शुक्रवार, २५ सप्टेंबर, २०२०

पक्ष्यांच्या राज्यात मी

 पक्ष्यांच्या राज्यात मी!

 

घरातली सगळी कामं आटोपली की बागेतून फेरफटका मारायची माझी नेहमीची सवय... दोन्हीबाजूला हिरवंगार लॉंन, त्यावरून येणारी वार्‍याची हलकीशी झुळूक, त्याने डोलणारी छोटी-मोठी झाडं आणि चिवचिवाट-कलकलाट करणारे विविध पक्षी! त्यांना चिवचिव करत अखंड उडतांना पाहिलं की मन प्रसन्न होऊन जायचं. कंटाळा कसा येत नाही यांना? सारखं नाचायचं, एकाजागी स्वस्थ म्हणून कधी बसत नाहीत. प्रत्येक वेळेस तितक्याच उर्जेने झेपावतात. मजा येते मला यांना बघायला.

  

शेवग्याच्या शेंगा, करवंद, पेरु, भोकराचा सुगीचा काळ म्हणजे त्यांच्या हक्काचीच जागा... त्यात पोपट आणि सातभाई आले की एकच कल्ला करतात. कोकीळ मात्र शांतपणे बसून एकेक भोकर चोचोने तोडून मग तोंडातल्या तोंडात वर मान करून झेलत झेलत गिळतांना बघायला मजा येते. पोपट पायाने पकडून कच्च्या पेरूला टोकरून टोकरून खातात. ती त्यांची गोल बाकदार चोच, उकरून उकरून फळातला गर बाहेर काढते. शेवग्याच्या शेंगा तर अलगद उघडून आतल्या बिया खातात. वाळून शेंग खाली पडते तेव्हा बेलाच्या पानासारखी तीन सालं वेगळी झालेली दिसतात. सनबर्डची तर गोष्टच वेगळी... सकाळी सकाळी फुलं उमलायचा अवकाश की यांनी त्यांच्या नाजूक लांब चोचीने, प्रेमाने त्या प्रत्येक फुलाचं चुंबन घेतलंच पाहिजे. त्यांचं ते इवलंसं तजेलदार शरीर, त्यावर पडणारे कोवळे सूर्यकिरण आणि त्यामुळे गडद निळसर जांभळ्या रंगछटानी चकाकणारे ते पक्षी फुलाला देखील मोहवून टाकत असतील. सुरुवातीला मला खूप मजा वाटायची सारखं काय बरं मिळत असेल यांना फुलाच्या आत चोच घालून? दिवसभर यांचं असंच फुलांभोवती घिरट्या घालणं सुरू असतं. लॉंनवर असलेले छोटे छोटे किडे खायला  मैना, बुलबुल, सातभाई, रॉबिन, कोतवाल, हुप्पी वगैरेअसायचे..  कधी कधी कुठून तरी टकटक टकटक असा आवाज येत असायचा. कोण बर हा? फ्लेमबॅक सुतार तो .. किती छान लालबुंद छोटासा तुरा डोक्यावर घेऊन एखाद्या झाडावर आपल्याच नादात टकटक करीत बसतात. रूफस ट्रीपाय मात्र किती कर्कश्श ओरडतात. कुठूनही त्यांना शोधता येतं. त्यांचं ते काळंभोर डोकं आणि लांबसडक शेपूट.. देखणेच वाटतात. तसेच भारद्वाज... नावाप्रमाणेच भारदस्त 'शाही लिबाज़'! सोनेरी तपकिरी अंग आणि चालताना खानदानी तोरा. एखाद्या राजघराण्यातल्या व्यक्तीला भेटल्यासारखं वाटतं मला. एकदा एक हुप्पी आला आणि त्याला दहा बारा साळुंख्यांनी गोल घेरा घातला. जणू त्याला दमच देत होत्या की हा आमचा इलाका आहे, इथे तू येऊ शकत नाहीस.

   

मोठ्या निलगिरी, बोर, बाभुळ, झाडांवर घार आणि शिकरा आपला मक्ता सांगायचे. आंबा आणि पारिजातवर बसून आपल्या गळ्यातून टुकटुक आवाज करत बसायला तांबटला नेहमीच आवडतं.

 

अशा या फळलेल्या, फुललेल्या या बागेत माझा खूप वेळ जायचा.. दिसायला माणसं कमी आणि निसर्ग जास्त. पण छान रमायचे मी तिथे.  

   

 

दुपारी मात्र एकमेव लक्ष असायचं ते म्हणजे मोर... त्यांची भेटीची वेळ ठरलेली. दुपारी दोन नंतर... आपल्या आकाराप्रमाणेच कर्कश्श आवाजात 'मी आलोय, मी आलोय' म्हणत कंपाऊंड वर बसायचा. मग मी प्लेटमध्ये पोळीचे तुकडे, ज्वारी, बाजारी, मक्याचे दाणे टाकून आत आले की राजे लॉंनवर पधारायचे, सोबत एकदोन मोर आणि चारपाच लांडोर असायच्याच. खाऊन झालं की मोबदला म्हणून खुशीत येऊन पिसारा फुलवायला सुरुवात करायचे. दोन तीन लांडोरी गवतात किडे, अन्न शोधत फिरत असणार आणि हा त्यांच्या आजूबाजूला आपलं नृत्य सुरू करणार. काहीजण प्रेक्षक असल्यासारखे कंपाऊंडवरच बसून राहणार. एप्रिल सुरू झाला की त्यांचं नृत्य पाहणं ही माझ्यासाठी एक पर्वणीच असायची. नोव्हेंबर नंतर पिसं गळायला सुरुवात होते आणि मार्च पर्यंत नवी पिसं आलेली असतात. तोपर्यंत नाचले तरी ती रंगीत तालिम आहे असं वाटतं.

 

खिडकीत स्टूलवर बसून मी रोज पाहायचे, पुन्हा पुन्हा निरखत राहायचे; तरीही माझं मन भरत नव्हतंच. पिसारा फुलवला की जरा जास्तच ताठ होणारी त्याची ती ऐटदार मान... नाचतांना चोच उघडी ठेवून मान हलवायची लकब एखादं गाणं गुणगुणत असल्यासारखी वाटायची. गळ्यापासून पोटापर्यंत मोरपंखी रंगाचा मखमली अंगरखा पांघरलेला, त्यावर काळेपांढरे पिसांचे पट्टेरी जाकीट... जाकीटावर वरच्या बाजूला हिरवागार बो. मागे लांबसडक पिसारा. पिसारा इतका मोठा की पिसार्‍याचा पसारा सावरून नाचतांना पायाचे कणखर स्नायू पूर्ण शरीराचा तोल सावरतांना दिसायचे.

 

मोर सुरूवातीला लांडोरीसमोर पाठमोरा नाचत असतो. एखाद्या लावणी नृत्यात पदर डोक्यावर घेऊन जसं पाठमोरं थिरकतात ना तसंच. नीट बघितलं की मागच्या बाजूला असंख्य पिसं गटागटाने विभागलेली दिसतात. ती लहान-मोठी, वेगवेगळ्या रंगांची-जाडीची असतात. पिसार्‍यापासूनच सुरुवात करायची तर... पिसार्‍यात दोन प्रकारची लांब पिसे एकाडएक असतात. एकावर डोळा आणि त्याच्या भोवती रंगीत वलये असतात तर दुसरी लांब पण बिना डोळ्याची. त्या लांब पिसार्‍याची रचना, उघडल्यावर गोलाकार दिसेल अशारीतीने दोन्हीबाजूंनी लहानापासून मोठी होत गेलेली दिसतात. त्यांना आधार द्यायला मागच्या बाजूला अस्तर लावल्या प्रमाणे पांढरी शुभ्र आणि भक्कम पिसे असतात. या पिसांच्या मुळाभोवती छोटी छोटी अगणित, भरगच्च रंगीबेरंगी पिसं अंडाकृती आकारात असतात. जवळून बघितलं की त्याची रचना खवल्या खवल्यांसारखी दिसते. पोटाला दोन्ही बाजूला घोड्याच्या खोगीर लावल्याप्रमाणे खाली काळी आणि त्यावर तपकिरी दणकट पिसं असतात. मोर पाठमोरा नाचतांना ती इतकी छान थिरकतात की त्यामुळे नक्कीच मोर अजूनच उत्तेजित होत असेल असे वाटते आणि यांच्यामध्ये वरच्या बाजूला मऊ मऊ फर असलेला गोल बॉल ठेवल्याचा भास व्हावा इतका सुंदर इवल्या इवल्या शुभ्र पिसांचा गुच्छ. अहाहा! अप्रतिम! असेच उद्गार निघावेत तोंडातून... नृत्य सुरू केलं, पिसारा फुलवला की सगळी पिसं यंत्रवत आपापली हालचाल किल्ली दिल्याप्रमाणे करतात. प्रत्येकाचं एकेक वेगळेपण...

नेमकं काय काय निरखावं?

काळ्याभोर डोळ्याभोवती शुभ्र कोयरी प्रमाणे असलेली किनार डोळ्याला जास्तच उठाव देते. डोक्यावरचा तुरा तर काय वर्णावा, मोरपंखी गुल असलेल्या काडेपेटीतल्या काड्या एकत्रित करून सरळ रेषेत डोक्यावर खोचल्या प्रमाणेच दिसतात.

बिन आवाजाचं गाणं गातांना वरची थोडीशी बाकदार चोच पायांच्या ठेक्यावर हलत असते. तो नृत्यात इतका रममाण होतो की चोचीतून लाळ टपकल्यावरच तोंड बंद करायची जाणीव होते.

नाचतांना सुरुवातीला पाठमोरा नाचतो तेव्हा लांडोर खूप दुर्लक्ष करत आपल्याच खाण्यात दंग असल्याचं दर्शवते.

शब्द नाही, भाषा नाही, पण त्यावेळच्या त्या दोघांच्या हालचाली खूप काही सांगून जातात. प्रेमात झुलवणे, आळवणे म्हणजे काय ते पुरेपूर जाणवते त्यावेळी. एक लांडोर... शेवटी स्त्रीच ना ती! आपल्यासारखं भेटी देणं, गोड गोड बोलणं, एकमेकांची काळजी घेणं, मदत करणं... सगळं सगळं त्याच्या त्या नाचात सामावलेलं असतं असं मला नेहमीच वाटत राहतं. पण त्याला झुलवणारी लांडोर खूप वेळ त्याला हुलकावणी देत इकडे तिकडे पळत असते. ती जवळ आली की तो खुशीत येऊन मनातलं सांगायला पिसाऱ्याची अशी काही प्रेमळ सळसळ करतो ती त्याच्या नाचाला अजूनच खुलवते. काही वेळ पाठमोरा नाचल्यावर अचानक मोर उलटी गिरकी घेतो आणि आपला मनोहर पिसारा तिला दाखवतो. मान डोलावतो आणि म्हणतो की ‘बघ माझी ही संपत्ती’. मग मुद्दामून दुर्लक्ष करणारी ती मादा मंत्रमुग्ध होऊन पाहतच राहते. तिचं सुरुवातीचं ढोंग गळून पडतं आणि क्षणार्धात ती त्याच्या आधीन होते. तो तिच्यावर आपला पिसारा अलगद चादर पांघरल्याप्रमाणे लपेटतो आणि ‘तू फक्त माझी आहेस’ असा विश्वास तिला देतो.

डोळ्यासमोर मोर रोज नाचत असतो पण प्रत्येकवेळी त्याचे डोळे, देहबोली थोडी थोडी कळत जाते. तासभर लॉंन वर आपला नृत्याविष्कार सादर केल्यावर सगळेजण निघून जातात. मग पुन्हा संध्याकाळी जोराने आरोळी मारून ‘मी आता माझ्या बिछान्यात जातोय, शुभरात्री’ असे सांगायचा. मग बाजूच्या झाडांवरून ‘मी पण, मी पण' असं ऐकायला येतं.

 

पक्ष्यांच्या राज्यात दिवस फार रम्य जायचे.

 

 

राजेश्वरी 

२५/०१/२०१९ 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

पाचोळा - कुसुमाग्रज

कविता रसग्रहण    पाचोळा - कुसुमाग्रज आडवाटेला दूर एक माळ तरू त्यावरती एकला विशाळ आणि त्याच्या बिलगूनिया पदास जीर्ण पाचोळा पडे तो उदास उषा ये...