मंगळवार, १६ नोव्हेंबर, २०२१

वाचन वेडे स्पर्धा

 

संवर्धन मराठीचे


'संवर्धन' कसा आहे ना शब्द? पर्यावरण संवर्धन, संस्कार संवर्धन, निसर्ग संवर्धन, वृक्ष संवर्धन.... आणि यातच मातृभाषा/मराठी संवर्धन, मराठी संस्कृती संवर्धन... 

वेगळं काय करायचं असतं यासाठी? कोणी काय केलं, हा विचार मनात येतो तेव्हा आठवतात त्या काही व्यक्ति ज्यांनी  मातृभाषा, मराठी साठी काहीतरी आगळा वेगळा उपक्रम केला. जसा माझ्या माहितीतला गंधार कुलकर्णी भारतभर सायकलने फिरला फक्त मातृभाषेचा प्रसार करायला.  कै. सुधीर देव यांनी तब्बल पन्नास वर्षांपेक्षा जास्त काळ मराठीच्या संवर्धनासाठी अनेक उपक्रम केले. परदेशात किंवा परराज्यात राहून देखील मराठी संवर्धन करणारे अनेक समूह आहेत. खूप छान छान कार्यक्रम ते आयोजित करत असतात. माझ्या काही मैत्रिणी आहेत, ज्या परदेशात राहून आपल्या मुलांना शुद्ध आणि स्पष्ट मराठी बोलायला आणि वाचायला शिकवतात. अगदी संध्याकाळी परवचा, श्लोक, आरत्या म्हणायला शिकवतात, सगळे मराठी सण समारंभ साग्रसंगीत साजरे करत असतात. खूप समाधान वाटतं असं पाहिल्यावर. मराठी माणसाने खरं तर प्रत्येकाने घरात जाणूनबुजून मराठी बोललं पाहिजे. मराठी पुस्तकं वाचली पाहिजेत. पण असं पुस्तक वाच म्हणून सांगून थोडीच आपली मुलं पुस्तकं वाचणार आहेत? त्यासाठी काहीतरी युक्त्या शोधाव्या लागतात. कधी आवडलेल्या पुस्तकातील उतारा मुलांना वाचून दाखवला पाहिजे, तर कधी त्या पुस्तकाचा सारांश मुलांना सांगितला पाहिजे. माझी एक मैत्रीण आपल्या मुलाला आणि गुजराती सुनेला मराठी पुस्तक वाचून दाखवते. 

खरंच मराठी साहित्यात प्रचंड विविधता आहे. फक्त वाचणारं मन पाहिजे. 

नुकतंच मला एका स्पर्धेबद्दल कळलं. मराठी साहित्याची उकल, परीक्षण करण्याची नजर आणि वाचनवृद्धी करण्यासाठी आयोजित करत असलेला एक अनोखा उपक्रम...    

एक दिवस फोनची रिंग वाजली. मॅडमनी सुरूवातीला नाव गाव सांगितलं आणि प्रास्ताविक बोलणे झाल्यानंतर म्हणाल्या, “निकोबारची नवलाई” पुस्तक आमच्या ‘वाचन वेडे’ मध्ये सर्वात जास्त चर्चिलं गेलेलं पुस्तक आहे. सर्वांना फार आवडलं आणि वाचन वेडे स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे." याखेरीज अजून एक विनंती होती, "या कार्यक्रमाच्या उपांत्य फेरीसाठी तुम्ही प्रमुख पाहुण्या म्हणून याल का? उपांत्य आणि अंतिम फेरी १५ ऑगस्टला आहे." शेवटी असा प्रस्ताव मांडला. हा फोन करणार्‍या साधना पाटील या मराठी चित्रपट सेन्सॉर बोर्डाच्या सल्लागार सदस्य आहेत. म्हणजे, भारतातील विविध भाषेत तयार होणार्‍या प्रत्येक चित्रपटांना या सदस्यांनी मान्यता दिल्याशिवाय, प्रशस्तीपत्र दिल्याशिवाय ते चित्रपट पहायला आपणापर्यंत पोचत नाहीत. त्यांचं बोलणं ऐकून मी क्षणभर स्तब्धच झाले. 

"काय आहे ही स्पर्धा? मला याबद्दल काहीच माहीत नाही. जरा माहिती देता का?"

यावर्षी स्पर्धेचं हे तिसरं वर्ष होतं. जसजशी मॅडम माहिती सांगत गेल्या तसतशी उत्सुकता ताणली गेली. 

दीड एक महिना चालणारी ही मेजवानी होती माझ्यासाठी. त्यात तिखड, गोड, कडू, आंबट रस होतेच पण साहित्याची पंचपक्वान्न देखील पुरेपूर होती.

एखादं पुस्तक कसं वाचावं? वाचनालयात गेल्यावर आपण पुस्तक हातात घेताना काय विचार करतो? 

सुरूवातीला मुखपृष्ठ बघतो, नाव बघतो आणि मलपृष्ठ बघतो. ते आवडलं, मनाला भावलं तर हातातलं पुस्तक उघडून मधेच एखाद्या पानावरच्या चार ओळी वाचून बघतो. त्यातली भाषा कशी वाटते ते बघतो. बरं वाटलं तरच घरी घेऊन येतो. स्वतःला विकत घ्यायचं असेल तर चिकित्सा अजून जास्तच करतो. 

पुस्तक आणलं, वाचलं की ठेवून देतो किंवा जवळच्या कोणाशी त्याबद्दल बोलतो. काही पुस्तकं मनात खोलवर रुतून बसतात, विचार करायला लावतात, त्याविषयी कोणाशी तरी बोलायला भाग पाडतात, आपल्याला जाणकारांना भेट द्यायला भाग पाडतात. बस्स इतकंच. 


वाचन वेडे काय करतात? पुस्तकाकडे कसे बघतात? नाही...  त्यांना बघायला लावतात, डॉक्टर क्षितिज कुलकर्णी, जे स्वतः एक उत्तम लेखक, दिग्दर्शक आणि एक सुजाण पुस्तक प्रेमी आहेत. त्यांच्या पुढाकाराने ही संकल्पना साकारलीय आणि त्यातूनच ही स्पर्धा आकाराला येतेय. 

स्पर्धेत सामील होण्याचा निकष एकच, तुम्हाला पुस्तक कसं वाचावं याची जाण असली पाहिजे. डॉक्टर दर वर्षी ही स्पर्धा आयोजित करतात आणि विशेष म्हणजे दरवेळी स्पर्धेत स्पर्धकांना दिलं जाणारं कार्य वेगवेगळं असतं. त्यामुळे स्पर्धेची उत्सुकता अखेरपर्यन्त ताणली जाते. याखेरीज ही स्पर्धा सोडूनही डॉक्टर सतत त्यांच्या 'शतकोटी' नावाच्या समूहाला वेगवेगळे विषय, संकल्पना देऊन प्रोत्साहित करत असतात. त्यांनी दिलेल्या विषयांची विविधता आपल्या मनातील विचारांना सतत कार्यरत ठेवते, निरीक्षणशक्ति वाढवते, सादरीकरणाचे धाडस वाढवते. फेसबूकवर सुरू केलेल्या  'झपूर्झा' पानामधून आपल्याला त्यांच्या 'अजेय' संस्थेबद्दल अद्ययावत माहिती जाणून घेता येते.

'अजेय' ही डॉक्टरांनी स्थापन केलेली नाट्यसंस्था आहे. या संस्थेमध्ये महिन्याला एक उपक्रम, साहित्यिक कार्यक्रम, शॉर्ट फिल्म, नाटक, एकांकिका, फीचर फिल्म, वेब सिरिज अशा अनेक माध्यमातून कलाकारांना संधी मिळत असते, या उपक्रमातून कलाकारांची कला उमलत रहाते, बहरत जाते.  गेल्या दहा वर्षांपेक्षा जास्त काळ त्यांचं हे कार्य सुरू आहे. स्वतः डॉक्टरांनी 'New techniques of acting in digital age' हा विषय घेऊन डॉक्टरेट मिळवली आहे. त्यांची 'चिंब', 'कट्टा', 'H2O'  ही पुस्तकं प्रकाशित झाली आहेत.  

त्यांच्या या चळवळीत सहभाग घेणार्‍या आणि  सहाय्य करणार्‍या साधनाताई पाटील, गौरव संभूस आणि इतर अनेक उत्साही कलाकार त्यांच्या टीम मध्ये आहेत.    

या स्पर्धेसाठी डॉक्टर आधी स्वतः आणि त्यांच्या समूहातील इतरांनी वाचून अभ्यासलेली पुस्तकांची यादी तयार करतात. 

स्पर्धकांनी आपलं नाव नोंदवायचं, गट तयार करायचा आणि मग  गटाने यादीतील पाच पुस्तकं निवडायची. बस्स, मग सुरू होते स्पर्धा. 

यावर्षी एका गटात सात स्पर्धक असे एकूण आठ गट होते. प्रत्येक गटाचे नाव देखील त्यांनी निवडलेल्या पुस्तकातील एका पुस्तकाचंच ठेवलं. जसं - स्मृतिचित्रे, कोसला, पैस, ययाती, विशाखा, मृत्युंजय वगैरे...  गट विभागणी करून झाली की, चर्चा करून थोडक्यात त्यांना करावे लागणारे कार्य समजावून सांगितलं जातं. दर तीन दिवसांनी एक कार्य दिलं जातं. यावेळी मी पाहिलेल्या स्पर्धेतील काही कार्ये आणि निरीक्षणे.....

१. पुस्तकाचे मुखपृष्ठ पाहून तुम्हाला काय वाटलं? त्यातून पुस्तकाबद्दलची काय माहिती मिळते? 

  • बापरे! स्पर्धकांनी मुखपृष्ठावरील फोटो, चित्र पाहून कायकाय निष्कर्ष काढले ते फारच कौतुकास्पद होते. त्यावरचा पांढरा, लाल रंग काय दर्शवतो, शिडी काय दर्शवते, नदी, डोंगर, माणूस, हिरवळ, समुद्र, लाटा..... त्यांचे पुस्तकाप्रमाणे अनेकाविध अर्थ काढले या स्पर्धकांनी.

२. तीच प्रक्रिया होती मलपृष्ठाबद्दल काय वाटतं याची. त्यातही मी न पाहिलेल्या पुस्तकाचे देखील मलपृष्ठ माझ्या डोळ्यासमोर आलं. 

3. गाडी पुढे गेली ती अर्पण पत्रिकेवर. तुम्ही निवडलेलं एक पुस्तक कोणाला आणि का अर्पण केले? त्याबद्दल तुम्हाला काय वाटते? 

४. पुस्तकातला आवडलेला उतारा सादर करायचा. यात अभिनय आणि सादरीकरण आवश्यक. 

  • सादरीकरण बघत असतांना तर मला एकपात्री प्रयोगच बघत असल्याचा भास होत होता.           

५. थोडक्यात पुस्तकाबद्दल आपलं मत मांडायचं. 

  • हे कार्य मात्र अचंबित करून गेलं. कोणी भारुड रचून आणि गाऊन, तर कोणी द्विपात्री एकांकिका करून, कोणी बुरगुंडा भारुड सादर करून पुस्तकाचं विश्लेषण केलं, तसेच कोणी छान काव्य रचून किंवा साधे सरळ लेखामधून विचार मांडले. एक पुस्तक वाचून त्यावर आपल्याला भावलेल्या मुद्द्यांवर अशी रचना करणं आणि तेही दोन दिवसात, अगदीच कौतुकस्पद होतं. 

६. पुस्तकातील आवडलेले एखादे विधान किंवा वाक्य सांगा. 

  • इतक्या पुस्तकाच्या पानांमधून एक विधान शोधून ते का आवडलं सांगणं खरंच कठीण काम होतं. 

७. लेखकाची शैली कशी वाटली? 

  • इतक्या बारीक नजरेतून, शब्दाशब्दातून लेखकाची शैली वेगळी असते हे कळायला किती प्रचंड वाचन केले पाहीजे...  

८. पुस्तकातल्या एखाद्या व्यक्तिरेखेवर बोला. 

  • ती व्यक्तिरेखा कणखर, खंबीर का वाटली? त्यातून काय विशेष जाणवलं? नकारात्मक भूमिका कोणती वाटली? स्पर्धकांच्या सादरीकरणातून अशा अनेक व्यक्तिरेखा कळत होत्या. उलगडत होत्या. 


९. पुस्तकात लिहिलेला एखादा प्रसंग तुम्हाला अजून वेगळा कसा मांडता आला असता ते सांगा. 

  • याचं उत्तर ऐकायला देखील मजा आली. कारण पुस्तक लिहिताना लेखकाने केलेला विचार आणि वाचकाने वाचताना केलेला विचार कसा भिन्न असू शकतो ते जाणवत होतं. 

१०. पुस्तकात कोणत्या प्रसंगातून नकारात्मक विचार पहायला मिळाले? 

११. हे पुस्तक तुम्ही का निवडलं? 

  • याचं उत्तर देताना स्पर्धकाने किती विविध अंगांनी त्या पुस्तकाचं परीक्षण केलं ते दिसून आलं.

१२. अंतिम फेरीत तर त्या पुस्तकामधून असे काही प्रश्न काढले की, त्याची फक्त एक ते दोन वाक्यात उत्तरं द्यायची आणि ती देखील फक्त एक मिनिट विचार करून.   


दर आठवड्याला असे कार्य दिले जायचे आणि स्पर्धक आपलं साहित्य ज्ञान, कौशल्य पणाला लावायचे. प्रत्येकजण अतिशय सुंदररीत्या आपले विचार मांडायचे. त्यांच्या विचारातून मला देखील काही वाचलेल्या पुस्तकातील खाचाखोचा लक्षात आल्या. 

स्पर्धा संपल्यावर मला एका स्पर्धकाचा फोन आला. तिने ‘निकोबारची नवलाई’ हे पुस्तक अभ्यासासाठी निवडलं होतं. पुस्तकाबद्दल तर ती भरभरून बोलत होतीच पण पुस्तकाच्या नावावरून तिने जो काही विचार केला तो खरं तर मी किंवा संपादकांनी नाव ठरवताना केला नसेल असंच वाटलं. ती म्हणाली, "नवलाई वाचायला सुरुवात केली तेव्हा जाणवलं की या पुस्तकात सुरुवातीपासूनच कित्येक गोष्टी अशा आहेत की ज्या वाचून आपल्याला नवलच वाटते. कारण त्या काही गोष्टी आपल्या रोजच्या जगण्याचा कधीच भाग झालेल्या नव्हत्या, म्हणून नवलाई हे नाव सार्थ ठरतं. असं असून देखील शेवटी एका भागात बदलत जाणारं निकोबार आहे. तो भाग वाचून जाणवलं की, त्सुनामीनंतर त्या स्थानिकांची बदललेली परिस्थिति ही त्यांच्यासाठी एक नवलच आहे. कित्येक अनभिज्ञ गोष्टी त्यांना आता अनुभवायला मिळू लागल्यात. म्हणजे वाचकांसाठी निकोबार हे नवलाईपूर्ण आहेच पण निकोबारींसाठी देखील त्यांचं बदलतं जग देखील सगळं नवलाईपूर्ण घडलं आहे. याच दोन कारणांसाठी पुस्तकाचं नाव 'निकोबारची नवलाई' अगदी सार्थ ठरतं." तिचं हे वक्तव्य ऐकून मी खरंच अगदी अवाक झाले. 

मराठीच्या पदवी परीक्षेत तरी मुलांनी असा विचार केला असेल की नाही माहीत नाही पण या स्पर्धेमुळे मला पुस्तक हातात घेतल्यावर काय काय आणि कसं निरीक्षण करायचं हे मात्र निश्चित कळलं.    

वाचन वेडे बद्दल मला वाटतं... 


वाचन वेडे ही स्पर्धा नसून एक संकल्प आहे...

वाचन वेडे ही स्पर्धा नसून एक संकल्प आहे...

संकल्प आहे...

वाचन वृद्धी करण्याचा... 

साहित्य अभ्यासण्याचा... 

आणि

साहित्यिकांना समजून घेण्याचा...


वाचन वेडे ही स्पर्धा नसून एक संकल्प आहे... 

संकल्प आहे...

अभ्यासू वाचक निर्माण करण्याचा...

रंगमंचावर आपलं मत सादर करण्याचं धारिष्ट्य दाखवण्याचा... 

आणि

साहित्यातील विविध पैलू उलगडून दाखवण्याचा...

 

वाचन वेडे ही स्पर्धा नसून एक संकल्प आहे... 

संकल्प आहे...

लोककला मनामनात रुजवण्याचा...  

इतरांचे विचार समजण्याचा... 

आणि

त्याच बरोबर आपल्या विचारांना साकारण्याचा... 

वाचन वेडे ही स्पर्धा नसून एक संकल्प आहे. 


या समुहाच्या पुढील वाटचालीतील उपक्रमांसाठी सर्व वाचन वेड्यांना शुभेच्छा !!


-  राजेश्वरी 

२४/०८/२०२१


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

पाचोळा - कुसुमाग्रज

कविता रसग्रहण    पाचोळा - कुसुमाग्रज आडवाटेला दूर एक माळ तरू त्यावरती एकला विशाळ आणि त्याच्या बिलगूनिया पदास जीर्ण पाचोळा पडे तो उदास उषा ये...