शुक्रवार, २५ सप्टेंबर, २०२०

स्पर्श

  स्पर्श  

 


     मे महिन्यातली टळटळीत दुपार होती. ऊन मी म्हणून अंगावर येत होतं. हवेतलं बाष्प ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त होतं त्यामुळे ओल्या अंगाची लाही लाही होत होती. घरात बसून बसून मुलं कंटाळली होती. विशाखापट्टणम मधील पहिलाच उन्हाळा नकोसा होत होता. रेल्वेच्या डब्याप्रमाणे चार खोल्यांचे, वरच्या मजल्यावरचे घर उन्हानं तापून जायचं..

खाली घरमालक, म्हातारे दादा-दादी आणि त्यांच्या मुलाचं कुटुंब रहायचे. दादाजींना इंग्लिश बोलता यायचे. पण बाकी कोणाला ना हिन्दी ना इंग्लिश..

वेळ कसा घालवायचा कळत नव्हते. मुलांना शाळेला सुट्ट्या लागलेल्या. दिवस मावळायला लागला तसे कुठेतरी बाहेर जाऊ असे वाटू लागले. मुले लहान त्यामुळे बाहेर म्हणजे बागेत जाऊ असं ठरलं....

‘शिवाजी पार्क’ घरापासून दहा बारा किलोमीटर अंतरावर होते. जवळच्या बागा बघून झाल्या म्हणून शिवाजी पार्कला जायचे ठरले.

     स्कूटरवर आम्ही दोघं आणि मध्ये दोन मुलं स्वार होऊन निघालो. निघतांना घरमालकांनी बघितले. पण ‘कुठे जातो? काय करतो? कधी येणार?’ हे सगळं सांगायची काय गरज? ते थोडेच आपले घरचे आहेत? आम्ही कुठेही जाऊ.. कधीही येऊ.. ते तर परप्रांतीय, त्यांना कशाला सांगायचं?  या विचाराने निघालो.

शोधत, विचारत एकदाशी समोर मोठ्या अक्षरात लिहिलेले “शिवाजी पार्क" दिसले. कमानीतून बघितले तर प्रचंड मोठा हिरवागार परिसर दिसत होता. उन्हाच्या तडाख्याने हैराण झालेलो आम्ही ती हिरवीगार मैदानं आणि त्यावर बागडणारी मुलं बघून आनंदलो. स्कूटर कडेला लावून बागेत प्रवेश करायला लागलो मात्र..  आणि हवा सुरू झाली. ती गरम हवा त्यावेळी नकोशी वाटत होती पण बागेत जाण्याच्या नादात त्याकडे दुर्लक्ष केले. हळूहळू हवेचा जोर वाढू लागला. हिरवळीवर पोहोचण्यापूर्वीच वरुन टपोरे थेंब पडायला सुरुवात झाली. जोराच्या हवेमुळे रुक्ष झालेली धूळ हवेत मिसळून समोरचे दिसणे कमी होत चालले होते.

कडेवरच्या मुलांना त्या लुसलुशीत थंडगार गवताचा स्पर्श होण्यापूर्वीच परतणे योग्य आहे असे वाटले. दूर दूर पर्यन्त पसरलेल्या बागेत कुठेच आडोसा दिसत नव्हता. असता तरी बागेतली गर्दी पाहता त्याचा उपयोग होणार नव्हता. सगळ्यांबरोबर आम्हीही परतीची वाट धरली. स्कूटरपर्यंत जात असतांनाच थेंबांनी जोर धरला. धावतपळत स्कूटरवर बसलो आणि निराशेने परत फिरलो. रस्ता ओलांडून पुढे आलो आणि जाणवले कि आता कुठेतरी थांबले पाहिजे. जवळच एक बस थांबा दिसला आणि आम्ही तिथे शिरलो. आधीच तिथे बरेचजण उभे होते. पण आमच्या कडेवरच्या मुलांना पाहून प्रामाणिकपणे सगळ्यांनी आम्हाला मधे जागा करून दिली.

विजांचा कडकडाट वाढला होता.. आभाळ फाटल्यासारखा पाऊस पडायला लागला होता.. स्वतःचा आवाजही ऐकू येत नव्हता..

ढगफुटी झाल्याप्रमाणे पाऊस तासभर तरी कोसळत होता. वादळी पावसामुळे सगळीकडे अंधार झाला होता. रस्त्यावर फुटभर किंवा त्यापेक्षा जास्त पाणी वहात होतं. त्यात सगळ्याप्रकारचा कचरा वाहताना दिसत होता. तासाभराने पावसाचे हे तांडव थांबलं पण वाहतं पाणी थांबायचे नाव घेत नव्हतं.. त्यामुळे तोपर्यंत आम्हाला थांबावे लागले. संध्याकाळी पाच वाजता घरातून निघालेले आम्ही रात्रीचे आठ वाजत आले होते. पाणी ओसरून घरी पोचायला नऊ वाजून गेले. चोघंही बर्‍यापैकी भिजलेलो. स्कूटरवरून येतांना गार वारं लागलेलं. थोडंसं कुडकुडतच घराकडे आलो. स्कूटरचा लाइट बंद झाला आणि अंधारात मालकांच्या घरातील मेणबत्ती चमकली. मेणबत्तीच्या उजेडात चार डोळे घराच्या पायर्‍यांवर चमकले. आम्हाला पाहून हायसे वाटून दोघंही उभे राहिले. दचकून मी बघितलं तर पंच्यांशी वर्षाचे दादाजी आणि ऐंशी वर्षाच्या दादीमा आमच्या समोर आले.

दादीमांनी कडेवरच्या मुलांच्या डोक्यावरुन, पाठीवरून हात फिरवला. तेलगू भाषेत विचारले...

 “ठीक आहात ना तुम्ही? मुलं भिजली तर नाहीत ना?

काळजी वाटली...

इतक्या लहान मुलांना घेऊन गेलात... कुठे अडकलात...

बूथवरुन एक फोन तरी करायचा ना ”.. (हो, त्यावेळी मोबाइल नव्हते ना.)

डोळ्यातले पाणी आणि घशातला आवंढा, आवाज फुटू देत नव्हता..

नुसतीच मान हलवत सगळं काही ठीक आहे सांगितले..

त्यावेळचा तो दादीमांचा स्पर्श अजूनही पावसाचा जोर वाढला की आठवतो...

 आपलेपणाचा... आधाराचा... प्रेमानं ओथंबलेला...

 

 

राजेश्वरी

२२/०८/२०१८ 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

अनुभव_एका_पावसाचा

  अनुभव_एका_पावसाचा नुकतीच मी श्रीकांत सुनीताच्या घरी काही कारणाने जाऊन आले. गेट उघडलं तर समोर सुनीताला बघून मी म्हटलं, "अगं, किती छान ...