दुवा
“हॅलो, मॅडम सरिता बोलते. माझ्याबरोबर अपर्णा पण आहे."
“मॅडम, रोहित, गणेश दोघांनी छान मार्क मिळवले."
“तुम्हाला खूप आनंद होईल म्हणून पहिला निकाल तुम्हाला सांगतोय."
जून महिन्यात दहावी बारावीचे निकाल लागले तेव्हा बेळगावच्या अपर्णा आणि सरिताचा फोन आला. अपर्णाच्या गणेशला दहावीला ९२% आणि सरिताच्या रोहितला बारावीला ८६% पडले होते. फार खुश होत्या दोघीही.
“मॅडम तुमच्यामुळे आमची मुले इतकी चांगले मार्क मिळवू शकली.” असे सारखे म्हणत होत्या.
“नाहीतर उनाडक्या करणारी आमची मुले कधी अभ्यास करतांना दिसलीच नसती.”
किती छान वाटते ना कोणाच्या चांगले होण्याचा दुवा आपण बनले तर?
मी काय केले? मुले खेळत असतांना थोडेसे त्यांच्याशी गोड बोलले. ते अभ्यास करतात का ते विचारले. ‘पुढची परीक्षा झाली की मला निकाल सांगायला या’ असे संगितले. त्यानंतर दोघेही हमखास निकाल लागला की यायचे. मग मी एकेक कॅडबरी देताना पुढच्यावेळी अजून जास्त मार्क पडले तर अजून एक मिळेल म्हणायचे. मस्त उड्या मारत जायचे ते.
अपर्णा आणि सरिता चौकीदाराच्या बायका. त्यांची माझी ओळख झाली आणि त्यांचे आयुष्यच बदलून गेले असा समज आहे दोघींचा. त्याला कारणही तसेच आहे.
आठ नऊ वर्षांपूर्वी आमची बेळगावला बदली झाली. त्यापूर्वी आपण आणि आपले घर इतकेच काय ते माझे विश्व होते. आलापच्या शिक्षणाकडे आणि आरोहीच्या तब्येतीकडे लक्ष देणे याशिवाय दुसरे कुठले उद्देश्य असूच शकत नव्हते. त्यातच सासर्यांना कॅन्सरचे निदान झाले. उपचारासाठी सासू सासर्यांना बेळगावला घेऊन आलो. आरोही बरोबरच अजून दोघांच्या आजारपणाची काळजी घेणे क्रमप्राप्त झाले. घरातले वातावरण तणावपूर्ण झाले होते. रोजच्या वेगळ्या टेस्ट आणि वेगळे दवाखाने...
एक दिवस अचानक किशोरच्या साहेबांनी ऑफिस कर्मचारी कुटुंबासाठी ‘कुटुंब कल्याण मंडळ’ (Family Welfare Association) स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडला. त्या साहेबांचे कुटुंब शिलोंगला असल्यामुळे ती जबाबदारी दूसरा वरिष्ठ म्हणून किशोरकडे सोपवली. म्हणजेच पर्यायाने माझ्याकडे. नाही म्हणायला पर्याय राहिला नव्हता.
Family Welfare Association चे काय कार्य असते याची काहीच कल्पना मला नव्हती. साहेबांच्या सांगण्यावरून, ‘कर्मचार्यांच्या घरच्या सौख्यासाठी, त्यांच्या पत्नीसाठी, मुलांसाठी विविध कार्यक्रम आयोजित करायचे. त्यांच्या काही समस्या असतील तर त्या सोडवण्यासाठी मार्ग दाखवायचा (मार्गदर्शन करायचे). महिन्यातून एकदा एकत्र भेटून चर्चा करायची.’ असे काहीसे मला करावे लागणार होते.
तीन तीन पेशंट घरात असतांना घराबाहेर पडणे मला खूप जिकिरीचे वाटत होते. पण तरीही संकटाला नेहमीच धैर्याने तोंड द्यायची सवय लागल्याने हे आव्हान स्वीकारायचे असे ठरवले. आणि अध्यक्ष या नात्याने मी पहिली महिला भेट ठरवली. त्यात सगळे स्पष्ट संगितले. पाहिल्याच भेटीला चाळीस पंचेचाळीस महिला उपस्थित राहिल्या. सगळ्यांनाच ही कल्पना नवीन होती.
थोड्याच दिवसात गणपती उत्सव साजरा होणार होता. ऑफिसच्या एका प्रशस्त हॉलमध्ये सजावट करून गणपती बसवण्याची प्रथा कित्येक वर्षांपासून सुरू होती. सकाळी संध्याकाळी पूजा आणि शेवटच्या दिवशी महापूजा आणि महाप्रसाद असायचा. मी त्यात थोडा बदल करायचे सुचवले.
दहा दिवसांपैकी एक दिवस महिला आणि मुलींसाठी रांगोळी स्पर्धा, एक दिवस मुलांसाठी चित्रकला स्पर्धा, एक दिवस महिलांचे हस्तकला प्रदर्शन असे आयोजन केले. हस्तकला प्रदर्शनांनंतर कोणाला भरतकाम, कोणाला शिलाइकाम, कोणाला शोभेच्या वस्तूंच्या तर कोणाला चित्राच्या फ्रेम करून द्यायच्या मागण्या येऊ लागल्या. घरबसल्या आपल्याला उद्योग मिळेल असे कोणाला वाटलेच नव्हते.
सगळ्या कार्यक्रमांना खूप चांगला प्रतिसाद मिळाला. प्रत्येक कार्यक्रमात किमान चाळीसजण तरी सहभागी असायचेच.
आयुष्यात पहिल्यांदाच अशाप्रकारची जबाबदारी घेऊन चांगल्याप्रकारे पूर्णत्वास नेली गेली. भरपूर ओळखी झाल्या. भरपूर कौतुक झाले, ज्याची कधीच सवय नव्हती. आता त्या कौतुकाची चटक लागल्यासारखे होऊ लागले.
मग दिवाळीत मुलांसाठी फटाके आतषबाजी आणि महिलांसाठी पाककृती स्पर्धा आयोजित केली. एक तिखट आणि एक गोड पदार्थ करायचा. नंबर काढायला मुददामच महिला परीक्षक न ठेवता ऑफिसच्या पाच ज्युनिअर इंजिनीअरना संगितले. सगळ्यांनी चवीचविने सगळे पदार्थ फस्त केले. ‘दर महिन्याला अशा स्पर्धा ठेवा म्हणजे आमची चंगळ होईल’ असे मार्मिक शेरे ऐकायला मिळाले. त्या स्पर्धेतून दोनतीन जणींना पदार्थांच्या ऑर्डर मिळू लागल्या.
२६ जानेवारीला झेंडावंदन झाल्यावर स्त्रिया आणि मुलांचे संगीत खुर्ची आणि पळण्याच्या विविध स्पर्धा सुरू केल्या.
एकदा माझी स्त्री रोग तज्ञ वाहिनी, डॉ. वर्षा देशपांडे आली तेव्हा ‘चाळीशी नंतरचे स्त्रीचे आरोग्य' या विषयावर चर्चा सत्र आयोजित केले. कामगारांच्या स्त्रियांनी खूप शारीरिक अडचणी सांगितल्या त्यावर तपासणीसाठी वाहिनीने मार्गदर्शन केले.
शेती तज्ञ मेव्हणे डॉ. रामभाऊ पाटील आले तेव्हा ‘पौष्टिक अन्न आणि पोषण' यावर त्यांना विचार मांडायला संगितले.
सर्वात जास्त मजा आली ते दुसर्या वर्षीच्या गणपतीला. पहिल्या स्पर्धांबरोबरच ‘नृत्य स्पर्धा’ आयोजित केल्या. एक महिना आधी पासून सराव सुरू केला गेला. दोन कर्मचार्यांच्या मुलांनी छोट्या मुलांना नृत्य दिग्दर्शन केले. सरावादरम्यान काही गैरप्रकार होऊ नयेत म्हणून मी स्वतः आरोही आलापला घेऊन जातीने हजार रहायचे. तीन तासाचा उत्कृष्ठ कार्यक्रम सादर झाला. कामगार पहिल्यांदाच आपल्या मुलांना स्टेजवर बघितल्यावर भाऊक होऊन गेले.
एक दिवस सकाळी सात ते संध्याकाळी सात अशी महिलांची सहल ठरवली. सगळ्यांनी आपापली मुले वडिलांना सांभाळायला लावायची म्हणजे मुलांची जबाबदारी काय असते ते कळावे. आणि केवळ महिलांना घरातील रामरगाड्यापासुन एक दिवस तरी सुटका मिळावी हा मुख्य उद्देश ठेवला. त्या बारा तासात भरपूर वेगवेगळे खेळ खेळले गेले. सगळ्यांनी मनस्वी आनंद लुटला.
मधल्या मधल्या भेटीत कोणाच्या घरगुती अडचणी विचारून त्या सोडवायचा प्रयत्न मी करायचे.
अशाप्रकारे परस्पर संवादामधून खूप चांगले लोक भेटले.
ते सगळे लोक मला मान देतात पण त्या तीन वर्षात माझे व्यक्तिमत्व बदलत गेले. माझी विचार करण्याचा दृष्टीकोन सकारात्मक होत गेला. त्यांचे काही अनुभव मला प्रगल्भ बनवत गेले. माझी ताकद मलाच ओळखता येऊ लागली.
मी कधी कधी स्वतःच स्वतःला विचारते, नाहीतर मी काय केले असते? घरातली आजारपणे बघून निराश होऊन बसले असते की अजून काही?
मी आतून बाहेरून इतकी बदलून गेले की सासर्यांना दाढीला सलून मध्ये किंवा केमोथेरपी आणि लाइट घ्यायला दवाखान्यात कुठेच न्यायला कचरले नाही. सुदैवाने सासर्यांचा कॅन्सर पूर्ण बरा झाला.
त्यावेळी साहेबांनी माझ्यावर अध्यक्षपदाची जबाबदारी टाकली. त्यामुळे मला नेहमीच्या त्याच त्या दीनक्रमातून बदल मिळाला. आणि हुरूप आला. म्हणूनच घरच्या जबाबदारया पण मी समर्थपणे सांभाळू शकले. मला अधिक अनुभवसंपन्न आणि सकारात्मक बनवण्यासाठी ही जबाबदारी एक दुवा ठरली...
राजेश्वरी
११/०८/२०१८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा