ग्रेट_भेट
प्र_के_घाणेकरसर
कधी, कुठे भेटायचे ठरवता ठरवता अखेर CME मध्येच भेटू असा निरोप आला. दुपारी चार वाजताच येणार होते प्र. के. घाणेकर सर. प्रकाशन कार्यक्रम झाल्यावर पुस्तक घेतलेले दाखवून, सरांनी आवर्जून मला सांगितले, “वाचतो आणि मग भेटून बोलू." मी देखील “नक्की भेटू” म्हणाले आणि विसरून पण गेले. अर्थात त्यादिवशी असे बर्याचजणांनी सांगितले होते. त्यानंतर जवळपास महिना उलटून गेल्यावर त्यांचा निरोप आला. खरेतर त्यांचा निरोप येईपर्यंत त्यांचे एकही पुस्तक मी वाचलेले नव्हते. ज्या व्यक्तिला भेटायचे त्यांची थोडीफार माहिती तरी हवी ना? म्हणून मी आधी आंतरजालावर माहिती घेणे सुरू केले. बापरे! सत्तरहून जास्त पुस्तके लिहिलीत या माणसाने.. वयाची सत्तरी पार केलेली.. महाराष्ट्रच काय इतर देखील गड किल्ले सर करून मगच त्यावर पुस्तक लिहायचे. जात्याच वनस्पतीशास्त्राचे प्राध्यापक असल्याने गडावरच्या वनस्पतींचा देखील त्यात मागोवा घेतलेला. त्यांनी अंदमानवर एक पुस्तक लिहिलेले असल्याने मला जरा टेन्शनच आले. त्यांचे एकतरी पुस्तक वाचावे म्हणून मी पळाले अप्पा बळवंत चौकात.. बरीच शोधाशोध केल्यावर एक पुस्तक हाती लागले. दरम्यान यू ट्यूब वर त्यांची काही भाषणं ऐकली. माहिती घेत गेले आणि त्यांची महती जाणवत गेली. ते घरी येण्याचा क्षण जवळ आला तशी मनातली भीती वाढत होती पण आपल्या पुस्तकाबद्दल काय बोलतात याची उत्सुकता देखील होती..
सर घरी आले. छान गप्पा सुरू झाल्या आणि त्यांनी माझ्या पुस्तकात केलेल्या टिप्पणीचा कागद बाहेर काढला. चक्क दोन पाने भरून लिखाण केलेले होते. सर अजूनही आंतरजाल किंवा मोबाइल फोन वापरत नाहीत. त्यांच्याशी बोलायचे ते लॅंडलाइन फोनवरच.. त्यांनी लिहून आणलेल्या कागदावर बर्याच शंका, प्रश्न होते. त्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे, शंका निरसन झाल्यावर आम्ही CME तलाव बघायला बाहेर पडलो. फिरत असतांना आजूबाजूच्या झाडांचे निरीक्षण सुरू होतेच. त्याची माहिती आम्हालाही सांगत होते. काही त्यांच्या आठवणी, किस्से सांगत होते. एक फार मजेशीर किस्सा त्यांच्या तोंडून ऐकला...
“आम्ही पाच जण गडावर फिरायला गेलो होतो. वाटेत मस्तपैकी भाजी तळण्याचा घमघमाट येत होता. पाच कांदा/खेकडा भजीची ऑर्डर दिली, तर एक मित्र ओरडला, ‘अरे, नाही बाबा, मी गडावरच्या शिवलिंगाचे दर्शन घेतल्याशिवाय काहीच खाणार नाही.' मग आम्ही चार प्लेट भजी सांगितली. तोपर्यंत मी इकडेतिकडे पहात होतो. मी शोधत होतो एक झाड. आणि मला ते लगेचच सापडले. त्याची काही फळे तोडून मित्राला दिली आणि सांगितले, ही फळे हातावर चोळत रहा त्यातला रस निघून जाईल आणि हातात फक्त बिया रहातील तेव्हा मला दाखव. मी काय आणि का सांगतोय तो उद्देश न कळल्यामुळे तो निमूटपणे हातात फळं रगडत राहिला. हात कोरडे झाल्यावर बिया मला दाखवल्या. मी त्या बिया हातावर घेतल्या आणि सांगितले नीट निरीक्षण कर, तुला यात काय दिसते ते पहा. त्याने क्षणभर त्या बिया निरखल्या आणि साक्षात माझे पाय धरले. तू महान आहेस म्हणाला. आणि लागलीच भजीची पाचवी प्लेट मागवली.” असे सांगून सर आठवणीने हसू लागले.. कसल्या होत्या त्या बिया माहीत आहे? “एक मिनिट थांबा, मी तुम्हाला पण दाखवतो” असे म्हणाले आणि जवळच्याच एका झाडाची सुकलेली फळे चुरगाळून त्यांनी आम्हाला त्याच बिया दाखवल्या.. साक्षात शिवलिंगाचा आकार होता त्यांचा.. त्या बिया पाहून आम्हीदेखील चाट पडलो..
अशाच विविध गमतीजमती, अनुभव सरांच्या तोंडून ऐकत आम्ही फिरत होतो.. सुरुवातीची भीती सरांशी बोलतांना कधी नाहीशी झाली ते कळलेच नाही. अगदी मैत्रीपूर्ण गप्पा सर मारत असल्याने आमचे औघडलेपण नाहीसे झाले होतेच..
अस्ताला चाललेला सूर्य, हवेत हलकीशी हालचाल, मावळतीचे रंग, निर्मळ वातावरण सरांना खूपच आवडले. त्या निसर्गाचाच फायदा घेऊन मी हळूच सरांना पुस्तक कसे वाटले ते विचारले. त्यांच्या परवानगीने त्याचे रेकॉर्डिंग केले. त्यांच्याशी बोलतांना जाणवत होते, फार अभ्यासपूर्ण वाचन केले आहे सरांनी..
अंधार पडला तेव्हा घरी येऊन गरम गरम कांदेपोहे आणि चहाचा आस्वाद घेऊन निरोप घेतला. वेळ पुढे सरकत होती पण गप्पा संपत नव्हत्या..
पुन्हा एकदा भेटू या म्हणत एका ‘ग्रेट भेटीची' सांगता झाली.
राजेश्वरी
२९/०२/२०२०



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा