शुक्रवार, २५ सप्टेंबर, २०२०

भावंडांच्या_खोड्या

 भावंडांच्या_खोड्या 

 

लहानपणापासून एकत्र कुटुंबात वाढलेली मी.. भावंडांच्या खोड्या तर असणारच ना.. भावंडांच्या एकेक खोड्या आठवू लागले, तेव्हा एखाद्या चित्रपटाप्रमाणे सगळ्या घडामोडी डोळ्यासमोर आल्या.. त्यावेळी त्या खाकी चड्ड्या घातलेली मुलं आणि तेल लावून केस चापून दोन वेण्या शेपटासारख्या मिरवणार्‍या, स्कर्ट घालणार्‍या आम्ही मुली... मला नेहमीच आठवतं ते आमचं गोड, खोडकर बालपण..

नंतर नोकरी निमित्ताने तीन काका बाहेरगावी गेले आणि सगळी भावंडं मग सुट्टीला एकत्र जमू लागलो. मग कधी कराडला वाड्यात तर कधी एखाद्या काकांच्या घरी.. सगळे जमले की दुपार आमची हक्काची असायची.. रोज नवा गडी नवा राज्य तसे नवा दिवस नवी खोडी, नवा उद्योग..

हा हा.. चाळीस वर्षांपूर्वी केलेल्या गमती जमती, आता खोड्या म्हणून लिहिताना फार मजा येतेय.. आठवून आठवून हसायला येतंय..

लहानपणी केलेल्या या खोड्या कश्या असतात ना, काही खोड्या मोठ्यांपासुन लपवलेल्या असतात तर काही त्यांना नंतर सांगितलेल्या..  काही खोड्या मोठ्यांना कळल्या तरी ते काही न करू शकलेल्या आणि काही कळून चुकल्यावर आपल्याला धो धो धुतलेल्या.. अशी अद्दल घडवलेल्या की परत तसं करण्याच्या वाटेला न जाणार्‍या..

नुसत्या आठवल्या तरी एकटेच हसत बसाव्यात अश्या..

सगळ्या खोड्या लिहू लागले तर ग्रंथच तयार होईल, त्यामुळे काही मोजक्याच पण मजेशीर खोड्या लिहिते..

१..

सगळे जमतो तेव्हा एक गोष्ट आम्ही हमखास बोलतो आणि पोट धरधरून हसतो, ती गोष्ट...  

आमच्या कराडच्या वाड्याच्या शेजारच्या गल्लीत बागवान रहातात. त्यावेळी त्यांच्याकडे कायम बोकड, बकर्‍या पाळलेल्या असायच्या.. काहीवेळा बकरीची बांधलेली दोरी सुटायची आणि बकरी आमच्या वाड्यातली झाडाची पान खायला यायची.. एक दोन वेळा तर फुलाची झाडं तिने पूर्णच खाऊन टाकली.. बकरीला ती चटकच लागली.. फार वाईट वाटायचं, छान फुलं लगडलेलं रोपटं एकदम नाहीसं झालं की .. मग हे थांबवायचं कसं? एकाला कल्पना सुचली.. तिला आपण आत घेऊ या आणि वाड्याचे दार बंद करूया.. पहिल्यांदा दार बंद केल्यावर बकरी घाबरली आणि ओरडायला लागली. मग बकरीचे मालक शोधत येतील आणि आम्हाला ओरडतील या भीतीने तिला सोडावे लागले.. असंच तिला एक दोन वेळा दाराच्या उंबर्‍यातून हिरवी पानं खायला टाकत टाकत आतपर्यंत आणले, तिच्या पाठीवरून आम्ही हात फिरवला आणि तिला सवयीची केली, म्हणजे ती ओरडायला नको म्हणून.. मग एक दिवस एकाने तिची गळयातली दोरी धरून ठेवली. एकाने तिला खायला घालणे सुरू ठेवले.. आणि एकाने.. हा हा .. घरातून ग्लास आणायला लावला आणि चक्क सुरू केले की दूध काढणे.. आम्ही सगळे कुतुहलाने हसत हसत पहात राहिलो.. गंमत म्हणजे, त्याला सवय नव्हती, माहिती नव्हती तरीही भावाने चांगले अर्धा कप भरेल इतके दूध काढले .. आता दुपारची वेळ.. मोठे कोणी उठले तर काय करायचं.. त्यापेक्षा संपवूनच टाकू की हे दूध.. असे म्हणून एका भावाने केले की गट्टम दूध.. आणि पटकन बोलून गेला, मस्त होतं. थोडं गरम.. थोडं गोड.. बाकीच्यांना मात्र चव नाही मिळाली..

अजून कधी सगळे भेटले की त्याला विचारतो..  कशी होती रे चव? आणि मग सगळ्यांचा हशा...

 

२..

सुट्टीत हमखास संध्याकाळी सगळी मुलं एकत्र बसून परवचा म्हणायचो.. मग त्यात छोटे छोटे श्लोक, अथर्वशीर्ष, रामरक्षा, भीमरूपी, मनाचे श्लोक, पसायदान.. असं सगळं एका सुरात म्हटलं जायचं..

 एका सुट्टीतली गोष्ट.. माझे काका रहात होते तिथे आम्ही सगळे गेलो होतो.  त्यांच्या शेजारीच एक गुरुजी मुलांना पूजापाठ, योगासनं शिकवत आणि करून घेत.. चुलत भाऊ त्यावेळी असेल बारा वर्षांचा.. जवळच रहाणार्‍यां त्याच्या मित्राच्या, गुरवाच्या  घरात सत्यनारायण पूजा करायची होती.. त्यांनी सहज बोलून दाखवले असेल, ब्राम्हण बघायला पाहिजे पूजा सांगायला. गुरवाच्या घरची परिस्थिति अगदीच गरीब म्हणता येईल अशी.. माझे काका पूजा पाठ वगैरे करण्याला फारसं महत्व न देणारे, त्यामुळे मुलाची मुंज देखील त्यांनी केली नव्हती. तरी हा पठ्ठ्या, माझा भाऊ त्यांना म्हणाला, काळजी करू नका. मी सांगतो ना पूजा. ब्राम्हणाचा मुलगा..  येत असेल त्याला पूजा, असं समजून त्यांनी सगळी तयारी केली.. अति चाणाक्ष असलेला आमचा हा भिडू, घरी काहीच न सांगता, सराईतपणे पुस्तक वाचून पूजा सांगू लागला.. अगदी सराव असल्यासारखी.. भटजी म्हणतात तसा हेल काढून..  पूजा झाल्यावर मग सत्यनारायणाची महती सांगणारी कहाणी पण वाचून दाखवली..

 साहेब सगळं करून घरी आले, जसं काही घडलंच नाही असं.. काकूने, कुठे गेला होतास? असं विचारताच, कुठे नाही गं. मित्रांशी खेळायला गेलो होतो..  असं उत्तर दिलं आणि रमला घरातच.. तो दिवस तर गेला.. दुसर्‍या दिवशी गुरव आले की घरी, पूजेचा शिधा, तांदूळ, फळं आणि दक्षिणा द्यायला.. एका पांढर्‍या कापडाच्या पुरचुंडीत सुपारी आणि तांदूळ काही नाणी, प्रसाद दिला आणि मुलाने पूजा उत्तम सांगितली.' खूप समाधान वाटलं बघा.." असं त्यांच्याकडून ऐकलं मात्र आणि काका, काकूंना काहीच कळलं नाही.. अवाक होऊन बघतच बसले...  मग यानेच घाबरत घाबरत कथन केल की, ते लोक गरीब आहेत ना म्हणून मी पूजा सांगितली..  काय बोलावं आता या मुलाला.. त्या लोकांना खरं सांगितलं, अहो याची अजून मुंज झाली नाही. हा कसा काय सांगू शकतो पुजा? पण त्यांना तर ब्राम्हणाच्या मुलाने सांगितलेली पूजा पाहून समाधान मिळाले होते, पूजा सफल झाल्याचा आनंद होता त्यांच्या चेहर्‍यावर.. मग मात्र काका काही बोलू शकले नाहीत, पण त्या शिध्यातले चार तांदूळ काढून बाकी सगळं काकूने शेजारच्या गुरुजींना नेऊन दिलं.. त्यातच समाधान..

या खोडीत मात्र कळून सवरून काकांना काहीही करता आलं नव्हतं..  

परत असं काही करू नकोस असं आमच्या हीरोला बजावलं मात्र..

 


३..

माझं बालपण अशा वाड्यात गेलं की जिथं एकाच वेळी चार पाच बिर्‍हाडं रहात आणि प्रत्येकाच्या घरात तीन चार मुलं होती.. सगळी एक दोन वर्षांनी लहान मोठी.. धम्माल असायची नुसती.. एकाच्या डोक्यात कल्पना आली की, ती सगळे मिळून उचलून धरायचे..

खोड्या करण्यात पुढाकार आमच्यातल्या मोठ्या भावंडांचा आणि मुख्यतः मुलांचा... आम्ही मुली त्यांना अपेक्षित मालाचा पुरवठा करणार फक्त.. आम्ही वस्तू आणून द्यायचो पण परत त्या जागेवर नेऊन ठेवायच्या हे कोणाच्याच डोक्यात नसायचं.. मग दुसर्‍या दिवशी व्हायची ना गडबड..

 काही उद्योग शाळेत शिकलेल्या विज्ञानावर आधारित असायचे.. जास्तकरून भौतिक शास्त्र वापरुन..  जसं प्रकाश परावर्तीत होतो असं शिकलो तेव्हा घरातले सगळे आरसे गोळा केले.. का तर सिनेमा दाखवायचा म्हणून..

एका पाठोपाठ एक असे तीन चार आरसे सरळ, तिरके अंतरा अंतरावर ठेवले की, पहिला आरसा अंगणात उन्हात आणि त्यातून परावर्तीत झालेला प्रकाश पंधरा फुटावरच्या दुसर्‍यावर मग दूसरा तिरका असा ठेवला की त्याने परावर्तीत केलेले किरण पुढच्या आरशावर येतील मग पुढचा आरसा थोडा तिरका असा ठेवला की त्यातून उन्हाची तिरीप आमच्या घरच्या अंधार्‍या जिन्यात जाईल. तिथेच मग एक भिंग ठेवायचं..  जिन्याच्या खालच्या पायरीवर त्या भिंगाच्यापुढे जुन्या फोटोंची फिल्म.. या फिल्म पूर्वी एका दुकानात मिळायच्या.. काहीवेळा विकत आणायच्या किंवा त्यांना नको असलेल्या, त्यांनी टाकून दिलेल्या.. अगदीच नाही तर  जत्रेतला छोटा कॅमेरा असायचा ना तो उघडून त्यातून काढायची.. मग एकाने भिंगावरची फिल्म बदलत रहायची आणि दुसर्‍याने त्यावर भाष्य करायचं.. या भिंगासमोर धरलेल्या फिल्मचा पहिला फोटो जिन्याच्या भिंतीवर विशाल रूपात दिसायचा तेव्हा आम्हा सगळ्यांना काय आनंद व्हायचा..सगळे अगदी एकसुरात ओरडणार, टाळ्या वाजवणार.. झालं मग काय मोठे जागे व्हायचे ना.. पण मग तेही आमच्या सिनेमात सामील व्हायचे आणि आमची बाल्कनी भरून जायची.. आवडला सिनेमा तर तिकिटाचे पैसे देखील मिळायचे पुढच्या सिनेमाच्या फिल्म आणायला .. त्यावेळी अशा शोले सिनेमाच्या अशा छोट्या फिल्म मिळायच्या.. मग काय सोबत एकेकांचे डायलॉग, अगदी नाटकीच...

 असा हा आमचा दुपारचा सिनेमा लहान मोठे सगळे बघायचे..

दुसर्‍या दिवशी दाढी करायला, वेणी घालायला मोठ्यांना आरसा शोधावा लागायचा इतकंच.. बाकी काही नाही..

 

४..

दूसरा प्रयोग आम्ही केलेला आठवतो तो म्हणजे..

 संपलेल्या बॉलपेनच्या रीफीलचे पुढचे नीब दाताने जोर लावून उपसून काढायचे.. कधीकधी त्याची शाई ओठांना आणि जिभेला रंगवायची आणि आमचं बिंग फुटायचं.. तोपर्यंत, त्या मोकळ्या रीफीलमध्ये भरायला एकाने हळूच जाऊन गॅस, स्टोव जवळची किंवा देवघरातली काडेपेटी आणायची. त्याच्या सगळ्या काड्यांची गुल दगडाने ठेचून एका कागदावर त्याची पूड करायची.. (त्याच्या ऐवजी दिवाळीच्या दिवसात फटाके उलगडून त्यातली दारू बाजूला काढायची).. ही पावडर हळुवारपणे रीफीलमध्ये भरायची.. मग रीफीलचे टीप परत लावायचं. हो, त्यावेळी हे देखील शिकलो होतो ना, की आतली हवा बाहेर गेली तरच त्यात काही भरता येते.. मग असे हे रीफील मागच्या बाजूने काडेपेटीतल्या बसतील तेवढ्या काड्या आत घुसवून बंद करायचं.. आता एकावर एक विटा, दगड लावून रीफील ठेवायला तिरका पाया करायचा.. व्यवस्थित रीफील ठेवले की मागे लावलेल्या काड्या पेटवून लांब उभे रहायचे, गंमत बघत.. ठासून भरलेली रीफील असेल तर ती असा काही वेग घ्यायची की क्षणार्धात सुररsssकन वाड्याच्या बाहेर.. शोधून देखील सापडणार नाही अशी जायची.. एक दिवशी व्हायला नको तेच झाले.. रस्त्यापलीकडे रहाणारे एक काका घरात घुसत होते आणि मागून आमची रीफील त्यांच्या पायजम्यात.. मागून कोणी काय मारले म्हणून ते बघू लागले आणि आम्ही तोंड दाबून हसत राहिलो..  त्यांना काही कळले नाही कारण आमच्यात आणि त्यांच्यात अंतर बरेच होते..

मजा यायची या प्रयोगात पण संध्याकाळी चहा करायला काडेपेटी मिळाली नाही की ओरडा मात्र खायला लागायचा..

      

५..

मला अजून आठवते ती सुट्टी.. आम्ही पुण्याला काकांकडे आलो होतो सुट्टीला.. १९७६  साल होतं बहुतेक.. त्यावर्षी तूफान पाऊस होत होता. रेडियोवर बातम्यात कराड, सांगली भागात पावसाने कृष्णा नदीला पुर आलेला सांगत होते.. कृष्णा कोयना नद्यांचा प्रीतिसंगम असलेले गाव, दोन्ही बाजूने दुथडी भरून वाहणार्‍या नद्यांनी कराडला बेटाचे स्वरूप आले होते. आम्हाला परत कराडला जाता येत नव्हते.. घरात बसून बसून कंटाळा आला होता. मोठा भाऊ सगळ्यांना रद्दी वह्यांचे कागद फाडून होड्या, विमान, बाण करायला शिकवत होता..  सगळेजण मस्त गुंगून गेलो होतो.. वेगवेगळ्या आकृती बनवत होतो..त्रिकोणी घड्या घालून घालून बाण बनवून एकमेकांना मारणे, विमान वर उडवणे सुरू होते.. इतक्यात एकाने बाणाचे पुढचे टोक तोंडात घालून चावून चावून मऊ केले.. दोन हातांच्या मध्ये नमस्कार करतो तशी पोझ घेऊन तो ओला केलेला भाग आतल्या बाजूस आणि मधल्या दोन बोटांनी, हात उलटे वर करून बाण उंच सोडला.. काय आश्चर्य.. ओला चावलेला भाग सपssकन छतावर विराजमान झाला की... मग काय सुरू झाले एकेकाचे छतावर बाण मारणे.. कधी एकमेकांना जागा सांगून नेम धरून मारता येतो का ते बघायचं.. बघता बघता लोंबणार्‍या बाणांनी छत भरून गेले.. दुपार संपली.. काकूने केलेले पोहे मस्त चापणे सुरू होते इतक्यात काका कामावरून घरी आले.. ते कपडे बदलायला खोलीत गेले, दोरीवरचा पायजमा हात वर करून ओढत असतांनाच त्यांचं लक्ष गेलं की वर छतावर.. आणि काय म्हणावं याला ते न कळल्यामुळे जोर जोरात हसायला लागले.. ही करामत आम्ही दार बंद करून केल्यामुळे काकुला कळली नव्हती.. काका इतके का हसतात ते बघायला काकू आत गेली आणि आम्हाला तिने डोक्यावर हात मारून घेतलेला आवाज देखील आला.. आम्ही मात्र एकमेकांकडे बघत तोंडावर हात ठेवून घाबरत घाबरत हसू लागलो.. रात्री काका कपडे वाळत घालण्याच्या काठीने एकेक बाण खाली पाडू लागले.. आम्ही मग सगळे बाण गोळा करून त्यांना केराची टोपली दाखवली.. काकांनी जणू आम्हाला उद्यासाठी जणू मैदान मोकळे करून दिले.. आमची ही खोडी हसून सोडून दिली हे पाहिल्यावर मग काय थोडे दिवस रोज तेच काम.. कदाचित इतर काही धुडगूस घालण्यापेक्षा हे परवडलं असं त्यांना वाटलं असेल..

थोडा पाऊस कमी झाला आणि आमच्या या करामतीपासून आम्हाला बाजूला करायला काकूने एक तोडगा काढला.. ती रोज आम्हाला जेवण झालं की कधी पर्वती, कधी सारसबाग असं रोज पुणे दर्शन घडवणे सुरू केलं आणि आमचा बाण मारायचा नाद सुटला...  

 

 

 

६..     

 

मला आठवतंय, त्यावर्षी मी दहावीची आणि बहिणीने बारावीची परीक्षा दिली होती. सुट्टीला पुण्याला आत्याकडे आलो होतो.. कॅरम, पत्ते खेळणं सुरू होतं. एक भाऊ इंजीनीरिंग आणि एक मेडिकलला शिकत होते. ते रोज संध्याकाळी मित्रांना भेटायला सायकलवरुन जायचे.. मजा करून रात्री घरी यायचे. माझी बहीण मग त्यांच्यावर वैतागायची.. आम्हाला पण बाहेर घेऊन जावा ना कधीतरी. असं म्हणून दोघांच्या मागेच लागली. काही दिवस दोघांनी टोलवाटोलवी केली पण एक दिवस बहीण हटूनच बसली. आज मी तुमच्या बरोबर येणारच.' म्हणाली..

चल, फिरून येऊ, म्हणाले. ती अगदी खुशीत येऊन त्यांच्याबरोबर फिरायला गेली.. ऊंचेपुरे दोघं लांब लांब ढांगा टाकत भरभर चालत होते.. हिला मात्र त्यांच्या मागे पळतच जावं लागायचं.. अडीच तीन किलोमीटरचं अंतर कापून अखेर तिघे पोचले सारसबागेत.. गणपतीचे दर्शन घेतले. पायर्‍या उतरत असतानाच तिला भेळेचा घमघमाट आला.. थोडावेळ बाकावर बसू म्हणून टेकली बिचारी. आधीच चालून चालून पायाचे तुकडे पडलेत असं वाटत होतं तिला.. पटकन हे दोघे तिला ओरडले, बसू नको, उठ उठ. तुला घरी सोडून आम्हाला बाहेर जायचंय.'

ती कुरकुरत होती, थांबू या की रे थोडा वेळ. माझे पाय दुखायला लागलेत. नाहीतर जाताना रिक्षाने तरी जाऊ या..'

रिक्शा बिक्षा काही नाही.. चल उठ आता. आणि चालतच घरी जायचंय.'

हिरमुसलेली ती जड झालेले पाय ओढतच चालू लागली..

एकाने खिशातून पन्नास पैसे काढले आणि म्हणाला, तो बघ किती छान आहे.. गोल गरगरीत.. पाहिजे का तुला तो फुगा?

आता ही बारावी झालेली मुलगी काय फुगा घेऊन खेळत बसणार का? पण खोडील मुलांना त्यातच मजा..

भेळेचा घमघमाट अखेर नाकातच राहिला...

 

 

 ७..

दिवाळीची सुट्टी लागली की आम्हा बच्चे कंपनीची लगबग सुरू व्हायची.. शाळेचा सुट्टीचा गृहपाठ रोज सकाळी उठून केल्याशिवाय काही खेळत बसायचं नाही हा नियम होता.. मग त्यानंतर एकेक जण दाराच्या पायरीवर बसून, दिवाळीत करायची कामं यावर चर्चा करायचो.. त्यात सगळं असायचं.. आकाशकंदील, पणत्या, रांगोळी, नवीन कपडे, फटाके आणि सर्वात महत्वाचा किल्ला...

किल्ला कोणता करायचा? कुठे करायचा? किती मोठा करायचा? मावळे कोण आणणार? कारंजं करायला सलाईनची नळी शेजारच्या हॉस्पिटलमधून कोण मागून आणेल? शिवाजी व्यवस्थित आहे का परत रंगवला पाहिजे, की नवीनच आणायचा? एक ना दोन अनेक प्रश्न.. कधी सगळ्यांचं एकमत व्हायचं, तर कधी नाही..

आमच्या वाड्यात एक बिर्‍हाड होतं, त्यांची दोन मुलं आमच्यापेक्षा बरीच मोठी होती. मग ते दोघं त्यांचा त्यांचा वेगळा किल्ला करायचे.. दोन्ही ग्रुप आठ दिवसांपासून किल्ला करत असायचे. वेगवेगळ्या कल्पना लढवून किल्ले दिवाळीच्या दोन तीन दिवस आधीच तयार व्हायचे. मग त्यावर मोहरी, गहू, नाचणी वगैरे पेरायचं आणि रोज सकाळ संध्याकाळ त्यावर पाणी शिंपडायचं.. दोन दिवसातच लाल तपकिरी मातीवर हिरवेगार दाढीचे खुंट वाढल्याप्रमाणे कोंब उठून दिसायचे.. खूप प्रेमाने आम्ही त्या किल्ल्याकडे बघत बसायचो.. आता दिवाळीच्या पहिल्या दिवशी उठलं की त्यावर शिवाजी, मावळे मांडून ठेवू असा विचार करून आदल्या रात्री सगळे झोपायचो.. सकाळी उठून पहिला बॉम्ब कोण लावणार याची चढाओढ असायची.. डोक्याशी गजराचं घड्याळ, बॉम्ब, काडेपेटी, उदबत्ती ठेवूनच झोपायचो.. गजर झाला रे झाला की सर्वात आधी जाऊन बॉम्ब लावून यायचो.. सगळा वाडा दणाणून सोडायचा.

आमचे खोडील बंधूराज जागे झाले की उठणार, बॉम्ब घेणार, दुसर्‍याच्या किल्ल्याच्या गुहेत बॉम्ब ठेवणार आणि पेटवून पळत घरात जाऊन झोपणार.. बॉम्ब स्फोट होताना तो बॉम्ब किल्ल्याचे कोणते कोणते अवशेष उडवायचा ते बाहेर येऊन बघितल्यावरच कळायचे.. हा उद्योग कोणी केला ही चर्चा सुरू असताना, हे साहेब झोपलेलेच.. मग कोण संशय घेईल त्याच्यावर.. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी तर बाजारपेठेत पूजेची वेळ ठरलेली असायची. एकाचवेळेस सगळ्या दुकानात पूजा सुरू असायच्या.. पूजा संपली रे संपली की लगेचच फटाक्याची माळ लावायची म्हणून रस्त्यावर माळा पसरून ठेवलेल्या असायच्या.. एके वर्षी याने गंमतच केली.. आम्हा मुलांना बाजारपेठेतलं लक्ष्मीपूजन बघायला घेऊन गेला.. आम्ही पण गेलो आणि बघता बघता हातातल्या काडेपेटीने काडी पेटवून सुरू झाला की पठ्ठ्या... एकेक माळ पेटवत गेला.. आम्ही मात्र दुसर्‍याची फटक्याची लड लावतोय बघून पळतच घराकडे गेलो. पण हा ओळीने एकेक पेटवतच गेला.. पूजा होण्यापूर्वी कोणी पेटवली हे कळायला मार्ग नव्हता कारण याचा चेहरा फटाक्यांच्या धूरात कोणाला दिसला नाही..

 दुसर्‍यावर्षी पासून प्रत्येक दुकानदाराचा एक तरी माणूस दारात माळेची राखण करायला उभा असायचा..      

 

 

 

 

8. .

 

 

माझ्या एका दादाला किर्लोस्करवाडीला कारखान्यात नोकरी लागली. आमच्या भावंडात हाच सगळ्यात मोठा. मग काय सुट्टीला फिरायला जायचे अजून एक घर वाढले. मस्त धमाल करायचो आम्ही तिथे जाऊन.. सुरूवातीला त्याचं घर अगदी रेल्वे लाइनच्या जवळ होते. कराडला आमचे घर स्टेशनपासून बरेच दूर होते त्यामुळे रेल्वे फक्त प्रवास करायला गेलो तरच दिसायची. पण वाडीला गेलो तर डोळ्यासमोरून रेल्वे जाताना बघायला खूप अप्रूप वाटायचं. बर्‍याचदा डबे मोजायचो. जर एक्सप्रेस गाडी तिथे थांबणारी नसेल तर खूप वेगात जायची. मग प्रत्येकाच्या डब्याची मोजणी चुकायची.. त्यावेळी रेल्वेचे ग्रीन आणि रेड सिग्नल कुठे असतात ते प्रथमच कळलं.

दादाच्या घराच्या भोवतीच्या तारेच्या कंपाऊंड खालून गेलं की एक छोटसं गेट होतं. सिग्नल ग्रीन पडला की पळत जाऊन तिथे उभे रहायचो. रेल्वे निघून जाईल म्हणून गडबडीने जायच्या धडपडीत कित्येकांचे पाठीवरचे कपडे देखील त्या तारेच्या कंपाऊंडने फाडलेत, पाठीवर ओरखडे उठले पण तरीही जायचं सोडलं नाही.. एकदा तिथेच आम्हाला खिळे सापडले. ते रेल्वे येण्यापूर्वी ट्रॅकवर ठेवले. काही खिळे खाली पडले तर काहींचे रूपांतर सूरीच्या पात्यात झाले. मग काय सापडला खेळ.. सिग्नलकडे बघत बसायचे आणि आधीच जाऊन ट्रॅकवर ओळीने खिळे आणि एक दोन पैशाची नाणी मांडून गाडी जाईपर्यंत बघत उभे रहायचो. खिळे पण असे ठेवायचे की, गाडीच्या येण्याच्या दिशेला त्याचं टोक असलं पाहिजे. म्हणजे मग तो खाली पडत नाही.. गाडी पुढे गेल्या गेल्या लगेच त्यांना हात पण लावता यायचा नाही कारण घर्षणामुळे ते खूप गरम झालेले असायचे..

असे कितीक खिळे चपटे केले असतील त्याची गणतीच नाही. कधी कधी तर कराडहून जातांनाच बॅगेतून खिळे घेऊन जायचो. दोन तीन वर्षांनी दादाला क्वार्टर मिळाली आणि आमचा हा उद्योग बंद झाला..

 

 

9. .

 

 आलाप चार महिन्यांचा असतानाची गोष्ट.. त्याला बघायला सुट्टीत नणंद कुटुंब रहायला आमच्याकडे आले होते. त्यांची दोन्ही मुलं शाळेत जाणारी, मुलगा असेल त्यावेळी सातवी, आठवीत.. त्याला पालथा पडून सरकणार्‍या आलापशी खेळायला खूप मजा यायची. तो खूप मस्ती करायचा आलाप जवळ झोपून.. आलाप देखील खळखळून हसायचा. पोट भरण्यापुरता माझ्याकडे यायचा. मुलं येणार म्हणून किशोरने आंब्याची पेटी आणली होती आणि ती आतल्या खोलीत ठेवली होती.. मुलं भूक लागली की आवडीने आंबे खायची. मुलांची दुपारी जेवणं झाली की आलाप खेळतोय तोपर्यंत आम्ही जेवण करायचो. एक दिवस दुपारी आमचं आवरेपर्यंतच आलाप झोपला. तो नंतर कितीतरी वेळ भूक लागली म्हणून देखील उठला नाही. माझी चलबिचल.. दुसर्‍या दिवशी सुद्धा तेच.. असं दोन तीन दिवस झाल्यावर मला काहीतरी शंका आली. सगळ्यांना वाटायचं खेळून खेळून दमतोय म्हणून झोपतो.. पण मला चैन पडेना.. आम्ही जेवायला बसलो आणि अर्ध्यातच मी मुलांच्या खोलीत हळूच जाऊन डोकावले.. पहाते तर काय.. दादाच्या मांडीवर बसून दादाने दाबून दाबून मऊ केलेला आंबा आलाप मस्त मिटक्या मारत चोखत होता.. बापरे! धस्स झालं मला एकदम.. चार महिन्यांचं माझं बाळ. अजून बाहेरच्या पाण्याची पण चव बघितली नव्हती. आणि सुरुवातच आंब्यापासुन.. दादाला ओरडणार तरी कसं? थोडसं समजावलं आणि त्यानं मान्य केलं..

गंमत म्हणजे, मागच्यावर्षी हाच दादा त्याच्या स्वतःच्या सहा महिन्यांच्या मुलीला घेऊन आमच्याकडे आला. मी देखील आमरस केला आणि त्या बाळाला चाटवू का विचारू लागले, तर दादा कावराबावरा झाला.. नको नको, तिला त्रास होईल म्हणाला.. तेव्हा त्याला आठवण करून दिली.. आपल्या नवर्‍याची ही खोडी ऐकून सूनबाईंनी डोक्यावर हात मारून घेतला..

 

 

 

राजेश्वरी 

२१/०६/२०२० 

 

 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

पाचोळा - कुसुमाग्रज

कविता रसग्रहण    पाचोळा - कुसुमाग्रज आडवाटेला दूर एक माळ तरू त्यावरती एकला विशाळ आणि त्याच्या बिलगूनिया पदास जीर्ण पाचोळा पडे तो उदास उषा ये...