आरंभ - एक नवी सुरुवात
"आरोही, उद्या शाळेचा प्रोग्रॅम आहे. तू बोलणार ना?"
"हो. पिंक साडी नेसायची. नेलपेंट लावायचं, पिंक बांगड्या घालायच्या, टिकली पण लावायची."
"हो ग माझे बाई, सगळं करते, तू म्हणशील ते करते फक्त मी काय सांगितलं ते सगळं बोलशील ना?"
"हो. बोलणार."
"काय बोलायचं माहीत आहे का, विमानात बसून आपण जातो तेव्हा त्या लाल ड्रेस घालून उभ्या असतात ना तशी तू एयर होस्टेस होणार आहेस. त्या म्हणतात तसं, 'नमस्ते आप कैसे हो। आपका स्वागत है। आपकी यात्रा सफल रहे।' असं तुला म्हणायचं आहे, म्हणशील ना?"
काल रात्री अशी आमच्या दोघींची चर्चा झाली. निमित्त होतं ते आमच्या पहिल्या ऑनलाइन therapy session मासिक समापन समारोहाचं.
lockdown काळातला हा गेला एक महिना माझ्या आणि आरोहीच्या दृष्टीने सर्वात धावपळीचा पण उत्साहवर्धक होता. रोजची सकाळ उगवायची ती, "आज काय स्पेशल असेल" या विचारानेच.
"आरंभ तर्फे घेण्यात येणार्या ऑनलाइन कार्यशाळेबद्दल अंबिका मॅडमची पोस्ट वाचली आणि हे काहीतरी अद्भुत असणार याची जाणीव झाली. लगेचच मॅडमना फोन लावला. नेहमीप्रमाणे मस्त गप्पा झाल्या.
पंधरा वर्षांपूर्वी मुलांना वर्गात सोडल्यानंतर बाहेर गप्पा मारत उभे रहाणार्या आम्हाला कधी वाटले देखील नाही की, ही ओळख पुन्हा पंधरा वर्षांनी ताजी होईल ते.
गेल्या वर्षी अचानक एक दिवस अनुराधा राजाध्यक्ष यांनी केलेला एक video माझ्या पहाण्यात आला. गंमत म्हणजे हा video श्रीहरी, अंबिका मॅडम आणि 'आरंभ' बद्दल होता. मी video पाहिला तेव्हा लगेच त्या खाली मेसेज करून माझी ओळख सांगितली आणि त्यावेळचा आरोही आणि श्रीहरी असलेला एक फोटो पाठवला. मॅडमनी पण लगेच ओळखलं आणि गप्पा सुरु झाल्या.
आरंभची प्रगती त्यांच्या फेसबूक वरच्या वेगवेगळ्या पोस्ट्स मुळे कळत होतीच.
पण मला उत्सुकता होती ती इतकी चांगली नौसेनेतील नोकरी सोडून विशेष मुलांची शाळा सुरू केली याचं. मग काय एक दिवस ठरवलं आणि फोन करून वेळ मागून अगदी मुलाखतच घेतली. विशेष म्हणजे त्याचवेळी एक 'आदर्श शिक्षिका पुरस्कार' त्यांना मिळाला होता.
"हॅलो, अंबिका, मनापासून अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप सार्या शुभेच्छा!
एका आदर्श मातेला मिळालेला आदर्श शिक्षक पुरस्कार! वा वा. खूप छान".
"धन्यवाद राजेश्वरी. केलेल्या कष्टाचं चीज झालं. अर्थात मी करतेय ते काही अशा पुरस्कारांसाठी नाही ग. मी माझ्या श्री बरोबरच सगळ्या मुलांसाठी करतेय."
"या तुझ्या प्रगतीचं श्रेय तुला कोणाला द्यावं असं वाटतं?" माझ्या या प्रश्नाने अंबिका विचारात पडली.
"खरं सांगू का राजेश्वरी, पंधरा सोळा वर्षांपूर्वी मी विशेष मुलांच्या प्रशिक्षणामध्ये BEd करत होते. उद्देश फक्त इतकाच होता की मला माझ्या श्री ला योग्यप्रकारे शिक्षण द्यायचं होतं. त्याला त्याच्या पायावर उभं करायचं होतं. तेव्हा श्री फक्त सहा वर्षांचा होता. नवरा नौसेनेत असल्यामुळे दर दोन तीन वर्षांनी बदल्या होत होत्या आणि तो नवीन जागी गेल्यावर सुरूवातीला खूप बावरून जायचा. त्याला नवीन शाळा, नवीन जागेत स्थिर व्हायला खूप वेळ लागत होता. मुंबईत बदली झाल्यावर माझ्या नवर्याने नोकरी सोडली आणि आम्ही चांगली शाळा बघून तिथेच स्थायिक व्हायचं ठरवलं. तोपर्यंत माझं BEd पूर्ण झालं आणि मी श्री च्या शाळेत शिक्षिका म्हणून जाऊ लागले. पण माझी त्याला सामान्य करण्याची धडपड आम्ही रहात असलेल्या इतरांच्या लक्षात कमी यायची आणि श्रीने केलेली धडपड, आवाज, आरडाओरडा त्यांना जास्त त्रासदायक ठरायचा. इतका की दोन ठिकाणी आम्हाला घर सोडायला लावलं. मी तर म्हणते त्या लोकांना त्रास झाला, त्यांनीच मला ही झेप घेण्याची ताकद दिली.
त्या दरम्यान छोटा मुलगा दीड दोन वर्षांचा होता. मी दोघांनाही हाताने जेवणाचं, शिशू चे प्रशिक्षण देत असे. सतत बोलून तर कधी ओरडून, तास तासभर बाथरूममध्ये श्रीला बसवून, उभं करून मी शिकवायची धडपड करत असे. पण आजूबाजूच्या लोकांना त्याचा त्रास व्हायचा आणि आम्हाला घर बदलायला भाग पडायचं. दोन वेळा असं झाल्यावर ठरवलं. आता बास. आता आपण आपल्या स्वतःच्या घरात जायचं. त्यावेळी हातात असलेला पैसा आणि मुंबईत विकत घ्यायच्या सदनिकेचा ताळमेळच बसेना. आम्हाला मुंबई सोडून जाणं भाग पडलं. मग औरंगाबादला थोडसं गावाबाहेर आमच्या आवाक्यात असलेलं घर मिळालं. फार आनंद झाला त्यावेळी. पण तो आनंद काही फार काळ टिकला नाही. श्री चा आजार दिव्यांगातला स्वामग्न गटात मोडणारा होता. त्यादरम्यान कुठेच अशा मुलांसाठी वेगळ्या शाळा नव्हत्या. मानसिकदृष्ट्या मंदबुद्धी असलेल्या शाळेत त्याला घातलं पण म्हणावी तशी प्रगती होताना दिसत नव्हती. त्याच दरम्यान मला एक मैत्रीण भेटली, तिचाही मुलगा स्वमग्न आहे. त्याचक्षणी ठरवलं या दोघांना आपण शिकवायला सुरूवात करायची. जाहिरातबाजी करून, मोठी जागा घेऊन मला एकदम झेप घ्यायची नव्हती. या दोन मुलांपासून सुरू केलेली शाळा दोन वर्षातच बावीस मुलांची शाळा झाली. तेव्हा घराजवळच एका छोट्याशा खोलीत सुरू केलेली शाळा मग मोठ्या जागेत सुरू करावी लागली. आज मागे वळून पहाता माझा छोटासा आरंभ एका मोठ्या समूहात रूपांतरीत झालेला दिसतोय. आता शाळेत साठ मुलं आणि एकूण सोळा प्रशिक्षक, कर्मचारी वर्ग आहे.
सुरूवातीला प्रशिक्षक मिळायला देखील त्रास झाला. कारण जाणूनबुजून या मुलांना शिकवायचं काम कोण गळ्यात घेईल ना? नौसेनेच्या 'संकल्प' शाळेत चार वर्ष श्री होता तेव्हा तिथल्या सोयीसुविधा पाहून मला माझी शाळा तशीच खास करायची होती. स्वमग्न मुलं कधी कधी अति आक्रमक होतात तेव्हा त्यांना शांत करायला मला वेगवेगळ्या खोल्या तयार करायच्या आहेत. एक संगीत उपचार खोली, एक स्पर्शज्ञान खोली, एक रंगीबेरंगी आकाशकंदील असलेली अंधारी खोली, मुलांना सुरक्षितरीत्या पळण्यासाठी मैदान, एक व्यायाम उपचार खोली. या सगळ्यांसाठी आम्ही नुकतीच एक मोठी जागा घेतली आहे. तिथेच एक कायमस्वरूपी मुलांची रहायची सोय देखील मी करणार आहे. खर्च खूप आहे पण जिद्द जबरदस्त आहे. आपल्यानंतर काय? हा प्रश्न दिव्यांग मुलांच्या पालकांना नेहमीच पडतो. अशा पालकांना मला खात्रीशीररीत्या दाखवून द्यायचं आहे की, काळजी करू नका, मी त्यांची सोय करण्याचा 'आरंभ' केलाय. म्हणूनच मी शाळेचं नाव "आरंभ" ठेवलंय. एकदा सुरुवात झाल्यावर मग मी मुलांना आणि पालकांना योग्य ते प्रशिक्षण देता यावे म्हणून बर्याच ठिकाणी जाऊन तिथले अभ्यासक्रम अवगत केले. दिल्लीला जाऊन परदेशी तज्ञांकडून मार्गदर्शन शिबीरात जाऊन प्रशिक्षण घेतले. चेन्नई, हैदराबाद, मुंबई मधील विशेष मुलांच्या संस्थेमध्ये वेगवेगळे कोर्सेस केले. या सगळ्याचा मला माझ्या शाळेतील कर्मचार्यांना अजून शिक्षित करायला खूपच फायदा झाला.
जसं जसं शाळेचं कामकाज वाढत गेलं तसं तसं मला इतर गोष्टी शिकण्याची गरज भासू लागली. शाळा नुसती प्रशिक्षण वर्ग न रहाता स्वयंसेवी संस्था झाली. त्याचे आर्थिक व्यवहार सांभाळण्यासाठी वेगळं प्रशिक्षण घ्यावं लागलं. लग्नापूर्वी वडलांनी करायला लावलेल्या संगणक कोर्सचा उपयोग मला करता आला.
हळूहळू मला जाणवू लागलं, नुसतं मुलांना शिकवून चालत नाहीये तर पालकांचं समुपदेशन देखील करणं क्रमप्राप्त्य आहे. मुलाला शाळेत तर पालक घेऊन येतात पण त्याचं विशेषत्व मान्य करायला उशीर करतात. सामान्य मुलांप्रमाणे एका वर्षात त्यांच्या मुलाने शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण करायला पाहिजे असा अट्टाहास करतात. अशा पालकांना समजावणे खूप कठीण काम असतं. प्रत्येक मुलाची बौद्धिक वाढ ठराविक कालावधीपर्यन्त होत असते. त्यानंतर साधारणतः ती वाढ थंडावते. जर मुलाला काही वर्ष सामान्य शाळेत घातलं असेल आणि मग माझ्याकडे आणलं तर त्याची तितकी प्रशिक्षणाची वर्षं वाया गेलेली असतात. अशा मुलांचा नित्यक्रम मार्गी लावणं फार त्रासदायक होतं. सामान्य हुशारीचा बुद्ध्याङ्क असतो त्यापेक्षा थोडा कमी बुद्ध्याङ्क असलेल्या मुलाला आम्ही दहावी पर्यन्त शिकवून मग त्याच्या कुवतीप्रमाणे त्याला कार्यशाळेत प्रशिक्षण देतो. तो काहीतरी आर्थिक कमाई करून स्वतःच्या पायावर उभा राहील याची काळजी घेतो.
आपल्या मराठी सणांप्रमाणे वस्तु आम्ही तयार करून घेतो. रक्षाबंधनसाठी राख्या, गणपतीसाठी आरास, दिवाळीत दिवे, पणत्या आणि इतर मुलांना करता येतील असे उद्योग त्यांना शिकवतो. त्यात घराची तोरणं करून देतो. यात भेटवस्तू, शुभेच्छा कार्ड, चहाचा कप ठेवता येणारे कोस्टर्स, फुलदाणीत घालायला कापडी फुले आणि बरंच काही आम्ही सध्या ईको फ्रेंडली पदार्थापासून करतो.
या शाळेमुळे श्रीला काय फायदा झाला असा प्रश्न मला पडला होता...
श्रीने माझं बोट धरून या शाळेत प्रवेश केला आणि आता श्री इतर मुलांना आपलं बोट धरायला देतो. त्याला दिसेल ती मदत तो करत असतो. कधी मुलांना व्यवस्थित बसवणे तर कधी मुलांना भरवणे. कधी मुलांकडून व्यायाम करून घेणे तर त्यांना खेळायला शिकवणे हे सगळं श्री अगदी प्रेमाने करत असतो. त्याला तसं बघितलं की मला अगदी सार्थक झाल्यासारखं वाटतं.
श्री बरोबरच मला त्याच्या वडलांचा म्हणजेच माझ्या अहोंचा देखील पूर्ण पाठिंबा असतो, अगदी सक्रिय पाठिंबा असतो. त्यांच्यामुळेच तर मी अनेकविध छोटे मोठे प्रशिक्षण अभ्यासक्रम करू शकले. प्रत्येकवेळी त्यांनी पुर्णपणे घराची आणि दोन्ही मुलांची जबाबदारी घेतली. माझ्या प्रत्येक घडामोडीत त्यांचा मोलाचा वाटा असतोच.
आरंभचे काम हळूहळू वाढवत जाताना पालकांसाठी देखील वेगवेगळी शिबिरे आयोजित करून पालकांना सरकारी सवलती, कायदे यांचं ज्ञान देतो. कित्येक पालक सरकारी सवलतींबाबत अनभिज्ञ असतात.
या सगळ्या गोष्टींसाठी घरच्यांचं पाठबळ आणि आर्थिक पाठबळ असणं अतिशय गरजेचं आहे. मी माझ्या शाळेचा उद्देश कधीच पैसा मिळवणे हा ठेवला नाही.
नजर न स्थिरावलेलं मूल माझ्या शाळेत प्रवेश करतं आणि त्यानंतर जेव्हा ते मला बघून हसून हात हलवतं तो क्षण मला सार्थकतेचा भासतो. नशिबाने मला साथ देणारे सगळेच माझे कर्मचारी माझ्याप्रमाणेच समर्पित भावनेने काम करतात आणि त्याचं फळ आम्हाला मिळत आहे.
"हो, ग. मी बघतेय ना सध्या ऑनलाइन प्रशिक्षण घ्यायला मुलं किती सरावली आहेत ते. अशीच तुझी प्रगती होत राहुदे आणि कित्येक आयांना आपलं मूल काहीतरी करू शकतंय याचं समाधान मिळू दे. तू मुलांसाठी हा जो स्वमग्न ते सामान्य असा वसा घेतला आहेस, त्यात तुला खूप खूप यश मिळू देत.
आरंभ तर्फे आता खास विशेष मुलांसाठी आणि पालकांसाठी एक महिन्याची कार्यशाळा घेत असल्याचं तिच्याकडून कळलं. Speech, Music, Dance, Art and Craft Online Therapy घेणार होते.
रीतसर नाव नोंदणी झाली आणि घाबरतच लॅपटॉप समोर आरोहीला घेऊन बसले.
आजपर्यंत तिने आमच्या zoom meetings बघितल्या होत्या आता आम्ही तिच्या बघणार होतो.
2,3 दिवसातच मुलं एकमेकांना ओळखू लागली. वय वर्षे 4 ते 30 पर्यंतची सगळी बाळं घेऊन आम्ही आया online व्हायचो.
सौरभ सर मुलांना बोलतं करत होते तर चेतन सर मुलांना हलवत होते. मंजुषा मॅडम मात्र मुलांना हलवत हलवत बोलतं ठेवायच्या. प्रगती आणि प्राची मॅडमची कला पाहून आरोहीला पण चित्र काढावं असं वाटायचं.
स्क्रीन वरच्या छोट्या छोट्या खिडकीत बसलेली मुलं पाहून आरोहीला जुन्या शाळेतल्या आठवणी यायच्या. रुची आणि देवांशी तिच्या सगळ्यात आवडत्या होत्या. अनन्या आणि अवनीला उड्या मारताना बघून आरोही फार खुश व्हायची. त्यातच त्यांनी नाच केलेलं, तिच्या आवडीचं गाणं, 'नाच रे मोरा'. मग काय, आमची गाडी खूषच.
रोजचे session सुरू करायचा अवकाश, हिचं लगेच सुरूच व्हायचं, "नमस्ते, आप कैसे हो?" मग तो mike सुरू आहे की नाही, त्याच्याशी काही तिचं देणं घेणं नसायचं.
2,3 वेळा उत्साहाच्या भरात नाचल्यावर संध्याकाळी तिची शुगर कमी व्हायची. मग काय डोकेदुखी, उलट्या सुरू झाल्या. तिचं तिलाच जाणवलं आणि तिने नाचणं बंदच करून टाकलं.
अति स्मरणशक्तीचा परिणाम, धोका ओळखून हळूच अंग काढून घ्यायचं चांगलं जमतं तिला. काही वेळा तर उठ म्हणता उठायची नाही.
आरोही, यापूर्वी ज्या सरांकडून शिकायची, ते सर तिच्याकडून रोज तेच ते पुस्तक आणि त्यातली चित्रे, गाणी पाठ करून घ्यायचे. ती सवय म्हणून की काय, या online शाळेत हे काहीच विचारत नाहीत पाहिल्यावर दिवसभर माझी शिकवणी सुरू राहायची. 'भाज्या सांग, फळं सांग, पक्षी सांग, प्राणी सांग, देव सांग...' सगळी उत्तरं देईपर्यंत माझी सुटका नसायची.
एकूण काय मरगळलेल्या मुलांना ताजेतवाने करण्याचे श्रेय तमाम "आरंभ" टीमला जाते.
अंबिका मॅडम, प्रज्ञा मॅडम आणि त्यांच्या टीमचा उत्साह, सकारात्मक ऊर्जा वाखाणण्याजोगी आहे.
आजचा समारोपाच्या कार्यक्रमात शाळेतले विविध गुणदर्शन पहायला मिळाले. आमच्या प्रत्येक बाळांनी उत्तम सादरीकरण केले.
प्रतिथयश नृत्यांगना, शर्वरी जमेनिस यांची उपस्थिती आणि त्यांचे मनोगत आम्हा पालकांचा उत्साह द्विगुणित करून गेला. त्यांनी सादर केलेली 'मोराचे गर्वहरण' कथा आणि अभिनय वाखाणण्याजोगा होता. वेळात वेळ काढून त्यांची उपस्थिती प्रशंसनीय होती.
मधे पंधरा दिवसांची सुट्टी देऊन पुन्हा online कार्यशाळा वर्ग सुरू केले. यावेळी अजून नवीन मुलं लॅपटॉप पडद्याच्या वर्गात आरोहीला दिसू लागली. पण दुसर्यांदा सुरू झाल्यावर मात्र आरोही लॅपटॉपच्या पडद्याकडे बघायला नाराज असायची किंवा डोळे बंद करून ऐकत असायची. मला तीचं ते वागणं खटकत होतं. सकाळी उठल्यापासून माझी धडपड सुरू असायची, दुपारी साडे बारा वाजता शाळा सुरू होण्यापूर्वी स्वयंपाक आणि आरोहीचं आवरून मस्तपैकी तासभर आरोहीला जवळ घेऊन बसायचं आणि तिच्याकडून गाणी म्हणून, प्रश्नांची उत्तरं देताना उच्चार स्पष्ट येतील याची काळजी घ्यायची. पण... शेवटी कोणत्याही कार्यात 'पण' हा ठरलेलाच असतो. आरोही नुसती पडद्याकडे बघून देखीलल कंटाळून जायची आणि शाळा संपल्या संपल्या सगळ्यांना टाटा बाय बाय करून झोपून जायची. मग ती दिवसभर मरगळलेली रहायची. शुगर कमी व्हायची. तो महिना असाच 'हो नाही हो नाही' करता करता संपला. मीही तिला फार बघण्याची जबरदस्ती करू शकले नाही.
सगळा एकत्र परिणाम म्हणा किंवा डोळ्यांचा त्रास म्हणा, पण तिचं डोकं अतिशय दुखायला सुरुवात झाली. मायग्रेनचा त्रास होतो तसा त्रास सुरू झाला. डोकं दुखायला लागलं की उलट्या मग पोट रिकामं झालं की ती झोपणार आणि शुगर कमी होणार. सुरूवातीला तर दिवस रात्रीतून तीनतीनवेळा हा त्रास झाला. डॉक्टरनी सांगितलेल्या गोळ्या सुरू केल्या. त्यांच्यामते हळूहळू हा त्रास कमी होईल. आठ दिवस गेले, पंधरा दिवस गेले, गोळ्या बदलत गेले. allopathy झालं, homeopathy झालं मग अगदी फुलांचे अर्क घातलेल्या गोळ्या दिल्या, acupressure सुद्धा सुरू केलं. त्रास कमी झाला पण तरीही लॅपटॉप मोबाइल, टॅब्लेटचा पडदा बघितला की त्रास होतोच. मला भीती वाटत होती ती तिला परत फिट्स येतील की काय याची. पण फिट्सच्या गोळ्या वेळेवर देत असाल तर मग फिट्सची काळजी करू नका असं डॉक्टर म्हणाले. मग थोडं हायसं वाटलं. पण मुख्य प्रश्न मिटला नाहीच म्हणून मग डोळ्यांच्या डॉक्टरना विचारलं तर ते म्हणतात तिला डोळ्यांना नंबर असणार आहे पण नेमका नंबर ती नीट काढून देणार नाही आणि चुकीचा नंबर असलेला नंबर आणि चष्मा तिच्यासाठी जास्त त्रासदायक ठरेल. त्यापेक्षा तिच्या डोळ्यांना कमीतकमी त्रास द्यायचा आणि डोकं दुखलं तर दुखणं थांबवायची गोळी तिला द्यायची हा एकच मार्ग आहे.
अखेर सुरू असलेली online कार्यशाळा तिला बघू न देणे इतकेच माझ्या हातात आहे. तिच्या आनंदापुढे तिच्या तब्येतीने हात टेकले असल्याने तिची प्रकृती महत्वाची हे नक्की.
अजून असंच lock down असेपर्यंत online कार्यशाळा वर्ग सुरू असतील पण त्यात आरोही नसेल याचं अंबिका मॅडम आणि इतरांना देखील वाईट वाटतं, कारण सगळ्यांना पडद्यावर बघितल्या बघितल्या आरोहीचा "नमस्ते, आप कैसे हो?" असा स्वर ऐकायची सवय झाली होती. कधीतरी आरंभच्या विशेष भागात थोडावेळ तिला सगळ्यांना भेटवून आता मी तिच्या डोळ्यासमोरचा लॅपटॉपचा पडदा बंद करते.
पण
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा