ब्लॅक_अँड_व्हाइट
परवाच दूरदर्शनच्या ब्लॅक_अँड_व्हाइट चॅनेल वर ‘ससुराल' हा ब्लॅक_अँड_व्हाइट सिनेमा सुरू होता..
छान वाटते असे कधीतरी जुने चित्रपट बघायला..
अभिनय, कथा, चित्रपट निर्मिती याचा त्या काळात जाऊन विचार केला की कधी कधी खूप रस येत जातो बघायला..
बघता बघता गाणे सुरू झाले..
“तेरी प्यारी प्यारी सूरत को किसी की नजर ना लगे..."
अप्रतिम गाणे... अगदी लहानपणापासून ऐकत आलेले..
हे गाणे किंवा अजून दोन तीन गाणी,
“हुस्न वाले तेरा जवाब नही।"
“तोच चंद्रमा नभात..."
“ऐ मेरे वतन के लोगो..”
या गाण्यांचा अर्थ कळत नव्हता तेव्हापासून त्यांचे शब्द आणि चाल मनात कोरली गेलीय लहानपणीच..
त्यातले कोणतेही गाणे लागले की पहिल्यांदा डोळ्यासमोर येतो तो आमचा ग्रामोफोन...
HMV कंपनीचा..
१९३८मध्ये एकशे साठ रुपयांना घेतलेला. त्यातल्या साउंड बॉक्सची विशेष काळजी घ्यायला लागायची त्याची किंमत साठ रुपये. आणि बाकी सगळा ग्रामोफोन शंभर रुपयांना..
काळाभोर चौकोनी बॉक्स..
मुलांनी खराब करू नये म्हणून एका लाकडी कपाटात ठेवलेला..
कधीतरीच बाबा, काका रिकामे असतील तेव्हा बाहेर निघणार. कारण वजनदार असल्यामुळे आम्हाला उचलून तो बाहेर काढता याचा नाही. मग दादा मोठा झाल्यावर तो काढायचा.
त्या फोनोच्या शेजारीच त्याच्या दगडी रेकोर्ड्स असलेला दूसरा उभा बॉक्स.. तो तर अजूनच जड असणार. दोघांनी मिळून खाली घ्यावा लागणार. त्यात काळ्याभोर, दगडी, गोल रेकोर्ड्स.. मध्यभागी नाव आणि HMV चा तो खास कुत्रा..
ग्रामोफोन म्हणजे शाळेत असतांना तो आम्हाला आमचा प्रतिष्ठा वाढवणारा मुद्दा वाटायचा. कारण आमच्या मित्रमंडळींपैकी कोणाकडेच तो नव्हता.. बाबांच्याही लहानपणी आजोबांनी आणलेला.. पण अजूनही तितकाच खणखणीत आवाज येणारा..
सुट्टीच्या वेळात तो अलगद उचलून बाहेर काढायचा. कोणी मध्येच हात घालत असेल तर त्याला चांगलीच ओरडणी बसायची. हो, खराब व्हायला नको ना.
बॉक्स खाली घेतला की सुरू व्हायची ती चर्चा.... आधी कोणते गाणे लावायचे? मग आपआपल्या समज, आवडीप्रमाणे गाण्यांचे नंबर लागायचे.
ग्रामोफोन उचलून बाहेर घ्यायच्या आधी सगळ्यांनी जमिनीवर गोलाकार बसून घ्यायचे. मग पेटारा खाली येणार..
ग्रामोफोन चे झाकण उघडून वर केले की, पेटीच्या वरच्या झाकणाला आतून दोन क्लिप मध्ये खोचलेली ती साधारण आकाराची त्याची किल्ली.. आतून स्प्रिंग आणि बाहेरून त्याला किल्ली देत राहायचे जोपर्यंत घट्ट होत्त नाही तोपर्यंत किल्ली फिरवत राहायचे...
मग बॉक्स मधील मध्यभागी असलेल्या गोल तबकडीवर एक जाड लोकरीचे किंवा तत्सम थोडे खरखरीत कापड असायचे. मध्यभागी असलेल्या छोट्याश्या शाफ्ट मध्ये एखादी दगडी रेकॉर्ड ठेवायची. त्याच्या बाजूला असलेल्या क्लिप मध्ये अडकवलेला ‘S’ आकाराचा आवाज पुढे पाठवायचा पाइप. त्याला पुढच्या बाजूला साऊंड बॉक्स बसवायचा. साऊंड बॉक्स ला एका बाजूला पिन लावायची. ती पिन मात्र एकावेळी दोनच गाणी गोड आवाजात ऐकवेल. तिसर्या गाण्याला पिन बदलली नाही तर आवाज फाटणारच. तीन मिनिटांच्या एक किंवा दोन गाण्यांनंतर किल्ली द्यायची. त्याला हात लावण्यासाठी आमची धडपड सुरू असायची. माझे गाणे लावायचे तर मीच किल्ली देणार, मीच साऊंड बॉक्स रेकॉर्ड वर ठेवणार.. गाणे सुरू झाले की सगळी शांतता. गाणे संपायची वाट बघायची. मग दुसरे..
त्या ग्रामोफोन वर ‘ऐ मेरे वतन के लोगो..' लागले कि लतादीदींच्या त्या आर्त स्वरांची पकड काळजाला थेट हात घालायची... शब्दशः अर्थ कळत नव्हता तरी कुठल्याशा वेगळ्याच अभिमानाने ऊर भरून यायचा ..... हे गाणे नेहमी ग्रामोफोन वर ऐकण्याची सवय झालेली असल्यामुळे घरात पहिल्यांदा रेडियो आला त्यावेळी रेडियोवर लागलेले ते ‘ऐ मेरे वतन के लोगो..' अजिबात आवडले नव्हते.
काय आवाज होता त्या ग्रामोफोनच्या कर्ण्यामधून निघणारा, आहाहा! नंतरच्या कोणत्याच म्यूझिक सिस्टिमला त्याची सर आली नाही..
त्यातच अजून मग इतरही बरीच गाणी वाजवली जायची..
त्यात ‘अनमोल घडी’ मधील नुरजहाँचे सुप्रसिद्ध ‘जवां हई मुहोब्बत'.. सुरैया, सैगल यांची गाणी...
“झाशीच्या राणीचा पोवाडा”.. शाळेत जाण्यापूर्वीच आम्हाला झाशीची राणी माहीत करून देणारा.
एक गाणं होतं “झुकं तोल तोल तोल गं.. आडाचं पानी लई खोल गं..."
त्यात एक रेकॉर्ड आम्हा सगळ्यांना हसवून जायची ती म्हणजे, “भिकारणीची नक्कल".. ‘वाढ गं माये’.. असे म्हणून पुढे ती बोलायची... अप्रतिम आवाज आणि बोलणे होते. ती लावल्याशिवाय त्तो फोनो बंदच व्हायचा नाही. कदाचित त्याकाळी शाळेत जाण्यापूर्वी दारावर आलेल्या भिकार्याची ओळख असायची त्यामुळे असेल कदाचित. पण तो आवाज जवळचा, नेहमीचा वाटायचा..
तर असा हा काळ्या रंगाचा पण खणखणीत आवाजाचा ग्रामोफोन..... बालपणीच्या अनेक रम्य आठवणींशी निगडीत असलेला... एक मर्मबंधातली ठेवच जणू ......
आणि नुकताच घेतलेला पांढर्या रंगाचा “कारवाँ”... ग्रामोफोनची त्याला सर नाही.....
कारण ‘जुनं ते सोनं’ हेच खरं...
राजेश्वरी
०४/०२/२०१९
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा