शुक्रवार, २५ सप्टेंबर, २०२०

चिंगी

 


चिंगी 



नेहमीप्रमाणेच आजही पक्षांच्या किलबिलाटाने जाग आली. पेपर घेण्यासाठी दरवाजा उघडला आणि आहाहा !! वाऱ्याची एक थंडगार झुळूक अंगाला चाटून गेली. काय प्रसन्न वाटले म्हणून सांगू? चैत्रातल्या या थंडगार झुळूकेला .सी./कुलर कशाकशाची सर नाही येत. एका हातात पेपर, एका हातात चहाचा कप घेवून बाल्कनीत बसणे, थंडगार वाऱ्याबरोबर दीर्घ श्वास घेत चहाच्या एकेक घोटाचा आस्वाद घेत असताना समोरच्या नुकत्याच पालवी फुटलेल्या चाफा, लिंबाच्या पानांचा मंदसा सुगंध हवेत दरवळत असतो. छोटे छोटे पक्षी ताजेतवाने होवून इकडून तिकडे उडत असतात. माझी सर्वात आवडती वेळ ही ! आजही तसेच सुरु होते. आणि अचानक सातभाई (Babbler) पक्षांचा कलकलाट सुरु झाला. सुरुवातीला एक, मग दोन असे करत करत एकदम पंचवीस ते तीस पक्षी गोळा झाले की. यांचे एक असते, काही धोक्याची सूचना द्यायची असेल तर यांची एकी वाखाणण्याजोगी असते. रस्त्यावरून मांजर जरी चालत असले की यांचा कलकलाट सुरु. आजही मला तसेच वाटले म्हणून कुठे मांजर दिसते का म्हणून मी एक नजर फिरवली तर मांजर कुठे दिसलं नाही पण अचानक कोपऱ्यात साठलेल्या पाचोळ्यातून एक मोठा साप बाहेर पडला आणि शांतपणे आपल्या वाटेने चालता झाला. सकाळचे कोवळे ऊन त्याची चमक अजूनच उठावदार करत होते. तो शांतपणे जात असताना अचानक चिंगीची आठवण आली. काय केले असते आत्ता इथे चिंगी असती तर? असेच जावू दिले असते का त्याला? भुंकून भुंकून नुसता कल्ला केला असता.  

“चिंगी” म्हणजे आमची बेळगावची कुत्री. अगदी एक ते दोन महिन्यांची असताना कोणीतरी रस्त्यावर सोडलेली. बरेच दिवस उपाशी असल्यामुळे हाडं वर आलेली. पावसाचे पाणी वाहून जाईल म्हणून काढलेल्या नाल्यात लपून बसली होती. बहुतेक याआधी कुठेतरी मार खाल्ला असेल म्हणून आम्हाला बघून लांब पळायला लागली. तिला बघून आलापचे प्राणीप्रेम लगेच उफाळून आले. घरातून दोन तीन बिस्किटं आणून तिला द्यायला गेला तर ती अजूनच लांब पळायला लागली. नाजूक इवलेसे पिल्लू पाहून “इतकुशी चिंगी आहे ग, म्हणून त्याला मी चिंगी म्हणणार असे लगेच आलापने सांगून टाकले. मग एका छोट्या ताटलीत बिस्किटं ठेवून आम्ही आत गेलो. तशी पटकन येवून तिने ती गट्टम केली. एकाच दिवसात तिच्या लक्षात आले कि या जागेत आपण सुरक्षित आहोत. मग छान जवळ येन प्रेम करून घ्यायला लागली. तिला घरात आणले तर आरोही घाबरेल आणि तिच्या केसांनी इन्फेक्शन ची भीती. त्यामुळे तिला घराबाहेर पण व्हरांड्यात ठेवायचे असेल तरच मी खायला घालेन असे सांगितले. ते आलापने लगेचच मान्य केले. आता त्याला क्रिकेट बरोबरच चिंगीबरोबर खेळणे आवडायला लागले. तिला रात्रीचा बिछाना तयार करून दिला तर सुरवातीला तिला मजाच वाटली. तो तोंडात धरून सगळीकडे फिरायला लागली. मग आलाप तिला ओरडून सांगायचा. ‘चिंगी हे विस्कटायचे नाही हं. हे तुला असं झोपायला घातलं आहे. कळले का तुला?” असे म्हणून त्याने स्वतः तिला त्यावर झोपून दाखवले. इतकी मजा वाटली मला त्यावेळी. किती निरागस असतात न लहान मुलं. पण त्यानंतर चिंगी मात्र दिवसरात्र त्या बिछान्यावरच बसायची. स्वतःला एकदम स्वच्छ ठेवायची. खूपच गुणी होती. जेवायला रोज दूध आणि पोळी खायची. मग हळूहळू तिची तब्येत सुधारू लागली. रात्री मात्र कधी कधी खूप ओरडत राहायची. कित्येकदा ‘चिंगी, झोप आता’ असे ओरडून सांगावे लागायचे.. खूप दिवस आम्हाला कळतच  नव्हते कि दिवसा शांत असलेली रात्री इतकी का ओरडते ते.... 

मात्र कोणी अनोळखी व्यक्ती आली कि ओरडून ओरडून हैराण करायची.  मग तिला त्यांचे नाव सांगितले कि मग गप्प व्हायची.

सासूबाई, सासरे बाहेर फेऱ्या मारायला लागले कि ही एखाद्या बॉडीगार्ड प्रमाणे त्यांच्या शेजारून चालायची. मधेच तिला हाक मारली तरी याची नाही. सगळ्यांनाच तिचे खूप कौतुक वाटायचे. आलाप तर तिला सोडून कोणतीच गोष्ट खायचा नाही. प्रत्येक गोष्टीची पहिली चव तिला द्यायचा.

कालांतराने चिंगीचे पोट आणि भूक दोन्हीही वाढलेले जाणवले. आणि आमचा अंदाज खरा ठरला. तिला एकदम पाच पिल्ले झाली. मग त्यांना उचलून जवळ घ्यायचा छंदच लागला आम्हाला. इटुकली पिटुकली ती पिल्ले किती गोड दिसायची. चिंगी सगळ्यांना एकदम छान साफ करायची. आता घराच्या मागच्या व्हरांड्यात त्यांची सोय केली होती. आता त्यांच्यासाठी एक मोठा थाळा ठेवून त्यात दूध घालायचे. पाचही जण मिटक्या मारत दूध पिताना बघायला काय मजा यायची. त्यातले एक पिल्लू कमी दूध प्यायचे कि आलाप लगेच त्याला उचलून पुन्हा दुधाजवळ न्यायचा. बहुतेक वेळा संध्याकाळी आमचा मस्त विरंगुळा होता हा. कितीही कंटाळा आला कि त्यांच्याबरोबर घालवलेले ते काही क्षण मनाला उल्हसित करून जायचे.

एक दिवस संध्याकाळी अचानक घराच्या मागच्या दारात चिंगीच्या ओरडण्याचा आवाज ऐकायला आला. संध्याकाळी गेटमध्ये कोणी आले कि ओरडायची पण मागे क्वचितच. आलापला मी म्हणाले “चल चिंगी का ओरडतीय ते बघू या.”

मागच्या बाजूला गेलो तर आधी तिची पिल्ले कुठेच दिसत नव्हती. इकडे तिकडे बघितले तर एका कोपऱ्यात घाबरून बसलेली दिसली. आता ती पिल्ले आम्हाला थोडी थोडी ओळखायला लागली होती. आम्ही दिसलो कि लगेच जवळ यायची. पण त्यादिवशी खूपच बिथरलेली दिसली. पहिली शंका, जवळपास दुसरा कुठला कुत्रा आलाय का? तसे पण काही दिसेना. चिंगी मात्र मागच्या कोरड्या नाल्यात बघून ओरडत होती. तिथे जाऊन बघितले आणि आमच्या काळजाचा ठोकाच चुकला. एक बऱ्यापैकी जाड साप वेटोळे करून बसला होता. पिल्लांना खाण्यासाठीच आला होता तो. आणि चिंगी त्याला ओरडून ओरडून हाकलायचा प्रयत्न करीत होती. संधीप्रकाशात त्याचे डोळे लकलकत होते. आकारावरून तो मनगटाइतका जाड होता. पिवळसर तपकिरी रंगावर गडद तपकिरी रंगाची करवतीच्या पात्याप्रमाणे नागमोडी नक्षी होती.

“अरे, हे तर अजगराचे पिल्लू दिसतेय.”

“नक्कीच पिल्लांना खायला आलेय.”

“फोटो काढूया का?”

“थांब, आधी बाबांना बोलाव. कमांडोंना बोलवावे लागेल.”

किशोर बाहेर येईपर्यंत मग आम्ही तिथेच उभे राहून मोबाईलमध्ये फोटो काढत बसलो.

(बेळगावला कमांडो ट्रेनिंग सेंटर मध्ये कमांडोंना साप पकडायचे कसे याचे प्रशिक्षण दिले जाते. त्यांना बोलावले कि ते साप पकडून घेवून जातात. कधी युद्धात किंवा एखाद्या कामगिरीवर असताना जंगलात राहायची वेळ आली तर लढता लढता जीव गेला तर चालेल पण उपाशी राहून जीव जाता कामा नये म्हणून तिथे उपलब्ध असतील ते प्राणी पकडणे, लाकडाच्या काठीने लाकडावर घासून आग तयार करणे आणि त्यावर शेकोटी करून तो प्राणी भाजून त्यावर आपली उपजीविका करणे. याचे पण प्रशिक्षण हा त्यांच्या ट्रेनिंग चाच एक भाग असतो. त्याप्रमाणे त्यांना एकदिवस खूप शारीरिक श्रम करायला लावतात आणि मग भूक लागेल तेंव्हा समोर दिसेल ते अन्न अशी चूल पेटवून, शिजवून खायला लावायचे. अंगावर काटा उभा राहतो न असे काही ऐकल्यावर? पण त्यांच्या खडतर प्रशिक्षणाचा हा एक भाग असतो).

पण दरम्यान या सगळ्या गडबडीत आमच्या हालचालींमुळे तो साप तिथून जवळच असलेल्या जमिनीखालच्या एका बिळात शिरला. त्यानंतर किशोरने बोलावलेले कमांडो आले. त्यामुळे कमांडोना आम्ही फोटो दाखवले. आम्ही त्याला अजगराचे पिल्लू सम्बोधल्यावर त्यांनी सांगितलेले ऐकून मला तर धडकीच भरली. ‘बेळगावमध्ये अजगर नाहीतच. तो एक अति विषारी सापांच्या प्रकारामधला घोणस (Viper) साप होता. तो वेटोळे करून बसतो तेंव्हा तो क्षणार्धात दोन ते अडीच फुट वर झेप घेवून चावा घेवू शकतो. तुम्ही त्याच्या इतक्या जवळ जाणे धोक्याचे होते,’ असे त्यांनी सांगितले. आणि आम्ही त्याच्या जवळ जावून फोटो काढत बसलो होतो. पण आम्ही जास्त वाकायला गेलो कि चिंगी आमच्या मध्ये यायची. त्यावेळी ती असे का करत होती ते नंतर कळले आम्हाला. खाल्ल्या अन्नाला जागणे म्हणतात ते हेच का?

‘परत साप आला कि सांगा पण आता त्याच्या जवळ जावू नका’ असे बजावण्यात आले. आणि ते निघून गेले. आमचे लक्ष आता पूर्णपणे चिंगीच्या भुंकण्याकडे होते. होता होता दोन तास गेले आणि पुन्हा एकदा चिंगी ओरडायला लागली. मागच्यावेळी प्रमाणेच अगदी चवताळून ओरडत होती ती. आता आम्ही सावधपणे बाहेर जावून बघितले. खात्री पटताच कमांडोंना फोन केला. यावेळी ते लगेच पोहोचले. पुढे ‘V’ आकार असलेली काठी घेवूनच आले होते ते. शांतपणे त्याच्या तोंडाच्या मागे काठी दाबायचा प्रयत्न केला. भुकेलेला तो नाराज होवून फुत्कारू लागला. पण त्यांनी लगेचच त्याला काठीखाली दबोचून तोंड दाबून पकडले आणि पोत्यात घालून नेले. जाताना मात्र एक गोष्ट सांगायला विसरले नाहीत. बेळगावच्या मिलिटरी कॅम्पस मध्ये भारतातील सर्वात विषारी समजल्या जाणाऱ्या सापाच्या तीन जाती सापडतात, घोणस(Viper), नाग(Cobra) आणि मण्यार(Crait) साप. त्यामुळे सांभाळून राहा.

आयुष्यात पहिल्यांदाच असा थरारक अनुभव आला होता. पण आता चिंगीची हि विशिष्ट भाषा कळू लागली होती. मग आम्हाला तिच्या आवाजावरून ती नेमके काय सांगतेय ते समजत होते. दहा वर्षाच्या आलापने मात्र तेंव्हापासून चंगच बांधला कि सापाच्या प्रजातीची इत्यंभूत माहिती गोळा करायची. दूरदर्शन वरील प्राण्यांचे चानेल्स तसेच इंटरनेट आणि पुस्तके जिथून जिथून माहिती गोळा करता येईल तिथून ती गोळा करू लागला. त्याच्या या आवडीचे आम्हाला पण आश्चर्य वाटू लागले. पण काहीतरी वेगळे आणि उपयोगी म्हणून आम्ही पण त्याला त्या कामात मदत करू लागलो. आता त्याचा आवडता प्राणी साप झाला. कुत्रा, मांजर आणि आता साप. तसे सगळेच प्राणी अजूनही त्याला प्रिय आहेत.

अशातच एकदा किशोरने बातमी आणली कि कमांडोना ट्रेनिंग देण्यासाठी  चेन्नईहून आलेले एक कर्नल आणि सर्पमित्र ऑफिसरच्या कुटुंबासाठी सापाची माहिती आणि पकडण्याची प्रात्यक्षिके दाखवणार आहेत. मग काय आमचा उत्साह संचारलाच. तसे कमांडो ट्रेनिंग सेंटर आमच्या ओळखीचेच झाले होते कारण किशोर कडे तिथला बांधकाम विभाग आणि दुरुस्ती विभाग होता. त्याकाळात येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याला आम्ही सेंटर दाखवत असू. अर्थात तिथे प्रत्यक्ष प्रशिक्षण सुरु नसेल ती वेळ पाहून. प्रशिक्षणाच्या वेळी तिथे जायला कोणालाच परवानगी नसायची. फक्त प्रशिक्षणाचा कालावधी संपल्यावर कमांडोना सर्टीफिकेट देण्याच्या  समारंभाला परवानगी घेवून जाता यायचे.

त्यादिवशी सापांची ओळख, त्यांच्या विषारी, बिनविषारी प्रजाती वगैरे शास्त्रीय माहिती देवून मग त्यांनी एकेक पोतडीतून साप काढायला सुरुवात केली. कधी विषारी कधी बिनविषारी असे साप ते पकडण्यासाठी तयार केलेल्या खास हौदांमध्ये सोडून पकडून दाखवत होते. मग एक हिरवा बिनविषारी साप त्यांनी सगळ्या प्रेक्षकांमध्ये पकडायला दिला. कोणी घाबरत होते तर कोणी ईsss करून लांब पळत होते. मी आणि आलाप मात्र आपल्या हातात कधी मिळतो याची वाट पाहत होतो. आणि अखेर तो आमच्यापर्यंत पोचला. मऊ, लुसलुशीत, हिरवागार, तजेलदार साप हातात घेतला तेंव्हा तो एकदम्र हातातून निसटणार नाही न याच्याकडेच जास्त लक्ष द्यावे लागत होते.  इतक्या जणांचे हात लागल्यावर तो बिचारा बावरलेलाच होता.  नाग मात्र फारच चिडून फुत्कार करत होता. पण त्या कर्नलसाहेबांनी त्याला शांत करून कसे काबू करायचे आणि त्याला इजा न पोहचवता कसे पकडायचे ते दाखवले. खूप काही वेगळे शिकायला मिळाले त्यांचे अनुभव ऐकून.

चिंगीची पिल्ले एक महिन्याची झाल्यावर आम्ही पुन्हा पिल्ले होवू नयेत म्हणून ऑपरेशन करून घेतले. चिंगीच्या पाच पिल्लांपैकी तीन कुत्रे होते ते लोकांना सांभाळायला दिले. चिंगी लहान असतानाच शेजारच्यांनी अजून एक पिल्लू गाडीसमोर आले म्हणून आणले घरी. तिच्या पांढऱ्याशुभ्र अंगावर काळे पट्टे होते. ते बघून आलापने तिचे नाव ‘शेरू’ असे ठेवले. शेरुची झुबकेदार शेपूट आणि अंगावर छान मऊ आणि लांब दाट केस होते. आम्ही चिंगीला आणि  शेजारच्या म्याडम नी शेरूला खूपच लाडावले होते. नंतर शेरूला पण पाच पिल्ले झाली. त्या काही दिवसात दोघांची मिळून आमच्या प्रांगणात बारा कुत्री झाली. गेट मधून कोणी आले कि band वाजवून स्वागत करतात तसे सगळी एका पाठोपाठ एक ओरडत उभी राहायची. मग कोणीही आत यायला घाबरायचे. पण आम्हाला मात्र ते खूप सुरक्षित वाटत होते. मी मग एकेक पिल्लू कोणालातरी देवून कमी करत गेले.

जेंव्हा शेजारच्या म्याडमची बदली आली तेंव्हा त्यांनी बेंगलोर च्या एका श्वान अनाथालयाची माहिती काढून सगळ्यांना एका खास गाडीत पिंजऱ्यात घालून पाठवायचे ठरवले. मात्र आम्ही ‘आमची रक्षक’ चिंगीला ठेवून घेतले.

आता चिंगी एकटीच त्या बंगल्यांची राखण करू लागली.

घोणस नंतर चिंगीने मला बरेच साप ओरडून दाखवले. दोन तीन वेळा कमांडोना बोलावता आले. पण काहीवेळा सरसर सरसर ते गेट च्या बाहेर निघून जायचे.

मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या होत्या. आमचे फार्म हाउस सारखे आजूबाजूला थोडेफार जंगल असलेले घर आणि बेळगाव कॅम्प पाहायला मुलांना घेवून कराड, मुंबईचे बहिण भाऊ त्यांच्या कुटुंबासहित आले होते. त्यांची मुले आणि आलाप क्रिकेट खेळत होते. सोबत चिंगी गम्मत बघत होतीच. प्रत्येकवेळी गवतात बॉल गेला कि चिंगी आधी तिथे पोचलेली असायची. मग कोणीतरी बॉल घ्यायला जायचे. आणि अचानक एकाबाजूला गवतात सळसळ जाणवली चिंगीला. मुले खेळण्यात मस्त होती. पण चिंगी गवताकडे पाहून ओरडायला लागली. आलापला कळले इथे जवळच कुठेतरी साप आहे. सगळ्यांना प्रथम विश्वासच बसत नव्हता. ‘काहीपण काय सांगतो? आत्ता इतकेजण आपण इथे खेळतोय आणि इथे कशाला साप येईल?’ पण आलाप चा चिंगीवर पूर्ण विश्वास. चिंगी ज्याठिकाणी पाहून ओरडतीय तिथे बघूया. थोडावेळ सगळेच अविश्वासाने पण बघत राहिले.  थोड्यावेळाने गवतातून फुत्कार ऐकू यायला लागले. आतामात्र सगळ्यांचे धाबे दणाणले. चिंगीच्या आवाजाने आत गप्पा मारत बसलेले आम्ही पण बाहेर आलो. मुलांना थोडे मागे केले. पण चिंगी काही केल्या मागे येत नव्हती. गवताच्या आतून आता आवाज स्पष्ट ऐकू येत होता. आवाजावरून साप बराच मोठा असणार असा अंदाज येत होताच, आणि अखेर त्या सापाने चिडून जावून चिंगीवर हल्ला करण्यासाठी झेप घेतली. त्या क्षणी सावध असलेली चिंगी एकदम मागे सरकली आणि तो साप घरा बाहेर असलेल्या सिमेंटच्या मैदानावर आपटला. त्याक्षणी आम्हाला तो दिसला तो जवळपास २ फुट बाहेर, मनगटापेक्षाही जाड, करड्या रंगाचा, चपटे त्रिकोणी तोंड आणि त्यावर शंकरपाळीप्रमाणे नक्षी. शंभर टक्के घोणस(viper) होता यात शंकाच नव्हती. ‘चिंगी नसती आणि तो कोणाला चावला असता तर?’ कल्पनाच करवत नव्हती कोणालाही.

“कमाल आहे तुमची. अग दारासमोर एव्हढे मोठे साप येतात, कसे राहता तुम्ही इथे?”

“सांभाळून राहा बरं”

“मी नसते राहिले बाबा इथे.”

“रोजच रोज सापाचे टेन्शन.”

मावशीने तर लगेचच सांगून टाकले कि “गाडी घराच्या पायरीला चिकटून लावायची. खालच्या सिमेंटवर मी आत्ता पाय सुद्धा ठेवणार नाही.” असे. सगळ्यांची मनोगते ऐकत आम्ही मात्र चिंगी वरच्या विश्वासाने आणि अभिमानाने सुखावून गेलो होतो...

असेच एकदा चिंगी मागच्या बाजूला भुंकत आली आणि घाबरून भिंतीवर चढलेला साप बाथरूम च्या खिडकीतून मण्यार(Crait) आत पडला. त्याच्या काळ्या रंगावर खूप सुंदर रिंग एकेक इंचाच्या अंतराने होत्या. हा पण अतिशय विषारी जातीचा साप आहे हे तोपर्यंत माहित झाले होते. बाथरूमच्या शुभ्र फरशीवर तो अजूनच उठून दिसत होता. आम्हाला बघून त्याची खिडकीबाहेर जाण्याची धडपड सुरु होती पण तो फरशीच्या गुळगुळीतपणामुळे वर चढू शकत नव्हता. कमांडो येईपर्यंत आम्ही त्याला कॅमेऱ्यात टिपत गेलो. यथासार कमांडो त्याला पकडून घेवून गेले. पुन्हा दिवस सुरु.

किशोरकडे हुबळीच्या एन.सी.सी. ऑफिसच्या कामाचा चार्ज पण होता. तिथले काम बघण्यासाठी तो हुबळी ला गेला होता. दुपारचे उन जरा जास्तच होते. आणि गेटजवळ चिंगी भुंकायला लागली. मला वाटले कोणी आले असेल पण तिथे तर कोणीच दिसत नव्हते. शेवटी जवळ जावून बघितले तर एक सहा सात फुट पिवळाधमक साप गेटच्या भिंतीजवळ शांत पहुडला होता. मला बघून जरा पाचोळ्याच्या खाली शिरायचा प्रयत्न करायला लागला. आता काय करायचे? कारण कमांडोंचे नंबर किशोरकडे आणि तो मिटिंग मध्ये असेल तर फोन उचलणार नाही. मग ऑफिसच्या एका जे.ई. ला फोन केला तर काय कमांडोंच्या बरोबर आख्खे ऑफिस बघायला घरी.  पाच दहा मिनिटातच त्यांनी त्याला पकडून पोत्यात टाकले. पण तो पकडल्यावर त्याचा फोटो काढायला नाही विसरले.  तो एक पिवळा धमक भला मोठा धामण(Rat snake) होता.

नेहमीप्रमाणे सकाळी आरोहीला शाळेत सोडायला निघाले होते. समोर भला मोठा विना रहदारीचा रस्ता होता म्हणून नेहमीच्या सरावाने गाडी जरा जोरातच होती. तितक्यात समोरच्या बाजूला अंदाजे पन्नास फुटावर एक दुचाकी थांबवून दोन युवक मला थांबायची खूण करत होते. मला कळेना. रिकामा रस्ता असून मला का थांबायला सांगतात? काही मदत पाहिजे असेल का? थांबू कि नको? सगळीच दोलायमान परिस्थिती. तरीही कचकन ब्रेक दाबला आणि समोर बघितले तर माझ्या गाडीच्या पुढून म्हणजे अगदी दोन तीन फुटावरूनच एक भलामोठा नाग रस्ता ओलांडून जात होता. धस्स झाले विचार करून कि नसते थांबले तर नक्कीच आपल्या गाडीखाली आला असता. आणि एका मुक्या प्राण्याला मारण्याचे पातक आपल्यावर आले असते. त्याला दिसेनासा होईपर्यंत पाहिले आणि मग पुढे निघाले. जाताजाता त्या दोघांना धन्यवाद म्हणायला नाही विसरले.

 सकाळची नेहमीचीच गडबड सुरु होती. चिंगीचे ओरडणे ऐकून कामवाली बोलवायला आली. “म्याडम, लवकर बाहेर चला..” आता सवयच झाली होती अशा प्रसंगांची. अशावेळी आधी फोन हातात पाहिजे. फोन घेतला आणि बघते तर काय, दोन नाग मस्त दोन-तीन फुट वर फणा काढून एकमेकांसमोर डोलत होते. आणि दोघांकडे बघत चिंगी ओरडत होती. (पण ते प्रणयात असावेत असा माझा अंदाज) तिच्या अस्तित्वाची दखल सुद्धा घेत नव्हते. कोणत्याही पार्श्वसंगीताच्या शिवाय एकमेकांच्या डोळ्यात बघून ते त्यांचे डोलणे, काय विलोभनीय दृश्य होते ते ! केवळ अविस्मरणीय !! अहाहा !! अजून आठवलं तरी डोळ्यासमोर उभे रहाते. पावसामुळे वाढलेले हिरवेगार गवत, त्यात ते तजेलदार करड्या रंगाचे डौलदार फणा काढलेले आपल्याच ऐटीत असलेले दोघे नाग एकमेकांशी गूजगोष्टी करतात असेच वाटत होते. त्यांच्या अंगावर पडलेले कोवळे उन त्यांची कांती अजूनच उजळवत होते.  मी सुद्धा त्यांना बघण्यात इतकी दंग होवून गेले कि कोणाला फोन सुद्धा करावासा वाटला नाही. “म्याडम, फोन करा की साहेबांना.” ती. “नको ग जातील आपल्या वाटेने. जरा काठी आपट म्हणजे जातील निघून.” मी म्हणाले. पण मला त्यांना घालवावेसे वाटतच नव्हते. मागच्या घराच्या दारापासून ते दहा बारा फुटांवरच असल्याने त्यांना दूर पळवणे आवश्यक होते. अखेर तिने काठी आपटली आणि त्यांची समाधी भंगली व ते आपल्या रस्त्याने निघून गेले.

दिवाळीची सुट्टी संपवून नुकतीच शाळा सुरु झाली होती आणि आता विविध गुणदर्शन चे वारे फिरू लागले होते. त्यातच आलाप शाळेतून आल्यावर  सांगत होता, “पुढच्या आठवड्यात सायन्स प्रोजेक्ट करायचेय. काहीतरी विषय सुचव ना. सापांवर करू या का?” वारंवार दिसणाऱ्या सापांमुळे त्याच्या डोक्यात तेच येत होते. थोडासा विचार केला आणि ठरवले करू या सापावर... योगायोग असा कि त्या दरम्यान सकाळी सकाळी झाडांमध्ये काहीतरी चकाकले. जवळ गेले तर नुकतीच टाकलेली नागाची कात सापडली. नुकतीच असे वाटले कारण कि ती अजूनही मऊ होती आणि त्यावरून मुंग्या फिरत होत्या. तोंडापासून पुढची कात जवळपास तीन एक फुट तरी होती आणि शेपटीचा भाग नव्हता म्हणजे पाच सहा फुट तरी नाग असणार. ती कात, आणि त्यावरच्या मुंग्या साफ करून घरात आणली आणि त्यात थोडा कापूस भरून गोलाकार केली. आता प्रोजेक्टला अजूनच मदत झाली होती. मग इंटरनेट वरून आलापने भारतात सापडणारे विषारी, बिनविषारी सापांचे फोटो आणि त्यांची माहिती संकलित केली. त्या फोटोच्या प्रिंट काढून चार अल्बम तयार झाले. काही प्रत्यक्ष घराभोवती सापडलेल्या सापांचे काढलेले फोटो असे एका जाड रंगीत कागदावर चिकटवून मध्यभागात भरलेली कात चिकटवली. एक सुंदरसे प्रोजेक्ट तयार झाले ते. प्रदर्शनाच्या दिवशी प्रमुख पाहुण्यांनी बरेच प्रश्न विचारले आलापला. त्यांची त्याने समाधानकारक उत्तरे दिली आणि आश्चर्य म्हणजे शाळेतर्फे त्या प्रोजेक्टला दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस मिळाले.

आता चिंगी मुळे आम्ही सापांच्या भीतीपासून निश्चिंत झालो होतो. होता होता तीन वर्षे संपली आणि आमची बदली पोरबंदर/गुजरात ला आली. नेहमीप्रमाणे किशोर आधी तिकडे गेला. तिथे राहण्याची सोय झाल्यावर आम्ही जायचे असे ठरले. आता चिंगीचे काय करायचे हा खूप मोठा प्रश्न होता. पोरबंदरला घर दुसऱ्या मजल्यावर मिळाले होते. त्यामुळे तिला तिकडे नेणे अशक्य होते. त्यातच लहानपणी ती गाडीखाली झोपलेली असताना मी गाडी चालू केली आणि जाताजाता चाक तिच्या पायाला चाटून गेले होते. तेंव्हा पासून ती गाडीची किल्ली बघितली कि लांब पळून जायची आणि हे तिने शेवटपर्यंत लक्षात ठेवले होते. त्यामुळे आमच्या सामानाचा ट्रक आला आणि ती दिसेनाशी झाली. आमच्या घराशेजारी लक्ष्मीचे मंदिर होते. तिथल्या पूजाऱ्यालाही चिंगीची ओळख होती. आमच्या घरात कोणी राहायला येईल तोपर्यंत तिची सोय करायला त्यांना आणि एका कुटुंबाला सांगितले.

मुक्या प्राण्यांना प्रेम देवून सोडून येणे किती कठीण असते ते प्रकर्षाने जाणवले. पण आजतागायत चिंगीने ते घर आणि परिसर सोडलेला नाही. आमची खूप इच्छा आहे एकदा पुन्हा जावून तिला भेटून यावे असे.

भेटी लागी जीवा लागलीसे आस....... 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

अनुभव_एका_पावसाचा

  अनुभव_एका_पावसाचा नुकतीच मी श्रीकांत सुनीताच्या घरी काही कारणाने जाऊन आले. गेट उघडलं तर समोर सुनीताला बघून मी म्हटलं, "अगं, किती छान ...