शुक्रवार, २५ सप्टेंबर, २०२०

बंद_दरवाजा

  

 बंद_दरवाजा

 

 

 

 

 

 ‘बंद दरवाजा’ या संकल्पानेवर लिहितांना मनात आले की आपण पण आपला एखादा दरवाजा उघडूया का? मग विचार करू लागले. आपल्याकडे असा कोणता बंद दरवाजा उघडायचा राहिलाय? मामबो मध्ये सामील झाल्यापासून सगळेच दरवाजे हळूहळू उघडत आलोय की आपण. अजूनही उघडतील. त्यापेक्षा एखाद्या जाणून बुजून बंद केलेल्या अशा काही दरवाजाबद्दल लिहू या. जो दरवाजा बंद करणे गरजेचे आहे..

 

  अंदमानला फिरत असतांना वेगवेगळ्या बेटांविषयी खूप निरनिराळ्या रंजक गोष्टी समजत होत्या. उत्तर-मध्य अंदमानला ‘Interview island’ नावाचे एक बेट आहे. खूप मोठे वन्यजीव संरक्षण निवास (wild life sanctuary) आहे तिथे. फार पूर्वी जंगलात फिरण्यासाठी, काम करण्यासाठी आणले गेलेले ८०-९० हत्तींचे संगोपन तिथे केले जाते. त्याशिवाय अनेक लहानमोठे प्राणी आणि पक्षी दिसतात. पर्यटकांसाठी खुले असले तरी फार कमी पर्यटक तिथे जातात असे कळाले. आम्ही इच्छा असून देखील मुले लहान आणि वेळेअभावी नाही जाऊ शकलो तिथे.

 

या बेटावर काही गुहा आहेत. त्या गुहांमध्ये पाकोळी नावाच्या छोट्याश्या पक्ष्यांचा स्वैर संचार असायचा. हजारो पक्षी आपली घरटी या गुहांमध्ये तयार करतात. बहुतेकवेळा सगळे पक्षी घरटे बनवतांना काड्या, दोर्‍या, कापूस, पाने अश्याप्रकारच्या वस्तु वापरतात. आपल्याकडे पण पाकोळी आढळतात आणि त्यांचे घरटे त्या चिखलाच्या छोट्या छोट्या गोळ्यांपसून तयार करतात. पण विशेष म्हणजे अंदमान निकोबारची पाकोळी घरटे करते ते आपल्या तोंडातील लाळेप्रमाणे स्त्रावणार्‍या चिकट स्त्रावाचा उपयोग करून. जसे कोळी जाळे विणतात, मधमाशी पोळे बनवतात तसे पाकोळी घरटे.

 हे घरटे बहुतेकवेळा एखाद्या गुहेत किंवा दगडाला तोंडातील चिकट स्त्राव लावत जाऊन बनवतात. बघायला ही घरटी इतकी सुंदर दिसतात, पांढरी शुभ्र किंवा किंचित मोतिया रंगातली घरे, हाताच्या ओंजळीप्रमाणे भासतात. देवळात तीर्थ घेतांना जसे हाताचा पंजा खोल करतो ना तसेच दिसते दगडी भिंतीवरचे ते घरटे. घराच्या भिंतींवर आपण छोटे छोटे शो पीस ठेवल्यासारखे दिसतात. मग त्या गुहांमध्ये अशी एकाखाली एक, शेजारी शेजारी अशी हजारो घरटी दिसतात.

एकदा कोणाला तरी शोध लागला की, या घरट्यांमध्ये खूप चांगले औषधी गुणधर्म आहेत. त्या घरट्यांचे सूप बनवून पिले तर शरीर तंदुरुस्त राहायला मदत होते. हे सूप खूप चांगले कामोत्तेजक म्हणून उपयोगात येते. ( प्रत्यक्षात की मानसिक ते माहीत नाही.)  

मग या घरट्याचा उपयोग कितीतरी फाइव स्टार हॉटेल मध्ये सूप बनवण्यासाठी करतात. ‘स्वीफ्टलेट नेस्ट सूप' (काही ठिकाणी याला ‘बर्ड नेस्ट सूप’ असे ही म्हणतात) हे एक महागडे सूप दिले जाते. त्या घरट्यातील काही वैशिष्ट्यपूर्ण औषधी गुणधर्मामुळे जगभरात त्याला मागणी खूप आहे. अंदाजे पन्नास हजार रुपये प्रतिकिलो या दराने या घरट्यांची विक्री होते. अंदमान निकोबारच्या बेटांवर प्रचंड प्रमाणात असलेल्या पाकोळयांच्या अस्तित्वामुळे तिथून पूर्वीपासुन या घरट्यांची तस्करी केली जात होती. बर्मा, चीन सारख्या देशात याला खूप मागणी आहे. या घरट्यांच्या तस्करी मुळे अचानक पाकोळ्यांची संख्या घटू लागली. लाखोंची संख्या हजारोंवर आली. आता या अंदमानी पाकोळ्यांचे अस्तित्वच नष्ट होईल की काय अशी भीती वाटू लागली.

 

तिथे काम करणार्‍या डॉक्टर शंकरन बद्दल ऐकले आणि आम्ही चाटच पडलो. डॉ शंकरन एक पक्षिविद्यातज्ञ आहेत. पक्षांचा अभ्यास करता करता ते पोहोचले या इंटरव्ह्यु बेटावर.  

डॉ. शंकरननी मग त्या पाकोळ्यांचे जीवन वाचवायचा विडाच उचलला. त्यांनी प्रशासनाच्या मदतीने त्यापैकी काही गुहांभोवती पहारा ठेवून तस्करी करणारे, घरटी पळवणारे चोर यांना गुहांच्या जवळ फिरकू द्यायला सुद्धा मनाई केली. काही दिवसांनी त्यांच्या प्रयत्नांना यश आलेले दिसून आले. आणि एक दिवस हजारो पाकोळ्यांची पिल्ले त्या गुहांच्या बाहेर उडतांना त्यांना दिसली. डॉक्टरांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. त्यांच्या या वर्षानुवर्षं चालणार्‍या कार्‍याला मदत म्हणून मग त्यांची मुलगी चित्रा सुद्धा शिक्षण संपवून त्यांना सहाय्य करायला हजर झाली. मोजकीच लोकसंख्या असलेल्या त्या बेटावर ते कायमचे स्थायिक झाले.

 

काही लोक पर्यावरणाचा र्हास करण्यात धन्यता मानतात तर काही पर्‍यावरणाचे संवर्धन करण्यात...

 

पाकोळी सारख्या निष्पाप, छोट्याश्या पक्ष्याचे अस्तित्व टिकून रहाण्यासाठी म्हणजेच पर्यायाने पर्‍यावरणाचे संवर्धन करण्याचा असा हा स्तुत्य प्रयत्न डॉक्टरांनी केला. आणि घरटे चोरांसाठी त्या बेटाचे दरवाजे बंद झाले...

 

 

राजेश्वरी  

१४/०९/२०१८  

 

 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

पाचोळा - कुसुमाग्रज

कविता रसग्रहण    पाचोळा - कुसुमाग्रज आडवाटेला दूर एक माळ तरू त्यावरती एकला विशाळ आणि त्याच्या बिलगूनिया पदास जीर्ण पाचोळा पडे तो उदास उषा ये...