रविवार, २७ सप्टेंबर, २०२०

वालचंद कोठाडीया आर्ट गॅलरी

वालचंद कोठाडीया आर्ट गॅलरी 



आज एका आगळ्यावेगळ्या कलेविषयी लिहावसं वाटतं आहे इथे. कलेची एक दृष्टी, नजर असली की काय घडू शकते याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हे कलादालन...

         यात १९२९, १९३० सालापासून करत आलेल्या काही अप्रतिम कलाकृती पाहायला मिळतात. आत्तापर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या रंगांनी आपल्या कुंचल्यातून रंग भरून केलेली चित्रे पाहिली होती. पण इथली विलक्षण चित्रं पाहून कलाकाराच्या कलाकृतीला सलाम केल्यावाचून रहावत नाही.

        थोडेसे कलादालनाच्या कल्पनेविषयी....

       स्वतः इंजिनीअर असलेले सर जेव्हा जेव्हा आपल्या वडिलांच्या कलेला बघत तेव्हा तेव्हा काहीही करून या कलेला समाजापर्यंत पोचवण्याची खूणगाठ मनाशी बांधत. त्यासाठी आपल्या कमाईतून थोडी थोडी रक्कम बाजूला काढत. एक स्वप्न साकार करण्यासाठी आयुष्यभर झटतात.. निपाणी किंवा कराड सारख्या छोट्याशा गावापेक्षा पुण्यासारख्या शहरात याला योग्य न्याय मिळेल असं वाटून निवृत्ती नंतर सर्व जमापुंजी वापरून एक असे घर घेतात की जिथे एक दालन फक्त आपल्या वडिलांची कला लोकांपर्यंत पोचवण्यासाठी असेल. दुसरे दालन अशाच हरहुन्नरी कलाकारांसाठी असेल की जे तरुण पिढीला आपल्या वेगवेगळ्या कला शिकवू शकेल. तिथे सुट्टी मध्ये मुलांना वेगवेगळ्या प्रकारच्या कला शिकवल्या जातात...

       एका दालनात आपल्या वडिलांचा हा अमुल्य ठेवा फ्रेम्समध्ये जपून ठेवलाय. दालनात प्रवेश केल्यावर एकेक चित्रं बघत गेले आणि सगळे उद्गारवाचक शब्द ठेंगणे वाटावेत अशी स्थिती झाली. काय अफलातून कला आहे ही? कुठेही न शिकवली जाणारी. याला फक्त आणि फक्त तशी नजरच पाहिजे.  

     सरांच्या वडिलांनी केलेल्या कलाकृतीचा माझ्या शब्दातील आढावा...   

      (सरांचे वडील, त्यांना मी आजोबा म्हणते म्हणजे लिहिणे सोपे जाईल) आजोबा एक शिक्षक होते. शाळा संपवून घरी आले की बायको काहीतरी रेशीम घेऊन भरतकाम करताना दिसायची. आपल्याच साडीवर केलेले सुंदर भरतकाम पाहून खुश व्हायची. पण आजोबांना वाटायचे की, साडी वापरून फाटली की संपलं सगळं. मग काय उपयोग या कलेचा. असा विचार करून आजोबांनी रेशमाच्या लडी हातात घेतल्या मात्र. त्यातून जिवंत केली एकेक चित्रं. रेशमाच्या असंख्य छटा वापरून निसर्ग चित्रं बनवू शकतो पण चेहऱ्यावरील भाव साकारणे किती कठीण. एका रंगात दुसरा मिसळला की नवीन रंग तयार करता येतो पण रेशीम कसे मिसळणार? त्यातून त्यांनी साकारले अनेक अप्रतिम चेहरे. आणि एक "कुतुबमिनार"  चे चित्र तयार करताना तर किती वेळेस रेशीम तोडून,जोडून, गाठी मारून त्याची उंची, छटा साकार करण्यासाठी प्रयत्न केलेत. हे चित्र दालनातल्या मांडणीत मात्र सरांनी कल्पकतेने उलटे फ्रेम केलंय, ते एका टीपॉय वर ठेवले आणि खाली आरशात त्याचे प्रतिबिंब म्हणजे तयार झालेले चित्र दिसते. उद्देश जाणकाराला पडद्यामागची कलाकारी दिसावी. अशी रेशीमकाम केलेली विविध चित्रे तयार करायला काय मेहनत लागली असेल, कारण एका चित्राला ४,६ महिने तरी नक्कीच गेले असायचे.

           पण अशा फक्त एकाच प्रकारावर प्रतिभा भागेल तो कलाकार कसला? 

      रस्त्यातून येताना शिंप्याचे दुकान दिसायचे. त्याने टाकून दिलेल्या चिंध्या बघून मनात विचार आले आणि मग घेऊन यायचे त्या चिंध्या आणि कापून चिकटवून काही चित्रे तयार व्हायची. चिंध्याचे तुकडे पण किती लहान हो, अगदी २,४ mm चे पण. बापरे, इतके बारीक तुकडे कापून ते चिकटवणे अशक्यप्राय गोष्ट. किती संयमाने करावे लागले असेल. आणि त्यातून साकारली एक बेजोड अप्रतिम कलाकृती... "छत्री दुरुस्त करणारा माणूस"! या एकाच चित्रात विविधता किती कल्पकतेने आणलीय, ती उभी स्त्री, दुरुस्तीच्या कार्यात मग्न असलेला मान खाली घातलेला तो कारागीर, त्याच्या हातातली छत्री, दुरुस्तीच्या सामानाचे सर्व साहित्य आणि इतर... याच प्रकारातले दुसरे चित्र साकारले तो "बैरागी" ... त्याचे केशरी वस्त्र, कमंडलू, काठी, सगळे केशरी रंगाच्या वेगवेगळ्या छटा वापरून ... काय सुरेख छटा तयार केल्यात त्या कपड्यांच्या तुकड्यांमधून...

       कधीतरी एकदा आजोबांना माशाचे खवले नजरेस पडले. आले की घरी घेऊन आता याचे काय करायचे विचार करत, दाढी करायच्या ब्लेड ने छोटे छोटे खवले बोटात पकडून त्याला आकार देत आणि मग चिकटवून साकार झाल्या त्या "WELCOME" आणि बसलेले "गौतम बुध्द" अशा दोन अप्रतिम फ्रेम्स.

        आजी लांबसडक केस विंचरत असताना काही केस खाली पडले. ते आजोबांनी उचलले. रोज थोडे थोडे असे एकत्र करत गेले आणि सुईत ओवून कापडावर भरतकाम करतात तसे विणून तयार झाले ते "रवींद्रनाथ टागोर" आणि "विजयालक्ष्मी पंडित" !! काय मस्त भाव उमटलेत त्यांच्या या दोन्ही चित्रात!  दुरून पाहिले की वाटते पेन्सिलने काढलेले चित्र असेल. पेन्सिलने काढताना चुकले तर एकवेळ खोडता येतेही पण एकेक केस कापडावर टाके घालत चेहरा साकारायचा आणि चेहऱ्यावरचे भावही निर्माण करायचे म्हणजे... नाही मी नाहीच करू शकत याचे नीटसे वर्णन.

         एकदिवस आजी शेंगा फोडताना दिसली. उचलली काही फोलं, बोटात घेऊन त्याला ब्लेडने आकार देत छटांचे विचार करत जोडत गेले आणि "महात्मा गांधीजींचा चेहरा." अवतरला...

        घरात आंब्याची पेटी आली की मिळाले यांना आयते गवत. काही जाड, काही बारीक, काही भडक, काही फिकट रंगाच्या काड्या कापून, जोडून बनवली गेली एक "बावरी स्त्री" आणि कसल्याशा ओढीने वाट पाहत बसलेला एक "छोटासा मुलगा". दोघांच्या चेहऱ्यातील ते आर्त भाव त्या निर्जीव गवतातून निर्माण करण्याचे अचाट साहसच ते.

गव्हाच्या काड्या बघितल्या शेतात आणि त्याच्या सुंदर सोनेरी झलक मुळे उठाव आलेले तयार झाले ते "यशवंतराव चव्हाण", "जवाहरलाल नेहरू" आणि "लेनिन". यशवंतरावांची प्रेमळ नजर, नेहरूंचे कर्तृत्ववान बोलके डोळे. सगळं सगळं आणि तेही त्या गवताच्या काड्यापासून.. अवर्णनीय.

        एकदा घरातले लाईट गेल्याचे निमित्त झाले आणि fuse वायर आणली. आता राहिलेल्या वायरचे काय करायचे. यांच्या डोक्यात चक्रे सुरू झाली. त्यातून तयार झाल्या दोन सुंदर कलाकृती. "वनांत विश्रांती घेत असलेले जणू राधा कृष्णच" आणि "एक पक्षी,त्याची भेदक नजर."

         आजी त्यादिवशी अळूच्या वड्या करणार होत्या. अळू धुवून पाटावर मांडून ठेवले होते. काकांची नजर त्या अळूवर गेली. एक पान उचलले आणि त्यावर रंगवले गांधीजी. ५०,६० वर्षांपूर्वी तयार झालेले हे चित्र आजही तितकेच सुरेख दिसतेय.

        पुढे गेल्यावर दिसले ते कातरकाम केलेले "राजर्षी शाहू महाराज" आणि "मोतीलाल नेहरू"... एक कागद दाढीच्या ब्लेडने कोरत जायचा आणि त्यातून चेहऱ्यावरच्या रेषा, महाराजांचा फेटा, करारी डोळे... विचार करणं थांबूनच जातं इथे. 

         त्याचबरोबर आजोबांनी केलेली निसर्ग चित्रं, तंबाखू उद्योगाला भारतात चालना दिलेले तंबाखू सम्राट म्हणून ओळखले जाणारे देवचंद शेटजी, गुजगोष्टी करत बसलेले जोडपे, अशी काही कापडाचे तुकडे चिकटवून साकारलेली चित्रे. अप्रतिम....

   आजोबांनी सर्वात शेवटची रेशमांनी तयार केलेली कलाकृती म्हणजे त्यांच्या घरासमोरच नेहमी बसणारा, कष्टाची कामे झाली की आरामात सिगरेट बोटात पकडून बसलेला, थकलेला "शंकर." एका कष्टकऱ्याच्या चेहऱ्यावरचे काय भाव टिपलेत त्यात. कमालच केलीय.

         अशी बरीच चित्रे बघून झाल्यावर साहजिकच आजोबांबद्दल अजून जाणून घ्यायची उत्सुकता निर्माण झाली...

          सन १९२९ साली जे. जे. स्कूल ऑफ आर्टस् मध्ये त्यांनी पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला. महर्षी कर्वे यांच्या ध्येयाने प्रेरित होऊन निपाणी सारख्या छोट्या गावात "फिमेल एज्युकेशन सोसायटीची" स्थापना केली. १९३८ साली निपाणी मध्येच कन्या शाळेची स्थापना केली. तेव्हापासून शाळेत कला शिक्षक म्हणूनच काम केले. घरातच "भरतकला मंदिर" स्थापन केले आणि अखेरच्या श्वासापर्यंत इच्छुकांना मोफत कला शिक्षण दिले. त्यांचे एकच म्हणणे असायचे... कला विकायची नाही !!     त्या आजोबांचे नाव आहे... 

    निपाणीभूषण कलामहर्षी गुरुवर्य

     श्री. वालचंद कोठाडीया...

    पुण्यातील कलादालन त्यांच्या मुलांनी म्हणजे अरविंद सरांनी मोठ्या कष्टाने उभे केले. उदघाटन उषा मंगेशकरांच्या हस्ते २०१० साली केले. उषा मंगेशकरांनी त्यांच्या फोटोचा अल्बम बघितला मात्र आणि लगेचच विना मोबदला उदघाटनाला यायची इच्छा प्रकट केली. उदघाटन सोहळ्यात सगळी चित्रे निरखून बघत त्याचे कौतुक करत होत्या. 

      नंतर लवकरच सर अचानक निवर्तले. पण तरीही आपल्या वडिलांची इच्छा त्यांच्या दोन मुली आपल्या आई सह योग्यप्रकारे सांभाळतात. आपापल्या घराला व व्यवसायाला सांभाळून दोन्ही मुलींचे कलादालनाच्या उत्कर्षासाठी सर्वपरीने प्रयत्न सुरू असतात...हे ही कौतुकास्पदच... असे हे दालन सर्वांसाठी रोज संध्याकाळी ४ ते ८ वेळात सर्वांसाठी खुले असते... खास वेळ काढून आवर्जून बघण्यासारखे...


         राजेश्वरी

        १३/०२/१८

      उदाहरण दाखल काही फोटो देत आहे...












 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

पाचोळा - कुसुमाग्रज

कविता रसग्रहण    पाचोळा - कुसुमाग्रज आडवाटेला दूर एक माळ तरू त्यावरती एकला विशाळ आणि त्याच्या बिलगूनिया पदास जीर्ण पाचोळा पडे तो उदास उषा ये...