सारे_प्रवासी_घडीचे
पोटात जीव अंकुरतो आणि आपला आयुष्याचा प्रवास सुरू होतो. साहजिकच जन्म ते मृत्यू या प्रवासात कित्येक प्रवासी भेटतात. काही आपल्या चांगल्या सुखकर आयुष्याचे प्रवासी होतात तर काही कटू आठवणी देणारे. पण त्या कटू आठवणींमुळे तर आपण छोट्या छोट्या सुखकर घटनांनी आनंदून जातो. आयुष्याची घडी विस्कटणारे भेटले की पुन्हा ती घडी ठीकठाक करणारे पण भेटतातच...
परंतु जिथे घडी विस्कटणारा निसर्गच असेल तर तिथे काय? तिथे घडी घालायचा प्रयत्न करणारे आपले सेना जवान असतात हा प्रत्यय नेहमीच येतो... अशाच काही जवानांचं घडी घालणं बघितलं...
२६ जानेवारी २००१
गुजरात मधील जामनगर मध्ये आम्ही सरकारी घरात रहात होतो. पाच खोल्यांचे ऐसपैस घर. सकाळी साडेआठची वेळ. किशोर झेंडावंदन कार्यक्रमाला गेला होता. नुकताच थोडं थोडं बोबडं बोलायला लागलेला दोन वर्षांचा आलाप माझ्या शेजारी बसून दूरदर्शनवर सुरू असलेले लाल किल्ल्यावरचे झेंडावंदन बघत होता. आरोही मात्र सर्वात आतल्या खोलीत अजून झोपलेली होती.
मानवंदना देण्यासाठी एकेक गाड्या येताना दिसत होत्या. सोबत त्याचे समालोचन सुरू होते. दिवाणखान्यात खिडकीजवळच जुन्या पट्ट्यांच्या लोखंडी कॉटवर आम्ही दोघे आरामात टेकून बसलेलो होतो.
आणि अचानक ‘धाड धाड’ करत चाळीस पंचेचाळीस गायी खुराने धूळ उडवत जिवाच्या आकांताने पळत जात होत्या. समोरच्या झाडीत एकापाठोपाठ एक आवाज आले आणि कोल्हे कुई जोराने सुरू झाली. एका क्षणात दोन्ही आवाज वातावरण एकदम गूढ गंभीर करत असतांनाच, काय होतेय हे खिडकीतून बाहेर बघण्यासाठी मी नजर वळवली मात्र आणि........ खिडकीची तावदाने कच कच वाजू लागली. लोखंडी कॉट तर, आपण जोरात घेतलेला झोका वेगाने खाली येताना मध्येच पायाने थांबवायचा प्रयत्न करतो तेव्हा जसा डुगडुगत, धडपडत थांबायचा प्रयत्न करत असतो तशी ती कॉट डुगडुगत पण जोराने हलायला लागली. कोयनेच्या भूकंपाची दरवर्षी कराडला धक्के अनुभवणारी मी, क्षणार्धात हा भूकंप असल्याचे जाणले अन डोळ्याचे पाते लवते न लवते तोच शेजारी बसलेल्या आलापला उचलले आणि दाराबाहेर पळाले. दहा वीस सेकंदात धक्का थांबतो पण हा धक्का थांबायचे नाव घेईना.. शेजारचे अशोक कुमार बाहेर आले तोच डोळ्यांसमोर एक बाजूची इमारत कोसळतांना दिसली आणि धुळीचे लोट उठले. आजूबाजूच्या सगळ्या घरातून स्टील आणि काचेची भांडी पडतानाचे आवाज येत होते. मला काळजी आरोहीची लागली होती. तिला आणायला आत पळाले तर मागोमाग आलाप पण पळत येणार. काय करू काहीच सुचत नव्हते. इतक्यात..
“अशोक भाईसाब, आप आलापको पकडोगे तो मै आरोहीको अंदरसे लेकर आती हूं।”
“मॅडम, आप अंदर जाना। बाहर मत आना। सामने ब्लास्ट हो रहे है।”
आयुष्यात कधीही भूकंप न अनुभवलेल्या या माणसाला मी सांगत होते की हा ब्लास्ट नसून भूकंप होतोय. हा भूकंप आहे, ब्लास्ट नाही, असे दोन तीन वेळा सांगूनही त्यांचे पालुपद सुरूच होते.. “मॅडम अंदर जाओ।"
शेवटी मी त्यांच्या कडेवर आलापला ठेवण्यात यशस्वी झाले आणि घरात पळाले. हॉल- स्वयंपाकघर- ओलांडून मधल्या पॅसेज मधून आतल्या बेडरूम कडे जात असतांना कप्प्यांमधील एकेक वस्तु जमिनीवर आपटून आवाज येत होते. मला फक्त लवकरात लवकर आरोहीला बाहेर काढायचे होते.. लटपटत असलेले पाय, हलत असलेली पायाखालची जमीन आजूबाजूच्या घरातून येणारे ओरडण्याचे आवाज आणि माझी खोलीत पोहोचायची सुरू असलेली धडपड... अखेर मी आत पोहोचले, पहाते तर काय... बाईसाहेब उठून बसलेल्या आणि डोलणार्या कॉटवर झोपाळ्यात बसल्याची अनुभूति घेत मजेत हसत होत्या.. मुले खाली पडू नये म्हणून गादीखाली घट्ट खोचलेली मच्छरदाणी मोकळी व्हायचे नाव घेईना. मच्छरदाणी प्रयत्नपूर्वक बाजूला करत मी आरोहीला पुढे येण्याबद्दल सांगत होते. पण तिला ते डोलणे आवडत होते आणि मी बाहेर काढेन म्हणून ती मागे मागे सरकू लागली होती. कॉटवर जवळपास पालथी पडून मी तिला पकडायचा प्रयत्न करीत होते. अखेर तिचा एक पाय माझ्या हातात सापडला आणि मी तिला तो पाय धरून वेगाने मच्छरदाणीच्या बाहेर खेचले. पटकन तिला उचलले आणि पळतच बाहेरचा दरवाजा गाठला. दरवाजाच्या बाहेर पडले आणि जोरात धाडकन आवाज आला. आता आमच्या घराची पाण्याची टाकी सरकत सरकत पुढे येऊन गच्चीवर आडवी झाली होती आणि गच्चीला कठडे नसल्याने पाणी मिळेल त्या मार्गाने खाली येऊ लागले होते. बाहेर येऊन पहाते तर काय, समोरच्या इमारती अजूनही डोलतांना दिसत होत्या. घाबरलेला, बावरलेला आलाप अंकलच्या कडेवर शांत बसला होता. दरम्यान अशोक कुमारना माझे म्हणणे पटले होते आणि त्यांनी त्यांच्या कुटुंबाला बाहेर बोलावले होते. ही सगळी गडबड, धडधड एक मिनिटांपेक्षा जास्तवेळ सुरू होती.
८.९ ते ९.१ रिश्टर चा तो धक्का आता थांबला होता.
आम्ही ज्या घरामध्ये रहात होतो त्या घराच्या आजूबाजूला रहाणारे सगळे थलसेनेतील जवानांची कुटुंबे होती. या जवानांना कमालीच्या थंड आणि उष्ण तापमानात युद्धाची सवय असावी म्हणून सरावासाठी दोन एक महिने भारताच्या सीमेवर जाऊन प्रशिक्षण घ्यावे लागते. त्यामुळे १५ डिसेंबरपासून जवान प्रशिक्षणाला गेले होते. तेव्हापासून आमच्या आजूबाजूला सगळ्या महिला आणि मुलेच होती. सगळेच जण भेदरलेले. तास दोन तास भूकंपाच्या चर्चा होऊन घाबत घाबरत प्रत्येकजण घरात गेले. काय काय पडझड झाली त्याची पहाणी सुरू झाली. ऑफिस मध्ये असलेले जवान आणि अधिकारी प्रत्येक कुटुंबाची आस्थेने चौकशी करून धीर देत होते. इतक्या जोराचा भूकंप झाल्यानंतर जमिनीतील हालचाल कमी अधिक प्रमाणात सुरूच होती. कधी जोराची हालचाल झाली की त्यामुळे सारखेच बाहेर जावे लागत होते. पुन्हा काहीवेळाने आत घरात यायचे.
दुपारनंतर बातमी आली की सीमेवरचे सगळे जवान इकडे यायला निघालेत. त्यांच्या कुटुंबांना खूप आनंद झाला. पण हा आनंद काही काळच टिकला. कारण जवानांना घेऊन येणार्या गाड्या फक्त अर्धा तासच थांबणार होत्या. छावणीच्या एका गेट मधून आत शिरलेल्या गाड्या अर्ध्या तासात दुसर्या गेट मधून बाहेर पडून भुज जवळच्या अंजार गावात बचाव कार्यासाठी मार्गस्थ झाल्या. काय बोलणे झाले असेल त्यांचे आपल्या कुटुंबाशी त्या अर्ध्या तासात? भेदरलेल्या बायकोला, घाबरलेल्या मुलाला कसा धीर दिला असेल? कुणाच्या घराची भिंत पडली, कुणाच्या स्वयंपाक घरातील ओटा पडला तर काही दगडी घरातील मोठाले दगड खिळखिळे होऊन जमिनीवर आलेले. आमच्या इमारतीप्रमाणे काही जणांच्या पाण्याच्या टाक्या पडलेल्या. ‘आम्ही लवकरच आमचे कर्तव्य करून परत येऊ’ असे आश्वासन देताना किती काळजावर दगड ठेवावा लागला असेल तेच जाणो.
नंतरचे पंधरा दिवस तरी आम्ही सगळेच जण बाहेर झोपत होतो. चार ते सहा अंश तापमान असलेली ती कडाक्याची थंडी आणि पहाटे पडणारे दव.. रक्त गोठवून टाकेल की काय असे वाटायचे. पहिल्या तीन दिवसानंतर तर काही जवान येऊन छोट्या छोट्या राहुटया घालून गेले.
अंजार गावात बचाव कार्यासाठी गेलेले जवान मात्र पंधरा दिवसानंतरच परतले. जगलेल्यांच्या आयुष्याची जमेल तितकी घडी घालायचा सुरुवातीचा प्रयत्न करून आलेले ते जवान अंगातील सगळं अवसान गळून गेल्यासारखे दिसत होते.. जवळपास भुई सपाट झालेले ते अंजार गाव आणि जगलेल्यांच्या चेहर्यावरचे ते विदीर्ण भाव त्यांना राहून राहून आठवत होते...
राजेश्वरी
२५/०९/२०१८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा