दृश्य
शांतपणे खिडकीशी उभी होते..
खूप दिवसांनी कोवळं ऊन झाडांना उजळवत होतं...
पावसाची रिपरिप रिमझिम शांत झाली होती...
जमिनीवर नुकतेच कोंब फुटून हिरवा गार गालिचा तयार होऊ लागलाय..
पावसाने आडोश्याला बसलेले पक्षी बाहेर पडून चिवचिवू, बागडू लागलेत..
मजा येतेय त्यांची लगबग बघायला...
इतक्यात अचानक एक पक्षी धोक्याची सूचना द्यायला कलकलू लागतोय…
सगळे पक्षी जागरूक होऊन, घाबरून सैरभैर होऊ लागलेत...
गोड चिवचिवाट आता कल्ला वाटू लागला...
मी खाली पहाते तर सीताफळाच्या झाडाच्या खोडावर हालचाल दिसली...
वरून खोडाचाच काळपट तपकिरी रंग पण खालून पिवळी धमक रंग असलेली एक प्रचंड मोठी धामण शांतपणे खाली उतरत होती..
आनंदाने सुरू असलेला चिवचिवाट शांत झालेला असतो..
असहायपणे गिळंकृत केलेल्या आपल्या साथीदाराला दुरावतात, पहात रहातात...
जणू श्रद्धांजली वहातात..
धामण आपले कार्य साध्य करून आपल्या मार्गाला निघून जाऊ लागते...
पाण्याने भरून गेलेले आपले बीळ सोडून दुसरीकडे सुस्तावायला...
एका क्षणात बदललेली परिस्थिती...
जीवन मरणाचा खेळ...
मला विचार करायला लावून गेली...
राजेश्वरी
१०/०७/२०१९
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा