घारींचे संमेल्लन
(ऑफिसर्स इन्स्टिट्यूट ची इमारत... डाव्या बाजूला स्विमिंग पूल... 2,3 मुले मस्तपैकी पाण्यात उडया मारण्यात दंग असतात... उजव्याबाजूला लांबच लांब पसरलेले हिरवेगार गवत.. ते इतक्या कडक उन्हात सुद्धा हिरवेगार रहावे म्हणून त्यावर सोडलेली पाण्याची पाईप..
‘ती’ आणि ‘तो’ सकाळी कुठेतरी भटकून आलेले असतात.. सकाळी 8 वाजताचे कोवळे ऊन आणि पाईप मधून येणारे थंडगार पाणी... घोट घोट पाण्याचा आस्वाद घेताना एकमेकांना तृप्त झालेले पहात असतात... बहुतेक रोजच त्यांची सकाळ अशी जात असणार.. बघायला कोणी नाही.. कदाचित त्यांची दखल घ्यायला देखील कोणी येत नसावे...
पण आजचा दिवस जरा वेगळाच उजाडला आहे की काय असे दोघांनाही वाटत असते.. पाणी पीत असतांनाच एक पांढरी शुभ्र कार रस्त्यावर अचानक थांबते.. दोघांचेही लक्ष कारकडे जाते. कार मधून हळूच एक व्यक्ती उतरते. आणि अचानक दोघेही सतर्क होतात.)
ती:: अरे हे तर मिलिंद . हेच ते आहेत ना जे टेल्को च्या त्या तलावावर आले होते ना मागे एकदा.
तो:: अच्छा तेच तर नाहीत जे सारखे चित्रबलाक चे फोटो काढत होते.
ती:: हो रे तेच ते. त्यावेळी आपण ही होतो की झाडावर, एकदम झाडाच्या शेंड्यावर बसलो होतो ना.
तो:: हो ग त्यांच्या हातात बघ ना तीच तर बंदूक की काय आहे. मला तर फार भीती वाटली होती त्यावेळी.
ती :: मलाही सुरुवातीला वाटली होती की. पण नंतर कळाले. अरे बाबा ती बंदूक नाही. तो तर कॅमेरा आहे.
मी बघितले ते त्या छोट्याच्या पडद्यावर चित्रबलाकचे फोटो पण बघत होते.
तो:: आज तर त्यांना फारसे कोणीच मिळणार नाही फोटो काढायला.
ती:: ए आपण असे करू या ना?
तो:: काय?
ती:: आपण आज फुटबॉल मैदानावर सगळ्यांना बोलवूया. मिलिंद आता नक्कीच तिकडे जाणार त्यांचा तो लाडका कॅमेरा घेऊन.
तो:: चल लवकरच बोलवूया सगळ्यांना.
(दोघेही तुंहुतुs टुहुंs टूsss करत उडत गेले.)
(त्यांच्या आवाजाने/बोलावण्याने आसपासचे सगळे सगेसोयरे जमले. सगळ्यांचे प्रश्नार्थक चेहरे. ???)
ती:: आपल्या भागात आज मिलिंद आलेत मोठा कॅमेरा घेऊन. आता थोड्याच वेळात ते इथे येतील.
तो:: आज आपण त्यांना निराश नाही करायचे. छोटी मुले जशी विविध गुणदर्शन करतात ना अगदी तसेच वेगवेगळे दर्शन त्यांना द्यायचे.
ती:: हो त्यांना आपण कधीच जवळून दर्शन दिलेले नाही. आज त्यांना खुश करून टाकू .
(मग दोघेही शाळेत शिक्षक सांगतात तसे...
1..ए तुम्ही तिघांन्नी मॉडेलिंग करायचे म्हणजेच माना इकडून तिकडे वेळावून त्यांच्या कॅमेरा कडे बघायचे. आपल्या पंखांवरची सुबक नक्षी दाखवायची त्यांना...
2..आता तुमच्या दोघा दोघांच्या जोड्या. बागेत बाकड्यावर जोड्या जोड्या कशा प्रणय करतात ना तसे चिकटून बसायचे..
तुम्ही आजोबा, त्या तीन जोड्यांवर लक्ष ठेवायचे...
(7 घारींचा फोटो.. )
3.. तू नुसताच पाणी पी. तुला तेवढेच जमते.
4.. आज तुम्ही तिघे मस्त अंघोळ करून आलेले दिसताय. तुमचे हे विराट पंख पसरवून दाखवा..
5.. तुला पाण्यावर सूर मारणे छान जमते, तू तसेच कर.
6.. तू आज फारच अस्वच्छ दिसतेस तू तुझे पंख चोचीने साफ करून दाखव जरा. तेवढीच तू स्वच्छ होशील त्यामुळे.)
अर्ध्या तासाने मिलिंद आणि किशोर पोचले की...
आणि काय डोळे विस्फारून पाहतच बसले क्षणभर.
‘ती' आणि ‘तो’ दोघांनी सांगितल्या प्रमाणे जणू सगळे जण एकेकेक पोझ देऊ लागले.
अरे हे काय kite फेस्टिवल दिसतोय की इथे.. जमेल तसे, जमेल तितके दोघांनीही वेगवेगळ्या कोनातून फोटो काढणे सुरू केले की..
इतकावेळ लांबवर किडे खाण्यात मग्न असलेल्या मोराला मग थोडेच चूप बसवतेय? त्यानेही मग पाणी पितांना, एक रंगीबेरंगी स्टेज वर उभे राहून रोड मिरर मध्ये बघत असे काही मॉडेलिंग केले की बस ...
‘तो' आणि ‘ती' विचारच करत बसले कितीतरी वेळ की आज सगळ्यांनी किती छान ‘विविध गुण दर्शन’ करून दाखवले.
मग चित्रपटात ‘स्पेशल अपियरन्स असतो तसे पाणकावळा, पाण कोंबडी, छोटा बगळा, मोठा बगळा, बदक, पांढरा कुदळ्या दर्शन देऊन आपआपल्या मार्गाने गेले.
मध्ये मध्ये छोटे छोटे पक्षी, फुलपाखरे आपल्याच मस्तीत नाचून गेली.
पक्षी बघायचा सिझन नसतानाही अशाप्रकारे दोघांचे मन रिझवून टाकले सगळ्यांनी...
बाकीच्यांना बघायला परत यायच्या बोलीवर मिलिंद नी आपला कॅमेरा बॅगेत ठेवला...
(सगळे फोटो मिलिंद केळकर यांच्या सौजज्ञाने..)
राजेश्वरी
२९/०५/२०१८.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा