शुक्रवार, २५ सप्टेंबर, २०२०

अग्नी_तांडव

  

अग्नी_तांडव

 

     कधी कधी एखाद्या व्यक्तीवर संकटांची मालिकाच सुरू होते. काही केल्या ती मालिका संपण्याचे नावच घेत नाही. तसेच काहीसे झाले होते माझ्या एका चुलतभावाच्या, दादाच्या बाबतीत... वैर्‍यावरही अशी वेळ येऊ नये’ असे आपण म्हणतो ना, तसेच काहीसे म्हणत असत सगळे..

     आधी नोकरी आणि मग व्यवसायात चढउतार होत होत तीन मुलांची शिक्षणं, एका मुलीचे लग्न झालं. एक मुलगा आणि मुलगी इंजिनीअर होऊन पुण्यात स्थिर होऊ पहात होते... आणि एक दिवस दोघे बहिणभाऊ दुचाकीवरून कामाला जात असतांनाच सिटी बसची धडक लागली आणि मुलगा जागच्याजागी गेला. मुलीला मामुली जखमा अंगावर झाल्या पण मनावर झालेल्या जखमांना बरे व्हायला, दुष्टिसमोर लहान भावाचे मरण पाहिलेल्या तिला यातून बाहेर पडायला खूप त्रास पडत होता. वर्ष दोन वर्ष गेली आणि एक अतिशय गुणी मुलगा जावई म्हणून घरात आला.

मागचे सगळे दुखः, मनावर दगड ठेऊन थोडाकाळ बाजूला ठेऊन आनंदाने लग्नाला दादा-वाहिनी सामोरे गेले. मुलगी सासरी गेली हा आनंद होताच पण आता घरात दोघेच... मनसोक्त रडण्यात रात्रीच्या रात्री जायच्या. दिवसा आपापल्या कामात वेळ घालवायचे.

जुने लाकडी घर, त्यावर जुनेच पत्रे... मुलाने नोकरी लागल्यावर नवीन घर बांधण्यासाठी सगळी तयारी सुरू केली होती. लवकरच बांधकाम सुरू होणार होते, तितक्यात मुलाच्या आकस्मित निधनाने त्यावर पाणी फेरले गेले. मुलीच्या लग्नासाठी तात्पुरते तुळयांवर हार्डबोर्डचे छत करून घेतले होते मांडवशोभा म्हणून. घराला रंग दिला गेला. आता पावसाळ्यात पत्र्यातून खाली घरात पाणी गळायचे कमी झाले. पण पाणी त्या छतावर मुरत रहायचे.

तात्पुरते नवीन घराच्या बांधकामाच्या शुभारंभाला स्थगिती मिळाली होती. दिवस सरत होते. पावसाळ्यात मुरलेले पाणी, नंतरच्या उन्हामुळे छत कोरडे करत होतेच पण त्याचे आयुष्यही कणाकणाने कमी करत होते.

मुलीच्या लग्नात आलेल्या नवनवीन वस्तूंनी, साड्यांनी घर भरलेले होते. नवीन घर कधी बांधलेच तर एक खोली मुलाच्या नावाने ठेवायची आणि त्यात त्याच्या सगळ्या आवडीच्या वस्तु, कपडे, त्याचे बूट, टोप्या, सगळं सगळं त्याचे त्या खोलीत सजवायचे असे ठरवले होते. मुलीच्या लग्नाने डोक्यावरची एक फार मोठी जबाबदारी हलकी झाली होती. आता थोडेफार काम करून राहिलेले आयुष्य मुलांच्या आठवणीत रममाण व्हायचे असे दोघांनाही वाटायचे...

पण नियतीला दादाच्या आयुष्यात सरळ मार्ग दिसतच नव्हता.

आणि एक दिवस असा उजाडला....

 

जुने घर, स्वयंपाकघरातील छोटासा ओटा, त्यावर दोन गॅस शेगड्या मावत नाहीत म्हणून पाणी तापवायला एक शेगडी खाली जमिनीवर दाराजवळच ठेवली होती. दादाला कामाला जायची घाई होती आणि नेमका गॅस संपला.. नवीन सिलेंडर जोडला गेला. सिलेंडर जोडत असतांनाच ओट्यावर लावलेल्या कूकरच्या शिट्ट्या होत होत्या.. कदाचित त्या आवाजाने नसेल कळले किंवा घाई म्हणा... खालच्या सिलेंडरला आतल्या बाजूला जिथे रेग्युलेटर जोडला जातो तिथे असते ती रबरी रिंग नसावी बहुदा आणि ते कुकरच्या आवाजात रेग्युलेटरच्या बाजूने गॅस जोराने बाहेर येतोय हे लक्षातच आले नाही. पातेल्यात पाणी तापायला ठेवले.. दोघेही आपापल्या कामात गर्क.. एकदम रेग्युलेटर जवळच्या गॅसने पेट घेतला.. दादाच्या लक्षात आले आणि त्याने दरवाजातून सिलेंडर बाहेर काढायचा प्रयत्न केला.. दाराला जुन्याकाळचा तीन चार इंच उंचीचा चांगला दणदणीत उंबरा.. तिथेच सगळी गडबड झाली... हाताला आगीच्या झळा लागू नये म्हणून सिलेंडर तिरका करून बाहेर काढू असा प्रामाणिक विचार दादाने केला आणि त्याला थोडा कलता केला.. गॅसने भरलेला व  वरुन गळती लागलेल्या सिलेंडर मधील द्राव बाहेर उंबरयावर सांडू लागला आणि काही कळण्यापूर्वीच उंबरा, चौकट आणि दाराने  पेट घेतला... आता मात्र दादा काही करू शकत नव्हता.. आपल्या दोघांचा जीव वाचवणे महत्वाचे वाटले. दरम्यान वहिनींनी अंगणात येऊन आम्हाला हाका मारल्या... माझ्या लहान भावाने पळत येऊन दुसर्‍या दारातून कूकर सुरू असेले दुसरे सिलेंडर बाहेर काढले.... मोठा वाडा... मध्ये भले मोठे अंगण.. कळेल तसे एकेक जण जमत गेले. कोणी आगीच्या बंबाला फोन केला.. कोणी आजूबाजूच्यांना सावधान केले.. शेजारी लागूनच माझ्या मोठ्या भावाचे स्त्री रोग हॉस्पिटल.. तिथल्या पेशंटना बाहेर काढले... दवाखन्यावर त्याचे रहाते घर, तिथल्या खिडकीतून खाली पाणी ओतणे सुरू केले.... पावसाच्या पाण्याने कुजून वाळलेले हार्ड बोर्डचे छत भुरभुर जळू लागले. दहा मिनिटात पूर्ण स्वयंपाक घराने पेट घेतला... शेजारी बेडरूम आणि त्यातील कपाटात ठेवलेल्या त्या अनमोल वस्तु... डोळ्यासमोर पेट घेतांना दिसू लागल्या.. डोळ्यातले पाणी आगीच्या झळांनी तिथल्यातिथे सुकत राहिले... शक्य होईल तिथून पाणी टाकत होते पण भरलेला गॅस सिलेंडर कशालाच दाद देत नव्हता, समोर दिसेल त्याला आगीच्या भक्षस्थानी घालायचे इतकेच त्याला माहीत होते. तिरके सिलेंडरमधून द्रव बाहेर पसरत होता... आता अंगणातील तुळस, जाई, मोगरा, गुलाब, कण्हेर, जास्वंद... सगळी त्याच्या आगडोंबामध्ये सामील झाली... गेल्या साठ वर्षांपासून सगळ्यांवर छत्र धरून असलेला बकुळ त्याचाही काही भाग आगीचे भक्ष बनला.. तासाभरात पाण्याचे बंब आले.. त्यांनी पाइप जोडून पाणी सुरू करण्यापूर्वीच सिलेंडर मधील गॅसने आपले विराट रूप आवाज करून दाखवले... एक कर्णकर्कश्य आवाजाने परिसर हादरून गेला... आजूबाजूचे जळके तुकडे त्या स्फोटाबरोबर विखुरले गेले... जिथे पडले तिथला काही भाग जाळत राहिले.. हॉस्पिटलच्या दुसर्‍या आणि तिसर्‍या मजल्यावरून काच फोडून आतल्या बेडवरच्या गाद्यांनी पेट घेतला... पण तात्काळ ती आग विझवली गेली... आगीचे लोट दूर दूर पर्यन्त नजरेस पडत होते... पूर्ण गावात बातमी पसरली गेली.. बघ्यांनी गर्दी केली... दोन तासानंतर पूर्ण घराचा कोळसा केल्यावर तो अग्नी शांत झाला... नंतर कितीतरी वेळ आकाशात काळ्या धुराची वलये जातांना दिसत होती.. दुसर्‍या दिवशीही काही ठिकाणी राहिलेल्या सामानात धुमसणे सुरूच होते. नंतर पाहिले तर इतक्या भक्कम सिलेंडरचे छिन्नविछिन्न तीन तुकडे झाले होते.. दुसर्‍या दिवशी हळू हळू घरात प्रवेश केला... राख, कोळसे आणि मारलेल्या पाण्याचे काळे थारोळे तीनही खोल्यात साचले होते... काही सामान, पैसे, दागिने सुस्थितीत आहेत का म्हणून पाहिले तर स्टीलच्या कपाटातील साड्यांच्या घड्या रंग ओळखण्यापलीकडे काळ्या ठिककर पडलेल्या दिसल्या. रेशमी साड्या घडीच्या घडीत, जसे केशर बोटाच्या चिमटीत धरून चौरले जाते तश्याच त्या साड्या चुरल्या जात होत्या.. आणि शुद्ध सोन्याचे दागिने तर भाट्यात वितळवून तार किंवा कांब बनवतात तसे वितळलेले दिसले... लाडक्या मुलाच्या आठवणीचा अमूल्य ठेवा नामशेष झाला होता...

आता लवकरच अनिच्छेने का होईना पण नवीन घर बांधणे गरजेचे झाले होते... फरक इतकाच होता की त्या घरात आता जुन्या कोणत्याच आठवणींना थारा राहिला नव्हता..

दादा वहिनींना आता वयाच्या एकसष्ठाव्या वर्षी नव्याने आयुष्याची ‘सेकंड इनिंग' सुरू करायची होती..

सिलेंडरला वायसर नसलेली एक क्षुल्लक चूक दुर्लक्ष झाल्यामुळे किती महागात पडू शकते...     

 

 

राजेश्वरी

२७/०८/२०१८     

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

अनुभव_एका_पावसाचा

  अनुभव_एका_पावसाचा नुकतीच मी श्रीकांत सुनीताच्या घरी काही कारणाने जाऊन आले. गेट उघडलं तर समोर सुनीताला बघून मी म्हटलं, "अगं, किती छान ...