सोमवार, २७ ऑक्टोबर, २०२५

आठवणीतली_दिवाळी

 आठवणीतली_दिवाळी

कराडला आमचा वाडा आहे. शाळेत शिकत असताना वाड्यात साजरी केली जाणारी दिवाळी, तीच खरी आठवणीतली दिवाळी.
मला आठवते...
दिवाळी जवळ आली, की घर साफसफाई करण्यापासून सुरुवात व्हायची. घर स्वच्छ करण्यापेक्षा आई ज्या वस्तू टाकून देणार, त्यावर लक्ष असायचं; कारण सोप्पं आहे, त्यातल्या कित्येक वस्तूंचा उपयोग आम्हाला किल्ला करायला होणार असायचा.
स्वयंपाक घरातले हळदीचे, बिस्किटांचे डबे, हिंगाच्या डब्या, आपापल्या कपाटातल्या वह्यांची अभ्यासाची काही पानं, खराब झालेल्या संपलेल्या रिफील्स, पेन, एखादी पाईप आणि टाचण्या असं सगळं शोधून एकत्र करायचं, कशासाठी करायचं, तर किल्ला बनवण्यासाठी.
घर स्वच्छ करून टोपलीभर सामान बाजूला काढायचं, मग वाडा स्वच्छ करायला घ्यायचा.
त्यात सापडलेले कौलाचे तुकडे, विटांचे तुकडे आणि दगड... सगळं बाजूला काढायचं आणि हे सगळं वापरुन किल्ला करायचा. अशी आधीच किल्ल्याची तयारी करून ठेवायची. खरंतर दिवाळीच्या आधी सहामाही परीक्षा असायची, पण अभ्यास करण्यापेक्षा किल्ला करण्याचं आणि दिवाळी कशी साजरी करायची, हेच डोक्यात जास्त असायचं.
बाकी सगळं... फराळ करायला आईला मदत, कंदील बनवायला बाबांना मदत, रांगोळी, हार, नवीन कपडे... सगळं होत असायचंच. दुपारी बाबांनी आणलेले चांदोबा, किशोर आणि इतर दिवाळी अंक वाचन व्हायचं.
वाडा मोठा, त्यात चार पाच बिर्हाडं, भरपूर मुलांची गॅंग असायची.
पहाटे चारचा गजर लावून कोण आधी सुतळी बॉम्ब फोडतो, अशी पैज लागलेली असायची. झोपताना डोक्याजवळच काडेपेटी, अगरबत्ती, फटाके ठेवलेले असायचे.
घाटावर मंदिरात जायला सकाळी सहा वाजता तयार होऊन दरवाज्याच्या पायरीवर एकेकजण बसायचे.
एकत्र जमून कृष्णाबाईच्या मंदिरात जायचं, तिथंच आमचं शंकराचं मंदिर आहे आणि इतरही मंदिरं आहेत, त्या मंदिरांत जायचं, सगळ्या देवांना नमस्कार करून यायचं. कोणी ओळखीचं भेटलं, तर त्यांना नमस्कार करून यायचं आणि दिवाळीच्या शुभेच्छा देऊन यायचं.
घरी येईपर्यंत आईने फराळाची चार-पाच ताटं तयार करून ठेवलेली असायची. विशेषतः ही ताटं गल्लीतले अब्दुलकाका डांगे, इस्माईलभाई बागवान आणि त्यांचे दोन तीन भाऊ अशा सगळ्यांच्या घरी एकेक ताट द्यायचं. बाबा ते बघत असायचे, काय ताटात भरलंय, मग म्हणायचे 'अरे अब्दुल काकांच्या घरी चार चकल्या जास्त, यांच्या घरी चिवडा जास्त दे,' असं सांगून ताटं पाठवायचे. त्यांच्या घरी जाऊन ताट मात्र लगेच परत आणा, असं सांगायचे. 'उगाच त्यांना त्रास नको, आपलं ताट परत भरून द्यायला,' असं म्हणून ती ताटं द्यायला आम्ही मुलं मुलं प्रत्येकाच्या घरी जायचो. त्यांच्या घरी कधी कोणी चहा पीत असायचं, कारण सकाळची आठची वेळ असायची, गुळाचा पातळ चहा प्यायला द्यायचे.
आमचे भाऊ परीक्षा संपली, की किल्ला करणं सुरू करायचे. आम्हा बहीणींचा वरकामात हात असायचा. वस्तू आणून द्या, माती चाळून द्या, पाणी द्या... वगैरे.
किल्ल्यात शेवटचा मातीचा हात लिंपण करत असताना, त्याच्यातच मोहरी, जवस, आळीव किंवा धणे... सगळं त्यात घातलेलं असायचं आणि लिंपण केल्यानंतर त्याच्यावर रोज सकाळ-संध्याकाळ थोडं थोडं पाणी शिंपडायचं. दिवाळी संपेपर्यंत त्याला छोटे छोटे मोड येऊन हिरवी हिरवी पाती आलेली असायची. आणि ज्या काही वस्तू घर स्वच्छ करताना सापडलेल्या असायच्या, डबे-डुबे, त्यांचा उपयोग कुठं तलाव करायचा, कुठं बुरुज करायचे, मावळे ठेवायचे, मावळ्यांना ठेवायला सपाट जागा करायची, एखादा बिस्किटाचा मोठा चौकोनी डबा असेल तर तो उलटा पाडून त्याच्यावर शिवाजी महाराजांना बसायला सिंहासन तयार करायचं. असा मोठा किल्ला वाड्यात केला जायचा आणि रोज त्या किल्ल्याजवळ पणती ठेवायला जागा असायची. शिवाजी महाराजांसाठी मंदिर पण तिथे असायचं.
खरी दिवाळी असायची, ती दिवाळी झाल्यानंतरची…
सगळे जमवलेले फटाके, जे फुसकेबाज असायचे, ते सगळे एकत्र करायचे. मग कागदावरती सगळेजण मिळून ते फटाके उघडायचे, एक एक फटाका अलगद उघडून त्यातली सगळी दारू एकत्र करायची; मग सापडलेली जुनी रिफील घेऊन भाऊ त्यात बारीक काडीनं एकेका रिफीलमध्ये दारू भरायचे आणि हळू हळू हळू दाबत शिल्लक राहिलेली सगळी दारू त्या रिकाम्या रिफीलमध्ये भरायचे. रिफीलची मागची टोकं काडेपेटीच्या काडीच्या गुलने भरून टाकायची, दाबून टाकायची. पूर्ण ठासून भरल्यावर मग तिरक्या विटा एकावर एक लावून त्याच्यावरती ते तोफेच्या आकारात रिफील ठेवून, मागून काडेपेटीचा गुल भरलेला भाग पेटवायचा. गुल पेटला, की ज्या दिशेला त्याचं टोक असायचं, त्या दिशेला झूम करत बार एकदम उडायचा. ते रिफील कुठेतरी लांब उडायचं. असे फुसके फटाके जितके जास्त असतील, तितक्या जास्त तोफा उडायच्या. हे सर्वात आवडतं काम असायचं आमचं.
त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून सगळेजण थोडं थोडं फराळाचं घेऊन एकत्र भातुकली खेळायचो. एकमेकांच्या खाऊची वाटावाटी करून त्यात कांदा, टोमॅटो घालून भेळ करून, असं काही खाणं सुरू व्हायचं, ते घरातला फराळ संपेपर्यंत.
तुळशीचं लग्न होईपर्यंत किल्ला तसाच ठेवायचा. दोन-तीन बॉम्ब मात्र भावांनी लपवून ठेवलेले असायचे, कोणी पळवू नये म्हणून. तुळशीचं लग्न झालं रे झालं, की त्या किल्ल्यात दोन तीन गुहा केलेल्या असायच्या, त्या गुहांमध्ये बॉम्ब ठेवायचे आणि पेटवून द्यायचे... मग जो काही त्या बॉम्बमुळे धमाका होऊन, तो किल्ला तुटून त्याचे तुकडे तुकडे सगळीकडे विखरायचे; ते बघायला खूप मजा यायची. कोणाच्या बॉम्बनी किल्ला फोडला, कोणी किल्ला उडवला, या चर्चा करायला पण मजा यायची.
अशा प्रकारे दिवाळी साजरी व्हायची.
त्यावेळच्या दिवाळीच्या आठवणी निघाल्या, की किती लिहू असं होतं.
राजेश्वरी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

अनुभव_एका_पावसाचा

  अनुभव_एका_पावसाचा नुकतीच मी श्रीकांत सुनीताच्या घरी काही कारणाने जाऊन आले. गेट उघडलं तर समोर सुनीताला बघून मी म्हटलं, "अगं, किती छान ...