#कथा
#तेवत्या_आठवणी
ब्रिगेडियर विनोद (सेवानिवृत्त) रोजचा दमछाक होईपर्यंत सराव करुन आपल्या आवडीच्या आराम खुर्चीत बसले होते. शेजारच्या खिडकीतून येणारी, अंगाला स्पर्श करणारी कोवळी सूर्यकिरणे तापायला लागेपर्यंत त्या खुर्चीत ते आणि त्यांचे वाचन सुरू असे. शिसवी लाकडाने बनवलेली ती भारदस्त खुर्ची आणि त्यात बसलेले ब्रिगेडियर साहेब. पंधरा वर्षं झाले निवृत्त होऊन तरी तब्येत अजूनही एखाद्या तरुणाला लाजवेल अशी. भरदार मिशांचे केस पांढरे झाले म्हणून वाढलेलं वय वाटतं, नाहीतर आवाजाची धार अजूनही तितकीच एखाद्याला हुकूम देत आहेत अशी. ऊंची सहा फुटापेक्षा जास्तच, दणकट शरीरयष्टी, सैन्याधिकाराची चाल. कोणाच्या समोर उभे राहिले तर समोरच्याची बोलतीच बंद व्हायची. नजरेतील जरबच त्यांच्या कुशल कर्तव्याची ओळख होती. इतकी वर्षं झाली तरी कधी रोजचा सराव चुकला नव्हता. जेवणखाण, झोप, वाचन सगळं वेळेवर असायचं. पूर्ण कुटुंबाला त्यांच्या या दिनचर्येची सवय झाली होती. एक मिनिट पुढे मागे चालत नसे.
वर्षातला एक दिवस मात्र त्यांचा स्वतःचा खास असायचा. देशातीप्रेमाने, अभिमानाने, आनंदाने, उत्साहाने सळसळणारा. त्यादिवशी त्यांना त्यांच्या आठवणीत रमायचं असतं. समोर कोणी असेल तर त्याला त्या आठवणींचे एकेक पदर उलगडून दाखवायचे असतात. अगदी सुरुवातीपासून त्यांना स्पष्टपणे डोळ्यासमोर येत असतं. आज त्या सुवर्ण क्षणाचा सुवर्ण महोत्सव होता. मग काय मिनिट अन मिनिट त्यांना आठवायचं होतं, त्यात रमून जायचं होतं.....
पन्नास वर्षापूर्वीचा तो काळ ते मनोमन स्मरू लागले....
एखाद्या चित्रपटातल्या नायकाला देखील लाजवेल असं ते रूप होतं त्यांचं. सहा फुटाच्यावर ऊंची, पिळदार बाहू, गोरापान वर्ण आणि बोलण्यातला आत्मविश्वास त्यांची प्रतिमा अजूनच उजळवत असे. वडलांना लहानपणापासून आर्मी पोषाखात बघून बघून त्यांचं देखील सैन्यात भरती व्हायचं स्वप्न होतं. कळायला लागल्यापासून मैदानी खेळ, कवायत करून शरीर तगडे बनवले होतं जणू. वयाची सतरा वर्षे पार केली आणि त्यांनी सैन्यात भरती होण्यासाठी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी मध्ये प्रवेश घेतला. प्रबोधिनीमधील अतिशय खडतर प्रशिक्षण पूर्ण केले. भल्याभल्यांनादेखील नकोसा वाटणारा तो रात्रंदिवस करून घेतलेला सराव उत्तम रीतीने पूर्ण झाला होता. सहाध्यायी आता वेगवेगळ्या कामगिरीवर भारतभर विखुरले जाणार म्हणून पदवीदान समारंभ सगळ्यांनी मिळून झोकात साजरा केला होता. टोप्या वर उडवणे, गाणी आणि त्यावर थिरकणे, प्रशिक्षकांबरोबर झालेली पार्टी सगळं वेगळं आणि नवीन आयुष्याची सुरुवात असल्याचं जाणवत होतं. पुढील प्रशिक्षणासाठी आधी डेहराडूनला एक वर्ष आणि मग सैन्य इंजीनीरिंग कॉलेजमध्ये यंग ऑफिसर ट्रेनिंग कोर्सच्या प्रशिक्षणासाठी दाखल झाले. नावामागे देशाभिमान वाटावा अशी लेफ्टनंट ही पदवी लागली होती. कॉलेजमध्ये देखील युद्ध प्रशिक्षण सुरू होते.
सन १९७०/७१ चा तो काळ होता. प्रशिक्षण पुरे होण्यापूर्वीच भारत पाकिस्तान दुसर्या युद्धाचे बिगुल वाजले, लेफ्टनंट विनोद आणि समूहाला युद्धभूमीवर पाठवण्यात आले. जाण्यापूर्वी सगळ्यांना एकेठिकाणी एक दिवस युद्धनीती, कोड्वर्ड, त्यांना प्रत्येकाला पाठवण्यात येणारे ठिकाण, तिथल्या परिस्थितीची कल्पना दिली. त्यांनी कोणत्या कमांडरना रिपोर्ट करायचा ते सांगितलं. कमांडरनी दिलेल्या सूचना पाळायच्या आणि त्याप्रमाणे हमला करायचा. प्रत्येकाच्या हाताखाली काही जवान नेमून दिले. प्रत्येकाची ठिकाणं वेगवेगळी होती. दुसर्या दिवशी पहाटे, उजाडण्यापूर्वी हेलिकॉप्टरने एकेकाला त्याच्या तळावर उतरवले गेले. काळाकभिन्न अंधार, डोळे ताणून बघितलं तरी समोर काय आहे ते कळत नव्हतं. टॉर्च पेटवायची अनुमती नव्हती. हळूहळू डोळे सरावले. नाही म्हणायला एक दोन दिवसांपूर्वीच पोर्णिमा होऊन गेल्याने चंद्राच्या प्रकाशाने परिसर उजळला होता. पण राहुटयांना असलेलं कापड आणि जंगल सगळं सारखंच. खिशातला कंपास(दिशादर्शक होकायंत्र) काढला आणि दिशा बघून अंदाज घेतला. कोणतीच हालचाल शत्रूला कळू द्यायची नसल्याने सावकाशीने, सावधपणे हालचाली करणे भाग होते. अखेर एक जवान अचानक समोर आला आणि तो कमांडरकडे घेऊन गेला. त्यांनी पुन्हा एकदा परिसराच्या खाचाखोचा आणि रणनीती समजावली. अशारीतीने आयुष्यातल्या पहिल्या लढाईला लेफ्टनंट विनोद सामोरे जायला सज्ज झाले.
खरंतर त्यांना खडतर प्रशिक्षणानंतर पोस्टिंग येईल तिकडे जाण्यापूर्वी मित्रमंडळींना भेटायचे, घरच्यांबरोबर थोडा वेळ घालवायचा होता, आईच्या हातचे जेवण जेवायला मन आसुसले होते. पण जवान म्हणजे चोवीस तास अविरत, अथक देशसेवा हेच खरे.
०३ ते १६ डिसेंबर १९७१ असं तब्बल तेरा दिवस चाललेले युद्ध अखेर पाकिस्तानला शरणागती पत्करायला लावून संपुष्टात आलं. त्या तेरा दिवसात क्षणाक्षणाला 'माझे मरण म्या डोळा पाहिले' अशी अवस्था असायची. कधीही कुठूनही गोळीबार व्हायचा. सतत जागृत रहावं लागायचं. जवळच टाकलेला एखादा बॉम्ब फुटला की काळीज फुटून जाईल की काय असा कानठळ्या बसवणारा आवाज एकीकडे देशप्रेम जागवत शत्रूला नामोहरम करण्याची जिद्द वाढवत असायचा पण दुसरीकडे
या युद्धातून आपण सुखरूप घरी जाऊ की नाही याची भीती मनातला आवाज गोठवून टाकायचा. वेळ मिळेल तेव्हा पोटात चार घास घालायचे आणि एकाडएक पहारा देत दुसर्याला डोळे मिटायला, पुन्हा लढायला तरतरी यायला थोडावेळ विश्रांती द्यायची. त्यातच जर कमांडिंग ऑफिसरचा संकेत आला तर कुठली झोप आणि कुठले जेवण असं व्हायचं. पहिले चार दिवस तर कोणीच झोपू शकलं नव्हतं. फावल्या वेळात आपल्या बंदुकीची निगराणी राखायची. त्याचबरोबर काहीजण आपल्या कमरेला लावलेल्या खंजीर/कट्यारीला धार लावत असायचे. न जाणो शत्रू आमनेसामने येऊन ठेपला तर बंदूक उचलून नेम धरायला वेळ मिळाला नाही तर त्याऐवजी कमरेचा खंजीर शत्रूचा घात करायला कामी येईल, असा सरळ सरळ केलेला विचार.
'आत्ता तर सुरुवात आहे, अजून देशासाठी खूप घाम गाळायचा आहे देवा, नको मला इतक्यात मरण,' असा धावा करावा वाटायचं सगळ्यांना. आपले सहाध्यायी, हाताखालचे जवान युद्धभूमीवर शहीद होत असताना पाहून मन हेलावून जायचं. पण तितकाच शत्रूबद्दल रोष, बदला घ्यायची भावना वाढीस लागायची. अखेर १६ तारखेला शत्रूच्या शस्त्र समर्पण करण्याचा संदेश आला आणि हायसं वाटलं. तरीही तल्लख मन आणि सभोवार दृष्टी फिरत ठेवणं गरजेचं होतं. शत्रूला नामोहरम करून तिथेच आनंद लुटायचा तो क्षण नव्हता. शत्रूचे उध्वस्त केलेले बंकर आणि त्यात सापडणारा दारूगोळा एकत्र करायचा होता. एका उध्वस्त केलेल्या बंकरमध्ये डोळ्यात तेल घालून नजर फिरवत असताना अचानक एक ब्रीफकेस हाती लागली....
शत्रूच्या बंकरमध्ये हाती लागलेली ती ब्रीफकेस सावधपणे विनोदनी उघडली. आत रोजच्या वापरातल्या काही गोष्टी म्हणजे हातरुमाल, दाढीचे सामान, साबण, कात्री, वगैरे होत्या. त्याचबरोबर त्यात एक लिफाफा होता...
तो उघडून बघताच दिसली ती सुगंधी, गुलाबी कागदावर सुवाच्च अक्षरात लिहिलेली प्रेमपत्रं. पंधरावीस तरी प्रेमपत्रं होती. प्रत्येक पत्राची सुरुवात आणि शेवट प्रेमळ शेर लिहून केलेली होती. शत्रूत्वाच्या भावनेत देखील ते गुलाबी कागद त्या जवानाचा प्रेमळ कोपरा दाखवत होते. कोणाच्या प्रेमाच्या खाजगी भानगडीत न अडकता विनोदची शोधक नजर त्यावरच्या तारखांवर गेली. तेरा दिवसात इतकी प्रेमपत्रं? काहीतरी गणित चुकतंय. त्याचवेळी त्यावरच्या तारखेवरून काळात होतं की, त्यातली काही पत्रे तीन महिन्यांपूर्वीची होती. प्रेमाने ओथंबलेली प्रेमपत्रं आणि सोबत अतिसुंदर, देखण्या प्रेयसीचे फोटो. कोणाही तरुणाला मोहित करतील असे ते फोटो. वाचताना निश्चितच स्थळ काळ विसरून जायला होत असेल तिच्या प्रियकराला. रणांगणावर असताना त्याला वेगळीच ऊर्जा, जिद्द मिळत असेल. लढाई संपवून सुखरूप तिच्याकडे परत जायची इच्छाशक्ती तयार होत असेल, तिचा एकेक शब्द वाचून.
'आपली पण कोणीतरी अशी वाट बघत असेल का? ती लिहिल का अशी पत्र? आई पण आता घरी गेल्यावर मुलींचे प्रस्ताव समोर ठेवेल. सध्या इथे तर जगण्याची शाश्वती नाही आणि हा विचार नकोच ते.' लेफ्टनंट विनोद भानावर आले.
त्या पत्रांवरून निष्कर्ष असा निघत होता की, म्हणजे पाककडून या युद्धाची तयारी तीन महीने आधीच सुरू झाली होती. विनोदनी त्यातली दोन प्रेमपत्रं आणि तिचा फोटो स्वतःच्या ताब्यात घेतला आणि उर्वरित ब्रीफकेस जमा करणार होते. थोडयाचवेळात उत्तरेकडून एक गाडी येताना विनोदना दिसली. गाडी शत्रूच्या ताफ्यातली होती. लेफ्टनंट विनोद तिथेच बंदूक रोखून उभा राहिले. गाडी अगदी जवळ येऊन थांबली आणि एक अधिकारी खाली उतरला. त्यांना त्यांची शस्त्रं जमा करायची होती. ती कुठे करायची ते विचारत होता. विनोद त्यांना माझ्याबरोबर चला म्हणत होते. शस्त्रागार जरा दूर होते. त्यांनी विनोदनाच त्यांच्या गाडीतून चलण्याचा आग्रह केला. युद्ध संपलं असलं तरी शत्रूवर विश्वास कसा ठेवायचा, त्यांनी जर किडनॅप केलं तर? गाडीतच गोळ्या घातल्या तर? असा विचार त्याक्षणी डोक्यात आला आणि विनोदने त्या अधिकार्याला स्वतःच्या गाडीतून यायला सांगितलं, पाठोपाठ त्यांची गाडी. गाडीत बसण्यापूर्वी त्याची झडती देखील घेतली पण आक्षेपार्ह असं काही त्याच्याकडे नव्हतं. गाडी सुरू झाली आणि नीरव शांततेत फक्त गाडीचा आवाज येत होता. पूर्ण प्रवासात दोघेही काहीच बोलले नाहीत. विनोदना ते नुकताच सैन्यात दाखल झालेले आहेत हे त्याला कळू द्यायचं नव्हतं. दोन्ही गाड्या शस्त्रागाराकडे पोचल्या आणि विनोदनी रीतसर तिथल्या अधिकार्यांना सविस्तर माहिती दिली. अधिकारी विनोद आणि पाक अधिकारी बसले होते. सैन्यकारवाई सुरू झाली तेव्हा साहेब त्याला नाव, गाव विचारू लागले. त्या पाक अधिकार्याने त्याचं नाव 'कॅप्टन मन्सूर' असं सांगितलं आणि त्याच्या गावाचं नाव ऐकताच लेफ्टनंट विनोद पुरते उडालेच. 'अरे हा तर आपल्याच गावचा दिसतोय. असं त्यांना जाणवलं.' वडील पण सैन्यात असल्याने दर तीन वर्षानी होणारी बदली एकदा भारताच्या उत्तर सीमेला झाली असताना, विनोद परिवार त्याच गावात काही काळ राहिले होते. आश्चर्य म्हणजे ज्या शाळेत तीन वर्षं त्यांनी धडे गिरवले त्याच शाळेत तो अधिकारी पण शिकला होता. मग काय बर्याच वर्षांनी जुन्या शाळेतले कोणी भेटल्यावर बोलतात तसे ते दोघे बोलू लागले. त्या शाळेतल्या शिक्षकांवर, त्यांच्या शिकवण्याच्या लकबीवर, कोणाच्या रागीटपणावर तर कोणाच्या मृदुपणावर त्यांची चर्चा झाली. कॅप्टन मन्सूर विनोदपेक्षा वयाने दोन वर्षांनी मोठा होता. ते दोघं एकदम त्यांच्या शालेय जीवनात रमून गेले. कारवाईची प्रक्रिया पूर्ण झाल्याचा निरोप आला आणि त्यांच्याकडील शस्त्रसाठा जमा करून पुन्हा आल्यापावली परत निघाले. पुन्हा तसेच, विनोद आणि मन्सूर एका गाडीत आणि बाकीचे मागोमाग. आता दोघांच्याही मनात भीतीचा लावलेश देखील नव्हता. फक्त भारताने युद्ध जिंकले होते आणि ते भारताचे युद्धकैदी होते. गाडीत बसल्यावर विनोदना एकदम त्या ब्रीफकेसची आठवण झाली....
त्या पत्रांवर नाव कधी मनू तर कधी मन्सूर असेच होते म्हणून त्याला त्या ब्रीफकेसबद्दल विचारलं.
विनोदचा प्रश्न संपता संपताच एक लाजेची लकेर आणि आनंदाने चमकणारे डोळे त्यांना दिसले. मग त्याला विनोदनी आपल्या राहुटीकडे नेलं आणि ती ब्रीफकेस दाखवली. प्रेमपत्रांबद्दल विचारलं तर तो थोडासा लाजलाच. त्याला स्वतःकडे ठेवून घेतलेली सर्वात जुनी दोन पत्रं दाखवली आणि फोटो ठेवतोय, असं सांगितलं तर खरं, पण नंतर त्यांना स्वतःचीच स्वतःला लाज वाटली आणि तो फोटो त्याला परत केला. त्याची प्रश्नार्थक नजर खूप काही विचारून गेली. विनोद म्हणाले, ''असा जर माझ्या प्रेयसीचा फोटो कोणी ठेवून घेतला असता तर मला ते आजिबात आवडलं नसतं आणि म्हणूनच मी हा फोटो तुला परत करतोय. ही दोन दोन पत्रं मात्र मी आठवण म्हणून माझ्याजवळ सुरक्षित ठेवेन.'' त्याला बंदी म्हणून नेण्यापूर्वी मात्र न राहून दोघांनी एकमेकांना कडकडून मिठी मारली. शत्रू असले तरी त्याक्षणी शाळासोबती म्हणून ही भेट होती.
त्याला सांगितल्याप्रमाणे विनोदनी त्या दोन पत्रांची फ्रेम करून घेतली. पण मग त्यांच्या पत्नीने ती फ्रेम घरी आणण्यास सक्त मनाई केली. ठराविक वर्षांनी बढती मिळत मिळत लेफ्टनंट विनोद नंतर कॅप्टन, कर्नल आणि शेवटी ब्रिगेडियर पदावर विनोद पोचले. त्यांच्या प्रत्येक ठिकाणच्या ऑफिस केबिनच्या भिंतीवर ती पत्रं दिमाखात विराजमान असायची. त्यांच्या सेवानिवृत्तींनंतर मात्र ती घरी आणायला बायकोने परवानगी दिली. दरवर्षी या दिवशी ब्रिगेडियर साहेब त्या पत्रांकडे टक लावून बघत बसायचे. ती नुसती प्रेमाची निशाणी नसून भारतीयांच्या जेतेपदाची आठवण होती.
कॅप्टन मन्सूरची आठवण जशी मनात आयुष्यभर कोरली गेली होती तशी अजून एक ब्रिगेडियर अस्लम यांची आठवण ब्रिगेडियर साहेबांच्या मनात साठून राहिलीय...
पाकिस्तानची कोंडी करून यश टप्प्यात आलं होतं. गोळीबारी कमी झाली होती, शत्रूला शरण येण्याचं आवाहन करत होते. भारताचे ४००० आणि पाकचे त्याच्या दुपटीने सैनिक मारले गेले होते. त्यावेळी नुकतेच लेफ्टनंट झालेल्या विनोदना आपल्या कारकिर्दीची सुरुवातच युद्धापासून होईल असा विचार देखील मनात आला नव्हता. आता सेवानिवृत्तींनंतर ते अभिमानाने सांगत असतात की, त्यांच्या पूर्ण तीस वर्षांच्या कारकिर्दीत जितके प्रसंग आले असतील, त्यापेक्षा सुरुवातीच्या युद्धाच्या एका महिन्याच्या काळात आलेले अनुभव त्यांना सर्वात जास्त समृद्ध करून गेले. एक रक्षक म्हणून, एक माणूस म्हणून, एक जबाबदार नागरिक म्हणून, असा सर्वतोपरी आकाराला आलो असं त्यांना वाटतं. तसं पाहिलं तर इनमीन विशी पार केलेला एक तरुण होते ते तेव्हा पण एक जबाबदार सैन्य अधिकारी बनायला ते अनुभव नक्कीच उपयोगी आले. शत्रूकडून रोज वेगळी आखणी, रोज वेगळी संकटं सामोरी यायची. स्थितप्रज्ञ राहून योग्य तो निर्णय घेणे आणि तोही तत्काल घेणे गरजेचं असतं.
ब्रिगेडियर विनोदना आठवतेय ती पहाट अजूनही. युद्ध संपायच्या दोन दिवस आधीची पहाट, पूर्वेकडे सूर्योदयाची चाहूल लागत होती. उजाडता उजाडता शत्रू कधी कुठे गोळीबारी सुरू करेल त्यावर जवानांचं लक्ष असायचं. सगळ्यांनी डोळ्यात तेल घालून, कान टवकारून नेहमी तयारच असलं पाहिजे अशी ती वेळ होती. डोक्यावर हेलिकॉप्टरची घरघर ऐकू आली म्हणून विनोद आणि त्यांचा सहकारी राहुटीच्या बाहेर आले. हेलिकॉप्टर शत्रूपक्षाचं होतं. सध्या सगळ्यांनाच उठता बसता मोबाइल हातात लागतो तसं, त्यावेळी त्यांच्या हातात आमच्या बंदुका ठेवाव्या लागत होत्या. जवळ शस्त्रसाठा होताच. ते तेरा दिवस कोणी कधी झोपायचे आणि कधी उठायचे ते कोणालाच कळत नव्हतं. लक्ष्य एकच, 'शत्रूला नामोहरम करायचं.' ते हेलिकॉप्टर त्यांच्या टप्प्यात आलं आणि त्यांनी त्यावर नेम धरला. ते जमिनीवर कोसळणार इतक्यात त्यातून दोन पॅरॅशूटधारी बाहेर पडताना दिसले. त्या दोघांना बंदी करायला जवानांना घेऊन विनोद धावले. त्या दोघांना सहीसलामत पकडून त्यांना बॉसकडे म्हणजेच कमांडर, ब्रिगेडियर माखिजांकडे घेऊन गेले. दोघांच्या पोषाखावरुन त्यातील एक कर्नल आणि दुसरे ब्रिगेडियर आहेत ते समजलं. ब्रिगेडियर अस्लम त्यांचं नाव. आता ते युद्धकैदी होतील, त्यांना बंदी बनवलं जाईल. त्यांचे हाल हाल करतील असा विनोदचा कयास होता.
परवानगी घेऊन ते ब्रिगेडियर माखिजांच्या केबिनमध्ये दोघांना घेऊन शिरले. एक नजर पुरेशी होती, दोघांना एकमेकांची ओळख लागायला. ब्रिगेडियर माखिजां उठले आणि, 'अस्लम तू? कया बात, कितने दिनो बाद?' असं म्हणत दोघांनी एकमेकांना कडकडून मिठी मारली. विनोद ते दृश्य बघतच राहिले. पॅरॅशूट घेऊन उडी मारलेला आणि त्यानंतर त्यांच्या ताब्यात आलेला तो अधिकारी ज्या तणावाखाली वाटत होता आणि त्यांना सहीसलामत पकडलेली विनोदची टिम उल्लेखनीय कामगिरी बजावली म्हणून अभिमानाने, ताठ मानेने उभे असताना एकदम असा विरोधाभास पहायला मिळणं म्हणजे आक्रीतच की.
खरं आक्रीत तर पुढे होतं...
कमांडर ब्रिगेडियर माखिजां, ब्रिगेडियर मधुसुदन आणि ब्रिगेडियर अस्लम हे तिघे अलिगढ विद्यालयात एकत्र शिक्षण घेतलेले. गंमत म्हणजे तिघेही रूम पार्टनर. दोन वर्षं एकत्र राहिलेले. शिक्षण पूर्ण झाले आणि सैन्यात सामील झाले. त्याच दरम्यान फाळणी झाली. अस्लमचे गाव पाकिस्तानात म्हणून ते पाक सैन्यात दाखल झाले आणि हे दोघं भारतीय सैन्यात. मग काय दोघांच्या जुन्या आठवणी काढत गप्पा सुरू झाल्या. विनोद त्यावेळी मागे उभा राहून आ वासून ऐकत होते. फाळणी नंतर तब्बल तेवीस चोवीस वर्षांनी भेटत होते दोघं आणि तेही असे अनपेक्षितपणे. गप्पा संपल्या की दोघांना कैद करायची होती. विनोद कागदोपत्री कारवाई होईपर्यंत वाट पहात उभे होते. 'आता भेटुच पुन्हा' असं म्हणत दोघांनी पुन्हा एकदा गळामिठी मारून एकमेकांचा निरोप घेतला.
विनोदना समोरचं दृश्य भारत पाक क्रिकेट मॅच सारखं वाटत होतं, मैदानावर शत्रू आणि मॅच संपली की मित्र. पण मग विनोदनी परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेतलं आणि पुढची कारवाई करण्यासाठी मदत केली.
सगळ्या शरणागतांना/पाक कैद्यांना काही काळानंतर सोडून दिले तेव्हा त्यांनी भारतीयांबद्दल आदर व्यक्त केला आणि कैदी असून देखील चांगली वागणूक दिल्याबद्दल आपल्या सरकारकडे भारताची प्रशंसा केली.
आता पन्नास वर्षांनी देखील ब्रिगेडियर विनोदना सगळं जसंच्या तसं डोळ्यासमोर उभं रहातं.
कर्तव्य बजावत असताना कमांडर ब्रिगेडियर माखिजांच्या केबिनमध्ये जायचे तेव्हा भिंतीवर असलेला या तिघांचा कॉलेजवयीन एकत्रित फोटो नेहमीच या क्षणाची आठवण द्यायचा.
या पन्नास वर्षात त्यापैकी कोणत्याच पाक अधिकार्यांच्या संपर्कात रहाता आलं नव्हतं. अखेर शत्रू ते शत्रूच ना? पण वाटतं खरंच ते शत्रू होते का, आहेत का? कधीतरी संपर्क करायचा प्रयत्न करायची इच्छा झाली तरी करता येत नव्हता कारण लगेच देशद्रोही म्हणून आरोप व्हायला कमी केलं नसतं कोणीही.
प्रत्येक देशाने आपल्या सीमारेषेच्या आत आनंदी, समाधानी, प्रगतिशील रहायला काय हरकत आहे?
का उगाच दुसर्याच्या जागेवर आक्रमण करून जागा बळकवायला बघायचं?
का दुसर्या देशाला पाण्यात पहायचं?
का आपल्या जवानांना दुसर्या देशात दंगे करायला पाठवायचे आणि त्यांच्या जीवाशी खेळायचं?
का का आणि का याचं उत्तर नाहीच.....
राजेश्वरी
१६/११/२०२१
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा