"भारतभ्रमण मातृभाषा संवर्धनाचे"
नुकतीच माझी एका ध्येयवेड्या तरूणाशी गाठ पडली. अलीकडच्या झटपट कमाई
करणारी विचारधारा बाळगणार्या पिढीमध्ये हा तरुण वेगळ्याच ध्येयाने
प्रेरित झालेला दिसून आला. ते म्हणजे, ‘मातृभाषेचा प्रसार आणि शिक्षण.'
‘गंधार विलास कुलकर्णी’ एक डोंबिवलीत राहणारा चोवीस वर्षीय मध्यम वर्गीय
तरुण. संस्कृत विषय घेऊन पुणे विद्यापीठातून एम.ए. केल्यानंतर त्याने
काहीदिवस मुलांना संस्कृत आणि मातृभाषेचे शिक्षण देणे सुरू केले. शिकत
आणि शिकवत असतांना त्याला वारंवार जाणवले की, सद्यकालीन शिक्षण पद्धतीत
प्रयोगशीलतेचा अभाव असल्याने विद्यार्थ्यांना मिळणार्या चाकोरीबद्ध
शिक्षणामुळे केवळ नोकरदार वर्ग निर्माण होत आहे. भाषा शिकताना आपण
भाषेकडे साहित्या पलिकडे जाऊन वैज्ञानिक दृष्टीने बघण्याची गरज निर्माण
करणे आवश्यक आहे. मातृभाषेविषयीच्या अभिमानाची जाणीव नवीन पिढीमध्ये कमी
होत चाललेली दिसून येत होती. त्यासाठी काहीतरी आपल्यापरीने प्रयत्न केले
पाहिजेत हा विचार त्याला स्वस्थ बसू देत नव्हता.
इयत्ता दहावी मध्ये शिकत असतांना त्याला संस्कृत विषयाची आवड निर्माण
झाली. त्यातच मेघदूतामधील काही भाग अभ्यासाला होता. तो वाचून त्याने
पूर्ण मेघदूताचा अभ्यास केला.
दिवसामागे दिवस जात होते. शिक्षण सुरू होते. जसजसे पुढचे शिक्षण चालू
होते तसतसा त्याचा विचार पक्का होत गेला. नित्यनियमाने व्यवहार सुरू असले
तरी शिक्षणातील कमतरता आणि मातृभाषेचा कमी होत चाललेला वापर त्याला
स्वस्थ बसू देत नव्हता. शिकत असल्यापासून एक आवड आणि सामाजिक बांधिलकी
वाटून तो ज्ञानप्रबोधिनी विस्तार केंद्र, डोंबिवली येथे स्वयंसेवक म्हणून
काम करू लागला.
कळायला लागल्यापासून आपल्या सायकलवर जिवापाड प्रेम करणारा गंधार,
नेमाने पहाटे उठून मनसोक्त सायकल चालवून मगच दिवसाची सुरुवात करतो.
वाढत्या वयानुसार बहुतेक मुलांना दूचाकी आणि मग चारचाकी गाड्यांचे आकर्षण
वाढत जाते. पण गंधारचा जास्त ओढा सायकल कडेच असतो हे विशेष.
मेघदूत काव्याचा इतका पगडा त्याच्या मनावर बसला होता की मेघदूतच्या
मार्गाने आपणही का जावू नये असा विचार त्याच्या मनाला शिवून गेला.
मातृभाषेचा प्रसार करण्याची जिद्द आणि सायकलवरुन फिरण्याची आवड यांची
योग्यप्रकारे सांगड घालून आपले स्वप्न साकार करायचे ठरवले.
अखेर त्याने मनाची तयारी करून गेल्या एक वर्षापासून भ्रमंतीची आखणी करायला सुरुवात केली आणि आता एक जुलै २०१८ ला तो एकटाच सायकल वरून भारत भ्रमण करायला निघाला आहे. घरातल्यांचा भक्कम पाठिंबा, मित्रमंडळींचे प्रोत्साहन, मान्यवर मंडळींचे अनुभवाचे बोल आणि काही मंडळींनी त्याच्या या जिद्दीला सलाम करून आपणहून केलेली आर्थिक मदत त्याला त्याचा हा उपक्रम तडीस नेण्यास उपयुक्त होईल.
असे काही कोणी अलौकिक करत असेल तर साहजिकच काही प्रश्न मनात येतात. मग मलाही पडलेले प्रश्न त्याला विचारले असता त्याच्यातील प्रगल्भता दिसून आली.
त्याच्या सायकलवरुन भारत भ्रमणाचा मार्ग त्याने मेघदूत काव्याला अनुसरून ठरवला. जसे मेघदूतात.. “आषाढस्य प्रथमदिवसे” पासून सुरुवात केली तसे या वर्षीच्या आषाढ महिन्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच १३ जुलैला
नागपूर पासून त्याने भारत भ्रमणाचा उपक्रम सुरु केला आहे. त्यासाठी डोंबिवलीतून १ जुलैला निघून १२ जुलै ला तो नागपुरात दाखल झाला.
दिवसाला सरासरी ८०-१२० किलोमीटर सायकल चालवायची म्हणजे शरीराला सांभाळून झेपेल तितकीच सायकल चालवायची हा त्याचा मानस आहे. त्यानंतर पोचलेल्या गावात असलेल्या शाळेत दीड ते दोन तास जायचे. शिक्षक आणि विद्यार्थ्यांशी भाषेचे अध्ययन आणि अध्यापन या विषयावर संवाद साधायचा. मातृभाषेचा अभ्यास मुलांनी करावा यासाठी एका कृती सत्राच्या माध्यमातून मुलांना स्वतःच्या भाषेविषयी जाणीव करून द्यायची.
भाषा शिकताना स्थानिक बोलीची ओळख व्हावी म्हणून शब्दांची एक यादी त्या त्या बोलीत अनुवादित करुन घ्यायची आणि मातृभाषेची महती मुलांना करून द्यायची. अशी काही उद्दिष्ट्ये बाळगून तो भारत भ्रमण करणार आहे.
एकट्यानेच जायचा विचार का डोक्यात आला असे विचारले असता, ”मी माझ्या उद्देशाला न्याय देणारा वेळ या मोहिमेसाठी देणार आहे. तितका वेळ माझ्या उद्देशासाठी किंवा स्वतःचा वेगळा काही उद्देश घेऊन माझ्याबरोबर फिरू शकणारा इतर कोणी भेटलेला नाही” असे गंधारचे उत्तर असते. मोहिम पूर्ण झाल्यावर भाषा अध्ययन आणि अध्यापनाचे सगळ्यांपेक्षा वेगळे नाविन्य पूर्ण मॉड्युल तयार करता यायला हवे अशी इच्छा त्याने बाळगली आहे.
"अतिथिः देवो भव।" ही उक्ती रुजलेल्या भारतात प्रत्येक गावात घरगुती निवासाची सोय व्हावी अशी त्याची मनीषा आहे. त्यातच सामानाची आणि त्याची स्वतःची सुरक्षितता आहे असे गंधारला वाटते.
आत्तापर्यंत त्याने महाराष्ट्रातील, मध्यप्रदेशातील काही शाळांना भेट दिली. आता तो राजस्थान- हरियाणा- उत्तरप्रदेश- उत्तराखंड- चंदिगड- हिमाचल प्रदेश- जम्मू काश्मीर- पंजाब- उर्वरित राजस्थान- गुजरात- महाराष्ट्र- गोवा- कर्नाटक- केरळ- तामिळनाडू- आंध्र प्रदेश- तेलंगाणा- ओरीसा- प.बंगाल- सिक्किम- आसाम- अरुणाचल प्रदेश- नागल्यांड- मणीपुर- मिझोराम- त्रिपुरा- मेघालय- बिहार- उत्तरप्रदेश- छत्तीसगड आणि उर्वरित महाराष्ट्र करून पुन्हा डोंबिवली मध्ये असा मार्गक्रमण करीत आहे. पुणे येथे २० नोव्हेंबर २०१८ तारखेच्या दरम्यान दोन दिवस मुक्काम असेल.
आयुर्वेदावर विश्वास असल्याने ऋतु नुसार आहार आणि तीन दोषांचे योग्य निरीक्षण यातून स्वतःला वैद्यकीय अडचण येणार नाही याची काळजी घेऊन, तरीही काही त्रास उद्भवलाच तर एक-दोन दिवस आराम करून पुढचा प्रवास सुरु ठेवीन ही जिद्द त्याने मनात धरली आहे.
ज्ञान प्रबोधिनी डोंबिवली विस्तार केंद्राचे काम करतांना कृतीशीलतेचे बीज त्याच्या मनात रोवले गेले. त्यामुळेच ही मोहीम साकार होत आहे. प्रबोधिनीने विणलेले संपर्काचे जाळे खूप मदत करणार आहे. भारत परिक्रमा करून आलेले श्री. सचिन गावकर यांचे मार्गदर्शनही त्याला लाभले आहे.
महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री माननीय श्री. विनोद तावडे यांना गंधारच्या या उपक्रमाची माहिती मिळताच तातडीने त्याला भेटण्यासाठी वेळ देवून शिक्षण खात्यातर्फे सर्वतोपरी मदतीचे लेखी आश्वासन दिले. तसेच पुणे विद्यापीठाच्या संस्कृत विभाग प्रमुखांनी लेखी पत्र देऊन अडचणीच्या वेळी त्याला सहाय्य करण्यासाठी आवाहन केले.
स्कॉट-बर्गमॉंट या जर्मन कंपनी ने प्रायोजकत्वाच्या स्वरूपात ३४,००० रु. ची हेलिक्स 3.5i ही सायकल गंधारला देऊ केली आहे.
बाईक पोर्ट या सायकल दुकानाने प्रायोजकता मिळवण्यात अमूल्य सहकार्य केले.
असीम फाउंडेशन, विवेकानंद केंद्र यांची मदतही प्रवासा दरम्यान होणार आहे.
डॉ. सायली वैद्य यांनी आयुर्वेदानुसार आहार कसा असावा यावर मार्गदर्शन
केले आहे. त्याच बरोबर के. ई. एम. इस्पितळात कार्यरत असलेल्या आहार तज्ञ
डॉ. महाडिक यांनी आहाराची दैनंदिनी बनवून दिली.
या मोहिमे अंतर्गत गंधार भारतातील अंदाजे २०० शाळांना भेट देणार आहे.
५०० दिवसांच्या मोहिमेत अंदाजे २०,००० किलोमीटर अंतर पार करणार आहे.
प्रत्येक प्रांतातील/राज्यातील विविध स्थानिक भाषांबद्दल माहिती घेऊन तिथल्या मातृभाषेचा प्रसार व्हावा असा प्रयत्न करणार आहे.
सुरुवातीच्या दिवसातील प्रवासात घडलेले काही किस्से त्याच्याच लेखणीतून आलेले, खाली नमूद करत आहे.
किस्सा १.. ११ जुलै २०१८
परवा वाशिमहून अमरावतीला पोहचायचं होतं. नियोजनानुसार वर्ध्यामार्गे नागपुरला पोहचायचा रस्ता प्रचंड प्रमाणात खराब असल्याने ऐनवेळी बदलून अमरावती मार्गे पोहचणारा करावा लागला. वाशिम ते अमरावती 150 कि.मी.चे अंतर. वाशिमहून सकाळी 6.30 वाजताच निघालो. 20 कि.मी. पुढे आलो असेन, रेनकोट विसरल्याचं लक्षात आलं. गुज नावाच्या गावात सायकल लावली. टमटमने वाशिम गाठलं. रेनकोट घेऊन परतलो. मार्गाला लागलो. या सगळ्यांत 10 वाजून गेले होते.
पुढचा प्रवास 130 किमी चा होता. चार वाजेपर्यंत अमरावती 50 किमी दूर राहील इतकच अंतर कापता आलं होतं. दिवसभरात पाऊस तर पडला नव्हता. पण, अमरावतीच्या दिशेकडून घनदाट ढग पाऊस घेऊन येत होते. मीही कंटाळलो होतो. थांबायचं आयतं कारण मिळालं होतं. जवळचं गाव होतं 'टाकळी.' मुख्य रस्त्यावरून 2 किमी आत शिरलो. गावात पोहचेपर्यंत पाऊस सुरू झाला होता. गावातल्या मंदीरा समोरील छप्पर असलेल्या मोकळ्या जागेत थांबलो असता चौकशी आणि चर्चा सुरू झाली. कोणीच घरी घेऊन गेलं नाही तर मी सातूचे पीठ खाऊन रात्र काढण्यासाठीची तयारी दाखवली होती. तिथे श्री व सौ. मिल्के (मामा) मला घरी घेऊन गेले व आपुलकीने सर्व व्यवस्था केली. पन्नास घरांची वस्ती असलेलं हे गाव. रोज-मजुरी करणाऱ्या मिल्के मामांची परिस्थितीही यथा तथाच. श्रीमंत मनाने गरिबीवर मात करावी असला त्यांचा पाहूणचार. गावा विषयी अधिक जाणून घ्यायची इच्छा होती. चौकात जाऊन तिथल्या मुलांशी गप्पा झाल्या.
गावात चौथी पर्यंतच शाळा. पुढला अभ्यास करायला 12 कि.मी दूर जरा मोठ्या शाळेत जावं लागतं नाहीतर अमरावतीला हॉस्टेल मध्ये राहून शिक्षण घ्यावं लागतं. मिल्के मामांचा मुलगा अमरावतीच्या हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या महाविद्यालयात शिकला व मल्लखांब मध्ये प्रावीण्य मिळवून राष्ट्रीय स्तरावर नाव गाजवले आहे. गावातली इतर मुलंही विविध खेळांमध्ये तरबेज आहेत. काही वर्षांपूर्वी इथे शाखा सुरू झाली. सगळी मुलं शाखेत जातात. प्रार्थना पाठ आहे. पण अर्थ माहीत नाही! मी संस्कृतमध्ये एम्.ए. केले असल्याने त्यांनी बोलता बोलता सांगितले. संस्कृत प्रार्थनेचा अर्थ सांगायची संधी मी चुकवू दिली नाही.
भारतभ्रमण सुरू झाल्यापासून अभाविपचे कार्यकर्ते, संघाशी संबंधित असलेले घर आणि स्वयंसेवक यांची न ठरवता भेट झाली. आज संघ म्हणजे लोकांच्या मनात उभे राहणारे कलूषित पूर्वग्रह दूर होतील इतकं काम या सर्वांकडून ऐकायला मिळतंय आणि बरेचदा पहायलाही मिळतंय.
आज नागपुरला पोहचलो. पाहूणचाराला दूर ठेवण्यासाठी अगदी हक्काने संघ कार्यालयात रहायला आलो. संघाचा कार्यकर्ताही नव्हतो आणि संस्कृत भारतीचे नाव सांगता येईल इतके कामही केले नव्हते. पण संघाच्या प्रार्थनेमुळे या विषयी कुठलाही त्रास होणार नाही एवढा विश्वास होता.
राजकारण, डावे-उजवे विचारसरणीतील वाद या सगळ्यांना अभ्यासात स्थान नाही. डाव्या उजव्यांमधील दुवा भाषा आहे. आज संघा विषयी लिहीतांना अनेकांना वाद निर्माण करण्याची इच्छा होईलही कदाचित्. पण अभ्यासात त्याला स्थान नाही...
किस्सा २.. २२ जुलै २०१८
विदिशेला पोहचलो. खूप आनंद होतो आहे. स्वतःच्या मर्यादा उल्लंघल्या मुळे असावा. जबलपूरहून निघून पश्चिमेची वाट धरली, विदिशेच्या दिशेने. आपण मेघ मार्गानेच निघालो आहोत का? असा प्रश्न दोन दिवसांमध्ये अनेक वेळा पडून गेला.
जबलपूरहून निघाल्यावरचे पहिले मुक्काम अगदी अनिश्चित होते. जास्तीत जास्त पुढे जाता येईल एवढाच विचार होता. दुपारी 1.30 वाजेपर्यंत भूक लागलेली होती. पुढे धाबा लागला की थांबायचं. कारण बाकी कुठे सोय होईल अशी स्थिती दिसत नव्हती. चहा पिऊन कुठे जेवायची सोय होते आहे का वगैरे एका ठिकाणी पडताळून पाहीलं होतं. बेलखेडा गावाहून जात असताना एका तरूणाने आवाज देऊन थांबवलं. विचारपूस केली आणि जेवण झालं का विचारलं. माझं नकारात्मक उत्तर ऐकून जेवायचं निमंत्रण दिलं. हर्यंश आणि देवांश हे दोघे भाऊ. एकत्र कुटूंब पद्धतीत राहणारे. हर्यंश bsc computer science होऊन MPPSCचा अभ्यास करत होता तर देवांश bsc biotechnology शिकत होता. त्यांच्याकडूनच गावात वाढत्या गांजा-चरस च्या व्यसनाधीनतेमुळे मुलांच्या शिक्षणावर झालेल्या परिणामाविषयी माहिती मिळाली. घरी काकूंनी गरमागरम जेवण वाढलं आणि गप्पाही रंगल्या. पन्नास कि.मी. अंतरच पार केलं होतं. तिथेच थांबून चालणार नव्हतं. ऊलटा वारा झेलंत पुढचा प्रवास सुरू झाला. हिरणी नदी ओलांडून वनक्षेत्रात प्रवेश केला. साडेपाच वाजता थांबून राहण्याची सोय शोधायला बल्धा गावाच्या चहा टपरीवर थांबलो. सरपंचांचा पत्ता घेतला. ते जिल्ह्याच्या गावी गेले होते. मग गावकऱ्यांनी मुख्य रस्त्यापासून तीन कि.मी. आत पीठेरा गावात जाण्याचा सल्ला दिला. नर्मदेच्या काठी आश्रम आहे. तिथे छान व्यवस्था होईल असे आश्वासन दिले. झालेही तसेच! रामकृष्ण मिशन च्या अर्घ्यानंद महाराजांच्या आश्रमात शिरलो तेव्हा ते जेवायलाच बसले होते. मी सायकल लावे पर्यंत माझं पान वाढलेलं होतं चार ज्वारीच्या भाकऱ्या, लोणचं आणि मूगाची डाळ! झोपायच्या खोलीत एकही डास नव्हता. सगळं टाप टीप ठेवलेलं होतं. शांत झोपेसाठी अजून काय हवं असतं?
दूसऱ्या दिवशीचा प्रवास सुरू झाला.
तीव्रस्तीव्रः वहति पवनः प्रतिकूलो यथा माम्
विदिशा तु तिष्ठति दूरा कठीनोऽयं पन्थाः।
कुतः दृष्टः कविकुलगुरुणा मार्गः मेघस्य नाम
स्यादपि कथं प्रवहेत् मेघः तां लिखितां विदिशाम्
(तीव्रतीव्र वाहे वारा माझ्या मार्गा प्रतिकूल
मार्ग कठीन राही विदिशा येथपासून दूर
कुठून दिसला मार्ग 'मेघाचा' कविकुलगुरू कालिदासा असेल तरीही वाहील कसा मेघ वर्णित विदिशेला)
कालिदासाने भौगोलिक वर्णन अचूक केलेलं असलं तरी वाऱ्याच्या दिशेचा विचार करता ठामपणे चूकीचे वर्णन करून "मन्दं मन्दं नुदति पवनश्चानुकूलो यथा त्वाम्" हे वाक्य सपशेल खोटं ठरतं. आम्रकूटापर्यंतच्या प्रवासात वारा अनुकूल असतो. पण नंतर, वारा प्रतिकूल होत जातो. इतका की चढ नसलेल्या रस्त्यावर 14-15 कि.मी/तास या पुढे वेग वाढवणे कठीण होते. अश्यात न बांधलेला रस्ता, माती आणि शेणावर पाऊस पडून अंगावर उडणारं ते मिश्रण, खडी, खड्डे याने सायकल चालवणं खूप कठीण झालं होतं. उदयपुराला सायकल धूतली आणि 4.30 वा. धाब्यावर जेवण केलं. तिथून सिल्वानी 28 कि.मीच्या अंतरावर होतं. तिथपर्यंत पोहचायचा निश्चय केला आणि उलट्या वऱ्याला, पावसाला न जुमानत 6.20 पर्यंत सिल्वानी गाठलं.
असो, तर या परिस्थितीत उदरपुराच्या अलिकडे "हा मेघ मार्ग असूच शकत नाही. आपण भोपाळ मार्गे परस्पर उज्जैनला जाऊयात. विदिशेनंतर वक्रः पन्थाः सांगितलं आहे, ना!" असा दुर्बळ विचारही येऊन गेला.
या नकारात्मक विचारांवर मात करून सिल्वानीला पोहचलो तेव्हा पुढल्या दिवशीच्या मार्गाबद्दल प्रचंड भिती मनात होती. भिती- वाऱ्याची, चढ-घाटांची!
सिल्वानीहून निघालो तेव्हा पाऊस सुरू होता. गावाला दोन किलोमीटर मागे टाकले. कीर्र जंगलातला घाटचा चढ सुरू झाला. पुढे आठ किलोमीटर एकही गाव लागणार नव्हतं. सुरुवातीलाच, गोमांसावर ताव मारणाऱ्या गिधाडांचं दर्शन झालं. शांत पण विशाल पक्ष्याचे ते स्वरूप अचंबित करून टाकणारं होतं. मी पहिल्यांदाच या पक्ष्याला इतक्या जवळून बघत होतो. आठ कि.मी चा घाटाचा चढ संपला. गावात चहा घेतला. आणि आता पठारावरचा सरळ रस्ता सुरू झाला. तिथेही नदीचा एखादा ओहोळ रस्त्याखालून वाहण्यासाठी अधिक उतार आणि मग येणारा प्रचंड चढ (त्याला स्थानिक भाषेत 'रिप्टा' असं म्हणतात) माथेरानच्या घाटाची आठवण करून देत होता. एका पूला जवळ तीन-चार लांडगै दिसले. जरा पुढे गेलो आणि अगदी रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला एक लांडगा. रस्ताही तीस फुटीच, सिंगल लेन! जे कान्हा-नागझिरा-ताडोबा इथेही दिसलं नव्हतं ते 'मेघमार्गा'च्या प्रवासात दिसत होतं. पाऊस अविश्रांतपणे सुरू होता. गढीच्या फाट्यावर विदिशेचा रस्ता लागला तेव्हा तिथून विदिशा तीस कि.मी.च्या अंतरावर होतं. पठार उतरणीचा भाग. उतारावरील एक शेवटचे वळण. आणि घाट संपल्यावर दिसलेले नितांत रम्य दृष्य. समोर मेघदूतातील वर्णना प्रमाणे विविध पर्वत रांगा, त्यांवर विसावलेले काळे कभिन्न मेघ आणि निस्सीम पसरलेली हिरवीगार शेती. एकेकाळच्या राजधानीचे वर्णन या वैभवापेक्षा अजून काय असावे?
मी विदिशेपासून 8-10 कि.मी अंतरावर होतो. हासूआ गावात चहासाठी थांबलो. गावतील बुजूर्ग मंडळी तिथे होती. मला मध्यप्रदेश कसा वाटला हे त्यांना जाणून घ्यायचे होते. मी म्हटलं. इतकी दूरवर पसरलेली शेती बघून खूप आवडला मध्यप्रदेश. खूप संपन्न भाग आहे हा. तोच, '"हा लेकीन पैसा नही है।"
-"पढोगे नही तो पैसा कहासे मिलेगा?" या प्रश्नावर आजोबा खूप खूश झाले आणि आपल्या दहावीत शिकणाऱ्या नातवाच्या पाठीवर हात मारून पुढे दिलखुलास गप्पा झाल्या.
-यह बात तो सही है, पैसा नही रहेगा फिर भी यहा कोई भूका नही सो सकता।
कालिदासाने मेघाला विदिशा का दाखवली याचे उत्तर मिळाले होते.
नीचैर्गिरी वर जाऊन आलो. वेत्रवतीचे दर्शन झाले. आता जरासा मार्ग वाकडा करून उद्या उज्जैनच्या दिशेचा प्रवास सुरू करीन...
या दोन अनुभवांबरोबरच रोजच्या रोज वेगवेगळे अनुभव गाठीशी बांधत गांधारचे मार्गक्रमण सुर आहे. आत्तापर्यंत तरी त्याच्या उपक्रमाला गावागावातून प्रोत्साहन मिळत आहेच.
त्याच्या या सामाजिक जागृतीच्या स्तुत्य उपक्रमाबद्दल माहिती वाचून अजूनही काही तरुणांना प्रेरणा मिळेल अशी आशा आहे. “सायकलोपासना” या नावाने फेसबूक पेज तयार करून त्यात रोजचे अनुभव सर्वांसाठी खुले करण्याचा त्याचा प्रयत्न राहील.
वातावरण आणि सायकल त्याला योग्य साथ देवो आणि जवळपास पाचशे दिवस चालणारा त्याचा हा आव्हानात्मक उपक्रम यशस्वीरीत्या तडीस जावो हीच माझ्याकडून सदिच्छा!!
तसेच साप्ताहिक सकाळ परिवार आणि वाचकांतर्फे “सायकलवरून भारत भ्रमण व मातृभाषा
प्रसार” कार्यासाठी गंधारला आपण खूप खूप शुभेच्छा देऊ या !!
राजेश्वरी
२५/०७/२०१८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा