एक_निसटता_क्षण
मागच्या शनिवारी पेपरमध्ये बातमी वाचली. ‘वारज्यात एका जेष्ठाची इमारतीच्या दुसर्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या.' बातमी मला नवीन नव्हती. आदल्यादिवशी सकाळी सकाळीच कळाली होती. कारण काय तर कोरोनाच्या भीतीने... हे ‘कारण’ मला त्रास देतंय. खूप विचार मनात घोळ घालू लागलेत ..
असा नव्हता तो... तो समोर आला की सर्वात आधी त्याचे डोळे खुश होऊन हसायचे. भरभरून बोलायचा.. जुन्या आठवणी निघायच्या.. लहानपणीच्या.. वाड्यातल्या.. अविस्मरणीय.. काही काळ तरी आम्ही त्या विश्वात परत एकदा जाऊन यायचो..
नंतर दिवस बदलत गेले.. प्रत्येकजण आपआपल्या विश्वात रमून गेलो.. प्रत्येकाच्या अडचणी वेगळ्या.. कधी लग्नप्रसंगी भेटी झाल्या..
त्याच्या आयुष्यात भरपूर अडचणी आल्या..
नोकरीला लागल्यावर दारूचे व्यसन.. मग बायको गोंडस मुलाला घेऊन त्याला सोडून गेली.. घटस्फोट.. मुक्तांगण मधून बरा होऊन आल्यावर मात्र त्याने कधी दारूला स्पर्श नाही केला.. दुसरं लग्न झालं.. सुगरण आणि नोकरी करणारी बायको मिळाली.. खुशीत होते दोघं.. नंतर दिव्यांग मुलाचा जन्म झाला तरी नाराज नव्हता तो.. न उठू शकणार्या, न बोलू शकणार्या मुलाच्या सवयी अगदी कौतुकाने सांगायचा तो.. मुलाचा दहा बारा वर्षांचा सहवास अचानक संपून गेला.. त्यावेळी देखील हार नाही मानली.. बजाज ऑटो सारख्या चांगल्या कंपनीला टाळे लागले आणि दोघांना घरी बसायची वेळ आली.. तरीदेखील तो कमकुवत नव्हता.. त्याचवेळी वारजेला स्वतःचे घर घेतले.. थोड्याच दिवसात एका खाजगी कंपनीत नोकरी लागली होती.. सुट्टीच्या दिवशी गुरुवारी मुक्तांगण मध्ये जाऊन तिथे व्यसनमुक्त होणार्यांना आपले अनुभव सांगून उभारी द्यायचा.. संध्याकाळी बायकोला घेऊन मंदिरात जायचा.. आजूबाजूच्या रहाणार्यांच्या मदतीला नेहमीच धावून जायचा.. कशातच काही खोट दिसत नव्हती..
लॉक डाउन मुळे घराबाहेर फिरणं थांबलं गेलं इतकीच काय ती सल होती.. अजून दहा वर्षं जातील ही परिस्थिती बदलायला असं म्हणायचा.. पण गच्चीवर जाऊन फिरून आलं, इमारतीतले कोणी भेटलं, की बरं वाटायचं त्याला.. मागच्या शुक्रवारी देखील तसाच तो चहा पिऊन गच्चीवर फिरून येतो म्हणून गेला..
‘धssप्प..' कसला आवाज झाला म्हणून लोकांनी बघितले आणि रक्ताच्या थारोळ्यात हा दिसला..
(कराडहून भावाला यायला आटापिटा करायला लागला.. पंचनामा करायला दोन दिवस.. त्यानंतर पोस्टमार्टम.. मग शव मिळून उत्तरक्रिया करायला आटापिटा.... त्यानंतर, नव्वद वर्षांची आई त्याच्या जवळ होती तिला आणि भाऊ पुण्यातून आला म्हणून, दोघं चौदा दिवस विलगीकरणात.. मनातलं दुःख बोलायला देखील कोणासमोर जाऊ शकत नाहीत की कोणाच्या गळ्यात पडून रडू शकत नाहीत..)
असं का.. कसं.. कशामुळे?? सगळंच अनुत्तरित.. असा तो नव्हता, परिस्थिती पुढे झुकणारा, हार मानणारा नव्हता तो.. असा कोणता क्षण, ज्याने त्याला मनातून कोलमडायला भाग पाडले? सतत हसतमुख असणारा तो.. आयुष्यात आलेले प्रत्येक टक्के टोणपे पचवणारा तो.. का?का? खूप प्रश्न मनात येतच रहातात..
पण हेही पुन्हा एकदा सिद्ध झाले की प्रत्येकाची वेळ तिथेच ठरलेली असते आणि ती कोणीच बदलू शकत नाही हेच खरं...
खरंच का असं घरात बसणं लोकांना कठीण होतंय? सारख्या सारख्या दूरदर्शनच्या बातम्या बघून मनाला नैराश्य येतंय? काय करावं यातून बाहेर काढायला? वाटतं, घरच्यांना ओळखता आलं पाहिजे एखाद्याला आलेलं नैराश्य.. आणि अलगद त्यातून बाहेर काढता आलं पाहिजे..
मी काही करू शकते का? रोज आपण एखाद्याला जरा फोन करून जुने, आनंदी दिवस आठवून देऊन मनात उभारी आणू शकतो का? त्यांच्या मनातला निसटता क्षण सकारात्मकतेत बदलता येईल का?
तुम्हाला काय वाटतं?
राजेश्वरी
१८/०४/२०२०
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा