शुक्रवार, २५ सप्टेंबर, २०२०

आठवण

आठवण

 

  अजूनही आठवतात ते दिवस सव्वीस वर्षे होऊन गेली त्याला. पण आठवणी आल्या की मन भरून आल्याशिवाय रहात नाही.

  फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मी पहिल्यांदा सासरी गेले. सोबत कोणी नाही. पद्धती माहीत नाहीत. स्वयंपाक आणि इतर घरातली कामांची माहिती होती पण अंगावर घेऊन करायची सवय आजिबात नव्हती. कारण नोकरी. नोकरी करत असतांना सगळं हातात आयतं पडत होते आणि मी कामाला जात होते.

   त्या घरातला माझा दुसराच दिवस असेल स्वयंपाक, भांडी आणि मी लढत होते. इतक्यात...

“हरिभाऊ, आहात का घरात?” अचानक सासर्‍यांच्या वयाचे तिघेजण घरात प्रवेशते झाले. मी कोणालाच ओळखत नव्हते. पण संस्कार म्हणा किंवा रीत म्हणा, मी पाण्याचे ग्लास घेऊन द्यायला गेले आणि खाली वाकून पाया पडले.

   “हे बघ बेटा, आता हे नेहमी नेहमी पाया नाही पडायचे. आमची मुलगी आहेस तू. मला तीन मुली आहेत आणि आता तू चौथी. इथे घर सोडून इतक्या दूर आली आहेस. एकटे वाटून घेऊ नकोस. कधीही काहीही वाटलं की सरळ उठ आणि तुझ्या माहेरी ये. तुझ्यासाठी आमचे दरवाजे सदैव उघडे असतील." कुलकर्णी काका बोलत होते.

“मी अग्निहोत्री काका. माझेही तेच म्हणणे आहे. मला दोन मुलगे आहेत. काकुला मुलीची फार हाऊस होती. आता ती मुलीची कसर तू भरून काढलीस. आमच्या घरी यायलाही आजिबात संकोच करू नकोस."

तिसरे पाटील काका ते पण तसेच बोलत होते.

तिघेही एकाच शाळेत शिक्षक होते. कुलकर्णी काका मुख्याध्यापक होते. शाळा कॉलेजमध्ये असतांना मुख्याध्यापकाचा दरारा सगळ्यांनाच असायचा पूर्वी. पण इथे ते माझे पालक झाले होते. कधीही न भेटलेले तीन तीन पालक मला त्यादिवशी अकस्मात भेटले.

नंतरचे तीन महीने मी तिथे राहिले. पण हे तीनही वडील रोज न चुकता, फिरत फिरत घरी यायचेच. माझ्या हातचा चहा पिऊन कौतुक करायचे. निघतांना, “अंजनीबाई, लक्षात ठेवा. ही आमची मुलगी आहे. हिला रागावून, बोलून त्रास देऊ नका बर का." असे माझ्या सासुबाईंना सुनावून जायचे.  

मग कधी मला घरी घेऊन जायचे. मार्च महिना सुरू झाला आणि खानदेशचे वैशिष्ट्य असलेले पापड, शेवया करायचे दिवस सुरू झाले. मग काय दर दोन दिवसांनी मला पापडाचे तर कधी शेवयाचे निमित्त करून घरी बोलवणार. मी सुरूवातीला म्हणायचे, मला त्यातले काही जमत नाही पण हे का बोलावतात? मी जाऊन तिथे काय करणार? आणि गेले तर काही सुद्धा करू देत नाहीत. पण माझ्या सासूबाई खुश व्हायच्या की, चला माझ्या सुनेला पापड, शेवया करायला शिकवतात म्हणून. पण नंतर मला कळून चुकले की तीनही काकू घरी गेल्यावर मला हाताला धरून सोफावर बसवायच्या. “तू यातले काहीच करायचे नाहीस. फक्त आराम करायचास. दमली असशील ना? बेटा, इथे तुला बोलवते ते फक्त आराम करण्यासाठी. दिवसभर कामं करून किती थकून जातेस तू. इथे येऊन कसलेही काम कराचे नाहीस.” काका काकूंचे हे बोलणे ऐकले की मला एकदम रडूच यायचे. कसं नशीब असते न? कुणाचे कुठले कोण ते सगळे. पण माझे भाग्य चांगले म्हणून माझ्या पाठीशी उभे राहिले.

हे बोलावणे अगदी मी तिथे असे पर्यन्त चालले. नंतरही बर्‍याचदा एप्रिल मे मध्येच जाणे व्हायचे. प्रत्येकवेळी कोणाचे ना कोणाचे पापड करणे सुरूच असायचे. मी थोडीशी मदत आणि जास्त निरीक्षण करीत रहायचे. किती प्रकार त्या पापडांचे... किती त्याच्या बनवण्याच्या विविध पद्धती..आजूबाजूच्या सगळ्या बाया (हो बायकांना तिकडे बाया असेच म्हणतात) आपापली साहित्य घेऊन येतात..   थोड्याफार लक्षात राहिलेल्या पद्धती ...

 

.... उडदाचे पापड करायचे तर त्यातही किती प्रकार.. तिखटासाठी - मिरेपूड, हिरवी मिरची, आलं लसूण, लाल तिखट यापैकी काहीतरी एक घालायचे. आंबट पाहिजे तर कच्या कैरीचा रस, लिंबाचा रस नाहीतर टमाटरचा रस घालायचा. भिजवलेले पीठ दणकून मुसळ/वरवंट्याने कुटायचे.. कुटत असतांना देखील विनोद करीत, नवरा सासुवरील राग कुटण्यात बाहेर जितका जास्त निघेल तितके ते पीठ लाटायला मऊ जाते. उडदाचे पापड लाटतांना मात्र जरा जोर लावायला लागायचा. त्याचे ते खास रेघा रेघा पाडलेले लाटणे, ज्यामुळे पापड जास्तीत जास्त पातळ बनतो. सगळीकडून एकसारखा जाड आणि गोल असलाच पाहिजे. मग ते पापड पेपेरवर घरातच कॉटखाली पसरायचे. ते पण सुरूवातीला एका रेषेत पण एकमेकांना न चिकटता. मग थोड्यावेळाने एकावर एक ठेवले तरी चालतात.  

 

... चिकणीचे, ज्वारीच्या शिजवलेल्या पिठाचे गरम गरम असतांनाच पापड लाटायचे. पीठ भल्या पहाटे उठून चुलीवर शिजवायचे. शिजत असतांना ते सारखे हलवत राहायचे. ते हलवायला लाकडी चमचा किंवा दंडुका असतो.  ते गरम असतांनाच लाटून किंवा चमच्याने पसरून सूती कापडावर घालायचे.

 पापड कधी लाटून कधी कापडावर ठापून तर कधी चमच्याने कापडावर पसरवून करतात.

 

नाचणीचे पापड करण्यासाठी नाचणी धुवून पाण्यात भिजत टाकून नंतर तिला मोड आणावे लागतात. मोड आलेली नाचणी फडक्यावर सुकवून मग दळली जाते. इवले इवले नाचणीचे कोंब सुकत चाललेले बघायला नको वाटते अगदी. ते पीठ उकळत्या पाण्यात टाकून त्याला वाफ दिली जाते आणि मगच ते लाटून पापड करतात.

 

... तसेच तांदळाचे पापड कधी लाटून तर कधी तांदळाचे पातळ पाणी स्टँडवरच्या चकत्यांवर अलगद पसरवायचे आणि अलगद तो स्टँड वाफावणार्‍या भांड्यात ठेवायचा. मग पाच दहा मिनिटांनी सुईने किनार मोकळी करून ते नाजुक पांढरेशुभ्र पातळ पापड तितक्याच नाजुकतेने कपडावर उन्हात वाळायला ठेवायचे. सगळे पापड वाळवत ठेवतांना ते एका सरळ रेषेतच आले पाहिजेत. त्याखालचे कापड सपाटच असले पाहिजे, त्याला एकही सुरूकुती पडायला नको. सगळे पापड एकाच आकारात असले पाहिजेत. त्या आधी तांदूळ धुवून दोन तीन दिवस पाण्यात भिजत टाकून ते दळून पाणी केले जाते.

 

... ज्वारीच्या पापडाला बिबड्या म्हणतात.. ज्वारी आधी पाचसहा दिवस भिजवून आंबवली जाते मग ती सुकवून दळून पीठ शिजवले जाते. हे पण कधी थापून, लाटून तर पळीने कापडावर पसरवून करतात. पसरवतांना पण एकसारखे, गोल, पातळ जमणे महत्वाचे असते. लाटायचे पीठ मात्र भिजवले की त्याचे गोळे कपडावर ठेवून ते मोठ्या भांड्यात काही वेळ वाफवून घेतले जातात. मगच ते लाटायचे. ते वाफलेले पीठ नुसते खायला पण मस्त मऊ मऊ चविष्ट लागते.

...ज्वारी प्रमाणेच मक्याचे पापड पण करतात..

 

...गहू भिजत टाकून, मग चिक काढून शिजवून केलेल्या अप्रतिम चवीच्या कुर्डया काय वर्णाव्या? कोणी याचा शोध लावला असेल त्याला/तिला खरेच ग्रेट म्हणाले पाहिजे. कसा तो चिक रात्रभर एका उभ्या भांड्यात ठेवतात, सकाळी त्यावर आलेले पाणी ओतून देतात आणि चिकाच्या प्रमाणात पाणी घालून शिजवायचे. मीठ घातलेला शिजलेला गोळा तोंडात टाकायला काय मजा येते ना? ती अर्धवट वाळलेली कुर्डयी संध्याकाळी प्लॅस्टिक पेपरावरून उलटवतांना खायला पण छानच लागते.

... बाजरीच्या पण अश्याच, बाजारी भिजत टाकून, चिक काढून, शिजवून कुर्डया करतात..

 

... उपासाचे पापड पण किती प्रकारचे... नुसता साबुदाणा वाफवलेले.. कधी भगर, उकडलेला बटाटा आणि भिजवलेला साबुदाणा एकत्र करून तर कधी चकलीसारखे सोर्‍यातून काढून.. कधी बटाटा, रताळे, कच्ची केळी अर्धवट वाफवून केलेले चिप्स किंवा कीस..  

 

...मग शेवया करायला, गहू धुवून भिजत टाकायचा, सुकवून रवाळ पिठी करायची. पीठ भिजवून कधी हाताने तर कधी साच्याने करायच्या. पाटावर शेवया करतांना बघायला खूप मजा येते. एकजण छोट्या स्टूलवर बसणार, समोर तिरकी, उतरती फळी लावणार. त्या फळीवर आडव्या रेघा कोरलेल्या असणार. पिठाचा गोळा हातात घेऊन त्या फळीवर असा काही रगडणार की चरख्यातून सूट निघते तश्या शेवया हाताच्या कडेपासून बाहेर पडणार. मग एकजण त्या शेवया पकडून अलगद लांब लांब गुंडाळून वाळायला टाकणार. ताटात किंवा बांबूवर त्या वाळत घालतांना बघायला देखील खूप मजा येते. आजिबात एकमेकांवर न चिकटता त्या वाळत रहातात.

 

... वडे/सांडगे करतात ते डाळी भिजत टाकून. किती किचकट काम असते ते. आधी रात्री डाळी भिजत टाकायच्या. सकाळी त्या पाण्यातून बाहेर काढून गोणपाटावर घासायच्या मग स्वच्छ धुवून वाटायच्या. भिजलेल्या गोळ्यातून मुठीत मावेल तितका गोळा हातात घ्यायचा आणि घास टाकल्या सारखा छोटे छोटे तुकडे प्लॅस्टिकवर टाकत जायचे. आकार कसाही वेडावाकडा चालेल पण प्रत्येकाचे परिमाण साधारण सारखे असले पाहिजे. असेच अजून गहू, तांदूळ, बाजारी, मका वापरुन वडे /सांडगे बनवले जातात आणि उपासाचे साबूदाण्याचे.   

 

माझ्या प्रत्येक खानदेश वारीत मला असे बरेच प्रकार बघायला मिळायचे. आजपर्यंत मी भारताच्या इतक्या राज्यात फिरलेय पण पापड म्हटले की खानदेशच आठवते.विविध प्रकार आणि तितक्याच विविध त्याच्या बनवण्याच्या पद्धती..

 

या सगळ्या प्रकारांची ओळख करून देण्यात मला माझ्या या तीनही माऊलींचा हातभार आहे.

 

 त्यातले कुलकर्णी काका आणि अग्निहोत्री काका पुण्यात स्थायिक झालेत. आता पुण्यात आल्यावर वारंवार नाही पण मनात आले की त्यांना भेटता येते. सगळे जुने दिवस आठवतात. त्यावेळी त्यांच्या तिथे असण्याने माझे दिवस सुखकर तर गेलेच आणि या प्रकाराची माहिती मिळाली.

 

किती झटत असतात या बायका, डोक्यावर तळपते ऊन पण यांना त्याचे काहीच नसते. वर्षभरासाठी डबे भरून ठेवण्याची चढाओढ मात्र आनंदाने सुरू असते यांची...      

 

 

राजेश्वरी

२२/०४/२०१९ 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

पाचोळा - कुसुमाग्रज

कविता रसग्रहण    पाचोळा - कुसुमाग्रज आडवाटेला दूर एक माळ तरू त्यावरती एकला विशाळ आणि त्याच्या बिलगूनिया पदास जीर्ण पाचोळा पडे तो उदास उषा ये...