शुक्रवार, २५ सप्टेंबर, २०२०

काटयातील गुलाब

 "काटयातील गुलाब !"



हुश्श! झालं बाबा एकदाशी.. सगळं कार्य अगदी निर्विघ्नपणे पार पडलं.”
हम्म...”
तुझी ही कल्पना फारच आवडली, वास्तुशांत झाली की सगळेच जण हॉटेलमध्ये जेवून यायचे.”
हम्म...”
नाहीतर फारच त्रास झाला असता रे. पूजेची आणि सगळ्यांच्या जेवणाची तयारी.
मुलांना सांभाळून कसं जमलं असतं सगळं? हे आपलं सुटसुटीत झालं. तसे मदतीला आले असते सगळे. पण उगाच कशाला कुणाला त्रास?”
आज कसं डोक्यावरचं खूप मोठं ओझं उतरून गेल्यासारखे शांत शांत वाटतय. आता उद्या वाड्यातुन सामान आणून टाकलं की जसे असेल तसे रहायला मोकळे.
दोनच वर्षे राहायचे म्हणून आलो इथे पण त्या दोन वर्षातही किती
उलथापालथ झाली नाही?
हे घर, ते घर.. दर सहा महिन्यांनी सामान हलवा. कंटाळा आला होता रे मला.
प्रत्येक वेळी काही ना काही कडवटपणा मनात रहात होता.”
हम्म..”
केतss, मी इथे एकटीच बडबड करतेय आणि तू आपला नुसताच हम्म, हम्म चा पाढा म्हणतोयस. काहीतरी बोल ना?”
रेवा, तुझ्या मनातला कडवटपणा काढलास ना की कळेल, ‘जे होतं ते नेहमी
आपल्या चांगल्यासाठीच होतं’. काय वाईट झाले? सांग ना. मस्त पाच खोल्यांचे
घर झाले, ते ही शहराच्या एकदम मध्यवस्तीत. शोधून सुद्धा सापडली नसती अशी जागा. इथे यायचा निर्णय घेतला तेव्हा एका वर्षात तू इतके छान घर घेऊ
शकशील आणि तेही तूझ्या पसंतीने सर्व सोयी करून? हा विचार तरी मनाला शिवला होता का?
मग, आता सगळं विसर आणि घरात सामान कसं लावायचं त्याचा जरा विचार कर.”

बरंss बाबा तूझच खरं, मग तर झालं? तुला कुठे आवडतं दुसर्‍या‍ कोणाला
नावं ठेवायला?”

      रात्रीचे बारा वाजून गेले होते आणि उद्या वाड्यातले सामान हलवण्याचा
विचार करत रेवाने डोळे मिटले मात्र..... दिवसभराच्या दगदगीमुळे झोप
येण्याऐवजी गेल्या वर्षभरातल्या घडामोडी तिच्या  डोळ्यांसमोर तरळल्या॰

     मागच्या एप्रिल महिन्यात केतनची बदली सीमेवर एका गावात झाली होती. त्याला जायला चार महीने बाकी होते पण मुलांच्या शाळा प्रवेशाच्या दृष्टीने रेवा
आणि मुलांची सोय लगेचच करायची होती. मुलांची परीक्षा झाली की रेवाच्या
माहेरच्या वाड्याजवळच एखादे घर भाड्याने घेऊन तिथे राहायचे ठरवले. रेवाचे
दोन भाऊ, वहिन्या आणि आईवडील भाड्याने घर शोधायला लागले. लग्नापूर्वीची
सत्तावीस वर्षे ज्या गावात, वाड्यात लहानाची मोठी झाले त्या गावात आता
आपल्या मुलांचे बालपण जाणार म्हणून रेवाला खूपच उत्साह आला होता. मुलगा, ‘आकाश’ला तिसरीत आणि पोलिओग्रस्त मुलगी, ‘अश्विनी’ला शाळेत प्रवेश घ्यायचा होता.

     आठच दिवसात रेवाला तिच्या आईचा फोन आला की, ‘तिच्या मैत्रिणीच्या म्हणजेच विमलमावशीचा एक तीन खोल्यांचा ब्लॉक रिकामा  आहे. तू तिच्याशी बोलून घे’.

     रेवाने विमलमावशीला फोन केला, “हॅलो, मावशी, मी रेवा बोलतेय. आई कडून
तुझा नंबर मिळाला.”

      “हं. बोल गं. कशी आहेस? कधी येतेस आमच्या घरात रहायला?”

      “मी बरी आहे मावशी. मी आणि मुले साधारण अडीच वर्षांसाठी रहाणार आहोत. मुलीला लहानपणीच पोलिओ झाल्यामुळे खालच्या मजल्यावरचेच घर पाहिजे होते. बरं झालं तुझाच ब्लॉक आहे ते. मुले लहान असल्यामुळे पुन्हा पुन्हा सामान हलवणे शक्य नाही होणार”॰

     “रेवा, अगं मावशी म्हणतेस ना मला? मी का तुला घर सोडायला सांगेन? तुला
हवे तितके दिवस रहा. ठीक आहे? ये मग लवकर."   मावशीने गोड बोलून तिचे
म्हणणे मान्य केले. आता केतनची काळजी कमी झाली होती. कारण ही सदनिका रेवाच्या माहेरच्या घरापासून अगदीच जवळ होती. मुलांच्या आणि रेवाच्या सुरक्षेची मनोमन त्याला खात्री झाली.

     मे महिन्यात एक दिवस सामान पाठवले गेले. आणि मागोमाग गाडीने रेवा, केतन आणि मुले निघणार होती. एकूण तेराशे किलोमीटर जायचे होते आणि रात्री दहा वाजता ठरवलेल्या ड्रायवरचा फोन आला की त्याला यायला जमणार नाही. आता काय करायचे? निघायलाच हवे होते कारण सामान सगळे पुढे पाठवलेले. नवीन ड्रायवर शोधायला एक दोन दिवस लागणार होते. केतन आणि रेवा दोघेही गाडी चालवायला तसे नवशिकेच होते. पण इलाज नव्हता.

     ‘गणपती बाप्पा मोरया!’ म्हणत गाडी सुरू केली. पहिल्याच दिवशी सहाशे
पन्नास किलोमीटरचा टप्पा पार करून रात्री एका हॉटेल मध्ये मुक्काम केला.
दुसर्यादिवशी पुन्हा तितकाच टप्पा पार करायचा होता. आलटून पालटून गाडी
चालवत दोघेही अगदी थकून गेले होते. विशेष म्हणजे मुलांनी मात्र काहीच
त्रास दिला नव्हता.

     दुसर्‍या दिवशी उर्वरित टप्पा पार करून अखेरीस रात्री अकरा वाजता ते
पोहोचले. सामानाचा ट्रक दुपारीच आला होता. रेवाच्या भावांनी मजुरांना
बोलावून सामान घरात टाकून घेतले होते.

     आईने केलेल्या गरम गरम जेवणावर ताव मारून रात्री झोपण्यापूरती जागा करून रेवा केतन पहुडले.

     पंधरा दिवसात मुलांच्या शाळेचे प्रवेश वगैरेची सोय लावून केतन आपल्या
नवीन जागी हजर झाला.

     लग्नानंतर रेवा अशी एकटी पहिल्यांदाच राहत होती. दिवसभर मुलांची तयारी, शाळेत सोडणे, शाळेतून आणणे, मधल्या वेळात माहेरी आणि संध्याकाळी नदीकाठी चक्कर मारणे यात दिवस कसा संपून जायचा तिला कळायचेच नाही. रात्र मात्र सरता सरत नव्हती. केतनच्या आठवणीने तिचा जीव कासावीस व्हायचा. झोपण्यापूर्वी त्याच्याशी मनसोक्त गप्पा मारणे हा तिचा विरंगुळा होता.
त्यालाही तिथे एकटेपणा जाणवायचा. त्याचाही दिवस कामात जायचा आणि रात्री
तिचा दिवसभराचा हालहवाल जाणून घ्यायची उत्सुकता असायची. केतन आणि बाकीचे सोबती रात्री एकत्र फिरत असत. पण केतन चा फोन आला की ‘हे साहेब आता आपल्याच विश्वात जाणार’ म्हणत ते त्याला मोकळीक द्यायचे.

     नवीन नित्यक्रम आता अंगवळणी पडून तीन महीने होऊन गेले होते. सगळे काही सुरळीत सुरू होते.

     एक दिवस... “ओ ओ बाई.."

     “बोला काका. मला ओळखले नाही का? मी रेवा. पूर्वी नेहमीच तुमच्याकडून
दागिने घ्यायचो ना आम्ही.”

     “ते असुदे. तुमच्या गाडीमुळे आमच्या दुकानात गिर्हाइक कमी येतील. तुमची
गाडी इथे दुकानासमोर लावत जाऊ नका."

     “अहो काका, तुमच्या दुकानापासून चांगली वीस फुट दूर आहे की. तुमच्या
दुकानात यायला कशाला कोणाला अडचण येईल? बघताय ना, माझ्या मुलीला चालायचा त्रास आहे. मला जवळ गाडी लावणे गरजेचे आहे हो.”

     “ते काही मला माहीत नाही. तुम्ही इथे गाडी लावू शकत नाही.”

     रेवा मनातल्या मनात पुटपुटली... ‘रस्ता काय तुमच्या मालकीचा आहे का?’
पण... उगाचच वाद नको म्हणून तिने रस्त्यापलीकडे रहाणार्‍यांची परवानगी
घेऊन शेवटी तिथे गाडी लावली.

     आणि हो... तो गोळ्यांचा किस्साही तिला आठवला.

     शुक्रवारची रात्र होती. नेहमीप्रमाणे तिचे आवरणे सुरू होते. आकाशची
शनिवारी सकाळची शाळा म्हणून बॅग भरणे सुरू होते. तितक्यात अश्विनीची
खुडबुड ऐकू आली.

     “अश्विनी? काय करतेस गं?”

     “गोळी खाल्ली."

     आता हिने कोणती बरं गोळी खाल्ली असावी? विचारकरून उठून बघते तर काय?
     बाईसाहेबांनी ‘एलट्रोक्सिन’ गोळ्यांची आख्खी बाटली तोंडात रिकामी केलेली.

     “बापरे, अगं काय हे अश्विनी, तोंड उघssड..... दाखव मला किती गोळ्या
खाल्ल्यास ते. आss कर...”

     जबरदस्तीने तोंड उघडून दहा-बारा गोळ्या तरी काढल्या रेवाने तिच्या
तोंडातून. तिने किती गोळ्या खाल्ल्या असतील? शंभर गोळ्यांची बाटली सुरू
करून किती दिवस झाले असतील? आधी तिचे तोंड धुऊन मग घाईघाईने तिने जुनी बिले शोधली. केतनची ही एक सवय उपयोगी आली असे वाटले तिला त्यावेळी. बिलावरून आकडेमोड केली तर किमान पंचवीस एक गोळ्या तरी बाटलीत असणार. म्हणजे दहा एक गोळ्या तरी रिचवल्यात बाईसाहेबांनी. आता आकाशला सोडून तरी कसे जायचे? आणि रात्री अकरा नंतर डॉक्टर भेटणार का?

     “केतन, काय करावे ते काहीच सुचत नाहीये रे.”

     “काय झाले रेवा? जरा न रडता मला समजेल असे नीट सांगशील?”

     रेवाने सगळी कहाणी सांगितली. रात्री अकरा नंतर आकाशला घरात एकट्याला ठेवून कसे दवाखान्यात जायचे तिला काहीच कळत नव्हते. दरम्यान अश्विनीला पण झोप लागली. आता सकाळी लवकरच जाईन दवाखान्यात असे केतनला सांगून रेवा झोपी गेली.

     “अगं रात्रीच तिला घेऊन यायचेस ना? पोटात नळी टाकून काढला  असता ना सगळा डोस. आता काही दिवस तिला चक्कर येईल, डोके दुखेल. खूप सांभाळावे लागेल तिला. पंधरा दिवस तिला आता गोळी देऊ नकोस.”

     “बर डॉक्टर. लक्ष देईन मी तिच्याकडे.”

     किती रडायची अश्विनी त्यावेळीते आठवून तिच्या अंगावर काटा  आला.
रात्रंदिवस आडवे झोपवून डोके दाबून धरले तरच ती शांत रहायची. हात काढून
काही काम करायला उठले की तिचे रडणे सुरूच.

     “का गं, दोन तीन दिवसांपासून तुझी मुलगी इतकी का ओरडते? आम्हाला वरती स्पष्ट आवाज येत असतो सारखा. शांत झोपता पण येत नाही. डॉक्टरला दाखवून तिला शांत राहायचे काही औषध देता आले तर बघ." वरचे काका किती वैतागून सांगून गेले त्यावेळी.

     “सॉरी काका. बरं काका." इतकेच बोलू शकली रेवा त्यावेळी.

     ‘तिला काय झाले आहे? इतके साधे विचारायची पण माणुसकी नाही या माणसात.’

     दहा बारा दिवसांनी डॉक्टरनी सांगितल्या प्रमाणे अश्विनीवर औषधाचा परिणाम कमी कमी होत गेला आणि ती शांत झाली.

     खूप तणावाखाली काढलेल्या त्या दिवसांची आठवणही नको यायला असे रेवाला वाटले.

     दोन-तीन महीने गेले आणि एके  दिवशी विमलमावशीने एक धक्का दिला.... “रेवा, तू हा ब्लॉक विकतच घे कि. आम्हाला जरा पैशांची नड  आहे. लगेच टोकन म्हणून एखाद लाख देशील तर बरे.”

     “काय? अगं दोनवर्षं रहाणार आणि जाणार. विकत घेऊन मी काय करू? भारतभर फिरणारे आम्ही. एका जागी रहायचा विचार सुद्धा करू शकत नाही."

       “मी केतनला विचारून सांगते”

     क्षणभर रेवाला वाटले की काय हरकत आहे? माहेरापासून जवळ आहे. कधीही
सुट्टीत येऊन महिनाभर रहायला येईल. घेऊ या का? मग तिने हा विचार दादाला बोलून दाखवला. दादाने झटक्यात तिचे म्हणणे खोडून काढले. त्या घराच्या बांधकामातील त्रुटि काय आहेत ते दाखवले. त्यापेक्षा कितीतरी चांगली घरे मिळतील म्हणाला. अगदी पटले तिला  दादाचे मत.

     मावशीला घर घेऊ शकत नाही सांगितले. पण तरीही मावशी आपला हट्ट सोडेना. दर दोन तीन दिवसांनी ती पुन्हा पुन्हा पैशाची गरज असल्याने मला हे घर विकायचे आहे असा तगादा लावायची.

     शेवटी "तुला दुसर्‍या कोणाला विकायचे तर विक.” असे सांगितले रेवाने.

     झाले, आता वरचेवर गिर्हाइके घर पहाण्यासाठी येऊ लागली. ही टांगती तलवार रेवाच्या मनावरचा ताण प्रचंड वाढवत होती.  दर चार दिवसांनी गिर्हाईक
यायचे आणि घर बघून जायचे.

     अखेर एका देशमुख कुटुंबाला ते घर पसंत पडले. दोन वर्षे घर तुम्हालाच देऊ
भाड्याने असा शब्द देशमुखांनी दिला. पण नेहमी घर पहाण्यासाठी त्यांची
बरीच माणसे येत, चहापाणी होई, गप्पा होत.

     त्यांच्या या त्रासामुळे तिने दूसरीकडे घर शोधायला सुरू केले. पण रेवा
आणि मुलेच रहाणार म्हटल्यावर लोक इतक्या विचित्र नजरेने पहायचे आणि नकार द्यायचे, मग तिला खूपच खचून जायला व्हायचे. ज्या उमेदीने एकटीने मुलांना सांभाळीन या ध्येयाने स्वतःच्या समजत असलेल्या गावात पाऊल ठेवले ते गाव देखील हळू हळू तिला परके वाटायला लागले होते.

     वाड्यात छोट्याश्या दोन खोल्या रिकाम्या होत्या पण अश्विनीच्या
तब्येतीच्या दृष्टीने सोयीच्या नव्हत्या.

     आणि एकदिवस देशमुख कुटुंबाचे त्या घराचे खरेदीखत झाले. रेवाला वाटत होते की शब्द दिल्याप्रमाणे ते आपल्याला आता हलवणार नाहीत. पण किती खोटा भ्रम होता तो.

     एका रविवारी सकाळीच देशमुख आले.

     “माझ्या  आईचा एक अनुभव सांगतो, तिच्या जुन्या घरात एक बाई एकटीच रहात होती आणि तिचे चालचलन ठीक नव्हते. एक दिवस त्या बाईचा गैरसंबधातून खून झाला. त्याचा त्रास आईला भोगावा लागला. त्यामुळे आईला आता या नवीन घेतलेल्या घरात कोणी भाडेकरू न ठेवता स्वतः राहावे असे वाटते आहे.”

     देशमुखांचे वक्तव्य ऐकले मात्र, रेवाच्या पायाखालची जमीनच सरकली जणू.

     ‘शीss, किती घाणेरड्या विचाराची आहेत ही लोकं. शक्यच नाही आता या घरात रहाणे.’ असा विचार मनात येऊन रेवा मटकन खुर्चीतच बसली. तिच्या
डोळ्यांपुढे अंधारी आली. काय करावे ते सुचेना.

     “हॅलो दादा, मी नाही राहू शकत आता या घरात. खूप खालच्या मनोवृत्तीचे आहेत रे हे लोक.”

     “का गं ? काय झाले?”

     रेवाचे बोलणे ऐकून दादा म्हणाला,

     “शांत रहा थोडावेळ. मी बघतो काय करता येईल ते.”

     खूप आधार वाटला त्याचा तिला त्यावेळी. दादाने दोन तासात चक्रे फिरवली आणि दारात सामान उचलायला टेम्पो आणि माणसं हजर झाली. संध्याकाळपर्यन्त ते घर सोडून वाड्यात रहायला पण आली ती.

     माहेरी सुरक्षित असली तरी पण लग्नानंतर असे माहेरी येऊन रहाणे तिला रुचत नव्हते. जरी विभक्त रहात होती तरीही ते योग्य नाही असेच रेवाला वाटत
होते. त्याला अनुभवही तसेच येत होते.

     “रेवा, मी जरा कामात आहे. जरा लॅंडलाइन फोन वाजतोय, कोणाचा आहे बघ ना." आई.

     “हॅलो”

     “कोण, रेवा का?”

     “हो जयाकाकू बोला ना. कसा आहे तुमचा नातू आता?"

     “एकदम छान आहे गं. आज संध्याकाळी त्याचे बारसे आहे, आई आणि तुझ्या दोन्ही वहिनींना संध्याकाळी पाच वाजता बोलावले आहे असा निरोप देशील?”

     “हो काकू. पाठवते त्यांना."

     ‘याच का त्या काकू ज्या आपण शाळेत असताना आपल्याला येताजाता काही ना काही काम सांगायच्या? आता मी इथे आहे तर घरच्यांबरोबर मला आमंत्रण देण्याचा विचार पण त्यांच्या मनात येत नाही... जाऊ दे तेवढेच आपले आहेराचे पैसे वाचले म्हणायचं आणि सोडून द्यायचं.’

     दोन-तीन वेळा तिला असेच अनुभव आले. एक बाई आपल्या मुलांना घेऊन रहाते म्हणजे प्रत्येकवेळी ती ‘आपल्या नवर्‍याला सोडूनच आलेली असते’ असाच विचार लोक का करतात? किती संकुचित वृत्ती आहे ही. अशा विचारांनी रेवा खचून जायची.

     मात्र या सर्व कटू अनुभावातून दिवसागणिक, नवीन घर घेण्याचा रेवाचा विचार दृढ होत गेला. केतनला पण रेवाची ती घालमेल संपावी वाटत होती म्हणून त्यालाही नवीन घराचा पर्याय पटला.

     अशातच तिच्या अलिबागला रहाणार्‍या मावशीने त्या गावातील तिचा ब्लॉक विकत घेण्याचा प्रस्ताव मांडला.

     “नाहीतरी आम्ही इथे रहात नाहीच तेव्हा तू हा ब्लॉक विकत घे. त्यामुळे
महिन्या दोन महिन्यातून आम्ही येऊ तेव्हा आमची पण खायची प्यायची सोय होईल तुझ्यामुळे. काय?”

     रेवाला तिचा हा प्रस्ताव अजिबात पटला नाही, आता सगळ्यांच्या अशा स्वार्थी
वृत्तीचा तिला प्रचंड राग येऊ लागला होता.

     “मी ब्लॉक बघून ठरवते.” म्हणून ती बांधकाम कसे आहे ते बघायला म्हणून
गेली काय आणि तिथे इमारत बांधलेला कंत्राटदार भेटतो काय. सगळाच योगायोग.
      तिची अडचण ऐकून त्याने एक पर्याय दिला... त्याची त्यावेळी नवीन इमारत
बांधायची योजना आखणे सुरू होते, त्यातील ब्लॉक घेण्याचा....  तिथे रेवाला
तिच्या स्वप्नातले, तिला कोणीही तिथून न हलवणारे घर मिळणार होते. लगेचच
तिने दादाशी बोलून आणि केतनला सांगून नवीन घरासाठी टोकन रक्कम देऊ केली.

     त्यानंतर सात-आठ महिन्यातच तिची सदनिका पूर्ण झाली आणि आता तिला त्या स्वतःच्या घरात तिथले राहिलेले दिवस सुखाने आणि समाधानाने व्यतित  करता येणार होते...

     गेल्या एक सव्वा वर्षात इतक्या सगळ्या ‘भूतो न भविष्यती' अशा घटना होत
गेल्या होत्या.

     ‘नको ना आता त्या आठवणी.. काहीतरी छानसं आठवत झोपूया..'

     “रेवा, ये गं. दोघे मिळून नवीन घराचे तोरण बांधू.”

     “देवा, माझ्या रेवाला आता या फुलांसारखे नेहमीच टवटवीत ठेव." असे म्हणत केतनने रेवाकडे एक प्रेमळ कटाक्ष टाकला होता. त्या नजरेतील भाव तिला एकदम रोमांचित करून गेले.

     डोळे मिटता मिटता ती एकदम रंगीबेरंगी फुलांच्या बागेत गेली. मधेच असलेला तो टवटवित लाल रंगाचा गुलाब तिला खुणावत होता. त्याला ती अलगद हातात घेऊ पहात होती. पण बाजूचे काटे तिला जखमा करत होते. तरीही निग्रहाने तिने तो काटयातील गुलाब’ मिळवलाच...

 

#राजेश्वरी_किशोर 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

पाचोळा - कुसुमाग्रज

कविता रसग्रहण    पाचोळा - कुसुमाग्रज आडवाटेला दूर एक माळ तरू त्यावरती एकला विशाळ आणि त्याच्या बिलगूनिया पदास जीर्ण पाचोळा पडे तो उदास उषा ये...