीकत कळल्यावर क्षणात म्हणाला माझ्याशी करशील लग्न?खूप आनंद, आश्चर्य, कौतुक वाटले ताईंना. सुरुवातीला तर विश्वासच बसला नाही. नेहमी प्रमाणे मस्करी करतोय असे वाटून सोडून दिले. मी ही अशी..  मला मागणी कशी काय घातली. पण तो आता पूर्ण तयारीनिशी विचारत होता. नाही म्हणायला कारणच सापडले नाही. साधेपणाने लग्न उरकले. आता निश्चितपणे सगळे अडथळे दूर झाले होते. दोघांचे शिक्षण पूर्ण झाले...  

    आता पुढे काय ??

मेडिकल ऑफिसर म्हणून कुठे सरकारी नोकरी मिळते का पाहू असे ठरले. कारण लग्नामुळे दोघांच्या घरचे नाराज होते. घरून मदत मिळणे अशक्यच.          अर्ज केले... तिथेही तिला निराशाच पदरी आली. अपंग बाई नको म्हणाले. पण पोरबंदर ला महेशला नोकरी मिळाली. चला पोटापाण्याची तर सुरुवात झाली. थोड्या प्रयत्नानंतर ताईंना एका डोळ्यांच्या दवाखान्यात असिस्टंट म्हणून बोलावले .

     संसार सुरू झाला. तीन वर्षांच्या अंतराने दोन गोंडस मुली झाल्या. हळूहळू पोरबंदर मध्ये जम बसू लागला. दोघांनी मिळून स्वतःचे असे हक्काचे  मजली हॉस्पिटल उभे केले. जोडीला ताईंची समाजसेवा पण सुरू झाली. एक मुलींसाठी शाळा सुरू केली. रोटरी क्लब पोरबंदरच्या , वेळा प्रेसिडेंट झाल्या. क्लबच्या मार्फत बरेच सामाजिक कार्य केले त्यामुळे त्यांना त्यावर्षीचा उत्कृष्ट रोटरी पुरस्कार पण मिळाला.

       सगळे काही छान दृष्ट लागण्यासारखे चालू होते. मोठ्या मुलीचे शिक्षण पूर्ण होताच एका डॉ ने मागणी घातली. छोटीला IIT खरगपूर ला  प्रवेश घेतला.

      पण सगळं सुरळीत कसं राहील? ... आणि एक दिवस चांगला असलेला पाय दुखायला लागला. टेस्ट झाल्या औषधोपचार झाले पण उपयोग शुन्य.  थोड्या दिवसांनी पायावर पाण्याचे फोड आले. ते फुटून अजूनच त्रास होऊ लागला. काय करावे काही कळेना. दोघे डॉ असून निदान होत नव्हतं. एकदिवस BP वाढले आणि आता प्रयोग बास म्हणून अहमदाबाद ला ऍडमिट केले. तिथल्या डॉ नी पण अथक परिश्रम घेतले पण DVT चे निदान होऊन पायाची मुख्य नस कापावी लागली. नाहीतर पूर्ण पाय सडून गेला असता. आता चांगला पायही निकामी झाला. , महिन्यात पायावरच्या जखमा भरून गेल्या. पेशन्ट तपासायची आणि ऑपरेशन करायची इच्छा पुन्हा जोर धरू लागली. मिळेल तिथून माहिती घेऊन दोन्ही पायांना caliper असलेले बूट तयार करायला अहमदाबाद ला ऑर्डर दिली. बूट आले.. अथक प्रयत्न केल्यावर उभे राहणे शक्य झाले. कंबरेखालील भागात संवेदना नसल्याने पाय उचलायचा कसा? सगळीच प्रश्नचिन्ह. पट्टयाचे बूट आणि वॉकर घेऊन एकेक पाऊल टाकले तेंव्हा आभाळ ठेंगणे झाले. पुन्हा एकदा आपण लोकांना दृष्टी देण्याचे कार्य पुढे नेऊ याची जाणीव झाली..

    पण मांड्या आणि गुढग्याखाली जिथे पट्टे बांधायचे तिथे जखमा होऊ लागल्या. संवेदना नसल्याने रात्री घरी आल्यावरच पट्टे काढल्यावर दिसायचे. मग त्याला मलमपट्टी करावी लागायची. अजूनही करावी लागतेच. घरातले बूट काढल्यानंतर चे सगळे व्यवहार मग रांगत रांगत करावे लागतात. म्हणून बूट काढण्यापूर्वीच स्वयंपाक  इतर कामे करावी लागतात. आणि सकाळी अंघोळ करून बूट घालून मगच स्वयंपाक घरात जावे लागते. स्वयंपाक सुध्दा ताई खूप छान करतात. रोज वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आणि इतर चटपटीत पदार्थ. कित्येक पदार्थ तर मी पण शिकले करायला. त्यात एक लक्षात राहणारी 'ओल्या हळदीची भाजी'.. अप्रतिम..

       पहाटे 5 वाजले की शिलाई मशीनचा आवाज सुरू व्हायचा. स्वतःच स्वतःचे ड्रेस वेगवेगळ्या फॅशनचे करायचे. त्यात त्या इतक्या रमून जातात की बस्स.. मला पण त्यांनी ड्रेस डिझाइन आणि कापणे शिकवले. घागरा, वेगवेगळ्या प्रकारच्या सलवार.. एका सुईने केलेल्या क्रोशाच्या बॉर्डर, रुमाल आणि गळ्याचे आकार ... प्रत्येक गोष्टीत वैविध्य आणि नवीन काहीतरी करण्याची इच्छा स्वस्थ बसू देत नाही त्यांना. रात्री ११ ते  इतक्याच काय ते आराम करतात. बाकी वेळ अखंड उद्योग. शिवणकाम, भरतकाम कमी म्हणून की काय ... कापडावरचे पेंटिंग करून फ्रेम करणे, छोट्या मडक्यांवरचे पेंटिंग्ज तर अप्रतिम. कुठली कला येत नाही, जमत नाही असे नाही. आपण अव्यंग असून इतके काहीच करत नाही असे वाटायचे.

       तरीही त्यांना माझे कौतुकअसायचे.. दरवेळी भेटले  की 'मला तुमच्यासारखी आई का नाही मिळाली' ... मग एक दिवस मीच त्यांना म्हंटले की... 'आभार माना त्या आईचे ज्यांनी तुम्हाला घरातली कामे करायला लावून तुमचे हात बळकट केले. माझ्यासारखी सगळे काही हातात देणारी आई असती तर तुम्ही पण आपल्या हाताने खाण्याशिवाय दुसरे काहीच करू शकला नसता'.. हे ऐकल्यानंतर क्षणभर विचार केला. आणि म्हणाल्या,'आयुष्याकडे इतक्या  positively बघणे तुमच्याकडून शिकावे' मात्र आईवरचा मनातला राग एका झटक्यात कमी झाला.

 

    इतक्या वर्षांच्या अनुभवाने जाणवते की काही व्यंग असणारी माणसं बरीच संशयी आणि शीघ्रकोपी असतात. आपल्याला कोणी हसत तर नसेल ही चिंता त्यांना नेहमीच सतावत असते.काय करणार आजही समाजात जागरूकता निर्माण झाली नाही ना. त्या ही थोडेच अपवाद असणार. त्यांनाही राग पटकन येतो. आणी मग राग आला की ओरडायच्या, शिव्या द्यायच्या. नंतर मला सांगायच्या. मी म्हणायचे शिव्या देऊन आपलंच तोंड का घाण करायचे, त्यातून निष्पन्न काय होणार? समोरचा थोडाच बदलणार? थोडेसे दुर्लक्ष केले की आपले BP वाढत नाही..  ते ही  त्यांना पटलं. , महिन्यातच कामवाल्या, हॉस्पिटल चा स्टाफ सांगू लागला की मॅडम आता खूप शांत झाल्यात. मला म्हणायच्या आत्तापर्यंत तुमच्यासारखी कोणीच भेटले नव्हते. सगळे माझी कीव करणारे किंवा हसणारे.

        त्यांच्याउलट महेशदादांचा स्वभाव... ते नेहमीच आनंदी असायचे. आम्हाला नेहमी म्हणायचे... आनंदी राहा. भरपूर हसा. टेन्शन घेतलं तर तुमचीच तब्येत बिघडेल. कायम विनोद करत असायचे. स्वतःच्या आवडीने कार पार्किंग सोडून अर्ध्या भागात swiming pool बांधून घेतलेला. रोज एकटे पोहायचेच पण रविवारी आजूबाजूच्या सगळ्या मुलांना पोहायला परवानगी असायची. , तास मुले आणि त्यांच्याबरोबर दादा मस्त दंगा करायचे. आणि ताईंना रविवार शांत हवा असायचा. मुलांचा दंगा त्यांना सहन व्हायचा नाही. हळूहळू दोघांचे मतभेद होऊ लागले. मग भांडणे.. आता त्या स्वतःला जास्तच एकट्या समजू लागल्या.          

       रविवारी सकाळी चहा घेऊन गेले की , तास आमच्या खूप विषयांवर चर्चा व्हायला लागल्या. पोरबंदर सोडून   वर्षे झाली तरी अजूनही कधी कधी रविवारी सकाळी फोन येतो. तुमची आठवण येते म्हणून. मग खूप काही गप्पा होतात.

असेच एकदिवस त्यांनी मला एक धक्का दिला...

                                                        

   

             दिवाळीचे दिवस होते. पाहुणे येणार होते. ताईंकडून नवीन प्रकार शिकून आपल्या पाहुण्यांना खायला घालायची इच्छा होती. मी माझ्याच नादात आणि त्यांनी एक बातमी दिली... जुनागढ जवळ 35 किलोमीटर वर एका खेड्यात एका ओसाड जागी एका भल्या माणसाने एक ट्रस्ट तर्फे आश्रम, गोशाळा, अनाथ मुला, मुलींचे वसतिगृह, शाळा, कॉलेज, वृद्धाश्रम आणि भले मोठे सर्व सोयींनी सुसज्ज असे  हॉस्पिटल काढले होते आणि तिथे डोळ्यांच्या डॉ ची आवश्यकता आहे. पगार चांगला देणार आहेत आणि राहायला  खोल्यांचे घर.. अजून काय पाहिजे. मला खूप आश्चर्य वाटलं.. आता ही बाई तिकडे जाऊन एकटी कशी राहील. पण अचाट धाडस करून गेल्या तिकडे.. डोळ्यांच्या डॉक्टर आल्यात कळल्यावर दवाखान्यात खूप गर्दी होऊ लागली. त्यात वृद्ध मंडळी खूप. कारण जवळपास कुठेच दवाखाना नाही आणि जुनागढ ला जायचे तर इतका पैसा नाही. ताईंच्या सेवेचे चीज होऊ लागले. त्यांनाही खूप समाधान मिळू लागले. ३५ वर्षांचे रुटीन एकदम वयाची साठी जवळ आल्यावर बदलणे म्हणजे खूपच कठीण काम. शनिवारी तिथली OPD संपली की पोरबंदर ला तडक स्वतःच्या दवाखान्यात येऊन तिथले पेशन्ट तपासायचे. रविवारी सकाळी पेशन्ट बघून मग आठवड्याचा बाजार घरात भरून (डॉ महेशदादा पोरबंदर मधले हॉस्पिटल बघायचे ना.) मगच पुन्हा जुनागढकडे प्रयाण करायच्या.

      शुक्रवारपासूनच आम्ही ताईंची वाट पाहात असायचो. आम्ही म्हणजे मी आणि त्यांची कामवाली. कामवाली कुठली, मुलगीच मानायच्या. नवरा दारू पिऊन मारतो म्हणून पोटुशी असताना घर सोडून आलेली. मग सकाळी  ते संध्याकाळी  त्यांचे घर सांभाळायची. मी तिथे राहायला गेले तेंव्हा तिला  वर्षाची मुलगी होती. पहिल्याच भेटीत माझेही सगळे काम तीच करेल म्हणाल्या. नवीन गावातली माझी ही चिंता लगेच त्यांनी सोडवली होती.

 

        असेच दिवसमागे दिवस जात होते. आलापची ९वी ची परीक्षा झाली होती आणि १५ दिवस सुट्टी होती. एकदिवस संध्याकाळ पासूनच आरोहिला डोकेदुखी, उलट्याचा त्रास सुरू झाला. नेहमीची औषधे दिली पण काही उपयोग होत नव्हता. जेवण केले म्हणून इन्सुलिन दिले गेले होते. आता hypoglycemia ची भीती वाटत होती. आणि रात्री ११.30 च्या दरम्यान तिला उलटीतून रक्त पडू लागले. महेशदादांना फोन केला. वर बघायला येण्यापूर्वीच त्यांनी हॉस्पिटल मधून इंजेक्शन आणि सलाईन मागवले. तिचे उपचार सुरू केले, तासभर थांबून, ती झोपली बघितल्यावरच ते खाली गेले.

दुसऱ्यादिवशी पण दवाखान्यात जाण्यापूर्वी तिला तपासून गेले. पण हा प्रकार यापूर्वीही झाला असे कळल्यावर मात्र  दिवसांनी तिला बरे वाटले की  endoscopy करण्याचा सल्ला दिला. त्यासाठी राजकोट किंवा जुनागढ ला जावे लागणार होते.

          ताईंना आल्यावर सगळे कळले. लगेच 'जुनागढ ला एक डॉ. आहेत आमच्या ओळखीचे, मी घेऊन जाईन तुम्हाला'.... पुन्हा सगळी काळजी मिटली. कधी जायचे ते ठरत नव्हते. थोड्याच दिवसात घरचेच एक लग्न होते. किशोर आलापला घेऊन लग्नाला जाणार होता. आरोहिला त्रास होईल म्हणून आम्ही नाही जायचे ठरले. "अरे वा, चला माझ्याबरोबर, मस्त धम्माल करू आपण तिघी. आणि जोडीला endoscopy पण करू." ताईंचा उत्साह वाढला. मला पण हा पर्याय आवडला.

         एका शनिवारी संध्याकाळी निघालो तिघी. पोरबंदर पासून १४० किलोमीटरवर मुख्यरस्त्यावरून गाडी आत वळली. थोड्याच वेळात त्या वसाहतीत शिरलो. अंधार झाला होता. पण तरीही रस्त्याच्या  दोन्ही बाजूने लावलेली झाडे, बागा, आणि मधेच एखादी इमारत लक्ष वेधून घेत होती. सगळीकडे सूर्यऊर्जेवर वीज सुरू होती. इतका सुंदर, स्वच्छ, शांत परिसर पाहून मन प्रसन्न होऊन गेले. ताई पण उत्साहीपणे एकेक ठिकाणची माहिती देत होत्या.

अखेर त्यांच्या घरी पोचलो. त्यांनी आधीच आमची सोय करून ठेवली होती. सकाळपासून नाश्ता, जेवण ताई ड्रायव्हर कडून घरी पाठवायच्या. सकाळी  ते  त्या हॉस्पिटलमध्ये असायच्या. मग आम्हाला घेऊन अजून परिसर फिरवायच्या. कुठे चिकूची बाग तर कुठे आंब्याची, कुठे भाजीपाला. सगळं कसं स्वच्छ आणि दर्शनीय. ताईंकडे पाहुणे आलेत समजल्यावर हॉस्पिटल स्टाफने सहलीला जाऊ या असे ठरवले. १५,२० किलोमीटर वर एका डोंगरावर (आजूबाजूला बरेच छोटेमोठे डोंगर होते.) जायचे ठरले. तिथे ट्रस्टचीच भलीमोठी गोशाळा होती. लांबून खूपच मोठी एखाद्या कंपनीची गोडाऊन वाटतील अशी ठेवण होती. जवळ गेल्यावर दिसले एका ठिकाणी फक्त चारा, दुसऱ्या बाजूला रस्त्यावर सोडलेल्या गाई. आणि एकीकडे ४०,५० चांगल्या दुभत्या म्हशीं. त्यांचेच दूध परिसरात सगळीकडे पुरवायचे आणि शेणापासून गॅस आणि खत तयार करायचे.

       पोचता पोचता संध्याकाळ झाली होती. नेहमीच्या सवयीने तरुणांनी चूल पेटवून स्वयंपाक सुरू केला. मला हे सगळंच नवीन होतं. काहीतरी थ्रिलिंग वाटत होतं. गिरच्या जंगलापासून जवळच हे ठिकाण असल्याने मधेच एकदा हरणांच्या कळपाचा पळण्याचा आणि ओरडण्याचा आवाज येऊ लागला. रात्री म्हणे सिंह, सिंहींण शिकारीला येतात...

        गरम गरम भजी, चुलीवरच्या भाकऱ्या, बटाटाभाजी आणि प्यायला ताक. एकदम स्वादिष्ट. माझ्यासाठी हा खूप अनोखा अनुभव होता.

        रात्री घरी आलो. मी तर खूपच भारावून गेले होते. आरोही झाल्यापासून तिला त्रास होईल म्हणून कधी कुठे जाणे कमीच व्हायचे. पण ताई मात्र आम्हाला कुठे ना कुठे फिरवायच्याच. मग कधी परिसरातच नाहीतर बाहेर. एक दिवस म्हणाल्या चला तुम्हाला इथल्या मालकांना भेटवते ज्यांनी हा सगळा डोलारा उभा केलाय.

          संध्याकाळची वेळ होती, एका कुटी मध्ये साधूच्या वेशात ते झोक्यावर बसले होते. शेजारी एकजण त्यांना वारा घालत उभा. काही परिस्थितीने गांजलेले येऊन आपल्या अडचणी, काळजी मांडत होते आणि ते त्यावर त्यांचा विचार सांगत... सगळं काही अनपेक्षित होतं. इतका सगळा विचार करून सम्पूर्ण नवीन सोयींनी सज्ज असे हॉस्पिटल आणि शाळा, कॉलेज काढणारा माणूस उच्चशिक्षित असेल असे समजले होते मी, पण हे तर शाळेत पण कधी गेले नव्हते. पण त्यांचे सल्लागार उच्चशिक्षित होते. त्यांच्या सल्ल्याने दवाखाना, शाळेकडे  यायला तिथला खेडूत समाज उद्युक्त होऊ लागला. पण विशेष म्हणजे बाकी काही अघोरी उपाय करायला सांगत नव्हते हे उल्लेखनीय..

          , दिवसांनी ताईंनी सांगितले की उद्या आरोहीला endoscopy ला जुनागढ ला जायचंय. सकाळी उठल्यापासून पाणीसुद्धा  पिता नेले. डॉक्टर यायला वेळ होता. भरपूर गर्दी होती. बरेच मोठे , डॉक्टरांचे एकत्र हॉस्पिटल होते. मला आरोहिच्या शुगर चे टेंशन. इन्सुलिन दिले तर शुगर कमी, नाही दिले तर वाढली. सकाळपासून 2 वेळा शुगर चेक केली. मग एक चॉकलेट देऊन इन्सुलिन दिले. अखेर १२ वाजता डॉक्टर आले. त्यांनी तपासून तिला टेबलवर घेतले. आरोहिला काहीतरी वेगळे जाणवले आणि तिने रडणे सुरू केले. तिच्या वयाप्रमाणे मोठी नळी टेक्निशियननी नाकातून घातली. पण ती आत जाईना आणि नाकातून रक्त येऊ लागले, मग परत छोटी नळी घातली.. माझी अवस्था विवेक दादांच्या OT मधील बाईच्या नवऱ्यासारखी झाली होती. पण तिला सोडून पण जाता येत नव्हते. अखेर एकदाचं सगळं झालं आणि तिला खायला द्या म्हणाले. रिपोर्ट आल्यावर बरेच काही प्रॉब्लेम्स ...जसे अन्ननलिकेत अल्सर्स, हयाट्स हार्निया कळाले. मुख्य डॉक्टर, ताई आणि मी बरीच चर्चा केली. काय काळजी घेण्याची जरूर आहे ते सविस्तर मार्गदर्शन त्यांनी केले. इतकी दवाखान्यात गर्दी असूनही मुख्य डॉक्टरनी आम्हाला इतका वेळ दिला आणि ते सुद्धा एकही पैसा  घेता. मी खूप आग्रह केला की माझ्याकडून घ्या आणि एखाद्या गरिबाचे फुकट करा म्हणून. पण त्यांनी शांतपणे नकार दिला. OT मध्ये असताना ताईंकडून माझ्याबद्दल कळल्याने माझेच कौतुक करत होते. मनात खूप काही भावना दाटून आल्या पण फक्त डोळ्यातलं पाणी बोलू लागलं.

          दिवसांनी घरचे लग्न आणि माझा वाढदिवस होता. त्याबद्दल माझ्या बिलकुलही डोक्यात नव्हते. पण ताईंच्या मात्र बरोबर लक्षात होतं. त्यांची रोटरी ची मिटींग राजकोटला होती. मला आदल्याच दिवशी संध्याकाळी म्हणाल्या, 'चला राजकोटला जायचेय'..

      तयारी करून निघालो.. पोहचून बघतो तर काय एका ३स्टार हॉटेलमध्ये बुकिंग केलेले. मी म्हटलं, 'ताई एवढे मोठे हॉटेल'.. उत्तर आले माझ्या सर्वात जवळच्या व्यक्तीचा वाढदिवस तेवढ्याच थाटात झाला पाहिजे ना.. काय बोलावे काहीच सुचेना. रात्री नेहमीप्रमाणे गप्पा झाल्या. सकाळी आमच्या बरोबर वाढदिवस स्पेशल नाष्टा मागवून त्या मीटिंग ला गेल्या. दिवसभर मला घरच्यांचे फोन येत होते आणि आजपर्यंत कधी  अनुभवलेला वाढदिवस मी खास मैत्रिणीबरोबर साजरा करत होते...

 

       नवरात्रात पोरबंदरच्या दूरदर्शन चॅनेल्स वर दांडिया, गरबा बघून "आरोहिला दांडिया बघायला जायचे"  असे आरोही म्हणायला लागली तर त्यांनी तिच्यासाठी मला घागरा शिवायला लावला आणि एक दिवस रात्री पोरबंदर मधील सर्वात चांगल्या दांडिया कार्यक्रमाला घेऊन गेल्या आणि एकदम पुढच्या खुर्च्यांवर बसण्याची व्यवस्था केली. अगदी रात्री १२ पर्यंत आरोही अनिमिष नेत्रांनी त्याचा आनंद लुटत होती.

 

          ताई म्हणजे अनाकलनीय आहेत. कोणावर किती कसे प्रेम करावे त्यांच्याकडून शिकावे. पोरबंदर मधील एका दुकानदाराचा मुलगा ३० वर्षाचा आहे पण तो दोन्ही पायांनी अधू असल्याने उभा राहू शकत नाही हे कळल्यावर प्रत्येक रविवारी संध्याकाळी त्याला आपल्या बरोबर गाडीतून नेऊन समुद्रकिनारी गाडीतच बसून गप्पा मारतात. त्यामुळे त्याचे नैराश्य कमी होते.  

 

        मुलीला खडकपूर IIT ला नेव्हल आर्किटेक्ट ला ऍडमिशन घ्यायची होती. अचानक महेशदादांना काम निघाले. नुकतेच DVT च्या धक्क्यातून उठून बाहेर पडत असणाऱ्या ताई. मुलीचे सामान भरून तिला घेऊन रेल्वेने निघाल्या. तिथल्या रोटरी प्रेसिडेंट ची ओळख काढून फक्त  दिवस एका कारची सोय करायला सांगितली. बाकी खोलीत लागणाऱ्या गरजेच्या गोष्टी घेऊन देऊन पुन्हा एकट्याच परत पोरबंदर ला आल्या. आश्चर्य म्हणजे मुलगी आता US ला रिसर्च करायला गेली पण अजूनही ती आईने शिवलेलेच कपडे वापरते. तिचे विचारही खूपच प्रगल्भ आहेत. मोठी मुलगी पण फॅशन डिझायनर झालीय. बडोदा, अहमदाबाद, पोरबंदर मध्ये तिचे नेहमीच एक्झिबिशन असतात.

        लग्नानंतर गेली २० वर्षे महाराष्ट्राबाहेर मी फिरतेय, पण ताईंसारखी उदभवलेल्या शारीरिक व्यंगावर आणि त्या अनुषंगाने आलेल्या अडचणींवर मात करून इतक्या ताठ मानेने जगणारी दुसरी कोणी स्त्री बघितली नाही. अतिशय धाडसी, तितक्याच प्रेमळ, विविध कलागुण संपन्न, उत्साहाने ओतप्रोत भरलेले त्यांचे चतुरस्त्र व्यक्तिमत्व कोणालाही प्रेरणादायी ठरेल...

        त्यांच्या या जीवन कर्तृत्वाला माझे शतशः प्रणाम !!!

 

- राजेश्वरी किशोर

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

अनुभव_एका_पावसाचा

  अनुभव_एका_पावसाचा नुकतीच मी श्रीकांत सुनीताच्या घरी काही कारणाने जाऊन आले. गेट उघडलं तर समोर सुनीताला बघून मी म्हटलं, "अगं, किती छान ...