मंगळवार, १६ नोव्हेंबर, २०२१

 मी एकटी??

"आई, पेपर दे ग जरा."
"अरे मी कोडं सोडवतेय ना.."
"सोडव ग नंतर. तुला काय काम आहे नाहीतरी. आरामात सोडवत बस. मला जरा घाई आहे. चाळतो पेपर आणि देतो मग तुला."
"बरंचसं सोडवलं पण एकाच शब्दासाठी गाडी अडकलीय.. सांग ना रे, तुला तो शब्द आठवतोय का?"
"आई, आता दुपारी बघू. आत्ता आजिबात वेळ नाहीये मला."
आजकाल असं का होतंय? काही कळत नाही. पेपरात कोडं सोडवायला बसले तर शब्दच आठवत नाहीत. कुठे गेले ते डोक्यातले सगळे शब्द? सगळेच सुट्टी मिळाल्यासारखे खेळायला गायब झालेत. कुठे शोधू आता त्यांना? रोजच्या वापरातले तर आहेत. तो एक उभा काय आहे? पाच अक्षरी, नद्यांचं समोरासमोर भेटणं... काय बरं म्हणतात? मिलन? नाही मग काय? का आठवत नाहीये. पूर्वीपासून कित्येक वर्षे तर मी रोज जायचे घराजवळच्या, नदीच्या घाटावर...देवाला नमस्कार करून पायर्यांवर नदीकडे बघत तर बसायचे की...आजकाल बाहेर जाणं राहिलं तसं नदीचं दर्शन देखील राहिलं. पुन्हा एकदा जाऊन बघू या का, कदाचित तिथं गेल्यावर आठवेल तो शब्द.
पायात चपला अडकवल्या आणि निघाले, मी मला न आठवणारा शब्दच शोधायला...
आठवेल का तिथं गेल्यावर? जाऊन तर बघू. "नकोच पण, इतक्या लांब जाण्यापेक्षा गच्चीवर झोपाळ्यावर बसू."
मुलाने जोपासलेल्या गच्चीवरच्या बागेत फिरू, झोके घेऊ, विसाव्याला बाकडी पण आहेतच की. लॉनच्या गालिच्यावर पाय मोकळे करू...
या झोपाळ्यावर झोके घेत बसलं की मन कसं शांत शांत होत जातं. शांत संथ लयीत, डोळे बंद करून एकेका पायाने झोका घ्यायची ही जुनीच आवड माझी. कधीतरी मुलाला बोलून दाखवली आणि त्यानं ती वयाच्या सत्तरीला पूर्ण केली. पूर्वी सारखं उंचावर जाणं झेपत नाही आताशा पण संथ झुलत रहायला आवडतं. मनाच्या मनाशी गप्पा मारता येतात मग. सध्या माझ्याशी बोलायला वेळ तरी कोणाला आहे? खाऊन पिऊन सुखी असलं की झालं का सगळं? कोणालाच कसं वाटत नाही, थोडावेळ बसावं, हालहवाल जाणून घ्यावा माझा.
खरं तर आज चार तारीख.. आज माझा वाढदिवस. कितवा? वयाची फक्त पंच्याहत्तरी पूर्ण होतेय आज...
कोणाच्या लक्षात तरी आहे की नाही काय माहीत.
मागच्या वर्षी मस्त घाटावर साजरा केला होता. नदी काठी पायऱ्यांवर बसून. सगळं कुटुंब एकत्र गोल करून बसलो होतो. सगळे खुशीत, हसत होते. मीही त्यात सामील होतेच की. आवडती भेळ, डोसा, पाणीपुरी आणि काय काय मागवलं होतं...
आज वाटतं, पडावं बाहेर, बागडावं मनासारखं. कित्येक वर्षांच हे माझं स्वप्न पुरं करावं. पण... पण झेपेल का बाई तुझ्या शरीराला? त्यापेक्षा हा झोपाळा बरा आहे की.
खरं तर, आयुष्याच्या उदयाला बघितलेलं मनसोक्त बागडण्याचं स्वप्न किमान मावळतीला तरी पूर्ण करू या. अस्ताला जाताना मनात रुखरुख नको रहायला, नुसतं स्वप्न बघितलं, सत्यात उतरवायचा प्रयत्न देखील केला नाही, असं आजकाल सारखं वाटत रहातं. शब्दशः बागडणं आता थोडंच जमणारं आहे, सगळं कसं आभासी करायचं...
काहीही झालं तरी आजचा दिवस माझा, असं ओरडून सांगावं वाटतं सगळ्यांना पण आवाज कुठे फुटतोय आताशा.
कधी कधी ओढून ताणून आणलेले ते कोणाचे खोटे खोटे मुखवटे, नको वाटतात मला बघायला. त्यांच्या सांगण्यावरून वागणे, आजचा दिवस साजरा करणे सहन होत नाही. पण विरोध करायला जमलंच नाही मला कधी. पण आज थोडंसं बंड पुकारू या. बघूया, काय होईल ते होईल...
का कोणाला कधी वाटलं नाही विचारावंसं, 'बाई गं काय पाहिजे तुला? काय आवडतं तुला?' आजच्याच काय पण इतर कोणत्याही दिवशी विचारलं कोणी? छे, कधीच नाही...
गोड बोलून फायदा करून घेतात सगळे. आता बास. किती दिवस मी यांच्या तालावर नाचायचं? आणि का? जाऊ या बाहेर, वाट फुटेल तिकडे. बंड करून उठूया असा विचार कित्येकदा मनात आला.
डोंगर कपारीत शिरू या. हिरव्या गार रानाचा वास मनात भरून घेऊ या. वरुन येणाऱ्या खळखळत्या झऱ्याला निरखत बसू या. त्याचा आवाज कानात भरून घेऊ या...
बागडणारी फुलपाखरं बघत बसू या. सूर्यकिरणांनी चमकणारे, वाऱ्याने डोलणारे गवतफूल बघत बसू या. वाऱ्याच्या झुळुकेबरोबर त्याच्याबरोबर आपण पण डोलू या...
काय करू नी काय नको अस्सं होतं कधी कधी, पण ते देखील फक्त मनातल्या मनात.
आज मी अशी एकटीच झुलत बसलेय आणि मनात विचारांची आंदोलनं झुलताहेत माझ्याबरोबर. या आधी कधी अशा मनाशी गप्पा मारल्या, ते आठवत पण नाही...
का आपण असं स्वतःला घरात कोंडून घेतलं? का नाही मोकळं होता आलं मला. सगळंच का इतरांनी वागवलं तसं वागले मी? का का आणि फक्त का?
प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते हे कबूल आहे, पण इतक्या उशिरा?
मनातल्या हिंदोळ्याबरोबर पावलं देखील एका लयीत उचलली जात आहेत... वेग वाढत चाललाय. इथे तिथे कुठे बघावं असं देखील वाटत नाहीये...
मन मात्र मागं मागं खेचतंय मला. मनातली तगमग शरीराला झेपत नाहीये आताशा...
झोका थांबवून कट्ट्यावर विसावू या क्षणभर. हृदयाचे ठोके शांत केले पाहिजेत. घोटभर पाणी पिल्यावर जरा मन शांतावलं...
असं मनाचं मनाशी हितगुज करायला मजा येतेय. याआधी असं मी कधीच कसं नाही केलं? अर्थात तसा वेळ तरी होता का? सतत काम काम आणि फक्त काम करत तरी राहिले नाहीतर पुढचं काम काय करायचा त्याचा विचार तरी करत राहिले...
आज पेपरमध्ये आपल्या गावाच्या वेशीबाहेरच्या माळरानावर वणवा पेटलेली बातमी होती. त्या वणव्याच्या बातमीत मला माझं जळणारं घर दिसू लागलं. वय होतं जेमतेम तीन चार वर्षे. दंगलीत पेटलेला तो वणवा. आधीच आई हे जग सोडून गेली होती. बाबांनी सुगी झाल्यावर आम्हा बहिणींना नवीन कपडे आणले होते. आम्ही आई शिवाय साजरी करणार होतो ती दिवाळी. बालमनाला नवीन फ्रॉकचं अप्रूप होतं. ताई माझ्यापेक्षा दोन वर्षांनी मोठी होती. तिला फारसा आनंद झाला नव्हता पण मी फार खुश झाले होते, नवीन फ्रॉक बघून. तो घालून मला गोल गोल गिरक्या घ्यायच्या होत्या. पण कसचं काय. घराच्या जळण्यात ना तो फ्रॉक राहिला ना सुगीचे धान्य राहिले. मेल्यांनी सगळं जाळून टाकलं. एकदा सुद्धा मनात विचार आला नाही, बिना आईच्या या मुलींचं डोक्यावरचं छप्पर काढून घेतलं तर काय करतील त्या, कुठे जातील त्या? अंगावरच्या कपड्यांनीशी बाहेर काढलं. आजोबा बाहेर यायला नकार देत होते तर त्यांच्या सकट घरावर रॉकेलचे पेटते बोळे फेकले घरात. घाबरून बिचारे ते पण पळत बाहेर आले. रात्रीची वेळ, आजूबाजूला नुसता हलकल्लोळ माजला होता आणि पेटत्या घरांचे वासे पळायला रस्ता दाखवत होते. शत्रूवर देखील अशी वेळ येऊ नये कधी..
तसाच हलकल्लोळ आज माझ्या मनात माजलाय. माझ्या सगळ्या इच्छांची होळी झालीय. कसंही करून पेटणाऱ्या त्या भावनांना शांत केलं पाहिजे. नकोशा वाटतात अशा बातम्या वाचायला. तो फोटो आठवून देखील अंगावर काटा उभा रहातोय. मनातून हे घालवलं पाहिजे. उठून गेलं पाहिजे. जाऊ या घरात? नको नको अजून मारू की गप्पा थोडावेळ...
अरेच्चा, हे काय? किती ते गार, दचकायलाच झालं अगदी. झाडांना पाणी घालता घालता, पाईप सुटून पाणी गच्चीभर पसरलं की. पायाखालचं ते गार गार पाणी एकदम मनाला पण शांत करून गेलं. त्या आयुष्य कडवट करणाऱ्या आठवणीतून बाहेर पाडलं जणू आपल्याला..
निसरड्या फरशीवरून देह सांभाळत चाललं पाहिजे हे कळतंय पण मनाला सांभाळणं, सावरणं कठीण जातंय. हळूहळू मनात उसळलेला डोंब शांत होतोय मात्र...
बसूया तिथेच कट्ट्यावर पाय पाण्यात सोडून थोडावेळ. तळपायाची आग पाण्याच्या इवल्याश्या लाटांनी थंडावताना जाणवतेय...
अधांतरी तरंगत राहिलेल्या पायांना त्या थोड्या थोड्या वेळाने येणाऱ्या इवल्याशा लाटा जणू कुरवाळत होत्या...
लग्नानंतर वर्षभरातच विधवा झालेली मावशी नाही का आपल्या सगळ्यांच्या केसातून अशी हळुवार हात फिरवायची. आमच्या दोघींच्या आई बरोबरच एक मामी सुद्धा प्लेगच्या साथीची बळी पडली होती. तीन मामे बहिणी आणि एक भाऊ कन्हय्या. आम्ही सहाच्या सहा जण मावशीच्या अवतीभवती असायचो... जगाकरता वांझ असलेली मावशी अचानक आम्हा सहा जणांची आई झाली होती...
मावशीच्या हातचा तो पिठलं भात देखील पंचपक्वान्न वाटायचा. तिचं प्रेम त्यात ओसंडून वहात असायचं. कोणालाच कमी नाही की जास्त नाही. एकटा मामा पोस्टाची नोकरी करणारा, खाणारी इतकी तोंडं कशी काय पोसणार?
आम्ही एकेकीने काम करणं सुरू केलं. किडुकमिडुक कमाई सुद्धा त्यावेळी लाख मोलाची वाटायची...
किती समाधान मिळायचे त्यावेळी, अगदी तेच समाधान आत्ता या कुरवाळणाऱ्या लाटा मला देत आहेत. मनातला क्षोभ कमी करत आहेत... घरातून निघतानाची घालमेल कमी होताना दिसतेय...
पण बाईसाहेब उठा आता इथून पुढचा पल्ला गाठायचाय तुला. माझं मन मलाच सांगत होतं. उठले, गच्चीच्या काठाकाठाने चालत राहिले...
हळूहळू जाणवलं, मनातली पायवाट जरा दूर नेतेय, आडवाटेला. पण इलाज नाहीये. मागे पुन्हा बघायचं नाही आणि पुढे काय वाढून ठेवलंय ते आठवत रहायचं. किती त्या विलक्षण आठवणी. दर काही वर्षांनी आयुष्यात अचानक घडामोडी होत गेल्या तेव्हा समोर येईल त्या अडचणींना तोड देत गेले.
समोरच्या कुंडीत किती गोड फूल उमललंय पण हात देखील लावता येत नाहीये. आपल्या आजूबाजूला काटयांत गुंतवून घेतलंय त्यानं स्वतःला.
अशीच काहीशी परिस्थिति तर झाली होती आपली, जेव्हा शिक्षणाकडे पाठ फिरवली आणि समोर आलेल्या बिजवराच्या गळ्यात माळ घातली. भला मोठा वाडा, एकत्र कुटुंब. दोन जावा आधीच्या आणि अजून दोघांची लग्नं व्हायचीत आणि एकुलती एक लहान बहीण...
आपल्या उलट परिस्थिती. आपण पाच बहिणी एक भाऊ आणि इथे पाच भावात एक बहीण. इथेही आईवडील देवाकडं निघून गेलेले...
सगळ्या भावंडांचे राज्य. थोरामोठ्यांचं घराणं म्हणून खायला ददात नव्हती. पडेल ते काम तर मी करत राहिले. पण थकलेय आता. आठवलं तरी आश्चर्य वाटतं.
पाण्याचा नळ बंद केल्यावर गच्ची लगेच तापायला लागलीय आता. उन्हाचे चटके बसून पाय पोळू लागलेत. विसाव्याला पुन्हा झोपाळा जवळ करूया... मनाला, शरीराला आलेला थकवा, पक्ष्यांच्या चिवचिवाटाने, गुंजनाने हलकेच दूर होत होता. जवळच पक्ष्यांची जोडी आपल्या पिल्लांना भरवत होती, उडायला शिकवत होती, साठलेल्या पाण्यात बागडायला शिकवत होती. ती दोन पिल्लं पण आपल्या आईला बघून कशी पाण्यात पंख फडफडवत आहेत ना. मजा वाटतेय बघायला.
जसं घरात एकेकांची लग्नं, मुलं बाळं होत गेली तसा बाळलीला बघण्यात, त्यांच्याशी खेळण्यात कामाचा रगाडा वाटत नसे. मुलं आपली आपली खेळात मग्न असली की कधी कधी जाणवायचं, आई तू हवी होतीस. आईची आठवण नकोशी करायची. आई तू हवी होतीस ग, तुझ्या नातवंडांचे लाड करायला. माझ्या कामातून मी नाही वेळ देऊ शकत मुलांना, याची खंत वाटायची. मी वेळात वेळ काढायचा प्रयत्न करायचे. मुलांची प्रगती सुखावून जात असे. अजून अजून त्यांनी मोठं व्हावं, नाव कमवावं म्हणून त्यांचे लाड करू लागले...
विचार करता करता, झुलता झुलता थकव्याने ग्लानि आली. मग मी माझी राहिलेच नाही...
जे काही करायचं ते इतरांच्या पसंतीचं, इतरांच्या इच्छेला आपली इच्छा समजायची सवय लागली. नवऱ्याच्या समाजसेवेच्या व्यसनात मीदेखील हरवून गेले होते. समोरच्याच्या आनंदात मी आनंद मानत राहिले होते…
विसरून गेले होते मी मला. त्या ग्लानीमध्ये किती दिवस, किती वर्षं सरली तो विचारच मनाला शिवला नाही...
जाग आली तेव्हा संध्याछाया पसरू लागली होती. गोखुराची धूळ हवेत विरत चालली होती. सगळे पक्षी, पिल्ले आपआपल्या जागी स्थानापन्न होऊ लागले होते...
माथ्यावरून 'टुही टुही' शिळ ऐकू येत होती. जणू ते मलाच हाकारत होते. अरेच्चा हे तर रंगपंचमीच्या रंगात न्हाऊन आलेले पोपट दिसतायत. गच्चीच्या कठाड्यावर ओळीने बसलेत जणू शाळाच भरलीय यांची. यापूर्वी असे कधी बघितलेच नव्हते. 'अग यापूर्वी बागेत जाऊन कधी बसलीयेस अशी?' माझी मीच मला प्रश्न विचारू लागले...
लालबुंद डोकं आणि केशरी पिवळी चोच. किती गोड ते रूप. अंगावर देखील पंचमीचे हिरवे पिवळे रंग उधळलेले. चेहर्यावर खट्याळ भाव...
आठवण जागी होतेय ती मुलाने, सुनेने, जावयाने भारतभूमीवरची दाखवलेली अनेक ठिकाणं. प्रेमानं, हक्कानं फिरवून आणलेल्या बागा…
माझ्या पण डोळ्यात, मनात त्यावेळी असेच खुशीचे अनेकानेक रंग होते. प्रत्येक ठिकाणी काढलेले माझे फोटो नेहमीच माझ्या मनाला विलोभून टाकतात, त्या आठवणीत रंगवून टाकतात मला...
या रंगीत पक्षांना, रंगीत फुलपाखरांना सांगावं वाटतंय, 'बाबांनो असेच आनंदाचे रंग उधळत रहा. मला आज दाखवताय तसे इतरांना पण दाखवत रहा...
हळूहळू शरीराला रितेपण जाणवू लागलं होतं. मुलं मोठी होऊन दूर जाताना दिसत होती.
इतक्यात काही पक्षी परतीच्या वाटेवर चिवचिवाट करत जाताना ऐकू येऊ लागले...
दूरच्या मंदिरातून आरतीचा घंटानाद कानावर येऊ लागला... मुलांनी लहानपणी म्हणलेल्या परवाचाचे बोबडे बोल अजून वेळ झाली की कानात घुमतायत असा भास होतोय…
पोटात खड्डा पडलाय, रात्रीच्या पोटापाण्याचे विचार मनात घोंगावतायत. पण मी का विचार करतेय हे? मी तर या सर्वांना मागे टाकून बाहेर पडलेय आता. आता नको पुन्हा त्या पाशात गुंतायला. छान वाटतंय की असं इथं झुलत रहायला, मधेच गच्चीत फेऱ्या मारायला.
चालता चालता मधेच वाट चुकल्याची जाणीव होऊ लागली. कोपऱ्यात लावलेल्या लॉनवरची गवताची पाती पायाला गुदगुल्या करू लागलीत, आठवणी देऊ लागलीत...
नातवंडांचे पायात घुटमळणे, त्यांचे इवले इवले हात, बोबडे बोल, न संपणारे प्रश्न, आयुष्याबद्दलची उत्सुकता, सगळं सगळं कसं गमतीशीर होतं ..
मनात साठवलेले त्यांचे आवाज पुन्हा रितेपणाची कसर भरून काढू लागले. पुन्हा एकदा नातवंडांसाठी शरीरात तरतरी आल्याचे जाणवलं...
काय करू? घरी जायचंय मला? का पण? तिथेच पुन्हा अडकून पडले तर? आता नाही. आता बास. माझं मला उठलंच पाहिजे. माझी स्वप्नं मी बघितलीच पाहिजेत... कळत नाहीये आता कुठे जाऊ. हे शरीर थकलंय आता. मन अजूनही उत्साही आहे. काहीतरी वेगळं करण्याची उमेद आहे. पण काय करू तेच सुचत नाही...वातावरणात अंधार दाटून येऊ लागलाय. अचानक शेजारी नाजुक, लाडिक कुईकुई ऐकू येतेय. कोण बरं आहे माझ्या मागे? हा तर आपल्या राजा कुत्र्याचा आवाज. राजा? तू? इथे कसा काय? अरे लबाडा, तू शोधून काढलंस मला. आज तुला खायला मिळालं की नाही रे? अशी कशी तुला विसरले मी? माझी पाठराखण करत होतास काय? ये, असा जवळ ये माझ्या. तुझ्या पाठीवरुन हात फिरवू दे मला. इन मीन गेल्या चार वर्षातली जवळीक आपली. कोणीतरी नतद्रष्टाने तुला आईपासून तोडून माझ्या दारात आणून सोडलं आणि मी दोन वेळची तुझी भूक भागवली. इतकीच काय ती आपली साथ. पण तू मात्र खाल्ल्या घासाला जागलास. माझी साथ नाही सोडलीस...
असा नको रे मला अडकवून ठेवूस. मला जाऊ दे माझ्या मार्गाने. तू जा तुझ्या मार्गाने...
नाही म्हणतोस. मग काय करू या. अरे माझा पदर का ओढत चाललास? थांब थांब येते मी. हळू हळू चाल रे. पायऱ्या पळत उतरायची सवय राहिली नाही आता. अरे अरे, तू तर मला परत माघारी घेऊन चाललास. मला मुक्त व्हायचं आहे रे सगळ्या पाशातून. तिथे आता माझी गरज नाही. संपलं माझं कर्तव्य...
राजा तू अस्सा हट्टी आहेस ना. ऐक म्हणता ऐकणार नाहीच. बरं बाबा, तुझंच खरं. चल जाऊ तू म्हणशील तिकडे...
"हुश्श, आलीस बाई एकदाची. कधीची वाट बघतोय आई आम्ही तुझी. अशी न सांगता कुठे गेली होतीस?"
"असं काय ग आजी, वाढदिवस कोणा बरोबर साजरा केलास? आम्ही इथे तुझ्या आवडीचं काय काय करून ठेवलंय बघितलंस का? तुला आम्ही सरप्राइज देणार होतो ना."
नातवंडांचे ते गोड गोड बोल ऐकले आणि मनातली रितेपणाची भावना, एकाकीपण, मनातली स्वप्नं पुन्हा एकदा गाठोड्यात बांधून टाकली…
कुठेही गेले नव्हते बाळांनो, थोडावेळ रस्ता चुकले होते पण आता आले पुन्हा परत...
आयुष्याचं कोडं सोडवण्यासाठी बाहेर पडले होते, पण ते इथे घरात परत येऊनच सुटले होते…
माझं एक काम करता का? आजचा पेपर हवाय मला, कोडं सोडवायला. 'प्रीतिसंगम' शब्द आठवत नव्हता तो आठवला आत्ता. डोळ्यात उभे राहिलेले आनंदाश्रू लपवत मी उद्गारले.
"हृदयाचा हृदयाशी संवाद" हा प्रयोग आयुष्य बदलवून टाकतो असं आजपर्यंत ऐकलं होतं नुसतं, आज अनुभवलं...
--राजेश्वरी किशोर
May be an image of 1 person, ocean and text

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

पाचोळा - कुसुमाग्रज

कविता रसग्रहण    पाचोळा - कुसुमाग्रज आडवाटेला दूर एक माळ तरू त्यावरती एकला विशाळ आणि त्याच्या बिलगूनिया पदास जीर्ण पाचोळा पडे तो उदास उषा ये...