साळुंखीचा आक्रंद..
“का ग बाई? का ओरडतेस इतकं? सकाळी दिलं की मी तुला खायला.”
चुकून आज मी तिला खाऊ द्यायला विसरले तर नाही ना, हे बघायला मी मागच्या खिडकीशी जाऊन बघितलं, तर खाऊ तसाच डब्यात...
“तो खाऊ तसाच पडलाय डब्ब्यात. तो तर खात नाहीस आणि इकडे पुढच्या बाल्कनीत येऊन काय ओरडतेस?”
पण काही केल्या ती ओरडायची थांबेना.. का कोण जाणे पण मला ते ओरडणं जरा केविलवाणं वाटलं.. रोज सकाळी मागच्या खिडकीत येते आणि एकदोन वेळा कर्कश्य ओरडते, ती साळुंखी.. जसं काही सांगावं, ‘मी आलीय, खायला दे बाय.’. मग मी खिडकी उघडून त्याला अडकवलेल्या डब्यात धान्न्याचे दाणे, चुरमुरे घालणार.. मग खुश होऊन बारीक, गोड आवाज करून एकेक दाणा खाणार.. पण आजचं हे तिचं नेहमीचं ओरडणं नव्हतं.. आत्ता असं एकदम काय झालं हिला? ते मला कळेना..
बहुतेक साळुंख्या एकत्र बागडत असतात. कधी कधी भांडतात देखील. जर एखादा साप किंवा मांजर दिसलं की मग मात्र त्यांचा आणि सातभाईंचा कल्ला ऐकवत नाही अगदी.. एकदा तर आमच्या बागेत सुतार पक्षी चुकून आला तर, त्याला तब्बल दहा साळुंख्यांनी घेरा घातला होता. खूप वेळ त्याला कुठेच जाऊ देत नव्हत्या. अखेर त्याची घाबरून केलेली चुळबुळ बघुन मी बाहेर जाऊन साळुंख्यांच्या गराड्यातून त्याची सुटका केली..
तिच्या ओरडण्याचे विविध प्रकार मी अनुभवलेत पण आजचं ओरडणं काही केल्या मला कळत नव्हतं.. तिला असं कधी बाल्कनीत आलेलं पण मी बघितलं नव्हतं.. खूप विचार केला.. अखेर मी बाहेर जाऊन बघायचं ठरवलं. ती ओरडता ओरडता, मला येताना पाहून एकदम विजेच्या खांबाकडे गेली आणि परत माझ्या जवळ येऊन गिरकी घेतली.. आता माझ्या डोक्यातली ट्यूब पेटली.. अरेच्चा, तिच्या घरट्याजवळ जातेय ती..
ओहह, कालच्या तूफान पावसाने हिचं घरट मोडलं होतं तर.. मी आणि किशोर बाल्कनीत उभे राहून नेहमीच बघायचो. तिचं घरटं, तिनं कुठे केलं असेल, तर ते विजेच्या खांबाच्या वरच्या उघड्या भागात.. आमचे त्याबद्दल बोलणे पण झाले होते, ‘हा खांब पूर्ण पोकळ असतो की बंद? जर पोकळ असेल तर हिने असं कसं घरटं आत केलं? चुकून तुटलं तर? पिल्लं आत पडतील ना मग बाहेर कशी येतील?’
आणि कालच्या जोरदार पावसाने त्याचं काम केलं होतं.. पिल्लं होती का नाही माहीत नाही पण हिला मात्र त्या खांबात शिरताना मी बर्याचदा बघितलं होतं..
“आईग्ग, आता कळलं मला, तू काय सांगतेस ते. पण मी तरी काय करू ग?”
“खांबावर कोण चढेल आणि आत किती खोल असेल? पिल्लं असली तरी ती खाली आत गेली असतील तर कशी काढणार ग बाहेर? मी तुझी काहीच मदत करू शकत नाही ग”.. मी मान हलवत, तोंडातल्या तोंडात पुटपुटले.
फार वाईट वाटलं मला.. कळत असून तिची काहीच मदत करू शकले नाही मी.. बिच्चारी, माझ्यासमोर एकदोन घिरट्या घातल्यावर तिलाही माझी अडचण कळली बहुतेक. मग ती त्या खांबावरच बसून आत बघत राहिली..
आजचा पूर्ण दिवस ती येरझार्या घालेल. निराश होऊन ओरडेल. पण दाद कोणाजवळ मागेल? माझ्याजवळ मागून बघितली. माझं हताश होणं कळलं असेल का तिला? हे पण तितकंच खरं की, उद्या नव्या दमाने ती पुन्हा नवीन घरं बांधण्याचा श्रीगणेशा करेल..
मला बघायचंय आता पुन्हा उत्साहात काड्या काड्या जमवणारी ती....
राजेश्वरी
३०/०६/२०२०
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा