निर्जीव_कागदाचा_तुकडा
म्हंटले एक कागदाचा निर्जीव तुकडा पण असतो कुणाच्या अस्तित्वाचा दाखला... कुणाच्या पुसलेल्या आयुष्याचा पुरावा.. कुणाच्या उपजीविकेचे साधन.. कुणाच्या व्यवसायाचा वर्तमान.. कुणाच्या यशाची गुरुकिल्ली तर कुणाच्या अपयाशाचे खापर.. एखाद्याच्या कार्याचा सन्मान... बहुतेकवेळा तो गेट पास असतो पुढील पायरी चढण्याचा..
प्रत्येकाकडे असे बरेच दाखले असतात.. दाखल्यांशिवाय पुढचे प्रवेशद्वार उघडतच नाही. कधीकधी हे दाखले मिळवायला मात्र फार कष्ट पडतात.. की कारण नसतांना पडवतात? दाखला देणार्याला त्याचा उपयोग नसतो पण घेणारा त्याशिवाय पुढेच जावू शकत नाही हे माहीत असल्याने मुद्दाम त्रास दिला जातो... हेलपाटे घालायला लावले जातात आणि शेवटी त्या दाखल्याची किंमत वाढवली जाते..
असेच काहीसे झाले होते काही वर्षांपूर्वी माझ्या बाबतीत.. जामनगर, गुजरात मधून आमची बदली पुण्याला झाली होती.. आरोहीला (वय वर्षे सहा) शाळेत प्रवेश पाहिजे होता. तिच्यातल्या शारीरिक मानसिक कमजोरीचा दाखला जामनगर सरकारी दवाखान्यातून एका फेरीत सहजी मिळाला होता.. प्रश्न पुण्यातील शाळेत प्रवेश मिळण्याचा होता. माहीत होतील त्या शाळेत गेलो.. पण प्रत्येक शाळेत पुणे ससून हॉस्पिटलचाच वेगळा दाखला पाहिजे होता..
दाखल्याच्या चौकशीसाठी ससून मधील क्लिनिकल सायकॉलॉजी प्रभागात गेलो.. माहिती घेता कळाले, ठराविक दिवशी सकाळी लवकर येऊन केस पेपर काढायचा मग नंबर येईल तेव्हा मुलीची मानसशास्त्रीय चाचणी घेतली जाईल. त्या दिवशी पेपर काढला की तुमचा नंबर येण्याची वाट पहात बाहेर बसा.. सकाळी नऊ ते दुपारी दोन पर्यन्त थांबून आमची मात्र अतिशय वाट लागली होती.. नंतर आधीच कंटाळलेली आरोही, त्यात त्यांचे अति जीर्ण झालेले जुने काळेपांढरे चित्रांचे पुस्तक ज्यात चित्र सरळ दिसत पण नव्हती, असे ते पुस्तक तिची चाचणी घ्यायला वापरले. कशाला ती उत्तरे देईल हो? त्यातले तर आम्हालाही नीटसे काही कळत नव्हते.. तिचा बुद्ध्यांक काही त्या शिकाऊ मुलींना काढता आला नाही.. मग काय दाखला देणार? त्यांनी एकेक फेर्या वाढवणे सुरू केले. प्रत्येकवेळी गेले की कधी चाइल्ड स्पेशालिस्ट, कधी नाक-कान-घसा तज्ञ, कधी हाडांचे तर कधी डोळ्यांचे डॉक्टर, शेवटी मानसोपचार तज्ञ... असे करता करता आमची ससून हॉस्पिटल मधील सगळी डिपार्टमेंट फिरून झाली. प्रत्येकवेळी केस पेपर आणि नंबर येण्याची वाट पहा. मग एका डॉक्टरने पेशंट मध्ये काही प्रॉब्लेम नाही असे लिहून दिले तर एकाने पेशंट तपासण्यासाठी सहकार्य करीत नाही असे लिहून दिले.. तब्बल तीन महीने फेर्या घातल्यावर शेवटी ससून हॉस्पिटलच्या प्रमुख डॉक्टरच्या दालनात मी आरोहीला घेऊन प्रवेश केला.. दोन चार प्रश्न विचारले आणि एक शेवटचा दाखला हाती सोपवला..
एक खूप मोठे टेंशन संपले होते. आता कोणत्याना कोणत्या शाळेत तिला प्रवेश मिळणार होता असा माझा गैरसमज झाला.. एक तर या ससून च्या वार्या करण्यात तीन महीने (जून ते सप्टेंबर) उलटून गेले होते.
आता इतकी कारणे कळाली,
एक तर शाळेत प्रवेश जून मध्ये होतात,
दुसरे आमची सध्या पट संख्या जास्तच आहे. ज्यावेळी आमची काही मुले अठरा वर्षे पूर्ण होऊन शाळेतून बाहेर पडतील त्यावेळी आम्ही तिला प्रवेश देऊ..
तिसरे आणि मुख्य कारण म्हणजे ससून च्या डॉक्टरनी “मतिमंद की सेरेब्रल पालसी” ‘‘?’’ असे प्रश्नचिन्ह दाखल्यावर लिहिले होते. मतीमंदांची शाळा म्हणायची ही CP आहे. CP शाळेत जा. आणि CP शाळेत गेले की, ‘इथे प्रश्नचिन्ह आहे म्हणून आम्ही आमच्या शाळेत नाही घेऊ शकत.'
समोर मूल दिसतेय त्याला घडवायला तुमच्याकडे शिक्षक आहेत पण तुम्हाला त्याला प्रवेश द्यायचा नाही..
जितका आनंद गुजरात सोडून पुन्हा पुण्यात परतल्यावर झाला होता त्यापेक्षा कैक पटीने त्यावर पाणी फेरले गेले होते. काही दिवसांनी कळाले की, ‘अरे इतका त्रास घेण्यापेक्षा हजार रुपये दिले असतेस तर तुला घर बसल्या ‘पाहिजे तो, पाहिजे तसा लिहिलेला' दाखला आणून दिला असता की.' असे उत्तर एकाने दिले. हे शब्द आमच्यासाठी पुर्णपणे मती कुंठित करणारे असे होते.
शाळा शोधता शोधता असेच तीन चार महीने गेले. आणि आमची बदली विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश मध्ये आली.. तिकडे जाऊन स्थिरस्थावर होईपर्यंत फेब्रुवारी महिना उजाडला. आता मागच्या अनुभवाने तिच्या प्रवेशाची तयारी लगेच सुरू करावी असे वाटले.
विशेष मुलांसाठी असलेल्या ‘संकल्प' शाळेत पोहोचलो.. मुख्याध्यापिकेने लगेचच आत बोलावले. बदलीचा कागद दाखवला.. ‘आता कोणत्या सरकारी हॉस्पिटलचे दाखले आणायचे’ विचारताच... ‘मुलगी माझ्या समोर आहे. तीला विशेष संगोपनाची, शिक्षकाची गरज आहे हे दिसतेय. मला कुठल्याच दाखल्याची गरज नाही. हा फॉर्म भरून द्या, तुमचा पत्ता ज्या भागातला आहे त्या भागातील मुख्य रस्त्यावर -- वाजता आमची बस येईल. त्यात तिला उद्यापासून बसवून द्या. आणि तिची आता काहीच काळजी करू नका.’ हे मुख्याध्यापिकेचे शब्द ऐकले आणि आपल्याच प्रदेशातील त्रास आठवून तिथेच माझे डोळे भरून आले. किती हा विरोधाभास..
एक निर्जीव कागद म्हंटले तर किती किमती आणि म्हंटले तर गरजेचा
पण नसतो...
(तळटीप: ही सत्य घटना अठरा वर्षांपूर्वी घडलेली आहे. आता यात काही बदल झाला असेल तर मला माहीत नाही. पण बदल झाला पाहिजे असे कळकळीने वाटते.)
राजेश्वरी
१२/०६/२०१९
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा