शुक्रवार, २५ सप्टेंबर, २०२०

एका_सुट्टीची_गोष्ट

एका_सुट्टीची_गोष्ट  

 

 

 

   काही गोष्टी, अनुभव आयुष्यभर मनावर कोरले जातात... मग ते चांगले असु देत किंवा वाईट... काही अनुभव चांगलाच धडा शिकवतात.. त्यातलीच ही ‘एका सुट्टीची गोष्ट.'

 

  बर्‍याच वर्षांपूर्वीची, म्हणजे साधारण चाळीस बेचाळीस वर्षे तरी झाली असतील, त्यावेळची ही गोष्ट...  माझे बाबा धरून पाच भावांचे असलेले एकत्र कुटुंब... नोकरी निमित्ताने तीन काका विभागले गेले... दोन भाऊ कराडला राहिले... सुट्टीला मात्र सगळे भाऊ सहकुटुंब कराडला यायचे... उन्हाळ्याच्या सुट्टीत जवळपास महिनाभर आम्ही भावंडे एकत्र असायचो. खूप मजा करायचो.. एकाच्या डोक्यातून एखादी शक्कल निघाली की सगळेजण तसेच करायचो..

 

  क्रिकेट, गलोरी, लगोरी, डब्बा ऐसपैस, लपंडाव, गाण्याच्या भेंड्या, पत्ते, समूह वाचन, एकत्र फिरणे, नदीवर पोहायला जाणे, भातुकली, कानगोष्टी... अजून कितीतरी खेळ लहान, मोठे सगळे मिळून अगदी गर्क होऊन खेळायचो... ना कधी भांडणे, ना कधी रूसवे फुगवे.. खूप मजा यायची.. वर्षभर सगळे जण जणू सुट्टी पडायची वाटच बघत असायचे...

 

  त्या वर्षी सगळ्यांनी कराडऐवजी काकांकडे कुरूंदवाडला जायचे ठरले... काका तिथल्या एका कॉलेजमध्ये प्राध्यापक होते आणि कॉलेजच्या परीक्षांमुळे त्यांना मुलांच्या सुट्टीत येता येत नव्हते... मग ठरले तर, सगळ्या मुलांनी मिळून कुरूंदवाडला जायचे.. सगळे मिळून आम्ही आठ जण भावंडं होतो..

  काकांचे घर एका शंकराच्या मंदिराच्या आवारात होते.. काळ्याभोर दगडातील ते खूपच प्राचीन मंदिर होते. गाभारयात भलेमोठे शिवलिंग होते... पुजारी सकाळ संध्याकाळ मंदिराची साफ सफाई करून पूजा करून गेले की खूपच प्रसन्न वाटायचे. काळ्याभोर पिंडीवर गोलाकार वाहिलेली पांढरी शेवंतीची फुले पिंडीला अजूनच खुलवायची.. मंदिराच्या आवारातच बाजूने चारपाच दुमजली घरे होती.. त्यातच एका घरात काका राहायचे.. तिथे गेल्यावर एक सवय चांगली लागली होती ती म्हणजे सकाळी आंघोळ झाली की मंदिरात जावून पाया पडून यायचे.. कधी कधी तिथेच मंदिराच्या थंडगार दगडी पायर्‍यांवरच आम्ही भावंडं गप्पा मारत बसायचो..

 

  जवळच नदीवरचा छोटासा पूल होता त्यावर गळ टाकून मासे पकडणारे लोक बसलेले असायचे.. आम्हाला असे मासे पकडणे इतक्या जवळून पहायला मजा वाटायची. दोन तीन दिवस रोज तिथे गेल्यावर त्या काकांशी ओळख झाली.. त्यांनी एक त्यांच्याकडचा गळ आणून दिला... आमचे बंधूराज मग उत्साहातच काकू कडून कणीक घेऊन ती गळाला लावून बसले. अचानक ओढ बसली.. गळाला मासा लागला. पुर्णपणे शाकाहारी आम्ही काय करावे कळेना.. पण त्या गळाला लागलेल्या माश्याला सोडवत पण नव्हते.. एका डब्यात पाणी भरून त्यात तो मासा घरी आणला. घरच्या मोठ्या पातेल्यात पाणी भरून त्यात तो हातभर लांबीचा मासा सोडला आणि त्याचे पातेल्यात गुरगूरू फिरणे आनंदात बघत राहिलो. तासभर गेला असेल. त्यात तो मासा कसा पकडला, गळ कसा टाकला, मासा गळातून कोणी काढला? सगळे वर्णन आम्ही रंगवून रंगवून काकुला सांगत होतो.  अचानक त्या माश्याने पातेल्याबाहेर उडी मारली. क्षणभर कोणाला काहीच कळले नाही पण त्याची ती तडफड आम्हाला बघवत नव्हती. एका भावाने मग धैर्याने त्या माश्याला उचलले आणि पुन्हा पाण्यात सोडले. आता आम्हा सगळ्यांनाच, त्या माश्याला आपण उगाचच कैद केलेय, असे वाटू लागले आणि अखेरीस त्याला पुन्हा डब्यातून नेऊन नदीत सोडून आलो. एका मुक्या प्राण्याचा जीव वाचवल्याचे समाधान वाटले.. आता तो जीवघेणा खेळ खेळणे मनाला पटणारा नव्हता.. आता काय नवीन खेळ खेळायचा? घरात असलेली सगळी पुस्तके वाचून पूर्ण झाली होती.

  आता आठवत नाही, पण एकाच्या डोक्यात एक अनोखा खेळ उगम पावला.. गप्पा मारत शिव मंदिराच्या दारात बसल्यावर आत पिंडीवर ठेवलेले पाच दहा पैशाची नाणी खुणावत होती. लहान लहान म्हणून घरातून कोणी हातात पैसे देत नसत. मग समोर आयते पडलेले पैसे दिसत होते. उचलावीत की नाही? घरचे संस्कार हात मागे खेचत होते पण अडनिडे वय स्वस्थ बसू देत नव्हते. अखेर एकाने एक नाणे उचललेच. मग नमस्कार करायला आत जायचे आणि वाकून हळूच नाणे उचलायचे.. आता काका काकूंना कळू न देता ते पैसे कुठे लपवायचे ते कळेना. काकुला स्टोव्ह पेटवतांना काडेपेटीचा वापर करतांना पाहिले होते. मग एकाने सुचवले रिकाम्या काडेपेटीत आपापले पैसे ठेवायचे आणि काडेपेटी घरामागच्या शेतातील एका आंब्याच्या झाडाच्या बुंध्याजवळ पुरून ठेवायची. ओळख म्हणून त्यावर एखादा दगड किंवा काडी उभी करून ठेवायची. रोज मिळालेली  पाच दहा पैश्यांची नाणी काडेपेटीत भरून मगच घरात यायचे. अखेर एक दिवस काडेपेटी भरून गेली. पैसे एक रुपयाच्यावर जमा झाले होते. आता याचे काय करायचे? इतके पैसे घरात कुठून आले विचारले तर? ‘बाहेरच कुठेतरी खर्च करून टाकू या’ असे ठरले...

 

 फिरता फिरता एक काकडी विक्रेता गाडा भरून काकडी विकत फिरतांना दिसला. थंडगार काकड्या, सालं काढून चार भाग करून मध्ये तिखट मीठ टाकून देताना त्याला पाहिले आणि तोंडाला पाणी सुटले.. तडक त्याच्याकडे गेलो.. हिशोबाप्रमाणे जमलेल्या पैश्यांतून प्रत्येकी एक काकडी येत नव्हती. अखेर थोडीशी घासघिस करून, ‘लहान मुलांसाठी इतके तर करू शकता ना’ असे बोलून,  त्याला पटवले आणि प्रत्येकी एक काकडी देण्यासाठी तयार केले. हे एक समाधान की आपल्याला किफायतीचा सौदा करता आला..

  सगळ्यांना मिळाल्याशिवाय खायला सुरुवात करायची नाही, ही शिकवण असल्याने आधी कोणीच खाल्ले नाही. सगळ्यांच्या हातात काकड्या देवून गाडीवाला पसार झाला.. शेताजवळच एका झाडाखाली गड जिंकल्याच्या आविर्भावात सगळेजण गोल करून बसलो. आता पैसे संपले होते. चोरी केल्याची  अपराधी भावना मनात एका कोपर्‍यात दडवून टाकली.

डाव्या हातातल्या काकडीचा एक तुकडा उजव्या हातात घेतला आणि तोंडात घालून त्याचा लचका तोडला...

  थूss... थूss.. थूss.. एका पाठोपाठ एक सगळ्यांच्या तोंडातून काकड्या बसल्या जागीच मागे मातीत थुंकायला सुरुवात झाली.. आश्चर्य म्हणजे सगळ्या काकड्या कडू निघाल्या... एकही काकडी आमच्या पोटात जाऊ शकली नव्हती.

  देवाला नारळ वाढवला आणि तो खराब निघाला की देवाला पावला म्हणतात ना तश्या आमच्या सगळ्या काकड्या देवाला पावल्या...

आयुष्याभरासाठी हा अनुभव एक शिकवण देऊन गेला...

 

असा हा सुट्टीचा किस्सा, सगळे जमले की हमखास बाहेर निघतोच आणि खो खो हसून सगळ्यांची करमणूक होते.       

 

राजेश्वरी

२६/०३/२०१९ 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

अनुभव_एका_पावसाचा

  अनुभव_एका_पावसाचा नुकतीच मी श्रीकांत सुनीताच्या घरी काही कारणाने जाऊन आले. गेट उघडलं तर समोर सुनीताला बघून मी म्हटलं, "अगं, किती छान ...