पर्यायी_वास्तव
एक अशी प्रसन्न (पसार्याची) खोली... खोलीला एक दरवाजा आणि खिडकी सोडली तर उरलेल्या भिंतींना लागून लहानमोठे कप्पे असलेली मांडणी.. मांडणीत ठेवलेले सामान, पुस्तके, डब्या... डब्यांमध्ये वेगवेगळ्या आकाराचे, रंग-रुपाचे स्पेयर पार्ट्स... पुस्तके म्हणजे लांबलचक ड्रॉइंग असलेल्या किचकट सर्किट डायग्रॅम... एकीकडे एक्स्टेंशन बॉक्स, स्टँडला लावलेली सोल्डरिंग गन, सोल्डरिंग मेटलचे रिळ, ब्लेड, कटर, पक्कड, टेस्टर... पांढरे शुभ्र सनमायका लावलेला प्लॅटफॉर्म... त्यावर पसरलेले टिव्ही, कम्प्युटर मॉनिटर, टेप रेकॉर्डर, रेडियो, व्ही.सी.आर. आणि बरेच काही... काही दुरुस्त झालेले सरळ ठेवलेले तर काही पाठ फिरवून उघडे पसरलेले... पायात पडलेले वायरचे तुकडे, जळके खराब पार्ट्स... एखाद्या कप्प्यात सुरू असलेला दुरुस्त केलेला टेप रेकॉर्डर किंवा टिव्ही.. डोक्यावर एक मोठा दिवा आणि बाजूला टेबल लॅम्प... या सगळ्याच्या मध्यात फिरत्या स्टूलवर बसलेली मी.. कधी सर्किट डायग्रॅममध्ये डोके खुपसून बसलेली किंवा कधी उघडलेल्या खोक्यात डोके घालून.. हाताला जागोजागी धूळ, ऑइलचे काळे डाग, बोटांना सोल्डरिंग करतांना झालेले नाजुक स्पर्श देखील आपल्या खुणा ठेवलेले.... क्वचित एखादा विद्यार्थी जोडीला.. ना खाण्याची शुद्ध, ना भुकेची जाणीव.. घरात असेन तर आईने बोलावले की पानावर बसायचे, बाहेर गेले की आईने दिलेला डबा उघडायचा.. तो उघडेल तेव्हाच कळायचे की आज घरात काय शिजलेय ते... मस्त रमून जायचे माझ्या या विश्वात मी... प्रत्येक इलेक्ट्रॉनीक उपकरणात चालणारे कार्य विद्यार्थ्यांना समजावून सांगायला फार आवडायचे मला.. रविवार मात्र वेगळा असायचा.. आठवड्याचे ते डागाळलेले कपडे स्वतः धुवायचे मग रविवारच्या भरलेल्या बाजारात जावून पिशव्या भरून हिरव्यागार ताज्या भाज्या आणणे, संध्याकाळी कृष्णा-कोयनेच्या प्रीतिसंगमावर फिरायला जाणे आणि आल्यावर वाळलेल्या कपड्यांना इस्त्री करणे.. महिन्या दोन महिन्यातून एकदा पुण्यात यायचे आणि संपत आलेले स्पेयर पार्ट्स, गरजेचे पार्ट्स विकत घेऊन येणे..
माझे बाकीचे असे फार कमी विश्व होते.. बोलणे देखील सगळे इलेक्ट्रॉनिक्सचेच ...
“मॅडम, याची खरखरच जात नाही.."
“काय बदललेस?”
“हा रेझीस्टर”..
“दाखव सर्किट”..
“अरे, इथे १.८k आहे आणि तू १८k लावलास. कसा आवाज स्वच्छ येईल?”
“मॅडम ते वॅल्यू कशी काढायची कळतच नाही.”
“कलर कोड पाठ कर म्हणजे किंमत काढता येईल.”
“मॅडम, हा बेल्ट इथे बसत नाही.”
माझी निमुळती लांबसडक बोटे मग लीलया तो बेल्ट बसवून देत. “बघ आता कॅसेट लावून स्पीड बरोबर आहे का?”
“हो मॅडम, एकदम ok.”
“मॅडम, हा कलर टीव्ही आहे आणि चित्र ब्लॅक व्हाइट येतेय.”
“ठेवून जावा टीव्ही. उद्या करून ठेवते.”
मग माझी संध्याकाळ तो दुरुस्त करण्यात जाणार.
असे हे माझे रोजचे दिवस फुलपाखरासारखे उडून जात असत.
लग्नानंतर देखील काही दिवस असेच नित्यक्रम सुरू राहिले फक्त भर पडली ते जेवण बनवायची.. पोटात नवीन बाळाची चाहूल लागली तरीदेखील फारसा बदल झाला नव्हता.. नववा महिना लागला तेव्हा किशोरच्या बॉसच्या घरी जावून टिव्ही दुरुस्त केला.. त्यांनी मला भेट म्हणून ‘MY BABY' हे पुस्तक दिले. त्या काळात सर्वात जास्त खप झालेले ते पुस्तक हातात घेतले आणि नंतर माझ्या हातातली सोल्डरिंग गन गळून पडली ती पडलीच.. आता तंत्रज्ञान बदलले, गरजा बदलल्या, जबाबदार्या बदलल्या... हे स्वप्न गळून पडले..
आता तर काय दुरुस्तीचा वेळ शब्दांची जुळवणी करण्यात जातोय.. दिवसभरात कधीतरी एखादे बीज सापडते.. रात्रीत त्याची जुळवणी होते.. सकाळी उठून चहा पिता पिता पेरणी होते.. भाजी निवडतांना, पोळ्या करतांना त्या बिजाला खतपाणी घातले जाते.. मोकळ्या वेळात लॅपटॉपवर त्याचा शब्दरूपी वृक्ष बहरू लागतो... शेवटी एखादा अनुभव, व्यक्तिचित्र, निसर्गचित्र, प्रवासवर्णन या रूपात दिसायला लागतो.. मामबोवर पोस्ट केला की त्याला बहर येतो.. फार रमून जाते मग मी या चक्रात..
पंचवीस वर्षांपूर्वी कोणी सांगितले असते की, तू लिखाण करशील तर ते स्वप्न वाटले असते आणि आता कोणी सांगितले की, ‘तू इलेक्ट्रॉनीक्सचे क्लासेस घे’ तर हे स्वप्न वाटेल...
वेळेप्रमाणे पर्याय निवडावे लागतात आणि व्यवस्था करावी लागते हेच खरे..
राजेश्वरी
२५/०९/२०१९
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा